Water Pollution in Marathi : सध्या जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. माणसाच्या दैनंदिन मुलभूत सुविधांमुळेही जलप्रदूषण पसरत आहे. जलप्रदूषणाची समस्या जगातील सर्व देशांना विचार करण्यास भाग पाडते. पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. पाणी हा मानवी जीवनाचा आधार आहे, त्याशिवाय माणूस, प्राणी, पक्षी, कोणताही प्राणी जगू शकत नाही. आपल्या दैनंदिन गरजांसाठी आपण मर्यादित प्रमाणात पाणी वापरावे. पाणी प्रदूषित होऊ नये.

आज आपण या लेखामध्ये जल प्रदूषण प्रस्तावना मराठी तसेच जल प्रदूषण मराठी माहिती, जल प्रदूषणाचे उपाय, जल प्रदूषणाचे प्रकार, जल प्रदूषणाचे परिणाम, जल प्रदूषणाचे महत्त्व, जल प्रदूषणाची व्याख्या, जल प्रदूषणाची कारणे कोणती आहेत या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती-Water Pollution in Marathi
जल प्रदूषण

जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती – Water Pollution in Marathi

प्रदूषण म्हणजे काय?

मूळ लॅटिन शब्द ‘Pollutus’ म्हणजे अस्वच्छता, घाण करणे होय, ‘Pollutus’ शब्दावरून ‘Pollution’ हा शब्द आला. त्याला मराठीत ‘प्रदूषण’ म्हणतात. अशुद्ध हवा, अशुद्ध पाणी म्हणजे प्रदूषण होय, म्हणजेच शुद्ध हवा व शुद्ध पाण्याची जीवसृष्टीच्या निर्मिती व विकासाला आवश्यकता असते.

प्रदूषणाची व्याख्या मराठी

मानव, प्राणी व इतर जीवांना जगण्यास घातक ठरतील, अशा पदार्थांची, द्रव्यांची निर्मिती केल्याने ‘प्रदूषण’ निर्माण होते. अशुद्ध द्रव्ये, दुर्गंधी, विषारी घटक यांच्यामुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण २०.९५ टक्क्यांपेक्षा कमी होते. तसेच पाण्यातील प्राणवायूचेही प्रमाण कमी होते. त्यापासून आरोग्याला जी इजा प्राप्त होते, त्यालाच ‘प्रदूषण’ म्हणतात, पाणी, हवा, जमीन यांच्या प्रदूषणाबरोबरच ‘तीव्र प्रखर’ अशा ध्वनीच्या खडखडाटामुळे आवाजाचे प्रदूषण घडते. जोराच्या ध्वनी/आवाजामुळे कानठळ्या बसून बहिरेपणा येतो. अस्वस्थता निर्माण होते. म्हणजेच ध्वनिप्रदूषणही धोक्याचे ठरू लागले आहे.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषणाचे मुख्य प्रकार ४ पुढीलप्रमाणे आहेत –

  1. हवा प्रदूषण
  2. जल प्रदूषण
  3. मृदा प्रदूषण
  4. ध्वनी प्रदूषण

यांपैकी या लेखात आपण जलप्रदूषणाची माहिती करून घेणार आहोत.

पृथ्वीवरील पाणी

पृथ्वीवरील पाणी
पृथ्वीवरील पाणी

आपल्या पृथ्वीवर ७१ टक्के भाग सागरजलाने, तर २९ टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे. पृथ्वीवर ९ टक्के पाणी क्षारयुक्त (सागरजल), तर केवळ ३ टक्के गोडे पाणी उपलब्ध आहे.

३ टक्के गोड्या पाण्यापैकी २.१ टक्के पाणी हे बर्फ-हिमाच्या घनरूपात ध्रुवांवर व उंच पर्वतशिखरांवर आढळते. केवळ ०.९ टक्के गोडे पाणी हे नद्या, ओढे, तलाव, सरोवरे, धरणे, विहिरी यांद्वारे मिळते; जे पिण्यासाठी सजीवांना उपयुक्त आहे. एवढे कमी प्रमाणात उपलब्ध असणारे गोडे पाणी हे कारखानदारी, कचरा, रासायनिक खते इत्यादींमुळे दूषित होऊन पिण्यास अयोग्य होते.

जल प्रदूषणाची व्याख्या मराठी

जेव्हा पाण्याची चव बदलते. पाण्यातील पारदर्शकता व तापमान बदलते व पाण्याच्या वासात बदल होतो, तेव्हा ते पाणी दूषित झाले असे समजतात.

ज्या पाण्यात हानिकारक बाह्यपदार्थ मिसळतात, ते पाणी विषारी, अपायकारक असते. अशा अस्वच्छ पाण्याला ‘जलप्रदूषण’ म्हणतात.

जलप्रदूषण-Water Pollution
जलप्रदूषण

पाण्याच्या प्राकृतिक-रासायनिक मूळ गुणधर्मात बदल होतो. असे पाणी सर्व सजीवांना अपायकारक, घातक असते. पाणी प्रदूषित झाले की, पाण्यातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे) प्रमाण कमी होते.

थोडक्यात म्हणजे पाणी अस्वच्छ, घाण, विषारी, दुर्गधयुक्त बनते. त्यामुळे रोगराई पसरते, त्यालाच ‘प्रदूषित जल’ असे म्हणतात.

‘पाणी’ सर्व सजीवांना जगण्यास अत्यंत आवश्यक, असा महत्त्वाचा घटक आहे. पाण्याला आपण ‘जीवन’ म्हणतो.

एका माणसाला जगण्यासाठी दररोज कमीत कमी ५ लीटर पाण्याची आवश्यकता असते. गेल्या ४० वर्षांत जगात पाण्याचा वापर तिप्पट वाढला आहे.

४० वर्षांपूर्वीपेक्षा चालू काळात भारताची व जगाची लोकसंख्या जवळ जवळ दुप्पट वाढली असून, शेती, उदयोगधंदे, वसाहतीमधून पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे; पण पाण्याचे प्रदूषणही तितकेच वाढते आहे. त्यामुळे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे आवश्यक असूनही अवघड होत आहे.

जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती -Water Pollution in Marathi-infographics
जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती

जल प्रदूषणाची कारणे

पावसाचे पाणी जमिनीवर / भूपृष्ठावर साचते; त्यात जेव्हा विषारी, दूषित द्रव्ये मिसळतात, तेव्हाच ते प्रदूषित होते, म्हणजेच मानवी हस्तक्षेपामुळे पाण्याचे गुणधर्म व पाण्याची गुणवत्ता बदलते. असे प्रदूषित पाणी कुठल्याही वापरासाठी अयोग्य होते.

