वजन कमी करण्याचे उपाय: आपल्या शरीरात जमा होणारी अतिरिक्त ऊर्जा म्हणजे फॅट्स् असून या फॅट्स् मुळेच आपले शरीर लठ्ठ होते, ही पहिली आणि मूलभूत गोष्ट कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवायला हवी.

याचा सरळ अर्थ असा की, तुमचे शरीर तुम्हाला प्रमाणबद्ध ठेवायचे असेल, त्याची अवास्तव वाढ रोखून येणारा बेंगरूळपणा दूर ठेवायचा असेल तर आपल्या शरीरात फॅट्स् जमा होणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी.

वजन कमी करण्याचे उपाय-Weight Loss Diet Plan in Marathi
वजन कमी करण्याचे उपाय – Weight Loss Diet Plan in Marathi

वजन कमी करण्याचे उपाय – Weight Loss Diet Plan in Marathi

Table of Contents

वजन कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती

 1. शरीराची ऊर्जा खर्च करणारे घरकाम दररोज करावे.
 2. दररोज एकदा तरी किमान पाऊण तास पायी फिरायलाच हवे.
 3. लिफ्टचा वापर टाळून वर-खाली ये-जा करण्यासाठी शक्यतो जिन्याचा वापर करावा.
 4. घरी आल्यानंतर थोडा वेळ नियमितपणे लहान मुलांशी खेळावे.
 5. शक्य असेल त्या ठिकाणी पायीच चालत जावे.

वजन कमी करण्यासाठी आपल्याकडे दोन उपाय आहेत :

 1. पहिला – आपल्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा साठणार नाही याची काळजी घेणे.
 2. दुसरा – शरीरात साचलेली अतिरिक्त ऊर्जा वापरून टाकणे. हे दोन्ही उपाय केल्याशिवाय आपण आपल्या शरीराचा लठ्ठपणा थांबवू शकत नाही.

हे दोन्ही उपाय अमलात कसे आणायचे ते आपण पाहू :

शरीरात अतिरिक्त ऊर्जा साठणार नाही यासाठी उपाय

1. संतुलित आहार घेणे

आपल्या शरीराला निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी विविध प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते. कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, फॅट्स् तसेच क्षार आणि खनिजद्रव्ये हे ते घटक होत. हे सर्व घटक आपल्या शरीराचे योग्य प्रकारे पोषण करण्यासाठी आवश्यक असतात आणि ते फक्त अन्नातूनच आपल्याला मिळत असतात. यापैकी एखादा किंवा काही घटक खूप जास्त मिळाले, थोड्या प्रमाणात मिळाले किंवा अजिबात मिळाले नाहीत, अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आपल्या शरीरातील फॅट्स् चे प्रमाण वाढू शकते.

त्यामुळे आपले शरीर प्रमाणबद्ध हवे असेल तर आपला आहार वरील सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला संतुलितच असायला हवा.

जे नियमित प्रमाणात संतुलित आहार घेत नाहीत ते लठ्ठ झाल्याशिवाय किंवा कुपोषित झाल्याशिवाय राहणार नाहीत.

2. संतुलित आहारात सातत्य हवे

सणावारी कधी तरी आपण मिष्टान्नाचे जेवण घेतो तसा संतुलित आहार कधी तरी एखाद्यावेळी खाणे पुरेसे नसते. संतुलित आहारात नियमितपणा आणि सातत्य नसेल तर त्याचाही फार उपयोग होत नाही.

मुळात आपल्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा फॅट्स्च्या स्वरूपात साठवून ठेवण्याची सोय आहे, ती आणीबाणीसाठी. काही कारणांमुळे आपल्याला उपासमारीला किंवा तशाच प्रकारच्या इतर अडचणींना तोंड देण्याची वेळ आली तर अशा वेळी शरीराला चयापचय क्रियेसाठी लागणारी ऊर्जा मिळावी म्हणून आपल्या शरीरात ही पर्यायी व्यवस्था आहे.

आपल्या जेवणात अशा प्रकारचा अनियमितपणा येतो तेव्हा शरीर साशंक होते. पुढचे जेवण केव्हा मिळेल याचा त्याला काही अंदाज करता येत नाही. त्यासाठी सुरक्षितता म्हणून ते अन्न साठवून ठेवायला लागते. ही साठवण फॅट्स्च्या स्वरूपात असते. शरीरातील फॅट्स् वाढणे म्हणजे लठ्ठपणा वाढणे, हे काही आता वेगळे सांगण्याची गरज नाही.

3. थोड्या थोड्या वेळाने खा

दर दोन तासांनी माफक स्वरूपात खाणे चांगले. नसता दीर्घकाळ काहीही न खाऊन जेवायला बसल्यास जास्त खाल्ले जाते. अशारीतीने दोनवेळा दाबून जेवल्यामुळे शरीरात चरबी वाढू शकते.

4. खाताना नाही म्हणायला शिकणे

आपले जेवण झाल्याचे किंवा पोट भरल्याचे लक्षात आल्यावर कोणी कितीही आग्रह केला तरीही एक घाससुद्धा जास्त खाऊ नये. अनेक घरांत आता इतकेच कशाला शिल्लक ठेवायचे किंवा इतके का टाकून द्यायचे? असा विचार करून भुकेपेक्षा जास्त खाण्याला संमती दिली जाते. अशा प्रकारचा होकार आपला लठ्ठपणा वाढविणारा असतो. जास्तीचे खायला नकार देऊन आपले शरीर प्रमाणात ठेवायला शिका.

अन्नाकडे पाठ करू नये, अन्नाला नाही म्हणू नये, अन्न दूर लोटू नये, अन्न पानात टाकू नये, अशा प्रकारचे काही संस्कार आपला लठ्ठपणा वाढविणारे आहेत हे लक्षात घ्या. याला एक पर्याय असा आहे की मोजकेच अन्न शिजवा. दोन घास जास्त खाण्यापेक्षा एक घास कमी खाल्लेला केव्हाही चांगला.

5. योग्य प्रमाणात खाणे

योग्य प्रमाणात खाणे ही गोष्ट शरीरातील फॅट्स् चे प्रमाण कमी होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या शरीराची जितकी गरज आहे तितकेच खाणे ही तर खरी शरीर योग्य प्रमाणात ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. शरीराच्या गरजेपेक्षा जराही जास्त न खाणे किंवा गरजेपेक्षा थोडेसुद्धा कमी न खाणे म्हणजे शरीराचे योग्य प्रकारे पोषण करणे होय.

आता योग्य प्रमाणात म्हणजे किती खायचे? या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या कोणालाही विचारून चालणार नाही. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असते आणि ते ज्याचे त्याला माहीत असायला हवे. खरं तर ते माहीत असते; पण नंतर जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात आपण ते विसरून जात असतो. पोटातील एक भाग पाण्यासाठी एक भाग हवेसाठी (म्हणजे रिकामा) आणि दोन भाग अन्नासाठी ठेवून जेवण घ्यावे.

शरीर प्रमाणबद्ध ठेवायचे असेल तर खाण्याचे योग्य प्रमाण आपले आपण माहीत करून घ्यायला हवे आणि एकदा माहीत करून घेतल्यानंतर फक्त तितकेच अन्न सेवन करायला हवे, ना कमी ना जास्त!

6. शिळे, पुन्हा पुन्हा गरम केलेले किंवा जास्त शिजवलेले अन्न न खाणे

आहार संतुलित आहे, तो योग्य वेळी घेतला जातो, इतकेच नाही तर तो योग्य प्रमाणातही घेतला जातो. इतकी सर्व काळजी घेतली जाते; तरीही शरीर काही प्रमाणबद्ध होत नाही, अशी कुणाची तक्रार असेल तर ती रास्त असू शकते. कारण शिळे, पुन्हा पुन्हा गरम केलेले किंवा जास्त वेळ शिजवत ठेवलेले अन्न खाल्ले तर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. शिवाय अशा अन्नामुळे फॅट्स् चे प्रमाण खूप वाढते.

आपले शरीर प्रमाणबद्ध राखायचे असेल तर एकदा जेवण तयार केल्यानंतर पुन्हा गरम न करता तीन तासांच्या आत खाण्याची सवय ठेवा.

7. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत

हल्ली बाजारात सर्व काही तयार मिळत असते. पीठ, मसाल्यांपासून सर्व काही तयार किंवा रेडिमेड मिळते. बाजारातून आणायचे आणि घरी खायचे. अशा प्रकारचे अन्नपदार्थ टिकाऊ करण्यासाठी त्यात अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात. तसेच त्यातील कोंड्यासारखा तंतुमय भाग काढून टाकल्यामुळे अन्नाची पोषकता कमी होते आणि वजन वाढते. असे अन्न पचायला जड जाते. त्यामुळे पचनसंस्थेच्या तक्रारी सुरू होतात. पचनसंस्थेच्या तक्रारी सुरू होणे म्हणजे शरीर लठ्ठ होण्याच्या दिशेने प्रवास सुरू करणे.

