विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, म्हणी आणि वाक्प्रचार हे तर कोणत्याही भाषेत आढळतात. ते म्हणजे भाषेचे अलंकारच आहेत जणू. आपल्याला हे ठाऊकच आहे की भाषा आधी बोलल्या जातात, नंतर त्या लिपिबद्ध होतात, म्हणजे लिहिल्या जातात.
बोलता बोलता माणसे सहजपणे मनातला आशय व्यक्त करण्यासाठी वक्रोक्तीचा वापर करतात, म्हणजे आडवळणाने बोलतात. कधी विशिष्ट घटनांचा, वस्तूंचा संबंध जोडून वेगळेच काही सुचवायचा प्रयत्न करतात. अशावेळी ‘वाक्प्रचार’ किंवा ‘म्हणी‘ निर्माण होतात. हे दोन्ही शब्दही पहा. ‘वाणी’शी त्यांचा संबंध आहे. याचाच अर्थ बोलता बोलता आपोआप त्या निर्माण झाल्या आहेत.
तर आजच्या लेखात आम्ही मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग घेऊन आलो आहेत. ह्या लेखात आपणास निरनिराळ्या Vakprachar in Marathi with Meaning and Sentence मिळतील ज्याचा आपणास नक्की उपयोग होईल.
पुढे काही वाक्प्रचार दिले आहेत. शब्दार्थ आणि उलट अर्थाचे शब्द जसे उलट-सुलट पद्धतीने अभ्यासले तसाच वाक्प्रचारांचाही अभ्यास आवश्यक आहे. हा अभ्यास अधिक पक्का करण्यासाठी या लेखामध्ये आम्ही काही वाक्प्रचारांचे वाक्यांत उपयोगही करून दाखवले आहेत. यामुळे तुमचा अभ्यास अधिक पक्का होईल.
मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग – Vakprachar in Marathi with Meaning and Sentence
अं वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | अंग काढणे | एखाद्या कार्यातून आपला संबंध काढून घेणे. | संसर्गाला घाबरून दिखाऊ नेत्यांनी समाजसेवेतून आपले अंग काढून घेतले. |
२ | अंकित करणे | पूर्ण ताब्यात घेणे, दुसऱ्याच्या अधीन असणे. | व्यापार करता करता इंग्रजांनी संपूर्ण भारतालाच अंकित करून टाकले होते. |
३ | अंग घेणे | लठ्ठ होणे. | |
४ | अंग चोरणे | अगदी थोडे काम करणे; कामात कुचराई करणे. | अंग चोरून काम करणाऱ्या माणसाला कधीही चांगला अनुभव मिळत नाही. |
५ | अंग झडणे | रोडावणे, कृश होणे. | |
६ | अंग झाकणे | एखाद्या कार्याशी असणारा आपला संबंध उघड न करणे. | |
७ | अंग झाडणे | झिडकारणे, नाकबूल करणे, जबाबदारी झटकणे, अव्हेरणे. | |
८ | अंग धरणे | बाळसे घेणे, तब्येत सुधारणे, रुजणे. | |
९ | अंग मोडून काम करणे | अतिशय कष्ट करून एखादे काम करणे. | |
१० | अंग मोडून येणे | ताप येण्यापूर्वी कसकसणे. | |
११ | अंग मुरडणे | दिमाख दाखविणे, तोरा दाखविणे. | |
१२ | अंगद शिष्टाई करणे | मध्यस्थी करणे. | काश्मीरप्रश्नी. चर्चा करताना, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणाचीही अंगद शिष्टाई नको असे पंतप्रधानांनी ठणकावले. |
१३ | अंग सावरणे | तोल सावरणे. | |
१४ | अंगाई गाणे | बाळाला झोपविणे. | |
१५ | अंगाचा तिळपापड होणे | रागाने फणफण करणे. | |
१६ | अंगाचा भडका उडणे | खूप संतापणे. | |
१७ | अंगाचा मळ काढणे | क्षुल्लक गोष्ट मिळवणे. | |
१८ | अंगाचे पाणी पाणी होणे | फार कष्ट करणे. | |
१९ | अंगाची लाही लाही होणे | संतापाने लाल होणे. | |
२० | अंगात त्राण न उरणे | शक्ती नाहीशी होणे | कारगिल युद्धामध्ये अन्नपाण्याशिवाय अंगात त्राण नसतानाही आपल्या जवानांनी गाजवलेले शौर्य विलक्षण आहे. |
२१ | अंगापेक्षा बोंगा मोठा | नाकापेक्षा मोती जड असणे. | दुकानात मिळणारे खाऊचे मोठे पुढे म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा याचे उत्तम उदाहरण असतात. |
२२ | अंगाबाहेर टाकणे | कामाशी असलेला आपला संबंध तोडणे. | |
२३ | अंगारा लावणे | आशा दाखवून शेवटी निराशा करणे. | |
२४ | अंगाला हळद लावणे | विवाह होणे. | |
२५ | अंगावर घेणे | जबाबदारी पत्करणे. | |
२६ | अंगावर जाणे | मारायला धावणे. | |
२७ | अंगावर शहारे येणे | खूप घाबरणे. | भूकंपाने घरादाराची झालेली हानी पाहून मदत पथकातील सर्वांच्याच अंगावर शहारे आले. |
२८ | अंगावर शेकणे | नुकसान सहन करणे. | |
२९ | अंगावरून वारा जाणे | पक्षाघात होणे. | |