जलप्रदूषण-Water Pollution (1)

पाणी जल प्रदूषणाची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत

१. वस्तीतील टाकाऊ पदार्थ

शहरातील किंवा वस्तीतील केरकचरा, घाण, मैला, सांडपाणी, तसेच कारखान्यातील टाकाऊ पदार्थ व खनिज द्रव्ये ओढे, नदी, सरोवरे, तलाव, विहिरी यांच्या जलाशयात मिसळतात, तेव्हा असे पाणी पिण्यास वापरले तर आरोग्याला घातक असते. घरगुती कचऱ्यामुळे पाण्यात फॉस्फेटस्, नायट्रेटस् यांचे प्रमाण वाढते. विघटनामुळे पाण्यात कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते. प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या, काचा यांचे विघटन होत नाही. त्यांचे प्रमाण जलाशयात व सागरात वाढते व त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाला अडथळे निर्माण होतात.

वस्तीतील सांडपाणी जलाशयात मिसळते तेव्हा अशा घाण पाण्यावर डास, पिसवा, माश्या व इतर विषारी कीटके वाढतात व रोगांचा फैलाव होतो. त्यापासून हिवताप, मलेरिया, अमांश, जुलाब, क्षय, पोलिओ, त्वचारोग इत्यादी आजार निर्माण होतात. शहरी व ग्रामीण भागांत गटारांचे सांडपाणी हे सर्वांत जास्त घातक असते.

विषारी जलप्राशनातून शरीराची कार्यक्षमता घटते. बुद्धीची क्षमता मंदावते. घाण पाण्यातील जीवजंतू रोगांचा फैलाव करतात. कपडे धुण्यासाठी पाण्यात साबणाचा फेस मिसळतो. हा फेस पाण्यात शेवाळ वाढवितो. हे शेवाळ पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते. त्यातून मासे व इतर जलचर प्राण्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. घरगुती कचऱ्यामुळे पाण्यात नायट्रेटस् व फॉस्फेटचे प्रमाण वाढते.

२. कारखान्यातील विषारी टाकाऊ पदार्थ

कारखान्यातील रासायनिक विषारी पदार्थ पाण्यात मिसळतात. कातडे, रसायने, खते, कोळसा, साखर, रबर, कागद, लोहपोलाद, यंत्रनिर्मिती इत्यादींचे कारखाने पाण्याचा वापर भरपूर करतात व त्यातून निर्माण झालेले टाकाऊ, विषारी, दुर्गंधीयुक्त घाण पाणी आरोग्याला घातक ठरते.

जलप्रदूषण-Water Pollution (2)

काही उदयोग व त्यातून निर्माण होणारे प्रदूषक घटक :

उद्योगप्रदूषक घटक
चर्मोदयोग (कातडी उदयोग)सल्फाइड्स, फेनॉल्स, आम्ले, क्रोमियम
धातू उदयोगगाळ, क्षार, असेंद्रिय घटक
रबर उद्योगहायड्रोकार्बन्स, झिंक
रासायनिक कारखाने, औषधेआम्ले, अल्कली
खत कारखानेफॉस्फेट्स, फ्ल्युरॉइड्स
रंग उद्योगशिसे, पारा
कागद उदयोगक्लोरिन, क्षार
वस्त्र व रंगकाम उद्योगरंग, धातू, क्षार
मदयार्क (मळी कुजवणे)सेंद्रिय आम्ले
डी.डी.टी. कारखानेक्लोरिनयुक्त कीटकनाशके, आम्ले
फोटोग्राफीचांदी धातू
शीतपेय उदयोगसायट्रिक आम्ल
अणुऊर्जा प्रकल्पफ्ल्युरॉइड्स

औदयोगिक क्षेत्रात पारा, तांबे, जस्त, शिसे, क्रोमियम, कोबाल्ट, अर्सेनिक, बेरिलीयम, कॅडमियम, निकेल इत्यादी जड, विषारी धातूंचे प्रमाण जास्त असते.

काही उदाहरणे : मुंबईच्या सांडपाण्यामुळे माहिमची खाडी ‘डासांचे कोठार’ बनली आहे.

कारखान्यातून बाहेर पडणारे शिशाचे सूक्ष्म कण पाण्यात व हवेत मिसळतात. पाण्यातून अन्नात मिसळून शरीरात हे शिसे प्रवेशते. त्यामुळे लिव्हर व किडनीचा आजार होतो. तसेच रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते.

कारखानदारीतून बाहेर पडणारा ‘पारा’ हा दुसरा प्रदूषक पदार्थ आहे. पारा जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास अंग सुजणे, झोप न येणे असे आजार होतात. जपानमधील क्युशू बेटावर पाऱ्याच्या जलप्रदूषणातून ‘मिनामाता’ हा धोकादायक आजार होऊन अनेकजण मृत्युमुखी पडले (१९५३ ते १९६१). पाऱ्यामुळे गर्भात जन्मत: विकृती निर्माण होते.

दररोज सुमारे १८० द.ल. लीटर विषारी पदार्थ कोचीन औदयोगिक क्षेत्रातून पेरियार नदीमध्ये सोडले जातात.

डी.डी.टी. या क्लोरिनयुक्त घातक विषारी रसायनावर ग्रेट ब्रिटन, डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी इ. प्रगत देशांनी पूर्णत: बंदी घातलेली आहे. भारतात डासांच्या नाशासाठी डी. डी. टी. चा सर्वत्र वापर केला जातो. जगात डी. डी. टी. च्या वापराचे सर्वांत जास्त प्रमाण भारतात आहे. कारण भारतीयांच्या दैनंदिन आहारात ०.२५ मि.ग्रॅम डी.डी.टी.चे प्रमाण आढळते. हे प्रमाण धोक्याच्या पातळीच्या वर गेलेले आहे. त्यामुळे कावीळ, कॅन्सर यांसारखे रोग होतात. दिल्लीजवळच्या डी.डी.टी. कारखान्यामुळे दिल्ली ते आग्रा या दरम्यान यमुनानदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे वेगवेगळे रोग होतात.

कोलकाता शहरात हुगळी नदीच्या काठावर सुमारे १५९ उदयोगधंदे, नदीचे पाणी दूषित करतात. त्यातून कावीळ, विषमज्वर, गॅस्ट्रो, क्षय, कॉलरा इत्यादी रोग फैलावतात.

अलाहाबाद गंगा-यमुना यांच्या संगमामध्ये दर दिवसाला ११२ द.ल.लीटर्स दूषित द्रव्ये नदयांच्या पाण्यात मिसळतात.

सुमारे ८० टक्के जल-प्रदूषण हे कारखान्यांमुळे होते. त्यात रासायनिक उदयोग, कागद व कातडी उदयोग, रबर उदयोग, प्लॅस्टिक व धातू उदयोग, साखर उद्योग यांचा मुख्यतः समावेश होतो. कोणत्याही कारखान्याजवळून जाताना उग्र, घाण वास येतो.

कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांमध्ये तेल, वायू, धातूचे कण, प्लॅस्टिक, आम्ले, क्षार, डी.डी.टी. इत्यादींचा समावेश होतो.

३. शेतीसाठी जंतुनाशक व कीटकनाशकांचा अतिवापर

शेतीसाठी रासायनिक व कृत्रिम खतांचा वापर सर्वत्र वाढत आहे. पिकांचे भरपूर उत्पन्न मिळावे म्हणून शेतकरी रासायनिक खतांचा व पिकांवरील रोग-कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. रासायनिक खते जास्त प्रमाणात जमीन नापीक करतात. तसेच खतातील रासायनिक घटक पाण्यातून, हवेतून व अन्नातून मानवाच्या शरीरात प्रवेश करतात.

जंतुनाशक-Pesticides

क्लोरिनयुक्त कीटकनाशकांमध्ये डी.डी.टी., एन्ड्रिन, गॅमेक्झीन इत्यादींचा, फॉस्फरसयुक्त कीटकनाशकांमध्ये रोगोर, टिक्ट्रेटी, डायझोन, पॅरामार, क्लोरोथियॉन, बगमार यांचा व धातूंच्या रासायनिक कीटकनाशकांमध्ये कॉर्बोमेट, ट्रायअझॉईन, निकोटीनॉइट या विषारी प्रदूषकांचा समावेश होतो.

रासायनिक खतांमधील अनेक विषारी द्रव्ये वाहत्या पाण्याबरोबर जलाशयात, नदया, विहिरी, तलावात जाऊन मिसळतात. नायट्रोजन खताच्या अतिवापरामुळे पिकांमध्ये पोटॅशियमची कमतरता निर्माण होते, अतिरिक्त प्रमाणात अमोनिया पाण्यात मिसळल्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. माशांनाही कर्करोग होतो. कृत्रिम रासायनिक खते ही अशा प्रकारे सजीवांचे, जलचरांचे व जमिनीचे आरोग्य बिघडवतात म्हणजे जमिनी कडक, नापीक, विषारी, अनुत्पादक बनवतात. दूषित पाण्यामुळे जठर, आतडे यांचा कॅन्सर बळावतो.

पाण्यातून जर शरीरात १०० मिली, रक्तात ८० मायक्रोग्राम्स अर्सेनिक वाढले तर विषबाधा होते. जर पाण्यातून ४० मायक्रोग्राम्स शिसे रक्तात मिसळले तर मेंदूचे आजार बळावतात. (१००० मायक्रोग्राम्स = १ मिली ग्रॅम) लहान मुलांमध्ये शिशाच्या विषबाधेमुळे मेंदूला इजा होते. मूत्रपिंड निकामी होते.

काहीजण दुधाला फॅटनेस वाढावा, दूध घट्ट होऊन त्याला चांगला दर यावा म्हणून दुधात युरिया मिसळतात व असे दूध शरीराला घातक ठरते. म्हणून ही विकृती नष्ट करणे गरजेचे आहे. या प्रकारावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. हल्ली फळे लवकर पक्व व्हावीत, पिकावीत, पालेभाज्यांचे उत्पादन वाढावे म्हणून त्यावर रासायनिक कीटकनाशकांचा फवारा करतात. अशी फळे व अशा पालेभाज्या शरीराला घातक ठरतात. पाण्यातून अन्नात, धान्यात भेसळ करणे हाही गुन्हा आहे.

विषारी रासायनिक घटक जर शरीरात मर्यादेपेक्षा जास्त वाढले तर त्याचा रंगसूत्रावर वाईट परिणाम होतो व त्यातून अनुवांशिक विकृती निर्माण होते. भारतातील गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा इत्यादी नदयांचा ‘प्रदूषित नदया’ म्हणून नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण संस्थेने उल्लेख केलेला आहे. या नदयांच्या प्रदूषणामुळे ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आजारी पडतात किंवा अकार्यक्षम, अशक्त बनतात. नदयांच्या काठावरील कारखान्यांमधील टाकाऊ पाणी नदयांमध्ये सोडले जाते.

अनेक शहरे व ग्रामीण वस्त्यांमधील गटारांची घाण ही ओढे, नदयांमध्ये सोडतात, त्यातून रोगांचा प्रसार होतो व जीवितहानी होते. प.बंगालमधील दामोदर, हुगळी व कर्नाटकातील कावेरी नदयांमध्ये कारखानदारीतील टाकाऊ पदार्थ पाण्यात मिसळतात व त्यामुळे नदयांच्या मुखालगत जलचर प्राणी व मासळीवर विपरित परिणाम होतो. माशांची संख्या घटते. त्यामुळेच मत्स्योत्पादन घटू लागले आहे.

४. भारतातील काही नद्यांचे जलप्रदूषण

जलप्रदूषण-Water Pollution (3)

नदी प्रदूषणाची कारणे

  1. गंगा नदी – हरिद्वार – भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (BHEL) कारखान्यातील प्रदूषके पाण्यात मिसळतात, अलाहाबाद, वाराणसी, हरिद्वार येथे अर्धवट जळलेली प्रेते नदीच्या पाण्यात सोडतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते, पाणी रोगट होते. शहराजवळ फूलपूरच्या खत कारखान्यामुळे नदी प्रवाह प्रदूषित होतो.
  2. जमुना नदी – दिल्लीजवळ मथुरा तेलशुद्धीकरण कारखाना, डी.डी.टी कारखाना व औष्णिक विद्युत केंद्रांमुळे नदी प्रदूषित होते. जमुना नदीच्या प्रदूषणामुळे १९५५-५६ ला दिल्लीत काविळीची साथ पसरली होती.
  3. हुगळी नदी – कोलकाता या शहराजवळ हुगळी नदीकाठी अनेक कारखाने आहेत.त्यामुळे ताग, कागद, रंग, रसायने, धातू, रेयॉन, साबण, पालिथिन उदयोग इत्यादी कारखान्यांचे पाणी नदीत मिसळून जलप्रदूषण होते.
  4. गोमती नदी – लखनौ शहराजवळ कागद व लगदा उदयोगामुळे ही नदी प्रदूषित होते.
  5. नर्मदा नदी – मध्यप्रदेशात कागद कारखान्यांमुळे नदी प्रदूषित होते.
  6. दामोदर नदी – नदीकाठी असलेले खत व लोह कारखाने, औष्णिक विदयुत केंद्रे इ. दामोदर नदीचे पाणी प्रदूषित करतात.
  7. चंबळ नदी – मध्यप्रदेशात या नदीकाठी असलेल्या कॉस्टिक सोडा व रेयॉन उदयोगांमुळे नदीचे जलप्रदूषण घडून येते.
  8. कावेरी नदी – तामिळनाडूमध्ये या नदीकाठी मदयार्क, कागद, रेयॉन व कातडी कमविण्याचे उदयोग आहेत. त्यामधील टाकाऊ पाणी नदीत मिसळते व प्रदूषित होते.
  9. भद्रा नदी – कर्नाटकात या नदीकाठावरील स्टील व कागद उदयोग हे नदीचे जलप्रदूषण करतात.
  10. गोदावरी नदी – या नदीकाठी अनेक कागद उद्योग आहेत व त्यामधील टाकाऊ पाणी नदीत मिसळून नदी दूषित होते. थोडक्यात नदयांच्या काठावरील वस्त्यांमधून वाहणाऱ्या गटारांचे सांडपाणी, मलमूत्र पावसाबरोबर नद्यांत मिसळते. याच नद्या पुढे समुद्राला मिळतात त्यामुळे सागरी जलप्रदूषण होते.