8. चहा, कॉफी आणि जंक फूड नको

चहा, कॉफी आणि विविध प्रकारचे जंक फूड खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो. हा एक भाग आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या अन्नाच्या पचनानंतर शरीरात जास्त प्रमाणात फॅट्स् साठतात. चहा, कॉफी या पेयांचा वापर अनेक जण भूक मारण्यासाठी करतात, तर अवेळी किंवा घराबाहेर असताना लागलेली भूक भागविण्यासाठी अनेक जण जंक फूडचा वापर करतात. या दोन्ही गोष्टी शरीरात फॅट्स् वाढविण्याचे काम करतात.

खरं तर फॅट्स् हा शरीरातील राखीव अन्नाचा कोटा असतो आणि तो आणीबाणीच्या प्रसंगी वापरायचा असतो. चहा-कॉफीमुळे फॅट्स् पासून पुन्हा ऊर्जा मिळविण्याची शरीरातील प्रक्रिया पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होतात.

9. ब्रेड, बिस्किटे यासारखे बेकरीचे

पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. या पदार्थांत तंतुमय पदार्थांचा अभाव असल्यामुळे मलविसर्जन व्यवस्थेत अडचणी निर्माण होतात. पचनसंस्थेत मल साचून राहणे शरीरात फॅट्स् निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरते.

10. याशिवाय गोड पदार्थ

आठवड्यातून एकदा योग्य प्रमाणात खावेत. त्यांचा अतिरेक टाळावा. भरल्यापोटी मात्र गोड पदार्थ खाणे टाळावे. पोट भरलेले असताना गोड पदार्थ खाल्ले तर त्याचे रूपांतर थेट फॅट्स्मध्ये होते.

11. फळे नेहमी ताजी खावीत आणि शक्यतो दाताने तोडून खावीत

अशा प्रकारे फळे खाल्ल्यामुळे फळांतील सर्व पोषक घटक आपल्या शरीरात जातात. फळे चिरून किंवा बारीक करून खाल्ल्यास फळांचा हवेशी संपर्क आल्यामुळे हवेतील ऑक्सिजनशी त्यांचा संयोग होतो. परिणामी फळातील अनेक घटक शरीरासाठी उपयुक्त राहत नाहीत. शिवाय हवेमुळे फळातील साखरेचे फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होते. आपल्या शरीरात फ्रुक्टोज जाणे म्हणजे आपला लठ्ठपणा वाढणे असते.

12. फळांचा रस

काढून पिऊ नका. एक तर फळापासून रस तयार करताना मूळ फळात असलेले अनेक घटक नष्ट होतात. फळाच्या साली रसात नसल्यामुळे फळातील तंतुमय भाग कमी होतो. शिवाय फळातील साखरेचे फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होत असल्यामुळेही वजन वाढविण्यात रस महत्त्वाची भूमिका बजावतो.

13. मन करा रे प्रसन्न

जेवताना मन प्रसन्न ठेवावे. मन आनंदी असेल तर जठरात पाचक रस योग्य प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. शिवाय मन आनंदी असल्यामुळे या अन्नापासून मिळालेली बहुतेक सर्व ऊर्जा शरीर लगेच वापरते. त्यातील काही ऊर्जा फॅट्स् च्या स्वरूपात शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याचा किंवा निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.

याउलट जेवताना मन प्रसन्न नसेल, जर मनावर काळजी-चिंतेचे ओझे असेल किंवा ताण असेल तर त्यामुळे अन्न नीट पचत नाही. शिवाय या ताणामुळे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की, खाल्लेल्या अन्नातील काही भाग शरीर सुरक्षित वापरासाठी फॅट्स्मध्ये रूपांतरित करून ठेवता येते.

काहीही खात असताना अन्न तोंडात घोळवून घोळवून खावे. तोंडात अन्न जास्त वेळ घोळवल्यामुळे त्यात लाळ जास्त प्रमाणात मिसळते. असे अन्न पचायला सुलभ जाते.

मेंदूतील हायपोथॅलामस हा भाग तहान, भूक आणि झोपेचे नियंत्रण करतो. त्याच्यामुळेच आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते. तसेच जेवण घेत असताना काही काळाने (साधारणत: 20 मिनिटे) हा भागच ‘आता पोट भरले’ असा संदेश देत असतो.

जर खूप भराभर, पुरेसे न चावता खाण्याची सवय असली तर हा संदेश मिळेपर्यंत आवश्यकतेपेक्षा खूप जास्त खाल्ले जाते, परिणामी अन्नपचनाच्या, चरबी वाढण्याच्या समस्या निर्माण होतात. उलट सावकाश, चावून चावून खाल्ल्यास हा संदेश येईपर्यंत कमी खाल्ले जाते.

14. जेवणात दही-ताकाचा वापर

अन्न पचनाच्या दृष्टीने जेवणात दही आणि ताकाचा समावेश आवर्जून करावा. ज्यांना दूध पचायला जड जाते त्यांनी दुधाचा वापर दही आणि ताकाच्या रूपात निर्धास्तपणे करावा. त्यांच्यातील सूक्ष्म जिवाणू (enzymes) पचनक्रियेला सक्रिय करून अन्न पचनाला मदत करतात. दही आणि ताकासंबंधी अनेक गैरसमजुती आहेत. जसे त्यामुळे सर्दी होते, हिवाळ्यात दही खाऊ नये वगैरे.

हे खरे की नेहमी दही-ताकाचे सेवन करण्याची सवय नसल्यास सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो; पण दही-ताक अगदी ताजे – सकाळी लावलेले संध्याकाळी व रात्री लावलेले सकाळी घेतल्यास सर्दी होत नाही वा ते बाधत नाही. ते फार आंबट असता कामा नये याची काळजी घ्यावी.

जेवताना मधे मधे पाणी न पिता ताक प्यावे. वाटीभर दही जेवणात असावे. रात्री शक्यतो यांचा वापर टाळला तरी चालेल. त्यांच्यासोबत साखरेचा वापर जास्त करू नये. ताज्या ताकात पुदीना, काळे मीठ, मिरी, आले घालून त्याचे सत्त्व व चव दोन्ही वाढवता येतात.

15. भावनांचा मागोवा घ्या

कधी कधी एकटेपणा किंवा नैराश्य (depression) दूर करण्यासाठी नकळत खाण्याचा आधार घेतला जातो. अधिकतर वेळी अशा खाण्यात केळी – बटाट्यांचे वेफर्स किंवा तसलेच तळलेले पदार्थ असतात. टी.व्ही. पाहता पाहता, वाचता वाचता असे पदार्थ किती प्रमाणात पोटात जातात याला काही सीमाच उरत नाही.

परिणामी वेगाने वजन वाढते. म्हणून स्वत:च्या भावनांचा कानोसा घेऊन हे कारण दूर केल्यास वजन आटोक्यात राहील.

16. वयानुसार खाण्याच्या प्रमाणात बदल करावा

लहान मुलांना वाढत्या वयात आणि तरुणांना अति धावपळीच्या वयात अधिक कॅलरीज लागतात; पण चाळिशीनंतर ही धावपळही थोडी कमी झालेली असते आणि पचनशक्तीची सक्रियता कमी होऊ लागते. म्हणून हळूहळू खाण्यात कमी कॅलरीज असलेल्या खाण्याचा समावेश करावा. शिवाय या वयात वजन वाढण्याचीच शक्यता असल्यामुळे आपल्या खाण्यावर अधिक लक्ष द्यावे.


वजन कमी करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा लगेच वापरून टाकणे

आपण आपले जेवण कितीही नियंत्रित आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडावे यासाठी आपले शरीर काही अन्न फॅट्स् च्या स्वरूपात साठवून ठेवीत असते.

आपण जास्त आहार घेतल्यानंतर शरीर जास्त प्रमाणात अन्न साठवून ठेवते; पण आपण किमान अन्न घेतले तरीही शरीर त्यातलेच थोडे का होईना; पण साठवून ठेवल्याशिवाय राहत नाही. असे थोडे थोडे अन्न शरीराने साठवून ठेवले तरी त्याचा काही दिवसानंतर व्हायचा तोच परिणाम होतो, म्हणजे आपण लठ्ठ होतो.

