सातारा जिल्हा माहिती | Satara District Information in Marathi

Satara District Information in Marathi : सातारा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचे मुख्यालय सातारा येथे आहे. त्याला ऐतिहासिक,सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यात सातारा जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा होता. या जिल्ह्यातील तरुण उत्साहाने सैन्यात जाऊन देशसेवा करतात. ही परंपरा आजही कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे, पूर्वेला सोलापूर, पश्चिमेला रत्नागिरी आणि दक्षिणेला सांगली जिल्हे आहेत. आज आपण या लेखात सातारा जिल्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

सातारा जिल्हा नकाशा-Satara District Information in Marathi
सातारा जिल्हा नकाशा

सातारा जिल्हा माहिती – Satara District Information in Marathi

Table of Contents

सातारा जिल्ह्याचा इतिहास

या जिल्ह्यावर पूर्वी मौर्य, सातवाहन यांच्यानंतर काही शतके मुस्लीम राज्यकर्त्यांनीही राज्य केले. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी सातारा आपल्या ताब्यात घेतला. राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने घेतलेला सातारा परशुराम पंतप्रतिनिधींनी पुन्हा मिळविला. इ. स. १६९८ साली छत्रपती राजारामांनी साताऱ्याला राजगादीची स्थापना केली. राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी साताऱ्यातून छत्रपतींची गादी सांभाळली. पुढे औरंगजेबाने शाहुंची सुटका केल्यानंतर साताऱ्यावर शाहुंच्या पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली. ताराबाईंनी कोल्हापुरात स्वतंत्र गादी स्थापन केली. मराठा काळात सातारा प्रदेशात मोठे सरदार उदयास आले होते. यामध्ये जावळीचे चंद्रराव मोरे, मलवडीचे घाटगे, फलटणचे निंबाळकर, कापशीचे घोरपडे इत्यादी प्रमुख होते. इंग्रज कालखंडात साताऱ्याच्या गादीच्या संरक्षणासाठी रंगो बापूजी इंग्लंडमध्ये गेले.

इ. स. १८४९ साली दत्तक विधान नामंजूर करीत इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा केले. रंगो बापुजींनी १९५७ पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा दिला व ते कधीही इंग्रजांच्या हाती आले नाहीत. छोडो भारत चळवळीत जिल्ह्याचे मोठे योगदान होते. क्रांतीसिंह नाना पाटलांचे प्रतिसरकार येथेच स्थापन झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्हा दक्षिणेकडील वारणा नदीपासून ते उत्तरेकडील नीरा नदीपर्यंत पसरला होता.

स्वातंत्र्यानंतर प्रशासकीय कामकाज आणि सोयीच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. पुढे दक्षिण सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्हा तयार झाला तर उत्तर सातारा जिल्ह्यातून सध्याचा सातारा जिल्हा उदयास आला. सातारा जिल्ह्याला सैनिकांचा जिल्हा म्हटले जाते. आजही सेना दलात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान देशाच्या सीमेवर देशाची सेवा बजावित आहेत. सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना २३, जून १९६१ मध्ये करण्यात आली.

सातारा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान व विस्तार

सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर हे शेजारील जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेस व अग्नियेस सांगली जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, वायव्येस (उत्तर-पश्चिमेस) रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याचा विस्तार उत्तरेला १७.५ ते १८.११ अक्षांस आणि पूर्वेला ७३.३३ ते ७४.५४ रेखांश असा आहे.

सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगा आहेत. त्याच्या पूर्वेला बामणोलीचा डोंगर दक्षिणोत्तर दिशेस पसरलेला आहे. याशिवाय जिल्ह्यात महादेव डोंगर, सिताबाई, औंध, आगाशिवा इत्यादी डोंगर आहेत. या डोंगराच्या दरम्यान कृष्णा नदीचा सखल मैदानी भाग आहे. जिल्ह्याची उत्तर सीमा निरा नदीने सिमीत केली आहे. जिल्ह्यामध्ये मांढरदेव व शिंगणापूर ही प्रसिद्ध शिखरे आहेत तसेच महाबळेश्वर व पाचगणीचे पठारही याच जिल्ह्यात आहेत. महाबळेश्वर हे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असून समुद्र सपाटीपासून सरासरी उंची १४३६ मीटर आहे.

सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ

सातारा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १० हजार ४८४ चौ. कि. मी. आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३.४१ क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. आकारमानाच्या दृष्टीने राज्यातील एकुण ३६ जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा १२ वा क्रमांक लागतो.