प्लॅस्टिक व टाकावू कचरा, काचा

निरुपयोगी टाकाऊ प्लॅस्टिकच्या वस्तू, अनेक औषधी टाकावू पदार्थ हे जलाशयात व सागरात टाकले जातात. प्लॅस्टिकच्या पिशव्या व वस्तूंचा कचरा सागरजलावर व इतर जलाशयांमध्येही तरंगतो. त्यामुळे सूर्याच्या उष्णतेने होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाला अडथळे येतात व जलचक्र पूर्ण होत नाही.

५. सागरी प्रदूषण

सागरामधून मीठ मिळते, तसेच अनेक सागरी जलचर प्राणी हे मानवाच्या अन्नाची गरज पूर्ण करतात. विविध प्रकारचे मासे हे सागरातून व जलाशयातून मिळतात. या माशांपासून अन्नाप्रमाणेच अनेक उपयुक्त औषधी द्रव्ये निर्माण करतात. सागरीजल प्रदूषणामुळे जगभर माशांचे उत्पादन घटत चालले आहे.

सागरी प्रदूषण
सागरी प्रदूषण

अनेक वेळा सागरजलात खनिज तेलाचे टँकर फुटून पाणी प्रदूषित होते. हजारो जलचर प्राणी व मासे त्यामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक ठिकाणी सागरकिनाऱ्यालगत तेलशुद्धीकरण कारखाने उभारलेले आहेत. या तेलशुद्धीकरण कारखान्यांमधून खनिज तेल (पेट्रोल) शुद्धीकरण केले जाते. या कारखान्यातून बाहेर पडणारे अनेक विषारी पदार्थ व रासायनिक द्रव्ये जीवसृष्टीसाठी धोकादायक आहेत.

तेलवाहू जहाजांमधून जहाजांची साफसफाई करताना व बंदरात जहाजावर तेलाची चढ-उतार करताना खनिज तेल समुद्रात पडते व त्याळे मासे व अन्य जलचर प्राणी मरतात. खनिज तेल विहिरींचे सागरतळावरच खोदकाम करतात. तेव्हाही तेल सागरजलात मिसळते.

१९६७ मध्ये टेरिकॅन्चन या तेलवाहू नौकेला ब्रिटनच्या किनाऱ्यावर अपघात झाला. १९६९ ते १९८३ या काळात पर्शियन आखात ५०० हून अधिक तेलवाहू जहाजांचे भयानक अपघात झाले. १९७९ मध्ये मेक्सिको आखातात झालेल्या अपघाताने तेलवाहू जहाजामधून ८ ते ९ महिने तेलगळती झाली. १९८७ मध्ये मुंबईजवळ बॉम्बे हायमध्ये तेलवाहू जहाजाला अपघात झाला. १९८९ मध्ये मुंबईच्या नैर्ऋत्येला दोन तेलवाहू जहाजांची टक्कर झाली; त्या जहाजांच्या अपघाताने समुद्रात खनिज तेल मिसळून अनेक जलचर प्राणी मरण पावले व मोठे नुकसान झाले.


जल प्रदूषणाचे परिणाम

जलप्रदूषणाचे अत्यंत गंभीर परिणाम होतात. वरील विवेचनात जलप्रदूषणामुळे अनेक दुर्धर रोगांच्या साथी पसरतात. सजीवांचे आरोग्य धोक्यात येते, हे आपणास समजून आले आहे. येथे आपण जलप्रदूषणाचे काही प्रमुख परिणाम समजून घेणार आहोत.

जलप्रदूषण-Water Pollution (5)

१) जलप्रदूषणामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होतो व त्यामुळे जलचर प्राणी, मासे व पाणवनस्पती नष्ट होऊ लागतात. जलपरिसंस्था संकटात येते. पाण्यात अतिरिक्त प्रमाणात अमोनिया वाढला तर जलचर प्राणी, मासे इत्यादींना कर्करोग होतो. पाण्यात प्रदूषणामुळे वनस्पती वाढू शकत नाहीत व पाण्याची क्षारता वाढते.

२) संडास व मलमूत्राचे सांडपाणी हे जास्त प्रमाणात जल दूषित करते. मानवी विष्ठेतील शिगेला व सालमोनेला यांसारख्या रोगजंतूंचा पिण्याच्या पाण्यात (विहिरी, ओढे, तलाव इत्यादी) शिरकाव होतो व त्यातून ज्वर, कावीळ, अतिसार, डोकेदुखी, आतड्यांचे विकार इ. वाढतात.

३) प्रदूषित पाण्यामुळे सजीवांची प्रतिकार शक्ती क्षीण होते. आरोग्य बिघडते व सजीवांची पुनरुत्पादन प्रक्रिया मंदावते, प्रदूषित पाण्यामुळे माणसाला पचनसंस्थेचे विकार होतात. पटकी, कॉलरा, कावीळ, सर्दी, खोकला, अतिसार, विषमज्वर इत्यादी आजार माणसाला दुबळे करतात. रक्तात जड धातूंचा शिरकाव झाल्यामुळे रक्तातील प्राणवायू (ऑक्सिजन) चे प्रमाण कमी होऊन रोग जडतात. जल प्रदूषणामुळे नदयांकाठी अनेक वस्त्यांमध्ये रोगांच्या साथी पसरतात.

४) ‘पाणी’ हा सर्व सजीवांचा, सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तेच पाणी निर्मालके, रासायनिक खते इत्यादींमुळे दूषित होते.

५) नदयाकाठी जलप्रदूषणामुळे घाण, केरकचरा, मैला इत्यादींच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या अस्वच्छ पाण्यावर डास, पिसवा, माश्या इत्यादी विषारी कीटक वाढतात व त्यापासून खरुज, नायटे, नारू, जुलाब, क्षय, पोलिओ, हिवताप, मलेरिया, अंधत्व इत्यादी आजार निर्माण होतात.