त्यामुळे आपला लठ्ठपणा नियंत्रणात ठेवायचा असेल किंवा कमी करायचा असेल तर अशा प्रकारे शरीरात तयार होणाऱ्या फॅट्स् नियमित प्रमाणात कशा वापरल्या जातील यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. आपल्या शरीरात अनावश्यक फॅट्स् शिल्लकच राहिले नाही तर आपण लठ्ठ होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

नियंत्रित आहाराचे सेवन केल्यानंतरही शरीरात तयार होणाऱ्या फॅट्स्पासून मुक्तता मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे शारीरिक व्यायाम करणे. त्याबरोबर योगासने आणि प्राणायाम केल्यास उत्तम.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम

लठ्ठपणाला दूर ठेवण्यासाठी रोज नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

चालणे, धावणे किंवा शारीरिक कसरती अशा प्रकारचा कोणताही व्यायाम रोज किमान पंधरा ते वीस मिनिटे करणे आवश्यक असते. विशेषत: बैठे काम करणाऱ्या लोकांनी अशा प्रकारचा व्यायाम करायलाच हवा.

आम्ही रोज इतके फिरतो, त्यामुळे आम्हाला व्यायाम करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद फिरते काम करणारे लोक करतात; पण हा युक्तिवाद योग्य नाही. शेवटी ठरवून केलेला व्यायाम (Exercise) निराळा असतो आणि कामाच्या निमित्ताने फिरणे (Exhersion) वेगळे असते.

व्यायामाला वेळच मिळत नाही, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त असते. व्यायामासाठी वेळ न काढणाऱ्यांना नंतर आजारी पडल्यावर इस्पितळात उपचार घेण्यासाठी मात्र वेळ काढावाच लागतो. इस्पितळात उपचार घेण्यासाठी वेळ काढायचा नसेल तर आता व्यायामासाठी थोडा वेळ काढायला काय हरकत आहे?

कोणत्याही प्रकारच्या व्यायामासाठी खूप ऊर्जा लागत असते. ही ऊर्जा आपल्याला शरीरातील राखीव फॅट्स्पासून मिळविता येते. त्यामुळेच व्यायाम करणाऱ्यांचे शरीर प्रमाणबद्ध असते. तुम्हालाही तुमचे शरीर प्रमाणबद्ध ठेवायचे असेल तर नियमित व्यायामाला पर्याय नाही.

वजन कमी करण्यासाठी योगासने आणि प्राणायाम

शरीर तंदुरुस्त आणि प्रमाणबद्ध ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम यांच्याइतके उपयुक्त दुसरे काहीच नाही. योगासने किंवा प्राणायाम करणे फार अवघड असते असा काही जणांचा कायम समज असल्यामुळे ते आपले काम नाही, असे समजून अनेक जण त्यांच्या वाटेला जात नाहीत. सर्वच योगासने अवघड नसतात, तसेच चांगल्या प्रकृतीसाठी सर्व प्रकारची योगासने करणे आवश्यक नसते. मोजकीच योगासने केली तरी चालण्यासारखे असते. अनेक योगासने घरच्या घरी सहज करता येणे शक्य असते.

योगासने किंवा प्राणायाम केल्यामुळे शरीरातील फॅट्स् खूप मोठ्या प्रमाणात जळतात. त्यामुळे शरीर प्रमाणबद्ध आणि सुडौल राहण्यास मदत मिळते. शरीरातील सगळ्या अंत:स्रावी ग्रंथींच्या कार्याला चालना मिळते. त्यांचे स्राव आवश्यक त्या प्रमाणात होऊ लागतात. त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही पोषक आणि सकारात्मक परिणाम होतो. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतला जातो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था इत्यादिंचे कार्य नियमितपणे होऊ लागते. त्यांच्यात निर्माण झालेला अडथळा दूर होतो. परिणामी निरामय शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते.

वजन कमी करायचं

1. अज्ञान दूर करणे

वजन आणि लठ्ठपणा याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत आणि काही जण तर मुळात चुकीची माहिती पसरवीत असतात. अशा प्रकारच्या कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता किंवा वजन कमी करण्यासाठी जे काही कानावर आले ते करण्याचा प्रयत्न न करता, योग्य प्रकारे शास्त्रीय माहिती जाणून घेऊन त्याचा वापर करावा.

2. जास्तीच्या कॅलरीज

तुम्ही आहार म्हणून जितक्या कॅलरीज आत घेता तितक्या कॅलरीजचा वापर केला नाही तर उरलेल्या कॅलरीज शरीरात फॅटस् म्हणून जमा होतात. त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील फॅट्स् कमी करायचे असतील तर तुम्ही जितक्या कॅलरीज शरीरात घेता त्यापेक्षा अधिक कॅलरीज वापरायला हव्यात. वजन कमी करण्याची गुरुकिल्ली म्हणजे कॅलरीत कपात करणे.

3. फॅट्स् आणि कार्बोहायड्रेटस्चे योग्य प्रमाण

आहारात फॅट्स् किंवा कार्बोहायड्रेट्स्चे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो, म्हणून अशा पदार्थांचा आहारात गरजेपुरताच समावेश करावा.

4. व्यायामाची कमतरता

कॅलरीज जाळण्यासाठी किंवा त्यांचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी रोज किमान पाऊणतास तरी व्यायाम करण्याला पर्याय नाही.

थोडक्यात काय तर आयुष्यभर आपले वजन योग्यप्रकारे नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला चुकीची जीवनशैली बदलण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही.


टीव्ही पाहण्यामुळे वजन वाढते

टीव्ही पाहण्यामुळे, कॉम्प्युटरवर नेट सर्फिंग केल्यामुळे आणि व्हिडिओ गेम खेळल्यामुळे वजन वाढत असल्याचे अलीकडेच विविध देशांत केलेल्या पाहणीतून आढळून आले आहे. कारण तासन्तास एकाच जागी बसून राहिल्यामुळे शरीराची ऊर्जा खर्च होत नाहीच उलट अनेकदा अशावेळी वेफर्स, जंकफुड यांचे सेवन केले जाते, जे चरबी वाढण्याचे कारण ठरतात.

टी.व्ही. पाहताना त्यात वारंवार येणाऱ्या जाहिराती ‘खोटी भूक’ वाढवतात आणि त्या जाहिरातीतील चिप्स किंवा शीतपेये घेण्याच्या अनावर इच्छेला आपण बळी पडतो. टी.व्ही. पाहता पाहता जेवण घेतल्यास किती अन्न पोटात गेले याविषयी आपण जागरूक राहत नाही आणि त्यामुळे गरजेपेक्षा जास्त अन्न पोटात पोहोचवले जाते.

आपले वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि लठ्ठपणाला कायमस्वरूपी दूर ठेवायचे असेल तर टीव्ही पाहण्यावर नियंत्रण आणून जेवताना आणि झोपताना टीव्ही पाहणे कमी करायला हवे.

आईस्क्रीम आणि शितपेये वजन वाढवतात

आईस्क्रीममध्ये भरपूर प्रमाणात दूधाची साय, साखर असे अतिप्रोटीनयुक्त पदार्थ असतात. तसेच शितपेयातही साखरेचे उच्च प्रमाण असते. त्यामुळे शरीराला अनावश्यक कॅलरीज मिळतात त्यामुळे वजन वाढते.


वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे

वजन कमी करण्यासाठी सकस आहाराची गरज असते. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करणारे पदार्थ आवश्यक असतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय आणि औषधे देखील प्रभावी आहेत (वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक घटक). वजन कमी करण्यासाठी, अशा औषधी वनस्पती किंवा औषधाची आवश्यकता असते, जे चयापचय दर वाढवते.

आयुर्वेदिक औषधांमध्ये पाचन तंत्र बरे करण्याबरोबरच वजन कमी करण्याचे गुणधर्म आहेत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक वजन कमी करण्याच्या टिप्स खूप प्रभावी आहेत. येथे आम्ही अशा काही औषधांबद्दल सांगत आहोत (वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी) जे वजन लवकर कमी करण्यास मदत करतात.

मधुमेह, हार्ट स्ट्रोक आणि रक्तदाब देखील लठ्ठपणा कमी करून नियंत्रित केला जातो. आयुर्वेदातील औषधे मधुमेहींसाठी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. तर उशीर काय आहे, वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांबद्दल जाणून घेऊया.

1. गुग्गुल चयापचय दर सुधारते

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदात गुग्गुल लिहून देण्यात आले आहे. गुग्गुलचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. गुग्गुल शरीराच्या चयापचय गतीला गती देण्यासाठी उपयुक्त आहे. गुग्गुल शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. गुग्गुलचे सेवन अनेक प्रकारे करता येते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही बाजारात गुग्गुल कॅप्सूलचे सेवन करू शकता.