३० | अंगी आणणे | बिंबवून घेणे, शिकणे. | |
३१ | अंगावर काटा उभा राहणे | भीतीने अंगावर शहारे येणे. | सीमेवरील लढाईच्या गोष्टी ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. |
३२ | अंगावर मांस न राहणे | प्रकृती खालावणे, रोडावणे. | |
३३ | अंगावर मूठभर मांस चढणे | धन्यता वाटणे. | आपल्या गुरूने केलेल्या स्तुतीमुळे मानसीच्या अंगावर मूठभर मांस चढले. |
३४ | अंगावर येणे | एखादे कार्य बिघडून त्याची अडचण सोसावी लागणे. | सिंहगडची मोहीम अंगावर घेऊन तानाजीने आपल्या मुलाचं-रायबाचं लग्न पुढे ढकललं. |
३५ | अंगी लागणे | फायदा होणे. | मन प्रसन्न ठेवले की अन्न अंगी लागते असं आजी नेहमी सांगायची. |
३६ | अंगीकार करणे | स्वीकारणे. | |
३७ | अंडी पिल्ली ठाऊक असणे | एखाद्याच्या गुप्त गोष्टीची माहिती असणे. | |
३८ | अंत पाहणे | कसोटी पाहणे, छळणे, गांजणे. | |
३९ | अंत लागणे | शेवट दिसणे, खोली समजणे. | |
४० | अंतर देणे | सोडून देणे, परित्याग करणे. | मुलांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना कधीही अंतर देऊ नये. |
४१ | अंतर्मुख होणे | मनाशीच विचार करीत बसणे. | |
४२ | अंतःकरण तीळतीळ तुटणे | अतिशय वाईट वाटणे. | |
४३ | अंतःकरण विदीर्ण होणे | अत्यंत दुःख होणे. | |
४४ | अंथरूण पाहून पाय पसरणे | उत्पन्नाच्या मानाने खर्च करणे. | |
४५ | अंतर्धान पावणे | नाहीसे होणे. |
अ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | अ-वागणे | वाईट मार्गास लागणे. | |
२ | अक्काबाईचा फेरा येणे | अतिशय दारिद्र्यावस्था येणे. | |
३ | अक्कल खर्चणे | खूप विचार करणे. | |
४ | अक्कल गुंग होणे | काहीही न सुचणे, मती गुंग , होणे, बुद्धी न चालणे. | |
५ | अक्कल जाणे | बुद्धी नाहीशी होणे, काहीही न सुचणे, विचार न करता कृती करणे. | |
६ | अक्कल पुढे धावणे | बुद्धीचा योग्य प्रकारे वापर न करणे. | |
७ | अक्कल मिळकत खाणे | दुसऱ्याचे ऐकून वागणे, दुसऱ्याच्या विचाराप्रमाणे वागणे, बोलणे. | |
८ | अक्कल विकत घेणे | अनुभवातून आलेले शहाणपण. | |
९ | अक्कल सांगणे | शहाणपण शिकविणे, चांगल्या गोष्टी सांगणे. | |
१० | अकलेचा खंदक | मूर्ख, बेअकली माणूस, विचार न करता काम मारणारा. | स्वतः बसलेल्या झाडाच्या फांदीवर कु-हाड मारणारा अकलेचा खंदकच असला पाहिजे. |
११ | अकलेचा कांदा असणे | बुद्धी न वापरता वागणे. | अकलेचा कांदा आणि गुळाचा गणपती म्हणजे केवळ सांगकामे, स्वतःच डोकं अजिबात चालवणार नाहीत. |
१२ | अकलेचे तारे तोडणे | ताळमेळ नसणारे बोलणे, अविचाराने बडबड करणे. | |
१३ | अकरावा गुरू होणे | भाग्य उजळणे. | परीक्षेतील घवघवीत यश आणि त्यामुळे लगेचच मिळालेली उत्तम नोकरी यामुळे अमितला सध्या अकरावा गुरू आहे असे सर्वच म्हणू लागले. |
१४ | अकसारणे | प्रसिद्ध होणे. | |
१५ | अकरावा रुद्र असणे | अतिशय तापट स्वभाव असणे. | |
१६ | अकांडतांडव करणे | रागाने आदळआपट करणे, रागाने विनाकारण आरडाओरडा करणे. | काही पत्रकारांमुळे दूरचित्रवाणीवरील चर्चा म्हणजे अकांडतांडव असेच समीकरण बनले आहे. |
१७ | अक्रीताचा व्यवहार | भ्रष्ट व्यवहार करणे, नुकसानकारक व्यवहार करणे. | |
१८ | अखेर होणे | मरण पावणे. | |
१९ | अखेरी मारणे | शेवटचा डाव जिंकणे. | |
२० | अगा बांधणे | तर्क काढणे. | |
२१ | अग्निकांड घडविणे | कपटाने आग लावणे, लावालावी करणे, आगीत तेल ओतणे. | |
२२ | अगडीदगडी जीव घालणे | अडचणीत येणे. | |
२३ | अग्निकाष्ठ भक्षणे | स्वतःस जाळून घेणे. | |
२४ | अग्निदिव्य करणे | कठीण कसोटीस उतरणे. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अलौकिक अशी कृती करणे. | प्रतापराव गुजरांनी बहलोलखानाच्या गोटात थेट शिरून अग्निदिव्य केल्याची बातमी ऐकून शिवरायांना धक्काच बसला. |
२५ | अग्नि देणे | मृतदेह पेटविणे, सरणावरील मृतदेहास पेटविणे. | |
२६ | अग्निप्रवेश करणे | सती जाणे, सती जाणे, स्वतःस जाळून घेणे. | माधवरावांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी केलेला अग्निप्रवेश अतिशय दुःखदायक होता. |