६) शेतीसाठी वापरल्या गेलेल्या अतिरासायनिक खतांमुळे, कीटकनाशकांमुळे पावसाळ्यात शेतीतील दूषित पाणी जलसाठ्यात मिसळते व ते आहारातून वा पाणी पिण्यामुळे मानवी शरीरात पसरते. डी.डी.टी. या स्वस्त कीटकनाशकामुळे मलेरिया नियंत्रणात येतो; पण त्यामुळे कॅन्सरसारखा आजार होतो. म्हणून डी.डी.टी. वापरावर पूर्णत: बंदी घातली पाहिजे.

7) शेतीत जास्तीत जास्त उत्पादन मिळावे, या हेतूने शेतकरी जास्त रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके वापरून उत्पन्न मिळवतात; पण ते शेत त्या शेतीतील जमीन-माती निरुपयोगी, अनुत्पादक होते, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक, क्षारयुक्त, कडक व निरुपयोगी होतात.

रासायनिक पिके, फळे, भाज्यांना चव तर नसतेच, पण त्यांच्यातील सत्त्वांचाही अंश कमी होतो. म्हणून जमीन रोगकारक, नापीक, अनुत्पादक बनवू नका अन्यथा अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल, विषारी द्रव्यांची अन्नसाखळी निर्माण होऊन सर्वच प्राणी, वनस्पती व माणसांमध्ये रोगांमुळे क्षीणता वाढत आहे.

रासायनिक खतांमुळे शेती उत्पादनाचा कस घटतो. गुणवत्तेचा दर्जा ढासळतो, हायब्रीडीकरणामुळे बियाणे खराब, बेचव बनते. ग्रामीण भागात सुपरफॉस्फेट, युरिया, पोटॅश, जमिनी क्षारयुक्त होतात व जमिनीतील नायट्रेटस् इ. खतांमुळे उपयुक्त जीवाणू, गांडूळ, बुरशी यांचा -हास करतात.

शरीरातील आतड्यांत नायट्राईट्सपासून मेटाहिमोग्लोबीन हा घातक घटक तयार होतो व त्यामुळे रक्तातील प्राणवायू (ऑक्सिजन) वहन थांबते. अनेकांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आढळते व अशक्तपणा येऊन लोक दगावतात. हे प्रमाण भारतात राजस्थानात जास्त आढळते, क्षारयुक्त नायट्रेट्स्ची विषबाधा होते.

८) कारखानदारीतील रासायनिक विषारी पदार्थ, तसेच निर्मालके (डिटर्जंट्स) पाण्यात मिसळतात व रोगांच्या साथी पसरतात, विघटन न होणारा प्लॅस्टिकचा कचरा जलाशयावर तरंगतो व बाष्पीभवनाला अडथळे येऊन जलचक्र धोक्यात येते. प्रदूषित पाण्यात शिसे, क्रोमियम, कॅडमियम, सायनाईट ही विषारी द्रव्ये मानवी शरीरात विकार निर्माण करतात, अर्धांगवायू, मूत्रपिंडाचे विकार बळावतात. प्रदूषित पाण्यामुळे जनावरांना व इतर जीवांनाही आजार होतात.

गंगानदीच्या काठावर १३२ पेक्षा जास्त कारखाने आहेत. त्यात उत्तरप्रदेशात एकूण ८६ कारखान्यांमध्ये ५९ कातडी कमविणारे व नदीचे प्रदूषण वाढविणारे आहेत. यमुना नदीच्या पाण्यात दर दिवशी सुमारे ५१,५०० किलो लीटर्स दूषित द्रव्ये व १५० टन सेंद्रिय पदार्थ नदीत मिसळतात. दिल्ली दुग्ध योजना व इतर उदयोगांमुळे दिल्लीच्या अशोक विहारसारख्या वस्तीत सर्वात जास्त जलप्रदूषण घडून येत आहे.

चंबळ नदीचे पाणी कोटा शहराच्या परिसरातील औष्णिक विद्युत केंद्रांमुळे व श्रीराम रेयॉन, जे.के. सिंथेटिक इत्यादी उदयोगांमुळे अतिप्रदूषित झाले आहे. एकाच वेळी लाखो भाविक या पवित्र नदयांमध्ये स्नान करून प्रदूषण करतात. कुंभमेळा व इतर धार्मिक उत्सवात पंढरपूर, काशी, प्रयाग, नाशिक, रामेश्वर इत्यादी ठिकाणी लाखो भाविक स्नान करतात व साथीच्या रोगांना बळी पडतात,

९) पाण्यावर तेल व कार्बनयुक्त पदार्थ तरंगतात व त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया थंडावते व प्राणवायूचा तुटवडा निर्माण होतो. वनस्पतींची, पिकांची, फळाफुलांची, पालेभाज्यांची वाढ थांबते. कारण दिवसा सूर्यप्रकाशात वनस्पती आपल्या पानांद्वारे प्राणवायू बाहेर टाकतात व कार्बनडाय ऑक्साइड वायूचे शोषण करतात. (कार्बन चक्र : प्रकाश-संश्लेषण)

१०) विघटनशील व अविघटनशील घनकचऱ्यामुळे पाणी दूषित होते. अनेक औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून उष्ण पाणी, जास्त तापलेले पाणी जलाशयात मिसळून पाणी प्रदूषित होते.

११) सेंद्रिय पदार्थांच्या विघटनामुळे पाण्यात विविध प्रकारची प्रदूषके निर्माण होतात.

१२) भारतात तारापूर (महाराष्ट्र), काक्रापारा (गुजरात), कोटा (राजस्थान), नरोरा (उत्तरप्रदेश) यांसारख्या अणुविदयुत शक्ती निर्मिती केंद्रांजवळ किरणोत्सर्जनाचे प्रमाण जास्त असते. या किरणोत्सर्जनातून सजीवांवर दुष्परिणाम होतात. अणुभट्टीचा स्फोट झाला तर किरणोत्सर्जनातून बाहेर पडणारे विषारी पदार्थ हे कित्येक कि.मी. अंतरापर्यंतचा निसर्ग व त्यातील प्राणी, मानव, वनस्पती उद्ध्वस्त करून टाकतात.

किरणोत्सर्जनामुळे आतडे, फुप्फुसांचे आजार बळावतात. अंधत्व येते. अनेक प्रकारच्या विकृती निर्माण होतात. १९८६ मध्ये रशियात चेर्नोबील अणुशक्ती केंद्राचा भयंकर स्फोट झाला. त्याचा परिणाम त्यानंतर सुमारे ५० वर्षे जाणवला. जीवितहानी, शरीरे दुबळी होणे, रोगट होणे, अपत्ये मतिमंद व दुर्बल निर्माण होणे इत्यादी परिणाम बघायला मिळाले.