2. त्रिफळा पचनसंस्था बरे करते आणि लठ्ठपणा दूर करते

पाचन तंत्र बरे करण्यासाठी आयुर्वेदात त्रिफळाची शिफारस केली जाते. त्रिफळा हे आयुर्वेदिक औषधांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे. रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्रिफळामध्ये आवळा, हरड आणि बेहेरा यांचा समावेश आहे. सकाळी गरम पाण्यात त्रिफळा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

3. विजयसर जलद वजन कमी

आयुर्वेदात मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर कमी करण्यासाठी विजयसर हे औषध म्हणून दिले जाते. शरीरातील जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी विजेसर खूप उपयुक्त आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी विजेसर एक आयुर्वेदिक औषध आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही विजेसर हर्बल चहा घेऊ शकता.

4. दालचिनी वजन कमी करण्याची औषधी वनस्पती

लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी दालचिनीचा सर्वाधिक वापर केला जातो. मध आणि दालचिनी चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी किंवा वाढत्या लठ्ठपणाला प्रतिबंध करण्यासाठी दालचिनी फायदेशीर आहे. जर तुम्ही सकाळी दालचिनीचा चहा पीत असाल तर तुम्ही लठ्ठपणा वेगाने कमी करता.

5. पुनर्नवा द्वारे लठ्ठपणा जलद कमी

तसे, पुनर्नवा मूत्र संसर्ग आणि मूत्रपिंड साफ करण्यासाठी वापरला जातो . पण आयुर्वेदानुसार, पुर्णवमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म आढळतात, जे वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

6. मेथी पोटातील चरबी कमी करण्यास मदत करते

मधुमेहाचे रुग्ण मेथीचे सेवन करून रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांच्यासाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला देखील लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही मेथीचे सेवन करू शकता.

जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर रात्री मेथीचे दाणे पाण्यात टाका. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या. काही आठवड्यांत वजन कमी होणे सुरू होते. या व्यतिरिक्त, आपण आपल्या आहारात मेथी पावडर देखील वापरू शकता.


वजन कमी करण्यासाठी काय करावे?

 1. जेवणाच्या आधी प्लेटभर सॅलडस् खावे. पूर्ण खाल्ल्यानंतर जेवणाला सुरुवात करावी. यामुळे प्रत्यक्ष जेवण करण्यापूर्वी तुमचे पोट लो कॅलरीज, अँटी ऑक्सिडेंटस् याने भरलेले असेल आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी करणे शक्य व सोपे होईल.
 2. जेवणाच्या आधी सूप घ्यावे. ते लो कॅलरी फूड असून तुमची भूक शांत करण्याचे काम करते. त्यामुळे आपोआपच जास्तीचे जेवण करण्यापासून तुमचा बचाव होतो.
 3. कमीत कमी तूप आणि तेलाचा वापर असलेले जेवण करावे.
 4. नाश्त्याच्या वेळी एक प्लेट फळे खावीत. त्यात सफरचंद, पपई, टरबूज किंवा संत्री यांचा समावेश करावा. जास्त कॅलरीज असलेल्या केळी, चिकू, द्राक्षे या फळांचा वापर टाळावा. ही फळे खूपच आवडत असतील तर त्यांचा एखादा तुकडा खाण्यास हरकत नाही.
 5. दिवसा आणि रात्री योग्य प्रमाणात जेवण करावे.
 6. आपल्याला भूक लागली आहे असे वाटल्यावर कमी कॅलरीज असलेले एखादे फळ किंवा काकडी, गाजर खावे.
 7. धान्यात जास्त कर्बोदके असतात, त्यामुळे आहारात त्यांचा कमी प्रमाणात समावेश असावा. • वरण किंवा डाळी शिजविताना त्यात हिरव्या भाज्या टाकाव्यात. त्यामुळे डाळीतील कॅलरीजचे प्रमाण कमी होते.
 8. बिस्किट खाण्याची इच्छा झाल्यावर लो कॅलरीज असलेल्या एखाद्या बिस्किटाचे सेवन करावे. जसे-मारी गोल्ड, सोया बिस्कीटस्
 9. साखर म्हणजे मोठ्या प्रमाणातील कॅलरीजचा स्रोत आहे. एक चमचा साखरेतून सुमारे 20 टक्के अधिक कॅलरीज मिळतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित असावे.
 10. दूध किंवा सायीच्या दुधाऐवजी चरबीविरहित दुधाचा वापर करावा. त्यामुळेही कमी कॅलरीज मिळतात. चरबीविरहित दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचाच आहारात समावेश करावा.
 11. मोड आलेल्या कडधान्यांचा रोजच्या आहारात समावेश असावा.
 12. कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत गेल्यावर आधी फळे खा किंवा सूप प्या. जेवण करताना साधी पोळी आणि कमी तेलात तयार केलेली भाजी खा. आइस्क्रीम आणि गोड पदार्थांपासून मात्र कटाक्षाने दूर राहा.
 13. जवळच्या प्रवासाला जाताना कमी तेलात तयार केलेली किंवा भाजी-पोळी, पराठे, भाकरी आणि फळे, सॅलड घरूनच घेऊन जा.
 14. पायी चालणे हा वजन कमी करण्याचा सर्वांत चांगला पर्याय आहे. त्यामुळे दररोज किमान अर्धातास तरी वेगाने चालावे.
 15. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे.
 16. जेवणात दह्याचा समावेश असावा.
 17. जेवतांना पाणी पिण्याऐवजी ताक प्यावे.
 18. दुधी भोपळ्याचा एक कप रस रोज सेवन करावा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
 19. तुम्हाला उपवास असेल किंवा उपवास करण्याची इच्छा असेल तर त्या दिवशी लो कॅलरीज फळे खा.
 20. आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारचा उपवास करायला हवा.
 21. शक्य झाल्यास आठवड्यातून एकदा लंघन करावे.

वजन कमी करण्यासाठी काय करू नये?

 1. स्वयंपाक करताना जास्त तेलाचा, तुपाचा वापर करू नये.
 2. पोळीला जास्त प्रमाणात तेल किंवा तूप लावू नये. त्याऐवजी फुलके खाल्ले तर उत्तम.
 3. तुपात तळलेली पुरी किंवा पराठे यांचा जेवणात समावेश करू नये.
 4. आहारात शक्यतो तळलेल्या पदार्थांचा समावेश करू नये. तळलेले पदार्थ खाणे अनिवार्यच असेल तर शक्य तेवढ्या कमी प्रमाणात खावेत.
 5. एका जेवणाच्या वेळी 2 पोळ्यांपेक्षा जास्त पोळ्या/फुलके खाऊ नयेत.
 6. जास्त कॅलरीज असलेल्या पास्ताचा आहारात समावेश नसावा.
 7. ब्रेड, टोस्ट किंवा सँडवीच शक्यतो खाऊ नयेत. खाणे आवश्यकच असेल तर त्यांचे प्रमाण कमी असावे.
 8. जेवणात कोणत्याही स्वरूपातील लोणच्याचा समावेश नसावा.
 9. कोणत्याही पातळ पेयात किंवा ज्यूसमध्ये साखर न घालता त्याचे सेवन करावे.
 10. चरबीयुक्त पदार्थांनी जेवणाचे ताट किंवा सॅलड सजवू नये.
 11. सूप सेवन करताना त्यात क्रीम किंवा लोणी घालू नये.
 12. पिझ्झा हाही उच्च कॅलरीयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे त्याचा आहारात समावेश​शक्यतो नसावा.
 13. नारळ किंवा खोबऱ्यापासून तयार केलेले पदार्थ नेहमी खाऊ नयेत.
 14. कंडेस्ड दूधही वजन कमी करण्यासाठी घातक आहे.
 15. सुका मेवा जास्त प्रमाणात खाऊ नये.
 16. केक आणि पेस्ट्रिज यासारखे बेकरीतील पदार्थ चुकूनही खाऊ नयेत.
 17. खव्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश नसावा.
 18. खूप पोटभर जेवण कधीही करू नये.
 19. जेवताना स्वत:ला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे जेवण करण्याची इच्छा अधिक बळावते.
 20. दिवसातून 4-5 वेळेस थोडे थोडे थोडे खा.
 21. एका महिन्यात चार किलोपेक्षा जास्त वजन कमी करू नका.
 22. जेवणानंतर आइस्क्रीम खाऊ नये. जेवताना शीतपेये अजिबात घेऊ नयेत.