२७ | अग्निसात होणे | आगीत नष्ट होणे. | |
२८ | अघळपघळ बोलणे | उगाच बडबड करणे. | |
२९ | अचंबा वाटणे | चकित होणे. | |
३० | अचकल मिचकल खाणे | काहीही खाणे. | |
३१ | अचांगीने बोलणे | चुकीचे बोलणे. | |
३२ | अजमाईसीस येणे | अनुभवास येणे, प्रत्ययास येणे, लक्षात येणे. | |
३३ | अटकेवर झेंडा लावणे | मोठा पराक्रम गाजविणे. | बालाकोटला जाऊन सैन्याने केलेला हल्ला म्हणजे अटकेवर झेंडा लावण्यासारखा पराक्रम होता. |
३४ | अट घालणे | शर्त घालणे. | |
३५ | अठरा विसवे दारिद्रय असणे | अतिशय दारिद्रय असणे | |
३६ | अडक्याची भवानी असणे | निरुपयोगी असणे. | |
३७ | अडकित्त्यात सापडणे | दोन्हीकडून संकटात सापडणे. | |
३८ | अढंच असणे | एखाद्याला वर चढवणे. | |
३९ | अढीच्या दिढी | अव्वाच्या सव्वा, फाजीलपणा. | |
४० | अढी धरणे | अडून बसणे, एखाद्याविषयी मनात आकस बाळगणे. | |
४१ | अत्तर मुरणे | उगीच आव आणणे. | |
४२ | अत्तराचे दिवे लावणे | खूप खर्च करणे, बेसुमार उधळपट्टी करणे. | थोरामोठ्यांची लग्ने म्हणजे हजारोंच्या पंगती, शाही सजावट जणू अत्तराचे दिवेच लावणे म्हणा ना. |
४३ | अति तेथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. | |
४४ | अतिप्रसंग करणे | अयोग्य वर्तन करणे. | |
४५ | अद्दल घडवणे | धडा शिकविणे. | |
४६ | अद्दल घडणे | चांगली शिक्षा मिळणे. | |
४७ | अद्वातद्वा बोलणे | वेडेवाकडे बोलणे, शिवीगाळ करणे, ताळतंत्र सोडून बोलणे. | |
४८ | अधःपतन होणे | विनाश होणे, संपूर्ण जाणे. | हे जीवन क्षणभंगूर आहे याची जाणीव ठेवली तर माणसाचे अध:पतन होत नाही. |
४९ | अध:पात होणे | वाईट स्थिती प्राप्त होणे. | |
५० | अर्धचंद्र देणे | गचांडी देणे, उचलबांगडी करणे. | |
५१ | अर्ध्या वचनात असणे | आज्ञापालनास तत्पर असणे, पूर्ण कह्यात असणे. | आपला मुलगा कसा आपल्या अर्ध्या वचनात आहे हे शोभाताई सर्वांना मोठ्या अभिमानाने सांगत होत्या. |
५२ | अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे | थोड्याशा लाभाने अति आनंदित होणे. | |
५३ | अनर्थ गुदरणे | अचानक संकट ओढवणे एकाएकी मोठे संकट येणे. | |
५४ | अन्न अन्न करणे | खायला अन्न न मिळणे. | |
५५ | अन्नत्याग करणे | उपोषण करणे, काहीही न खाणे. | अन्नत्याग करून प्राणार्पण करणे म्हणजे प्रायोपवेशनाचा मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला. |
५६ | अन्नपाणी सोडणे | उपोषण करणे, आजाराने काहीही खाता न येणे. | |
५७ | अन्नाची लाज धरणे | उपकाराची जाणीव ठेवणे. | |
५८ | अन्नात माती कालवणे | स्वतःच्या निर्वाहाचे साधन नष्ट करणे. | |
५९ | अन्नान्न दशा होणे | भिकेला लागणे. | |
६० | अन्नावर तुटून पडणे | अधाशीपणे खाणे. | |
६१ | अन्नास जागणे | कृतज्ञ असणे, उपकाराची जाणीव ठेवणे. | |
६२ | अन्नास मोताद होणे | उपासमार होणे, वाईट दिवस येणे, गरीबीत दिवस काढणे. | ओल्या दुष्काळाने ग्रासलेल्या भागातील लोक अन्नास मोताद झाले. |
६३ | अन्नास लावणे | निर्वाहाचे साधन मिळवून देणे. | |
६४ | अनाकानी करणे | दुर्लक्ष करणे. | |
६५ | अनुग्रह करणे | कृपा करणे, स्वीकार करणे, उपकार करणे. | |
६७ | अनुमान करणे | तर्क लावणे. | |
६८ | अबदा धरणे | सांभाळ करणे. | |
६९ | अब्रूवर पांघरूण घालणे | प्रतिष्ठा जपणे. | |
७० | अब्रू वेशीवर टांगणे | बेअब्रू करणे. | |
७१ | अभय देणे | जीवदान देणे, क्षमा करणे सुरक्षितपणाची हमी देणे. | |
७२ | अभिवादन करणे | नमस्कार करणे. | |
७३ | अपराध पोटात घेणे | क्षमा करणे. | |
७४ | अमरपट्टा घेऊन येणे | अमर असण्याचे आश्वासन मिळविणे, कायमस्वरूपी जिवंत राहणे. | |
७५ | अमृतकळा सोसणे | जीव घाबरा होणे. | |
७६ | अमृत शिंपडणे | गोडगोड बोलणे. | |
७७ | अमावास्या जीवनात येणे | जीवनात दुःखमय अंधकार येणे. | |
७८ | अलभ्य लाभ होणे | दुर्मीळ गोष्ट मिळणे. | |
७९ | अल्ला अल्ला करणे | ईश्वराची करुणा भाकणे. | |