१३) पंजाब, हरियाणा येथील औदयोगिक क्षेत्रात वुलनचे कपडे व स्वेटर्स, सायकली निर्माण होतात. त्यांची अंबाला, लुधियाना, सोनिपत ही महत्त्वाची केंद्रे आहेत. तेथील तलाव, नदयांच्या पाण्यात तेथील उदयोगातील निकेल, लोह, क्रोमियम, सायनाईड, तांबे इत्यादी विषारी घटक मिसळतात व पाणी दूषित होते. भारतात साखर कारखाने, कापड गिरण्या, लोहपोलाद यंत्रनिर्मिती इ. उदयोग यामुळे परिसरातील जलसाठे व जलप्रवाह प्रदूषित होतात.

१४) युरोपमध्ये हाईन नदी ही आठ देशांची जीवनवाहिनी आहे; पण ती नदी कारखानदारी प्रदूषणामुळे युरोपचे उघडे गटार बनली आहे.

१५) दूषित पाण्यामुळे सजीवांच्या, प्राण्याच्या अवयवांवर विपरित परिणाम होतो. हृदय, मूत्रपिंड, जठर, मेंदू, स्नायू या अवयवांमध्ये बदल होतात. हे हे अवयव निकामी होतात.

१६) मॅलेथिऑन, बी.एच्.सी.,फ्युराडॉन, सुमिथिऑन या कीटकनाशकांचा गोगलगाय, मासे, बेडूक, झिंगे इत्यादी प्राण्यांवर दुष्परिणाम होतो. जलचर प्राण्यांच्या वर्तनात बदल होतो. जलप्रदूषणाने माणूस व इतर प्राणी ही अस्थिर, अस्वस्थ बनतात. सजीवांमधील प्रदूषणामुळे जननेंद्रिये निकामी होतात व प्रजननक्षमता घटते. वंशवृद्धीला अडथळे येतात. अधू, विकृत अपत्ये जन्माला येतात. कीटकनाशकांचा हा सर्वांत गंभीर परिणाम होय.

१७) सेंद्रीय फॉस्फरसयुक्त कीटकनाशकांमुळे उलट्या, मळमळणे, झटके येणे, घाम येणे, जुलाब इत्यादी आजार होतात.

१८) सध्या जगात एक हजाराहून जास्त कीटकनाशके, तृणनाशके, कृमिनाशके, उंदीरनाशके वापरली जातात. दरवर्षी जगात ५ लाख टनाहून जास्त कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि त्यामुळे जलप्रदूषण जास्त प्रमाणात घडून येते.

१९) जगात शिशामुळे सजीवांवर अनेक दुष्परिणाम होतात. पाण्याद्वारे शरीरातील रक्तात शिसे मिसळून रक्तातील हिमाग्लोबीन या उपयुक्त घटकाच्या निर्मितीवर त्याचा परिणाम होतो व हिमोग्लोबीनमध्ये घट घडून येते. शिशाच्या विषबाधेमुळे मेंदूला इजा पोहोचते. बधिरता, मंदपणा येतो. तसेच जलप्रदूषणामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाणही कमी होते.


जल प्रदूषणाचे उपाय

जलप्रदूषणावरील प्रभावी उपाय

पाणी दूषित, गढूळ व अस्वच्छ होऊ देऊ नये, जल ‘निर्मळ’ म्हणजेच पाणी शुद्ध पाहिजे, अशा स्वच्छ पाण्याला आपण ‘अमृत’ म्हणतो. पाण्याला ‘जीवन’ म्हटले जाते, याचा उल्लेख सुरुवातीलाच आला आहे. कारखानदारी, शेती क्षेत्रात रसायनांचा वापर, वसाहत किंवा वस्तीतील मलमूत्र, कचरा व इतर गटारांमधील टाकाऊ पाणी अशा अनेक कारणांमुळे पाणी दूषित होते. वाढत्या लोकसंख्येमुळेही अन्न-पाण्याची कमतरता निर्माण होते.

पाणी हे विहीर, तलाव, जलाशयातील असो किंवा ओढे, नाले, नदया, कालवे, धरणात साचलेले असो, हे पाणी शुद्ध कसे राहील, प्रदूषित होणार नाही किंवा प्रदूषित झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करून, ते शुद्ध करून कसे घ्यावे इत्यादींबद्दल अनेक उपाय केले जातात. त्यातील काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत –

१) औदयोगिक क्षेत्रात कारखान्यात वापरून बाहेर पडणारे दूषित टाकाऊ पाणी हे शुद्ध करावे व त्याचा पुनर्वापर करावा, औदयोगिक सांडपाण्यातील पारा, शिसे व इतर विषारी पदार्थ बाजूला काढावेत व नंतर सांडपाण्याचा वापर करावा, नागपूरची ‘नेरी नावाची संस्था ही विषारी पाणी शुद्ध कसे करावे, प्रक्रिया कशी करावी व टाकाऊ पदार्थांपासून खत कसे तयार करावे, याबद्दलचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करते. पोलाद कारखान्यातील टाकाऊ पाण्यातील विषारी शिसे व गंधक हे पदार्थ पाण्यातून बाजूला काढावेत. कारखान्यातील जड धातूंचा पाण्यातून शरीरात प्रवेश होतो; तेव्हा हे वेगवेगळे जड धातू शरीरामधील रक्तातील प्राणवायू कमी करतात. त्यामुळे वेगवेगळे रोग जडतात.

२) कारखान्यातील सांडपाणी समुद्रात किंवा नदीत सोडू नये, ते स्वतंत्रपणे साठवून, त्यावर प्रक्रिया करून नंतर ते उपयोगात आणावे. ३) दूषित पाण्यातील घटकांचे भस्मीकरण करण्यासाठी अनेक रासायनिक सहाय्यकांचा उपयोग करतात. उदा. पोटॅशियम परमँग्नेट (kMnO.), ओझोन (O), हायड्रोजन पेरॉक्साइड (H.O.) यांच्या वापरातून पाणी स्वच्छ-निर्जंतुक करतात.

४) पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा व क्लोरिनचाही उपयोग करतात. हा उपयोग तज्ज्ञांनी ठरवून दिलेल्या प्रमाणात करावा. त्यामुळे रोगजंतू नष्ट होतात. भारतात गुजरातमध्ये बडोदा येथे सांडपाणी व औदयोगिक कचरा, घाण यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे.

५) शहरातील वस्त्यांमधील सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करून मगच ते नदीत सोडावे किंवा शेतीस वापरावे.

6) शहरातील व ग्रामीण भागातील वस्त्यांच्या गटारातील मैला, सांडपाणी नदी-ओढ्यांमध्ये सोडू नये. ते स्वतंत्र साठवावे व प्रक्रिया करून मगच पुन्हा वापरावे. मलमूत्र, मैला, त्याज्य पदार्थ, घाण यावर प्रक्रिया करावी.