वजन कमी करण्यासाठी काय खावे काय खाऊ नये

 1. महिन्यातील एक आठवडा फळे खाऊन लंघन करावे.
 2. चहा-कॉफी घेणे संपूर्णत: बंद करावे अथवा दिवसातून एखाद्या वेळी घ्यावे.
 3. वाफेवर शिजवलेले अन्न खावे.
 4. कोंडा असलेले धान्याचे पीठ, पालेभाज्या, फळे तसेच कच्च्या कोशिंबिरींचा आहारात समावेश करावा.
 5. जेवताना प्रत्येक घास इतका चावून पातळ करावा की तो सहज गिळला जाईल.
 6. थकवा जाणवत असेल किंवा कुठल्या गोष्टीची भीती वाटत असल्यास, काळजीचे कारण असल्यास त्यावेळी जेवण करणे टाळावे. जेवत असताना बोलू नये.
 7. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम हा सगळ्यात चांगला उपाय आहे.
 8. लठ्ठपणा घालविण्यासाठी रोज 10 ग्रॅम तिळाचे तेल सकाळी व संध्याकाळी घेतले तर हमखास फायदा होतो; परंतु हे तेल फोडणीत वापरावे.
 9. वजन एकदम कमी न करता हळूहळू कमी करावे.
 10. जेवणात कच्च्या सॅलडचे प्रमाण वाढवावे.
 11. साखर, मैद्याचे पदार्थ, मीठ, आइस्क्रीम, फरसाण आणि अंडी खाऊ नयेत.
 12. रोज सकाळी उठल्याबरोबर कोमट लिंबूपाणी घ्यावे.
 13. फास्ट फूड खाण्याचा मोह कटाक्षाने टाळावा.
 14. तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश असावा. त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे पोट लवकर भरते.
 15. घरी बनवलेले पौष्टिक अन्नच खावे.
 16. अधिक फॅट्स् असलेले पदार्थ खाणे टाळावे. फॅट्स् शरीरात साठून राहतात.
 17. घरातून बाहेर पडण्याअगोदर घरातून खाऊनच बाहेर निघावे. त्यामुळे बाहेर अधिक कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही.
 18. खाण्यावर नियंत्रण ठेवले तर वजन आणि थकवा कमी करणे शक्य होते.
 19. जेवणानंतर लगेच झोपू नये.
 20. तणावरहित मनाची एकाग्रता साधल्याने, ध्यानधारणा केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
 21. नियमितपणाने रोज दिवसभरातून 3 ते 4 ग्लास कोमट पाणी प्यावे.
 22. लठ्ठपणा घालवण्यासाठी सकाळी चालणे सर्वांत चांगला व्यायाम होय.
 23. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी.
 24. दररोज तीस मिनिटांचा व्यायाम सर्वांकरिता लाभदायक आहे.
 25. जेवणानंतर लगेच पाणी न पिता तासाभराने घ्या.
 26. लठ्ठपणा कमी करण्यासाठी गोड पदार्थ टाळावेत.
 27. दिवसभरात मध्येमध्ये भूक लागत असेल तर जेवणाऐवजी गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो असे पदार्थ खावेत.
 28. खूप श्रम झाले असे वाटेपर्यंत व्यायाम करावा.
 29. शारीरिक श्रमानुसार आवश्यक तेवढाच आहार घ्यावा.
 30. आहारात सोयाबीन तेलाचा वापर करावा.
 31. सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणात जास्त अंतर ठेवू नये.
 32. जगण्यासाठी खायचे असते खाण्यासाठी जगायचे नसते, ही गोष्ट कधीच विसरू नये.
 33. खाण्याला एकाकीपणा दूर करण्याचे किंवा नैराश्य घालण्याचे साधन बनवू नका.