८० | अल्लाची गाय होणे | अतिशय गरीब व निरुपद्रवी होणे, गयावया करणे. | |
८१ | अलीचा दरबार फिरणे | अत्यंत थाटमाट असणे. | |
८२ | अवगत होणे | माहिती होणे. | |
८३ | अवटणे | ओहोटी लागणे. | |
८४ | अवघडल्यासारखे वाटणे | शरमल्यासारखे वाटणे. | |
८५ | अवदसा आठवणे | स्वत:च स्वतःचे नुकसान करून घेणे, अविचाराने वागणे. | |
८६ | अवढणणे | वीट येणे. | |
८७ | अवलोडणे | पाण्यात बुडणे. | |
८८ | अरत्र ना परत्र | इहलोक ना परलोक. | |
८९ | अवतार संपणे | मृत्यू होणे, जन्मातून मुक्ती मिळवणे. | |
९० | अवलंब करणे | अनुसरणे. | |
९१ | अवसान येणे | स्फुरण येणे. | |
९२ | अवाक्षर न काढणे | तोंडातून ब्र न काढणे, अक्षरही न बोलणे. | |
९३ | अव्हेरणे | नाकारणे | |
९४ | अव्हेर करणे | दूर लोटणे. | |
९५ | असंगाशी संग करणे | नको त्या व्यक्तीशी संबंध येणे. | |
९६ | अस्तन्या सावरणे | हाणामारीस तयार होणे, सरसावणे, कामासाठी तयार होणे. | |
९७ | अस्मान ठेंगणे होणे | गर्वाने फुगून जाणे. | परदेशी जाण्याची संधी मिळाल्यावर सुमीतला अस्मान ठेंगणे झाले. |
९८ | अस्मानाला भिडणे | अहंकार होणे ; प्रगती होणे. | |
९९ | असे होणे | वैधव्य प्राप्त होणे. | |
१०० | अहमहमिका लागणे | चढाओढ लागणे. | |
१०१ | अळंटळं करणे | कामचुकारपणा करणे, आळस करणे. | |
१०२ | अक्षत् देणे | आमंत्रण देणे. | |
१०३ | अक्षता देणे | लग्न होणे. | |
१०४ | अक्षता पडणे | लग्न लागणे. | |
१०५ | अक्षता पाठवणे | लग्नासाठी आमंत्रण देणे. | |
१०६ | अक्षर वाङ्मय असणे | चिरकाल टिकणारी साहित्यकृती. | |
१०७ | अज्ञातवासात असणे | निर्जनस्थळी वास करणे. |
आ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | आंगवणे | नवस करणे. | |
२ | आंदकणे | नाउमेद होणे. | |
३ | आंतरिक आच असणे | मनातील इच्छा असणे. | |
४ | आंबटशौक करणे | भलत्यासलत्या चैनी करणे. | |
५ | आईमाई करणे | गयावया करणे, मनधरणी करणे. | |
६ | आकांत करणे | रडून आरडाओरडा करणे. | रेल्वे अपघाताच्या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी आकांत मांडला होता. |
७ | आकारास येणे | मार्गास लावणे. | |
८ | आकाश ठेंगणे होणे | गर्वाने फुगून जाणे. | |
९ | आकाश पाताळ एक करणे | फार आरडाओरड करणे, क्षोभ किंवा कल्लोळ करणे, प्रयत्नाची पराकाष्ठा करणे. | |
१० | आकाश फाटणे | चोहोबाजूने संकटे येणे. | एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे पूर अशा आपत्तीमुळे केदारनाथसाठी आकाशच फाटले. |
११ | आकाशाची कु-हाड कोसळणे | परमेश्वराची अवकृपा होणे, सर्व बाजूंनी संकटे येणे. | |
१२ | आकाशाला गवसणी घालणे | अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे. | एक पाय अधू असताना हिमालयातील शिखरे सर करणे हे अरूणिमाच्या दृष्टीने आकाशाला गवसणी घालण्यासारखेच होते. |
१३ | आकाशाला झेंडा लावणे | फार मोठा पराक्रम करणे. | |
१४ | आकाशाला ठिगळ लावणे | फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड देणे. | |
१५ | आखाड्यात उतरणे | विरोधकाशी सामना देण्यास तयार होणे. | |
१६ | आखूडशिंगी बहुदुधी | सर्व चांगल्या गोष्टी एकत्र असणे. | |
१७ | आखाड्यात उतरणे | एखाद्या वादास किंवा संघर्षास सिद्ध होणे, दोन हात करण्यास तयार होणे. | |
१८ | आख्यान मांडणे | कंटाळवाणे कथन करणे. | |
१९ | आग ओकणे | रागाने फटकळ बोलणे. | |
२० | आग पाखडणे | शिव्यांचा वर्षाव करणे, रागाने मोठ्या आवाजात बोलणे. | |
२१ | आगीत उडी घालणे | एखादे संकट ओढवून घेणे. | |
२२ | आगीत तेल ओतणे | भांडण विकोपास जाईल अश्या तऱ्हेने भर घालणे. | संसर्गजन्य साथीच्या मागे चीननिर्मित कृत्रिम विषाणू असल्याची चर्चा सुरू असतानाच लडाख सीमेवर अतिक्रमण करून चीनने आगीत तेलच ओतले. |
२३ | आगीतून निघून फुफाट्यात पडणे | एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडणे. | वाघ मागे लागला म्हणून झाडावर चढलेल्या तरुणाला जेव्हा झाडावर साप दिसला, तेव्हा त्याला आगीतून फुफाट्यात पडण्याचाच अनुभव आला. |
