अंतराळ संशोधन निबंध मराठी-Space research essay in marathi
अंतराळ संशोधन निबंध मराठी

अंतराळ संशोधन निबंध मराठी – Space Research Essay in Marathi

गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये अंतराळ संशोधनात मानवाने खूप मोठी प्रगती केली आहे. खरोखरच, ज्यांची पूर्वी कल्पनाही करणे अशक्य होते असे अनेक आश्चर्यकारक शोध ह्या काळात लागले. काही वर्षांपूर्वी अंतराळात प्रवास करणे, चंद्रावर जाणे इत्यादी केवळ स्वप्ने आणि कविकल्पना होत्या त्या आज प्रत्यक्षात उतरल्या आहेत.

अंतराळ प्रवासाच्या मोहिमा ४ ऑक्टोबर, १९५७ ह्या दिवसापासून सुरू झाल्या. रशियाने आपले स्पुटनिक १ हे अवकाशयान सुरूवातीला अंतराळात पाठवले. त्यानंतर स्पुटनिक २ ह्या यानातून लायका नामक कुत्री अंतराळात गेली. रशिया आणि अमेरिका ह्यांच्यात त्या काळात नेहमीच चुरस होती. त्यामुळे अमेरिकेनेही एक्स्प्लोरर आणि मरिनर ह्या अवकाशमोहिमा सुरू केल्या. ह्या मोहिमेत पाठवलेल्या यानांमुळे आपल्याला ग्रह, तारे, सूर्य आणि आपल्या पृथ्वीबद्दलची कितीतरी नवी आणि उपयुक्त माहिती आपल्याला कळली. मानवविरहित अवकाशयानांचा शोध लागल्यामुळेच आपण अंतराळविज्ञानात पुढले पाऊल टाकू शकलो.

अमेरिकेने रेंजर आणि सर्व्हेयर ही मानवविरहित याने अवकाशात पाठवली. त्याच वेळेस युरी गागारीन हा रशियन माणूस अवकाशात जाऊन पृथ्वीभोवती फे-या मारून आला. त्यानंतर २९ जुले, १९६९ रोजी अमेरिकेचे नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन आल्ड्रीन हे अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवण्यात यशस्वी झाले. संपूर्ण मानवजातीला गौरव वाटावा अशीच ही कामगिरी होती.

त्यानंतरच्या काळात बरीच अवकाशयाने अंतराळात पाठवली गेली. ह्या सर्व अवकाशयानांनी खूप संशोधन केले. त्यामुळे अंतराळात चालणे, खराब झालेल्या अवकाशयानांची दुरूस्ती करणे हे सगळे शक्य झाले. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा हा पहिला भारतीय अंतराळवीर सोयूज टी-२ ह्या रशियन अवकाशयानातून गेला आणि अंतराळात ८ दिवस राहिला. ते १९८४ साल होते.

भारतातही इस्रो ही संस्था अंतराळ संशोधनाचे कार्य करीत आहे. ह्या सर्व मोहिमांनी अंतराळातील अनेक रहस्ये उघड केली. ग्रह, तारे, चंद्र, सूर्य आणि आकाशगंगा ह्याविषयी भरपूर ज्ञान आपल्याला आता मिळाले आहे. मागील वर्षी आपण मंगळावर यान पाठवले. त्या यानाने मंगळ ग्रहाची असंख्य छायाचित्रे घेतली. तिथे भविष्यकाळात मानवाने वस्ती केली तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडणे ही एक महत्वाची गोष्ट ह्या संशोधनामुळे घडली. त्यामुळे हवामानाचे अंदाज अचूकपणे सांगता येऊ लागले. इंटरनेटचे जाळे, मोबाईल यंत्रणा ही सर्व ह्या कृत्रिम उपग्रहांवरच चालते म्हणूनच अंतराळ विज्ञानाचे खूप महत्व आहे.

कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स ह्या भारतीय वंशाच्या दोन अंतराळवीर महिलांनीही ह्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. असे हे अंतराळ संशोधन. कुणास ठाऊक पुढील काही दशकांनंतर आपण चंद्रावर वसाहतीही केल्या असतील.

पुढे वाचा:

Leave a Reply