वजन कमी करण्यासाठी उपाय

 1. आपल्या दिसण्यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे आपल्या शरीराचं वजन. आपण कसे दिसतो यात शरीराची प्रमाणबद्धता खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रमाणबद्ध शरीर व्यक्तिमत्त्वाला आकर्षक बनवते.
 2. चांगले जगण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी आपण आपली काळजी घ्यायला हवी. योग्य आहाराची आणि योग्य व्यायामाची नियमित सवय लावून घेणे म्हणजे आपण आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेणे असते.
 3. रोजचा आहारही नियमित असायला हवा. आहाराचे प्रमाण व्यक्तिसापेक्ष असते. एकच नियम सर्वांना लागू पडत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तसा आहार. • बोलताना विवेकाने बोलणे आवश्यक असते, तसेच खातानाही विवेकाने खाणे आवश्यक असते.
 4. योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच आधीपासून शरीरात जमा झालेली चरबीही यामुळे वेगाने कमी होऊ लागते.
 5. योग्य वेळी योग्य आहार घेतल्यामुळे आपल्या शरीरात साठलेली चरबी कमी होते की नाही, हे दोन महिन्यांतच आपल्याला जाणवायला लागते. मुख्य म्हणजे खाण्याविषयी आंतरिक जाणीव वाढते आणि गाढ झोप लागते. आपल्या शरीरातील चरबी कमी होत असल्याची ही दोन लक्षणे आहेत.
 6. आपल्या शरीराची उपासमार होईल किंवा कोणत्याही एकाच प्रकारचे अन्न सतत खावे लागत असेल तर असे डाएट स्वीकारू नका. आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तसेच शरीर प्रमाणबद्ध राखण्यासाठी संतुलित आहार आवश्यक असतो, याचा विसर पडू देऊ नका.
 7. शरीर उपाशी ठेवल्यामुळे किंवा कोणत्याही एकाच प्रकारचे अन्न सतत खाल्ल्यामुळे वजन कमी होत असले, तरीही त्यामुळे शरीर अशक्त आणि कमकुवत होते, हे लक्षात घ्या.
 8. डाएट व्यवस्थित नसेल तर सांधे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे असे सांधे जास्त वेळ शरीराचा भार सांभाळू शकत नसल्यामुळे भविष्यात समस्या उद्भवू शकतात.
 9. रात्रीच्या जेवणापासून सकाळच्या न्याहारीच्या वेळेत खूप अंतर असते. रक्तातील साखरेचे प्रमाण कायम राखण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर काहीतरी पौष्टिक खाणे आवश्यक असते.
 10. व्यायाम आणि औषधांशिवाय वजन कमी करण्याची खात्री देणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. डाएट केल्याने वजन कमी होते; पण त्याला व्यायामाची जोड नसेल तर हाडे ठिसूळ होतात आणि स्नायू कमकुवत होतात.
 11. व्यायामाच्या बरोबरीने आहाराकडेही लक्ष द्यायला हवे. नुसता व्यायाम केला आणि त्या तुलनेत संतुलित आहार घेतला नाही तर पचनसंस्थेचे प्रश्न निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर दिसायला लागतो.
 12. विविध प्रकारचे फॅट फ्री, लो फॅट, शुगर फ्री अशा प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे म्हणजे चुकीची माहिती देऊन अयोग्य पद्धतीने जंकफूड गळ्यात मारण्याचा फसवा धंदा आहे. आधीच लठ्ठ असणारी माणसे जंकफूड खाण्याच्या मागे लागली तर त्यामुळे त्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. विशेष म्हणजे या पदार्थांत ट्रान्सफॅट वापरतात. यामुळे हे पदार्थ टिकाऊ होतात आणि चार दिवसानंतरही ताजे असल्यासारखे वाटतात; पण हेच ट्रान्सफॅट वजन वेगात वाढविण्याचे काम करतात. शिवाय हे फॅट रक्तवाहिन्यांत अडकतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
 13. शरीराची तंदुरुस्ती, व्यायाम, वातावरण, वय, आजार, कामाचे स्वरूप आणि वैयक्तिक आवडीनिवडी यानुसार प्रत्येकाने डाएट निश्चित करावे.
 14. चहा-कॉफीत जास्त कॅलरीज आहेत म्हणून चहा-कॉफीसोबत कुकीज पिझ्झा, बिस्किटे खाणे म्हणजे जास्त जी.आय. आणि ट्रान्सफॅट असलेले पदार्थ खाणे, हे शरीरासाठी घातक आहे.
 15. फळं आणि भाज्यांचा ज्यूस काढून खाणे म्हणजे त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे वाया घालविणे असते. फळे-भाज्यांमधील खनिजे आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळविण्यासाठी त्यांना चावून खाल्ले पाहिजे. निसर्गानेआपल्याला दात फक्त अन्न आणि फळे चावून खाण्यासाठी दिले आहेत, हे विसरू नका.
 16. फळांमधील सर्व पोषणमूल्य आपल्या शरीराला मिळण्यासाठी जेवणाऐवजी फळे खावीत. जेवताना किंवा जेवण केल्यानंतर फळे खाणे म्हणजे मिठाई खाल्ल्यासारखेच असते.
 17. एखादा पदार्थ शरीरासाठी कितीही उपयुक्त असला तरीही त्याचा अतिरेक करायचा नाही. कोणत्याही पदार्थाचा अतिरेक करणे आणि एखादा पदार्थ अजिबात न खाणे या दोन्ही गोष्टी हानीकारक असतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना अतिरेक न करता सारासारविवेकाचा वापर करणे हाच मध्यममार्ग आहे.
 18. निरोगी राहण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे आपली जीवनशैली बदलणे. योग्य तेच योग्य प्रमाणात खाणे. योग्य प्रमाणात नियमित व्यायाम करणे आणि स्वत:बद्दल योग्य विचार करणे.
 19. वजन नियंत्रित ठेवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे आवश्यक अन्न मर्यादित स्वरूपात खाणे.
 20. सहा-सहा तास पोट सतत रिकामे ठेवायचे आणि खूप जोराची भूक लागली म्हणून मग इतके खायचे की, पोटात हवा-पाण्यासाठी नखभर जागा ठेवायची नाही. अशा पद्धतीने खाणे पोटावर अन्याय करण्यासारखे असते. याचा अपरिहार्य परिणाम वजन आणि कमकुवतपणा वाढण्यात होतो.
 21. आपल्या पोटाची पचनशक्ती खूप चांगली असते, तेव्हा आपण हलके अन्नपदार्थ खात असतो आणि पोट जेव्हा खूप थकलेले असते तेव्हा मात्र मागचापुढचा विचार न करता खात सुटत असतो. यामुळे जेव्हा शरीराला पोषणाची गरज असते तेव्हा काही मिळत नाही आणि गरज नसते तेव्हा इतके काही देत असतो की, शरीराला त्यातून पोषक असलेले काहीच मिळविता येत नाही.
 22. आपल्या पोटाच्या मर्यादेपेक्षा अधिक खाणे हेच सर्व आजारांचे मूळ आहे. मर्यादित खाण्याची आणि अमर्याद खाण्याची एक सीमा असते. एकदा ही सीमा ओलांडली की, क्षमतेच्या पाच-सहापट खाणे होते आणि त्याचा परिणाम म्हणून पचनसंस्थेचे विकार होतात.
 23. पोटभर जेवल्यानंतरही आपल्या आवडीचा पदार्थ किंवा जास्तीचा पदार्थ वाया जाऊ नये म्हणून खातो तेव्हा आपण खाण्याची मर्यादा ओलांडत असतो आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो.
 24. गोड किंवा तळलेले पदार्थ घरात ठेवू नका. घरात असतील तर ते खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपल्याला हवे तेवढे खाऊन झाले की उरलेले पदार्थ लगेच इतरांना वाटून टाका.
 25. कंटाळा घालविण्यासाठी किंवा आनंद मिळविण्यासाठी म्हणून आपण आपले तोंड चालू ठेवीत असतो, त्यामुळे वजन अमर्याद वाढते.म्हणून खाण्याला कंटाळा घालवण्याचा पर्याय बनू देऊ नका.
 26. खाण्यासाठी इतर इंद्रियांचा वापर करणे म्हणजे नाकाने त्याचा गंध घ्यावा. डोळ्याने तो पदार्थ डोळेभरून पाहावा. कानाने त्याचा खाताना होणारा आवाज ऐकावा आणि पदार्थाचे स्पर्शज्ञान होण्यासाठी हाताने जेवावे. अशा पद्धतीने अन्न खाताना सर्व इंद्रियांकडून मेंदूकडे त्याच प्रकारचे संदेश जातात आणि पोट लवकर भरते.
 27. हर्बल औषधीही कधी कधी शरीराला घातक ठरू शकतात, म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्यांचा वापर करू नये. कारण अनेक हर्बल पदार्थ कारखान्यात तयार होतात, त्यामुळे ते कृत्रिम असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 28. रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करणे शरीरासाठी आवश्यक असतो.
 29. शरीर निरोगी ठेवायचे असेल तर त्याचा वापर करा. कोणतेही यंत्र वापरले नाही की त्याला गंज चढतो. शरीराचेही तसेच आहे. त्याचा वापर केला नाही की ते निरुपयोगी व्हायला लागते.
 30. शरीरातील चरबीमुळे एखादी व्यक्ती खूप लठ्ठ दिसत असली तरीही ती अशक्त असते, तसेच काटक व्यक्तीच्या अंगात फारशी चरबी नसते; तरीही अशी व्यक्ती सशक्त असते. शरीरातील चरबी आणि शक्ती यांचे प्रमाण व्यस्त असते हे नेहमी लक्षात ठेवा. शरीर सशक्त ठेवण्यासाठी शरीरात चरबी नसावी.
 31. सतत स्वीट्नर वापरण्याऐवजी एक-दोन चमचे साखर रोज नियमितपणे घेतली तर चालू शकते. कारण ती स्वीट्नरच्या तुलनेत कमी नुकसानकारक असते.
 32. आम्लपित्त होणे, ढेकर येणे, पोटात गॅसेस होणे, मळमळणे यासारखा होणारा त्रास म्हणजे पोटाकडून किंवा आपल्या पचनसंस्थेकडून आलेला धोक्याचा इशारा असतो. यावर उपचार म्हणून औषधी घेण्याऐवजी आपल्या पोटाला विश्रांती द्यावी.