२४ | आघाडीवर असणे | पुढे असणे. | |
२५ | आधाडी साधणे | वेळ साधणे. | |
२६ | आटापिटा करणे | प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. | अभ्यास न करता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आटापिटा करणारे अनेक विद्यार्थी दरवर्षी दिसतात. |
२७ | आटे ढिले होणे | अतिश्रमाने अंगी त्राण न उरणे. | मे महिन्याच्या सुट्टीत आलेल्या पाहुण्यांची सरबराई करताना सुमनचे आटे ढिले झाले. |
२८ | आडपडदा न ठेवणे | मनमोकळेपणाने आपल्या सर्व गोष्टी सांगणे. | |
२९ | आडवा पालव घालणे | एखादे कृत्य गुप्तपणे करणे. | |
३० | आडव्यात शिरणे | मुख्य मुद्दा सोडून भलतेच बोलणे. | |
३१ | आड-विहीर जवळ करणे | आत्महत्या करणे. | |
३२ | आडवे घेणे | एखादी गोष्ट सरळ-सरळ असताना देखील त्यात व्यंग काढणे. | हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आडवे येणाऱ्यांना शिवरायांनी अजिबात दयामाया दाखवली नाही. |
३३ | आडवे येणे | कार्यात अडथळा आणणे. | |
३४ | आडात सोडून दोर कापणे | विश्वासघात करणे. | |
३५ | आडून गोळी मारणे | दुसऱ्यामार्फत कार्य साधून घेणे. | |
३६ | आढेवेढे घेणे | एखाद्या गोष्टीला एकदम तयार न होणे. | |
३७ | आतड्याला पीळ पडणे | कळकळ वाटणे काळजाला पाझर फुटणे, दयेने कळवळणे. | |
३८ | आतडे तुटणे | जीव कळवळणे. | |
३९ | आत्मा थंड करणे | मन तृप्त होणे, करणे. | घर बांधणाऱ्या मजुरांचा सन्मान करून त्यांचा आत्मा थंड करणे म्हणजे खरी वास्तुशांत होय. |
४० | आत्मसात करणे | पूर्णपणे माहिती करून घेणे. | |
४१ | आधाधिणे | भीती वाटणे. | |
४२ | आनंद गगनात मावेनासा होणे | खूप आनंद होणे. | दहावीच्या परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाल्यामुळे शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. |
४३ | आनंदाला उधाण येणे | खूप आनंद होणे. | |
४४ | आनंदाला पारावार न उरणे | अति आनंद होणे. | |
४५ | आपल्या पोळीवर तूप ओढणे | आपलाच स्वार्थ साधणे. | |
४६ | आपली पोळी पकविणे | फक्त आपलेच मत खरे म्हणणे, हेकेखोर स्वभाव. | |
४७ | आपलेच घोडे पुढे दामटणे | आपलाच स्वार्थ आधी साधून घेणे. | चर्चेतील विषय काहीही असला तरी नेहमी आपलेच घोडे पुढे दामटण्याची काहींना सवय असते. |
४८ | आफळासाफळ करणे | रागाने आदळआपट करणे. | |
४९ | आबाळ होणे | हेळसांड होणे, दुर्लक्ष होणे. | शिक्षणानिमित्त प्रथमच घराबाहेर राहताना मुग्धाची आबाळ झाली. |
५० | आभाळ कोसळणे | फार मोठा अनर्थ ओढवणे. | |
५१ | आभाळ ठेंगणे होणे | अत्यानंद होणे. | |
५२ | आभाळ फाटणे | सर्व बाजूंनी संकटे येणे. | |
५३ | आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे | इतरांनी कष्टाने मिळविलेल्या गोष्टीवर चैन करणे. | |
५४ | आयुष्याची दोरी तुटणे | मृत्यू ओढवणे. | |
५५ | आव आणणे | अवसान आणणे, जे नाही ते दाखविण्याचा प्रयत्न करणे. | |
५६ | आवळ्या-भोपळ्याची मोट बांधणे | भिन्न प्रवृत्तीच्या माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे. | |
५७ | आवळा देऊन कोहळा काढणे | लहान वस्तू देऊन एखाद्याकडून मोठी वस्तू उकळणे. | |
५८ | आ वासून पाहणे | आश्चर्याने थक्क होऊन पाहणे. | |
५९ | आसन जमणे | चांगला जम बसणे ; स्थिरता येणे. | |
६० | आसन डळमळणे | बसलेला जम विस्कटणे. | सत्ताधारी पक्षातील घोटाळे उघडकीस आल्याने मुख्यमंत्र्यांचे आसन डळमळीत झाले. |
६१ | आहारी जाणे | पूर्ण ताब्यात जाणे. | |
६२ | आहुती देणे | प्राणार्पण करणे. | |
६३ | आळ घेणे | दोषारोप करणे, खोटा आरोप करणे. | |
६४ | आळा घालणे | मर्यादा किंवा नियंत्रण घालणे. |
इ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | इंगा जिरविणे | अद्दल घडविणे. | |
२ | इंगा दाखवणे | गर्व दूर करणे, एखाद्याची खोड मोडण्यासाठी आपली ताकद दाखविणे जरब बसविणे. | साध्यासरळ नयनाने तिला त्रास देणाऱ्या लोकांना चांगलाच इंगा दाखविला. |