7) विहिरी, नदया, सरोवरे, पाण्याच्या टाक्या इत्यादींमधील पिण्याच्या पाण्याचे सतत परीक्षण करावे. तपासणी करावी.

8) सर्वच कारखानदारीच्या क्षेत्रात, उदयोगक्षेत्रात कोळसा, पेट्रोल (खनिज तेल) यांच्याऐवजी पर्यायी इंधनशक्तीचा, जलविद्युत शक्ती, पवनचक्की, ऊर्जा व सोलर (सौर) शक्तीचा वापर करावा.

९) शहरे व वस्त्यांमधील कचरा नदीकाठी किंवा समुद्रात टाकू नये. हा कचरा, कुजलेला भाजीपाला व इतर टाकाऊ घटकांवर प्रक्रिया करून त्यावर जैविक खते, कंपोस्ट खते निर्माण करावीत.

१०) शेती, फळे, भाजीपाला इ.साठी रासायनिक खते व कीटकनाशके वापरू नयेत. त्याऐवजी शेणखत, गांडूळ खत, जैव खत इ. नैसर्गिक खतांचा वापर करावा.

११) औदयोगिक क्षेत्रे व वसाहती, ग्रामीण, शहरी वस्त्यांमधील टाकाऊ सांडपाणी योग्य प्रक्रियेने शुद्ध करावे व त्याचा उपयोग बागबगीचे, फळे-पालेभाज्यांच्या शेती व वृक्षांसाठी करावा.

१२) विषारी अशुद्ध पाणी चाळण्यांमधून गाळावे. पातळ पडदे, गाळ, वाळू इत्यादींचा त्यासाठी वापर करावा.

१३) पिण्याच्या पाण्याचा दर्जा व शेतीच्या पाण्याचा दर्जा दर दिवशी तपासावा व गावोगावी प्रदूषण मापन यंत्रणा उभारावी. पाण्याचा वापर नियोजनाने करावा.

१४) सर्वत्र सांडपाण्याचा वापर शेती व वनस्पतींसाठी करावा.

१५) पाणी वापरावर कायद्याने नियंत्रणे व निर्बंध घालावेत. शहरांमध्ये वस्त्यांसाठी, उदयोगांसाठी व शेती क्षेत्रात पिकांसाठी अमर्याद पाणी
वापरण्यावर बंधन घालून योग्य ती मर्यादा घालावी. पाण्याचा मनमानी वापर थांबवावा.

१६) ग्रामीण व शहरांनजीकच्या साखरकारखान्यांचे वापरलेले पाणी सांडपाणी व मळीपासून प्रदूषण होऊ नये म्हणून त्या सांडपाण्यावर, मळीवर प्रक्रिया करण्याची सोय सक्तीची व बंधनकारक करावी.

१७) सर्व लोहपोलाद कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यातील गंधक व शिसे हे पदार्थ बाजूला काढावेत.

१८) मैला, मलमूत्र, कचरायुक्त सांडपाणी व प्रदूषित पाणी शुद्ध करणारी यंत्रणा बसवावी. जलशुद्धीकरणासाठी, दूषित पाणी हे उथळ तळ्यात सोडतात व त्यावर शैवाल व जीवाणूंमार्फत शुद्धीकरण करतात. या खुल्या उथळ तळ्यांमध्ये सूर्यप्रकाशात पाण्यात शैवाळ वाढते व दूषित पाण्यातील सेंद्रिय घटकांचे विघटन सूक्ष्म जीवाणूंमार्फत केले जाते. या प्रक्रियेला भस्मीकरण तळ्यांमार्फत होणारे जलशुद्धीकरण म्हणतात. भस्मीकरण तळी म्हणजेच Oxidation Ponds होत. काही वेळेला पाण्यात ऑक्सिजन सोडतात. पाणी घुसळल्याने किंवा मिसळल्याने पाण्याच्या शुद्धीकरणास चालना मिळते.

१९) पाण्यात प्रामुख्याने तुरटी (अॅल्युमिनियम सल्फेट), फेरिक सल्फेट, फेरस सल्फेट (FeSO, TH,O) हे घटक मिसळल्याने दूषित घटकांचा गाळरूपी थर पाण्यात तळाला निर्माण होतो. या प्रक्रियेला साकलीकरण (Coagulation) असे म्हणतात,

२०) पाण्यातील घाण वासयुक्त वायू व द्रवाचे कण (रेणू) शोषण करण्यासाठी अॅक्टिव्हेटेड कार्बनचा वापर करतात व पाणी शुद्ध केले जाते.

२१) मृत माणसांची अर्धवट जळालेली प्रेते नदी-ओढ्याच्या पाण्यात टाकू नयेत. त्यासाठी उपलब्ध असलेल्या विदयुतवाहिन्यांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करावा किंवा प्रेते जाळण्याऐवजी पुरावीत म्हणजे त्यांच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून नैसर्गिक खत उपलब्ध होईल.

२२) कोठेही केरकचरा पाण्यात टाकू नये, केरकचरा जाळून टाकावा किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्माण करावे.

२३) शेतीसाठी रासायनिक कीटकनाशके, जंतुनाशके यांचा वापर कमी करावा किंवा आवश्यक तेथेच करावा, किंवा वापर करणे पूर्णपणे टाळावे. शेतीच्या मातीत कोणते घटक सुपिकतेला उपयुक्त आहेत, याची माहिती करून घ्यावी व त्याप्रमाणे त्या घटकांच्या वाढीसाठी व मातीचा कस कायम टिकून राहण्यासाठी सतत प्रयत्न करावेत.

२४) प्लॅस्टिक कचऱ्यापासून रस्त्यावर पसरण्याचे डांबर निर्माण करावे, प्लॅस्टिक, काच, थर्मोकोल, पाणी पिण्याच्या बाटल्या यांच्यावर प्रक्रिया करून त्यांचा पुन्हा वापर करावा किंवा काच, प्लॅस्टिक वस्तू या अविघटनशील आहेत तेव्हा त्यांचा वापर कमी करावा.

२५) केरकचऱ्याचे वर्गीकरण करावे. काही कचऱ्यांपासून खत निर्माण करता येते, काही कचऱ्यावरील ऊर्जा निर्माण करता येते; तर प्लॅस्टिकसारख्या अविघटित कचऱ्यावरील प्रक्रियेतून इतर उपयुक्त वस्तू बनवाव्यात व पुनर्वापर करावा. उदा. ओला कचरा, प्लॅस्टिक कचरा, इतर टाकावू सुका कचरा इ. सर्व प्रकारचा कचरा पाण्यात टाकू नये, तर त्याऐवजी कोरडा कचरा जाळून टाकावा.