 33. पोट भरते; पण मन भरत नाही असे काही आवडीचे पदार्थ खाताना अनेकांच्या बाबतीत होत असते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक खाल्ले जाते; पण खाताना सर्व इंद्रियांना कामाला लावले तर मन आधी भरते आणि मग पोट भरले नाही तरी चालते.
 34. पोषक म्हणजे कार्बोहायड्रेटस्, प्रथिने आणि फॅट्स्ची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर गरज असते; तर जीवनसत्त्वे, क्षार आणि खनिजे तुलनेने कमी प्रमाणात हवी असतात. अन्नासोबतच शरीराला नेहमी पाण्याची गरज पडते कारण आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के फक्त पाणी असते.
 35. कोणतेही अन्न शिजवल्यानंतर लगेच म्हणजे जास्तीत जास्त तीन तासांच्या आत खाऊन घ्यावे. शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवणे आणि गरजेनुसार पुन्हा पुन्हा गरम करून खाणे टाळावे.
 36. अन्न तयार करीत असताना ते जितक्या कमी लोकांसाठी तयार केले असेल तितके ते अधिक पोषकमूल्य असलेले असते. कोणतेही अन्न जितका जास्त वेळ शेगडीवर असते तितके त्यातील पोषणमूल्य कमी होतात म्हणून घरच्या जेवणाच्या तुलनेत हॉटेलातील जेवण कमी पोषणमूल्य असलेले असते.
 37. तुमच्या अवतीभोवती पिकणारे आणि ऋतुमानानुसार मिळणारे पदार्थ तुमच्या अन्नासाठी वापरा. कारण वातावरण आणि हवामान याचा आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होत असतो तसाच त्या भागातील पिकांवरही होत असतो. म्हणून ते जास्त पूरक आणि पोषक असतात.
 38. जेवण करीत असताना मन शांत असेल तर अन्नातील पोषकद्रव्ये शरीरात चांगल्या रीतीने शोषल्या जातात. शिवाय खाल्लेल्या अन्नाचे चरबीत रूपांतर होत नाही. त्यामुळे चरबी जमा होणे आणि स्थूलपणा वाढणे हे होत नाही.
 39. जेवण करताना मनावर ताण असतो तेव्हा पाचक रस योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्याचा परिणाम म्हणून अन्न पुरेशा प्रमाणात शोषले जात नाही. शिवाय ताणामुळे शरीर स्वत:ला असुरक्षित समजते आणि आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडावे यासाठी शरीर अन्नाचे चरबीत रूपांतर करते.
 40. शांत चित्ताने जेवण नाही केले, तर खाल्लेल्या बहुतेक अन्नाचे रूपांतर चरबीत होत असल्यामुळे शरीरातील ज्या पेशींना ऊर्जेची गरज असते त्यांना काही मिळत नाही आणि दुसरीकडे चरबी असलेल्या पेशी मात्र सारख्या फुगत असतात. या परिस्थितीलाच अन्न आपल्याला खाते असे म्हणतात. अन्नाने आपल्याला न खाता आपण अन्नाला खावे अशी इच्छा असेल तर सर्व प्रकारचे ताणतणाव, दु:ख-काळजी आणि चिंता दूर ठेवून शांत चित्ताने जेवण करावे. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत प्रत्यक्ष जेवणाला सुरुवात करण्याआधी श्लोक म्हणण्याची पद्धत आहे.
 41. मन शांत असले की जठराग्नी धडाधडा पेटतो. त्या आगीत शरीरात तयार झालेली चरबी जळून जाते. ज्यांना आपला स्थूलपणा कमी करायचा आहे त्यांनी शांत चित्ताने जेवण करावे.
 42. जेवण करताना टीव्ही पाहणे, पेपर किंवा पुस्तक वाचणे अशा गोष्टी करू नये. माणसाचे चित्त विचलित करण्यास या गोष्टी पुरेशा असतात.
 43. निरोगी आणि निरामय जीवन जगण्यासाठी आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरीज नियमित स्वरूपात मिळणे आवश्यक असते. कॅलरीज मिळविणे आणि त्यांचा वापर करणे या पहिल्या धड्यापासूनच आपल्या जीवनाची सुरुवात झालेली असते.
 44. मनावर ताण न घेता कोणतेही पदार्थ मनमुराद सेवन केले तर त्याचे चरबीत रूपांतर होण्याचे प्रमाण खूप कमी असते. कधी चुकून काही जास्त खाल्ले तर आपण काही अपराध केला असे वाटून घेऊ नका. बिनधास्तपणा हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. जे खाल्ले ते स्वीकारा.
 45. मेंदूच्या कामासाठी आणि विचारक्रिया सुरू ठेवण्यासाठी कर्बोदके आवश्यक असतात. त्यामुळेच खूप भूक लागली की, अनेकांना दुसरे काही सुचत नाही आणि ते चिडचिड करतात. सर्व वनस्पतीजन्य पदार्थांतात कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात. मांसाहारी पदार्थांत मात्र ते अजिबात नसतात.
 46. प्रक्रिया केलेले ब्रेड, बिस्किट आणि खवा, श्रीखंडे पनीर अशा दुग्धजन्य यासारख्या पदार्थांत फॅट असतात. त्यामुळे माणसाला आळस येतो आणि त्याच्या हालचाली मंदावतात.
 47. शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसून, प्रार्थना आणि श्लोक म्हणून तसेच देवाला नैवेद्य दाखवून हाताने जेवावे. भारतीय संस्कृतीतील जेवणाची ही पद्धत मन शांत ठेवण्यासाठी खूप चांगली आहे.
 48. जेवणानंतर गोड पदार्थ खाऊ नका. खायचेच असतील तर कमी खा आणि दोन जेवणाच्या मधल्या काळात. म्हणजे त्यातील साखरेचे थेट फॅट्स् मध्ये रूपांतर होत नाही. व्यायामानंतर लगेच, तसेच उपवास असताना असे पदार्थ आणि फळे खावीत.
 49. शक्यतो आठवड्यातून एकदाच गोड पदार्थांचे सेवन करावे.
 50. नाश्त्यासोबत फळे खाऊ नका, तर नाश्त्याच्या आधी किंवा नाश्ता म्हणून फळांचे सेवन करा.
 51. तळलेल्या पदार्थांसोबत गोड पदार्थ खाऊ नयेत. दोन्हीपैकी कोणता तरी एकच पदार्थ आणि तोही आठवड्यातून एखाद्या वेळी खावा.
 52. शरीराची झीज भरून काढणे आणि शरीर सुदृढ राखणे हे काम प्रथिने करीत असतात.
 53. प्रथिनांना आपल्यावरील जबाबदारी नीट पार पाडता यावी यासाठी शरीरात त्यांचे प्रमाण योग्य तेवढे असणे आवश्यक असते. साधारणपणे आपले वजन जितके किलो असेल, तितकी ग्रॅम प्रथिने दररोज घ्यावीत.
 54. सर्व प्रकारचे मांस, अंडी, दूध आणि डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. डाळी आणि कडधान्यात पुरेशा प्रमाणात प्रथिने असतात; शिवाय त्यांच्यापासून आवश्यक त्या प्रमाणात कर्बोदकेही मिळतात. मांसाहारी पदार्थांत प्रथिने असले तरीही कर्बोदके आणि तंतू नसतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा यापेक्षा अधिक प्रमाणात मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये.
 55. सोयाबीन आवडत असले, तरीही प्रथिनांसाठी दिवसातून एकदाच सोयाबीन खावे.
 56. प्रथिनांसाठी मांसाहारी पदार्थ हवे असतील तर चिकनपेक्षा मासे बरे.
 57. वेगवेगळ्या पदार्थांतून प्रथिने मिळवावीत. कारण त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ले मिळत असतात. वरण, भात, पोळी एकत्र खाल्ल्यामुळे या तिन्ही पदार्थांतून प्रथिनांच्या बरोबरीने आवश्यक अमिनो आम्ले मिळतात.
 58. सॉस, प्रक्रिया केलेले आणि साठवून ठेवलेले मांस खाणे टाळावे. कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट्स् मोठ्या प्रमाणात असतात आणि ते आपले वजन वाढवीत असतात. वरील मांस खायचेच असेल तर भरपूर व्यायाम केल्यानंतर आठवड्यातून एकदा खावे.
 59. हॉटेलातील तळलेले पदार्थ खाण्यात वापरू नयेत. कारण पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरलेले तेल हानीकारक होते आणि त्यातील पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात, हे वेगळे सांगायला नको.
 60. शरीरात चरबी साठल्यामुळे शरीर बेडौल होते, म्हणून चरबीचा एकदमच तिरस्कार करण्याचे काहीच कारण नाही. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात फॅटस्ही आवश्यक असतात. आपल्या मेंदूचा साठ टक्के भाग चरबीयुक्त असतो. तुम्ही आहारात फॅट्स्चा समावेश केलाच नाही तर या मेंदूचे काय होणार? थोडक्यात काय तर फॅट्स् हवेत; पण प्रमाणात. त्यांचा अतिरिक्त साठा झाला की शरीर बेडौल होऊ लागते.
 61. अन्न तयार करण्यासाठी लोखंडी तवा आणि कढईचा तसेच इतरही लोखंडी भांड्यांचा वापर करावा. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. याउलट चकचकीत स्टेनलेस स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यांचा स्वयंपाकासाठी वापर केल्यामुळे शरीरातील पाचकरस कमी होतो. अल्युमिनियमची भांडी अजिबात वापरू नयेत.
 62. सूर्यप्रकाशाचा आपल्या शरीराशी थेट संबंध आला की, डी जीवनसत्त्व तयार होते. त्यामुळे कोवळ्या उन्हात बसून ऊन अंगावर घ्यावे. डी जीवनसत्त्व मिळविण्याचा याहून सोपा उपाय दुसरा कोणताही नाही.
 63. मका, शेंगदाणे, सूर्यफूल, सोयाबीन यासारख्या तेलबियांत ई जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते; पण या पदार्थांवर प्रक्रिया केली किंवा ते जास्त शिजविले की ई जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप कमी होते. आपले हृदय, त्वचा, मज्जारजू आणि स्नायू यांच्यासाठी ई जीवनसत्त्व उपयुक्त असते.