३ | इंगळ्या डसणे | मनाला झोंबणे, वेदना होणे. | भर दरबारात आपल्या सग्यासोयऱ्यांचा झालेला मृत्यू पाहून शहाजीराजांच्या मनाला इंगळ्या उसल्या. |
४ | इकडचा डोंगर तिकडे करणे | फार मोठे कार्य पार पाडणे. | राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार ही आदर्श गावांची प्रचंड कामे पाहून इकडचा डोंगर तिकडे झाला असेच म्हणावे लागते. |
५ | इजा बिजा तिजा | एकामागून असे तीन वेळा. | |
६ | इ(वि)टामाती वाहणे | हलके शारीरिक कष्ट करणे. | |
७ | इडापिडा टळणे | सर्व संकटे, त्रास दूर होणे. | त्सुनामीची मोठी लाट आपल्यापर्यंत पोहोचली नाही, हे पाहून इडापिडा टळली असेच उद्गार त्या पर्यटकांनी काढले. |
८ | इतरपितर काढणे | शिव्या देणे. | |
९ | इतिश्री होणे | शेवट होणे. | शास्त्रीय गायकाच्या सुरेल गायनाने मैफिलीची इतिश्री झाली. |
१० | इतिश्री करणे | शेवट करणे. | दुसऱ्या महायुद्धाची इतिश्री झाली आणि अमेरिका एक महाशक्ती म्हणून उदयास आली. |
११ | इन्कार करणे | नकार देणे. | |
१२ | इमानास जागणे | कृतज्ञता पाळणे, सचोटीने वागणे, वचन पाळणे. | खंडोजी बल्लाळ याने संभाजी महाराजांना खवळलेल्या समुद्रात वाहून जाण्यापासून वाचवले हे खरे इमानास जागणे होते. |
१३ | इरेस पडणे | अडचणीत सापडणे, गोत्यात येणे. | |
१४ | इरेस पेटणे | चुरशीने कंबर कसून सज्ज होणे; जिद्दीने कार्यारंभ करणे. | अपंगत्व आल्यानंतरही एव्हरेस्ट सर करण्याच्या इच्छेने अरुणिमा सिन्हा इरेस पेटली होती. |
ई वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | ईप्सित साधणे | इच्छिलेले साधणे. | आपले काम आपण योग्य रीतीने करत राहिल्यास ईप्सित साधतेच. |
उ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | उंटावरचा शहाणा | बेजबाबदारपणे मूर्खपणाची सल्लामसल्लत देणारा. | उंटावरच्या शहाण्याचे सल्ले ऐकून लोक स्वतः बसलेल्या फांदीवर कु-हाड मारून घेतात. |
२ | उंटावरून शेळ्या हाकणे | शहाणपणाने दूर राहून एखादे काम करण्यासाठी इतरांना उपदेश करणे. | शेतीकाम कसे करावे हे घरी बसून सांगत उमेश उंटावरून शेळ्या हाकत असतो. |
३ | उंबरठे झिजवणे | हेलपाटे मारणे. | |
४ | उंबराचे फूल | क्वचित भेटणारी व्यक्ती, दुर्मीळ गोष्ट. | |
५ | उकळ्या फुटणे | अनुकूल प्रवृत्ती होणे; मनोमन आनंद घेणे. | समोर हरणांचा कळप दिसल्यावर भुकेल्या वाघोबाला उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे. |
६ | उकिरडे कुंकणे | अत्यंत हीन गोष्ट करणे. | |
७ | उखळ पांढरे होणे | वैभव प्राप्त होणे. | |
८ | उखाळ्यापाखाळ्या काढणे | एकमेकांचे दोष काढणे. | एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसणारे रिकामटेकडे लोक काही उपयोगाचे नसतात. |
९ | उगीदुगी करणे | मध्ये-मध्ये बोलणे. | |
१० | उघडा पडणे | निराधार होणे. | |
११ | उचंबळून येणे | भावना अनावर होणे. | |
१२ | उच्चाटन करणे | नष्ट करणे. | आपल्या शिक्षणपद्धतीतून मेकॉलेच्या विचारांचे उच्चाटन करणे महत्त्वाचे आहे, असे नवे शैक्षणिक धोरण सांगते. |
१३ | उचलबांगडी करणे | हाकलून देणे, कामावरून कमी करणे, एखाद्याला त्याच्या मनाविरूद्ध दुसरीकडे नेणे. | |
१४ | उचल खाणे | एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त होणे, एकाएकी कामाला लागणे. | दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहून सुचेताच्या शास्त्रीय नृत्य शिकण्याच्या इच्छेने पुन्हा एकदा उचल खाल्ली |
१५ | उचलून गोष्ट सांगणे | विरोध करणे, दर्शवणे. | |
१६ | उच्छाद मांडणे | भंडावून सोडणे, त्रास देणे | |
१७ | उजेड पाडणे | मोठे काम करणे, यश मिळविणे खूप कर्तबगारी दाखवणे. | |
१८ | उट्टे काढणे | सूड घेणे. | |
१९ | उडत्या पाखराची पिसे मोजणे | अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखविणे. | |
२० | उणे उत्तर देणे | अपमानकारक जबाब देणे, उलटून बोलणे. | |