२६) अणुऊर्जा प्रकल्पातील व रासायनिक कारखान्यातील टाकाऊ पदार्थ पाण्यात सोडू नयेत. त्यावर संशोधन करून योग्य प्रक्रियेने त्यांचा नाश करावा.

२७) ओझोन व पोटॅशियम परमँगनेट (KMnO.) यांचा वापर पाण्यातील घाण द्रव्ये काढून टाकण्यासाठी करतात, त्यासाठी भस्मीकरण प्रक्रिया करतात. सेंद्रीय द्रव्याचे भस्मीकरण (Oxidation) करावे.

२८) सांडपाण्यातील व दूषित पाण्यातील घाण, विषारी द्रव्ये शोषण करून घेणाऱ्या पेशी व जीवाणूंची वाढ करून त्या पेशीजीवाणूंचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला पाहिजे. बॅक्टेरिया व काही जीवाणू हे पाण्यातील घाण दूर करण्यास उपयुक्त पडलेले आहेत.

२९) अणुभट्टीतील राख व विषारी पदार्थ समुद्रात टाकू नयेत. ते निर्मनुष्य क्षेत्रात खोल खड्ड्यात पुरावेत. अणुभट्टीतील विषारी राखेची स्वतंत्र विल्हेवाट लावावी.

३०) विषारी कचरा, निरुपयोगी पदार्थ यांच्यावर अतिनील किरणांचा मारा करून ते नष्ट करावेत.

३१) अणुचाचण्यांवर पूर्णपणे बंदी घालावी.

३२) किरणोत्सारी कचऱ्याचा साठा स्वतंत्रपणे करून योग्य काळजीने तो दूरवर जमिनीत गाडावा. घातक कचरा हा जलाशयात किंवा सागरतळाशी टाकून देण्यावर कायद्याने बंदी घालावी.

३३) त्याज्य/टाकाऊ पदार्थांपासून त्यावर प्रक्रिया करून उपयुक्त वस्तू बनवाव्यात.

३४) उदयोगधंदयातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी त्या त्या उद्योजकांवर टाकावी. कायद्याने त्यावर प्रक्रिया करण्याचे बंधन घालावे. जे कारखाने हे काम करणार नाहीत, त्यांचे उत्पादन शासनाने बंद करावे. कारखान्यांची परवानगी रद्द करावी.

३५) शेतीला निष्काळजीपणाने जलसिंचन करू नये. पिकांसाठी अमर्याद पाण्याचा वापर करू नये. कारण जादाचे पाणी साठून त्या पाण्यात खतातील रसायने मिसळल्याने जमीन कडक व नापीक होते.

३६) नगरपालिका व ग्रामपंचायतींनी टाकाऊ पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करावेत.

३७) प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कारखान्यांवर बंदी आणावी. प्रदूषण नियंत्रण कायदयांची कडक अंमलबजावणी करावी. घातक कारखाने बंद करावेत.

३८) समुद्रजलावर जर खनिजतेल पसरले तर ते वेळीच जाळून टाकावे. तसेच सागरवाहू नौकांद्वारे खनिज तेल वाहतूक केली जाते. त्यांची गळती रोखावी.

३९) सागरांना प्रदूषणाच्या संकटातून सोडविण्यासाठी नदी प्रदूषण कमी केले पाहिजे.

४०) अणुचाचण्यांच्या वेळी व युद्धात जलप्रदूषण होणार नाही, याची कडक अंमलबजावणी करावी. कायदे करून त्यांची अंमलबजावणी लगेच होईल याकडे सतत लक्ष दिले पाहिजे.

४१) निसर्गसौंदर्य कायम टिकविण्यासाठी व जलप्रदूषण नियंत्रणासाठी प्रसारमाध्यमांचा व लोकशिक्षणाचा वापर केला पाहिजे. जनजागृती व जनशिक्षणासाठी सर्वत्र प्रसार माध्यमांचा वापर करावा. प्रदूषणमुक्त जलसाक्षरता अभियान सुरू करावे; कारण परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी सर्व उपायांची आवश्यकता आहे.

४२) ८० टक्क्यांपेक्षा जास्त आजार हे पाण्यापासून निर्माण होतात. म्हणून जलसाक्षरतेची-लोकशिक्षणाची गरज आहे. त्यासाठीच २४ मार्च हा ‘जागतिक जलदिन’ व २४ एप्रिल हा ‘जलसंपत्ती दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जल प्रदूषण निष्कर्ष

जलप्रदूषण हे मानवासाठी जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार फोफावत आहेत. दूषित पाण्यात डास व जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. लोकांना प्रदूषित पाण्याजवळ राहणे कठीण झाले आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. श्वास घेण्यास त्रास होतो.

पिण्याच्या पाण्याचा दर्जा खालावत चालला आहे. नैसर्गिक वातावरण प्रदूषित होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आपण स्वत: प्रदूषणाबाबत जागरूक केले पाहिजे आणि लोकांनाही त्याबाबत जागरूक केले पाहिजे.

जल प्रदूषणाला मानवच जबाबदार आहे. माणसाला प्रदूषण थांबवता आले तर आपल्या नद्या, तलाव, तलाव इत्यादी पुन्हा स्वच्छ होतील. स्वच्छ पाणी असेल तर निरोगी जीवन जगू शकेल.

वरील जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती वाचून आपल्याला जल प्रदूषणाची कारणे, जल प्रदूषणाचे उपाय आणि जल प्रदूषणाचे परिणाम या लेखातून आपल्याला समजले असेलच. Water Pollution in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मीडियावर शेअर करा. तसेच Information About Water Pollution in Marathi हा लेख कसा वाटला व अजून जल प्रदूषणा बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.

Water Pollution in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली जल प्रदूषण मराठी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.

Water Pollution in Marathi

पुढे वाचा:

विजयदुर्ग किल्ला बद्दल माहिती | Vijaydurg Fort Information in Marathi

शांता शेळके यांच्या बद्दल माहिती | Shanta Shelke Information in Marathi

शनिवार वाड्याची संपूर्ण माहिती | Shaniwar Wada Information in Marathi

कसारा घाट माहिती मराठी | Kasara Ghat Information in Marathi

कल्पना चावला माहिती मराठी | Kalpana Chawla Information in Marathi

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा माहिती | Olympic Information in Marathi

डॉ वसंत गोवारीकर मराठी माहिती | Dr Vasant Gowarikar Information in Marathi

दौलताबाद किल्ला माहिती मराठी | Daulatabad Fort Information in Marathi

सी. व्ही. रमण माहिती मराठी | C V Raman Information in Marathi

भोर घाट माहिती मराठी | Bhor Ghat Information in Marathi

Leave a Reply