 64. शरीरात साठलेल्या चरबीचे विघटन करण्यासाठी ई जीवनसत्त्व अतिशय उपयुक्त असल्यामुळे ज्यांना शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची आहे त्यांनी या जीवनसत्त्वाचे पुरेशा प्रमाणात सेवन करावे.
 65. हिरव्या पालेभाज्या आणि पूर्ण धान्ये यामध्ये क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते.
 66. सी जीवनसत्त्व इतर प्राण्यांप्रमाणे आपल्या शरीरात तयार होत नसले तरी बहुतेक सर्व फळांत ते मुबलक प्रमाणात असते. आपल्या आहारातून ते आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत असले, तरीही हे जीवनसत्त्व पाण्यात विद्राव्य असल्यामुळे शरीरातील पाणी कमी झाले की याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे हे जीवनसत्त्व नियमित स्वरूपात मिळवावे लागते.
 67. आहारात असलेले तंतू आतड्यात साचून राहिलेले अन्नकण साफ करण्याचे काम करतात आणि पोट लवकर साफ करतात. त्यामुळे पोट योग्य प्रकारे साफ करण्यासाठी, त्वचा चांगली ठेवण्यासाठी आणि शरीर सुडौल राखण्यासाठी आहारात तंतुमय पदार्थ असणे आवश्यक आहे.
 68. कॅफिन, दारू, साखर, सोडा आणि प्रक्रिया केलेले इतर खाद्यपदार्थ यामुळे शरीरात कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच नियमित मद्यपान करणाऱ्यांची हाडे ठिसूळ होतात.
 69. सर्व प्रकारच्या अन्नधान्यात लोह पुरेशा प्रमाणात असते. आपल्या रोजच्या आहारातून आपण त्याचे योग्य प्रकारे सेवनही करीत असतो; पण शरीरात त्याचे शोषण होण्यासाठी सी आणि ब जीवनसत्त्व असावे लागते. ते नसेल तर आहारातून सेवन केलेले लोह निरुपयोगी ठरू शकते.
 70. निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या आणि आपल्या अवतीभोवती जे पिकते त्याचाच आपल्या आहारात समावेश करणाऱ्या लोकांना निरोगी जगण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज पडत नाही. त्यामुळे शक्य होईल तितके निसर्गाच्या जवळ जाऊन जगावे.
 71. आपल्या शरीराला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते कारण आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. ही गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते.
 72. सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिऊ नका. चहा, कॉफी सोडणे शक्यच नसेल तर त्याआधी काही खाण्याची सवय लावून घ्या.
 73. चहा, कॉफी, सिगारेट यामधील कॅफिनमुळे प्रत्यक्षात आपल्या श्वसनाची गती, रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो. यामुळे आपण फ्रेश झालो असे वाटत असले तरी प्रत्यक्षात पाचक रसांच्या निर्मीतीत व पचनसंस्थेच्या कार्यात अडथळा येतो. आणि त्यामुळे शरीरातील साठलेली चरबी जाळण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.
 74. ताण हा पचनसंस्थेचा सर्वांत मोठा शत्रू आहे. ताणामुळे खाल्लेल्या अन्नाचे मोठ्या प्रमाणात चरबीत रूपांतर होऊन ती साठून राहते. अशी साठून राहणारी चरबी घातकच असते.
 75. योग्य प्रमाणात चौरस आहाराचा समावेश असलेला नाश्ता सकाळी सकाळी घेतल्यामुळे त्याचे पचन अधिक चांगले होते. त्यामुळे कोणताही चहा अगदी हर्बल चहा घेण्याची सवय असणाऱ्यांनी सुद्धा चहाच्या आधी खायला हवे.
 76. शरीरातील पेशींची पोषकद्रव्यांची गरज भागण्याइतका पौष्टिक आहार सकाळी उठल्यानंतर घ्यायला हवा. त्यानंतर एक-दींड तासाने चहा-कॉफी काहीही घेतले तरी चालते.
 77. शौचास बसण्यासाठी आपल्या नैसर्गिक बैठकीचा वापर करावा. मोठ्या आतड्याचा कॅन्सर, गुद्द्वाराच्या समस्या, मूळव्याध आणि बद्धकोष्ठता या सगळ्या समस्या कमोडशी संबंधित असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
 78. रोज सकाळी व्यवस्थित पोट साफ होणे आणि पचनसंस्था सर्व सामर्थ्यानिशी कार्यरत असणे म्हणजे माणूस निरोगी असणे होय. शरीरातील चरबी कमी करण्याची हीच गुरुकिल्ली आहे.
 79. भुकेची जाणीव करून दिल्यावर आपण पोटाला गप्प बसविण्यासाठी चहा, कॉफी, पाणी याचा वापर करतो. भुकेकडे दुर्लक्ष करतो. भूक खूप तीव्र होते, तेव्हा मग आपण इतके काही पोटात तुडुंब भरतो की, पचनसंस्थेची कार्यक्षमताच त्यामुळे एकदम कमी होते आणि खाल्लेले अन्न पचत नाही. त्यामुळे दर दोन तासांनी थोडे थोडे; पण सकस अन्न खावे. त्यामुळे पचनसंस्था कार्यक्षम राहते आणि अति खाण्याच्या त्रासापासून आपली सुटका होते.
 80. तीन तास किंवा त्याहून मोठ्या कालावधीत काहीही न खाणे म्हणजे आपणच आपल्या शरीराला शिक्षा देण्यासारखे असते. शरीराला एका वेळी मोजक्याच कॅलरीज मिळाल्या तर शरीर त्यांचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. त्यामुळे कॅलरीज चरबीच्या स्वरूपात साठून राहण्याचा प्रश्नच येत नाही. कमी कमी जास्त वेळा थोडे-थोडे खाणे म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी साठण्याची प्रक्रिया कमी करणे.
 81. कामाचा खाण्याशी खूप जवळचा संबंध असतो. काम अन्न खाते असे आपल्याकडे म्हणतात ते यामुळेच. म्हणून खूप काम असेल तेव्हा जास्त खा आणि कमी काम असेल तेव्हा कमी खा. शरीर सुडौल ठेवण्याचा हा सोपा मंत्र आहे.
 82. पोट गच्च भरलेले असल्यावर किंवा सूर्यास्त झाल्यावर शरीर अन्नपदार्थातील पोषक घटकांचे योग्य प्रकारे शोषण करू शकत नाही. कारण सूर्यास्तानंतर चयापचयाच्या क्रियेचा दर कमी होतो. त्यामुळे अन्नातील सर्व पोषक घटकांचे शरीरात शोषण व्हायचे असेल तर सूर्यास्तापूर्वीच खायला हवे आणि तेही पोट गच्च भरेपर्यंत नाही.
 83. रोजचे शेवटचे जेवण झोपायला जायच्या दोन तास आधी घ्यावे. जेवण केले आणि लगेच झोपायला गेले असे होऊ नये.
 84. रात्रीच्या वेळी कितीही चांगले जेवण केले तरी त्याचा योग्य प्रकारे वापर करून घ्यायला शरीर सक्षम नसते. त्यामुळे सूर्यास्तानंतर काम कमी होते म्हणून जेवणही कमी करावे. रात्री जास्त जेवण केल्यावर ते एक तर वाया जाते किंवा त्याचे अतिरिक्त चरबीत रूपांतर होते.
 85. नियमित व्यायाम करणे आवश्यक असते, तसेच व्यायाम सुरू करण्यापूर्वी आणि व्यायाम पूर्ण केल्यानंतर काहीतरी खाणे आवश्यकच असते.
 86. रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ आणि कॉफी घेऊ नये. त्यामुळे शांत झोप लागत नाही, तसेच अन्न पचनात अडथळा निर्माण होतो. कॅल्शिअम आणि लोहाचे शोषण नीट होत नाही, तसेच अ‍ॅसिडिटी वाढून बद्धकोष्ठता होते.
 87. टीव्ही पाहत किंवा झोपायला जाण्याच्या थोडा वेळ आधी जेवण केले किंवा जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ले तर पोटफुगी, गॅसेस, मलावरोध यासारख्या तात्पुरत्या अडचणी निर्माण होतात, तसेच लठ्ठपणाही येतो.
 88. ज्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही शौचाला जाल आणि तुम्हाला भूक लागेल, त्या दिवसापासून तुम्ही शरीर सुडौल राखण्याच्या योग्य मार्गाला लागलात असे समजायला हरकत नाही.
 89. महत्त्वाचे म्हणजे दर सहा महिन्यांनी आपले दात तपासून घ्यावेत. दात आणि हिरड्यांचे आजार यामुळे अन्न नीट चावले जात नाही आणि नीट न चावलेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही. आपली पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठी दात चांगले असणे अतिशय आवश्यक आहे.
 90. आपल्या आहाराची आणि आपल्या दैनंदिन कामाची नोंद लिहून काढावी. कोणतीही गोष्ट लिहिली की ती जास्त परिणामकारक होते.
 91. कामक्रीडा, स्वसंरक्षण आणि झोप या तीन नैसर्गिक उर्मीइतकीच खाण्याची ऊर्मीही महत्त्वाची असते. तुमचा धर्म कोणताही असला तरी त्यात खाण्यावर नक्कीच भर दिलेला असतो. कारण खाणे ही अगदीच नैसर्गिक गोष्ट आहे.
 92. आता उठता, त्यापेक्षा फक्त अर्धा तास लवकर उठा आणि हा अर्धा तास व्यायामासाठी द्या. आता व्यायामासाठी वेळ देत नसाल तर आजारी पडल्यावर दवाखान्यात राहण्यासाठी मात्र वेळ काढावाच लागतो.
 93. मधल्या खाण्यासाठी गाजर किंवा काकडी, सोबत न्यायला हरकत नाही.
 94. मोड आलेली कडधान्ये काहीही खा; पण फक्त मूठभर.
 95. ताज्या भाज्यांचे सॅलड, डाळ आणि भाजी, परतलेल्या भाज्या, सूप आणि ग्रिल्ड केलेल्या भाज्या यांचे आहार म्हणून सेवन करणे अत्यावश्यक असते.

वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

अजून वाचा:

Leave a Reply