२१ | उजवा हात असणे | अत्यंत विश्वासू व तत्पर मदतनीस असणे. | |
२२ | उतरत्या पायरीस लागणे | -हास होत जाणे. | |
२३ | उतू जाणे | अती होणे, नाशक होणे. | |
२४ | उत्तेजन देणे | प्रोत्साहन देणे, पाठींबा देणे. | |
२५ | उतराई होणे | उपकारांची फेड करणे. | आईवडिलांच्या प्रेमाचे उतराई होणे जवळपास अशक्य असते. |
२६ | उदक सोडणे | त्याग करणे, एखाद्या गोष्टीचा नाद , सोडणे. | अनाथालयासाठी जमीन देण्यासाठी अमितने स्वखुशीने आपल्या हक्काच्या जागेवर उदक सोडले. |
२७ | उदरी शनी येणे | अचानक द्रव्यलाभ होणे. | |
२८ | उदो उदो करणे | प्रशंसा करणे. | उदो उदो करणारे खुशमस्करे आजूबाजूला जमले की कुणीही व्यक्ती विवेकहीन होण्यास वेळ लागत नाही. |
२९ | उद्धार करणे | शिव्या देणे, वाईट स्थितीतून चांगल्या स्थितीत आणणे. | |
३० | उधाण येणे | भरती येणे, ओसंडून वाहणे. | गणेशोत्सव आला की मराठी माणसांच्या उत्साहाला उधाण येते. |
३१ | उन्मळून पडणे | मुळासकट कोसळणे, निराश होणे. | आपला नवरा लढताना शहीद झाला हे ऐकून कल्पना उन्मळून पडली. |
३२ | उन्हाची लाही फुटणे | अतिशय कडक ऊन पडणे. | |
३३ | उपमर्द करणे | अपमान करणे. | |
३४ | उपपावन करणे | बाजू मांडणे. | |
३५ | उपर करणे | मदत करणे. | |
३६ | उपर ठेवणे | वरचष्मा राखणे. | |
३७ | उपसर्ग होणे | त्रास होणे. | गर्दीतून प्रवास करताना आपला उपसर्ग दुसऱ्याला होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. |
३८ | उपार्जन करणे | खर्चावयास देणे. | |
३९ | उभे जाळणे | फार छळणे. | |
४० | उपासमार होणे | खायला अन्न न मिळणे. | |
४१ | उभा इंद्र करणे | एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे. | |
४२ | उभा दावा करणे | कायमचे वैर करणे. | |
४३ | उभे धरणे | कडक शिस्त लावणे. | |
४४ | उमाळा येणे | गहिवरून येणे; मायेची भावना उचंबळून येणे. | |
४५ | उरात धडकी भरणे | अतिशय घाबरणे. | |
४६ | उरावर घेणे | जबाबदारी स्वीकारणे. | |
४७ | उरावर धोंडा ठेवणे | स्वतःचे दुःख दाबून ठेवणे. | |
४८ | उराशी धरणे | प्रेमाने कवटाळणे. | अतुलनीय पराक्रम गाजवून आलेल्या वीराला उराशी धरल्याखेरीज आईचे मन शांत होत नाही. |
४९ | उरीपोटी धरणे | प्रेमाने समजूत घालणे. | |
५० | उरी फुटणे | अतिश्रमामुळे त्रास होणे, अतिशय दमून जाणे. | |
५१ | उलट्या काळजाचा | दुष्ट माणूस. | |
५२ | उलटी अंबारी हाती येणे | भीक मागण्याची पाळी येणे. | |
५३ | उलटी पूजा करणे | हजेरी घेणे; समाचार घेणे. | |
५४ | उल्हागा देणे | टोमणा देणे. | |
५६ | उषा फाकणे | उजाडणे; सूर्योदय होणे. | |
५७ | उष्टेखरकटे काढणे | अवशिष्ट काम निस्तरणे. | |
५८ | उसने पारणे फेडणे | सूड उगवणे. |
ऊ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | ऊन-वारा न लागणे | मुळीच त्रास न होणे. | छोट्या बाळांना ऊन वारा लागू नये म्हणून आई नेहमीच काळजी घेते. |
२ | ऊत येणे | अतिरेक होणे. | मुख्य रस्त्यावर वाहनांना अगदी ऊत आला आहे. |
३ | ऊर दडपणे | १. भीतीने किंवा आश्चर्याने स्तब्ध होणे २. धास्ती वाटणे. | मेजवानीनंतर घरातील पसारा पाहून स्मिताचा ऊर दडपून गेला. |
४ | ऊर पलटणे | गांगरून जाणे. | अचानक शिक्षकांनी उभे करून प्रश्न विचारल्याने प्रशांतचा ऊर पालटला. |
५ | ऊर फाटणे | १. आश्चर्यचकित होणे २. घाबरणे ३. गांगरणे. | अचानक टोपलीखालून साप आल्याने सर्वांचेच ऊर फाटले. |
६ | ऊर फोडून घेणे | अतिशय श्रम करणे. | |
७ | ऊर बडविणे | दुःखाने छाती बडवून घेणे. | कर्जामुळे नवऱ्याने आत्महत्या केल्याने ती ऊर बडवून शोक करू लागली. |
८ | ऊर भरून येणे | अंतःकरणात भावना दाटून येणे. | मुलाचे यश पाहून पालकांचा ऊर भरून आला. |
९ | ऊहापोह करणे | चर्चा करणे. | दोन्ही बाजूंनी एवढा ऊहापोह करूनही शेवटी एक निर्णय घेतला गेलाच नाही. |
१० | ऊहू करणे | सुरू करणे. |
ऋ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | ऋणानुबंध असणे | स्नेहसंबंध असणे; घरोब्याचे संबंध असणे. | शेजारच्यांच्या निरपेक्ष मदतीने त्यांच्याशी नक्कीच काही ऋणानुबंध असावा असे मनवाला वाटले. |
२ | ऋषेश्वराचा कारभार असणे | दफ्तर दिरंगाईचा कारभार असणे. | ऋषेश्वराचा कारभार असलेल्या त्या कार्यालयात सारखे खेटे घालून सूरज थकून गेला. |
ए वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | एक घाव दोन तुकडे करणे | ताबडतोब निर्णय घेणे. | रागाच्या भरात नीलाने घराची वाटणी करून एक घाव दोन तुकडे केले. |
२ | एकमत होणे | सर्वांचा एकच विचार होणे. | या वर्षी साध्याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वांचेच एकमत झाले. |
३ | एकांडा शिलेदार | इतरांचे साहाय्य न घेता स्वबळावर कार्य करणारा. | कोणी साथ देवो न देवो प्रदूषण विरोधातील या लढ्यात तो एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत राहिला. |
४ | एकाचे एक असणे | रक्तसंबंध असणे. | |
५ | एकाचे दोन सांगणे | खोटेनाटे सांगणे. | रजा मिळण्यासाठी दिनेशने एकाचे दोन सांगितले. |
६ | एका नावेत असणे | एकाच स्थितीत असणे. | परीक्षेसाठी सभागृहात जमलेले सगळे विद्यार्थी एकाच नावेत आहेत. |
७ | एका पायावर तयार असणे | खूप उत्सुक असणे, सिद्ध असणे. | अभ्यासाचे कारण सांगून घरात काम न करणारी मुले चित्रपट पाहण्यासाठी मात्र एका पायावर तयार असतात. |
८ | एका माळेचे मणी | सगळी एकसारखी वाईट माणसं. | रघू आणि त्याचा भाऊ म्हणजे एकाच माळेचे मणी. |
९ | एकेरीवर येणे | भांडण किंवा मारामारी करण्याच्या बेतात असणे, हमरीतुमरीवर येणे. | गप्पांमधील क्षुल्लक मस्करीने चिडून जाऊन ते दोघे एकेरीवर आले. |
ऐ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | ऐसेनि ऐसे ऐकणे | अशुभ समाचार मिळणे. | युद्धाच्या बातम्यांमधून ऐसेनि ऐसे ऐकायला मिळू नये म्हणून पार्वतीबाई ईश्वराची करूणा भाकत होत्या. |
ओ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | ओक्साबोक्सी रडणे | ऊर बडवून मोठमोठ्याने रडणे. | पतिनिधनाची वार्ता कळताच कोमल ओक्साबोक्सी रडू लागली. |
२ | ओटीत घालणे | दुसऱ्यावर जबाबदारी सोपविणे. | |
३ | ओटीत घेणे | दत्तक घेणे, जबाबदारी घेणे, स्वाधीन करणे. | आरतीने अनाथ मुलाला आपल्या ओटीत घेतले. |
४ | ओटी पसरणे | पदर पसरणे, याचना करणे. | भिक्षेसाठी तिने ओटी पसरली. |
५ | ओटी भरणे | सौभाग्य लेणे देणे. | |
६ | ओठ पिळला तर दूध निघणे | अल्पवयाचा असणे. | |
७ | ओठ सुकणे | तहान लागणे; निराश होणे. | उन्हात फिरून फिरून रेवाचे ओठ सुकले. |
८ | ओठाबाहेर काढणे | बोलून दाखविणे. | संध्याने आपली नाराजी ओठाबाहेर काढली. |
९ | ओढून ताणून चंद्रबळ आणणे | नसलेला आव आणणे. | लग्नाचा खर्च राजीवला खरंतर जडच होता. मात्र, त्याने ओढून ताणून चंद्रबळ आणले. |
१० | ओनामा | प्रारंभ. | गुरूला नमस्कार करून स्वप्नाने तिच्या नृत्यशिक्षणाचा ओनामा केला. |
११ | ओमफस होणे | एखादी गोष्ट तडीस न जाणे. | माझा पहिल्यांदाच पुरणपोळी करण्याचा प्रयत्न ओमफस झाला. |
१२ | ओलीसुकी करणे | खरे-खोटे करून घेणे. | सरपंचांनी सर्वप्रथम ओलीसुकी करून मगच निर्णय दिला. |
१३ | ओले कोरडे खाणे | कसाबसा निर्वाह करणे. | संघर्षाच्या काळात रमेशला अनेक दिवस ओले कोरडे खावे लागे. |
१४ | ओवाळून टाकणे | क्षुल्लक गोष्ट समजून टाकून देणे; अर्पण करणे. | स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी आपले संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकले. |
१५ | ओहोटी लागणे | लयास जाणे. | मालिका बंद झाल्यापासून अभिनेत्याच्या प्रसिद्धीस ओहोटी लागली. |
औ वरून मराठी वाक्प्रचार
अनु.क्र | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
१ | औषध नसणे | उपाय नसणे. | तिच्या रागीट स्वभावाला औषध नाही. |
२ | औषधालाही नसणे | मुळीच नसणे, उपाय नसणे. | |
३ | औषधावाचून खोकला/खरूज जाणे | आपोआप संकट टळणे. | भांडखोर शेजाऱ्याची बदली झाल्याने अमितला औषधावाचून खोकला गेला असेच वाटले. |