सातारा जिल्ह्यातील लोकसंख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३०,०३,७४१ इतकी आहे. यामध्ये स्त्रियांची संख्या १४, ९२, ८९९ (४९.७०%) तर पुरुषांची संख्या १५,१०,८४३ (५०.३०%) इतकी आहे. या जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२%, लोकसंख्येची घनता २८७ चौ. कि. मी. आणि लिंग गुणोत्तर ९८८ इतके आहे. या जिल्ह्यातील अनुसूचित जातीची लोकसंख्या ३ लाख २३ हजार २३६ इतकी तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २९ हजार ६३५ इतकी आहे.

सातारा जिल्ह्यातील तालुके

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. ते पुढीलप्रमाणे : सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा. या तालुक्यामधील जावळी तालुक्याचे मुख्यालय मेढे हे आहे, माण तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी हे आहे आणि खटाव तालुक्याचे मुख्य ठिकाण वडूज हे आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका माण व क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका महाबळेश्वर हा आहे.

सातारा जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय रचना

सातारा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतो. या जिल्ह्याचा प्राकृतिक विभाग पश्चिम महाराष्ट्र आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार ७४५ गावे, १ हजार ५०२ ग्रामपंचायती, ११ तालुके, ११ पंचायत समित्या, ८ नगरपालिका, ८ नगरपंचायती, ७ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्यात सातारा व माढा २ लोकसभा मतदार संघव ८ विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्याचा आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक एमएच – ११ आहे.

संस्थासंख्यानावे
नगरपरिषदासातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, रहीमतपूर, पाचगणी, फलटण, म्हसवड
नगरपंचायतकोरेगाव, पाटण, मेढा, वडूज, दहिवडी, खंडाळा, लोणंद, मलकापूर
पंचायत समित्या११सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा
तालुके११सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा
महसूल उपविभागसातारा, कराड, वाई, फलटण, कोरेगाव, पाटण, माण-खटाव
सातारा जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय रचना

सातारा लोकसभा मतदार संघ

या मतदार संघात सातारा जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा या ६ विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो.

माढा लोकसभा मतदार संघ

या मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदार संघ व सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो.

सातारा जिल्ह्यातील घाट

सातारा जिल्ह्यात खंबाटकी, कुंभार्ली, पसरणी इत्यादी प्रमुख घाट आहे.

  1. खंबाटकी घाट : पुणे-बंगळुर महामार्ग (खंडाळ्याजवळ),
  2. कुंभार्ली घाट : पाटण -चिपळून (कराडरत्नागिरी),
  3. पसरणी घाट : वाई-महाबळेश्वर,
  4. हातलोट घाट : बिरमणी (ता. खेड) – घोणसपूर (ता. महाबळेश्वर),
  5. पार घाट : महाबळेश्वर-महाड ,
  6. आंबेनळी घाट : महाबळेश्वर-महाड.

सातारा जिल्ह्यातील किल्ले

सजनगड, प्रतापगड व अजिंक्यतारा हे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले आहेत. जिल्ह्यातील तालुकावार गडकिल्ल्यांची विभागणी पुढीलप्रमाणे:

तालुकागड/किल्ले
जावळी व महाबळेश्वरप्रतापगड, वासोटा, मकरंदगड
वाई व खंडाळाकमळगड, वैराटगड, पांडवगड, केंजळगड
पाटणभैरवगड, सुंदरगड, गुरपावंतगड, जंगलीजयगड
कन्हाडसदाशिवगड, वसंतगड
सातारा व कोरेगावअजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी
फलटण व माणवारूगड, महिमानगड, संतोषगड
खटावभूषणगड, वर्धनगड
सातारा जिल्ह्यातील किल्ले

सातारा जिल्ह्यातील नद्या

सातारा जिल्ह्यात कृष्णा व कोयना या प्रमुख नद्या आहेत. याशिवाय माण, येरळा, वसना, बाणगंगा या नद्या आहेत. नीरा आणि माण या भीमा नदीच्या उपनद्या आहेत.

कृष्णा नदी : महाबळेश्वर पठाराच्या पूर्व भागात समुद्रसपाटीपासून साधारणतः १ हजार ३७१ मीटर उंचीवर कृष्णा नदी उगम पावते. या नदीचा जवळपास १७२ किलोमीटचा प्रवास सातारा जिल्ह्यातून होतो. कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोयना असून ती कोयना नदीही महाबळेश्वर पठारावर उगम पावते. कृष्णा नदीच्या कोयना, उरमोडी, वेण्णा, कुडाळी या उपनद्या आहेत. कराड येथे कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास ‘प्रितीसंगम’ असे म्हणतात. कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम साताराजवळ माहुली येथे झाला आहे.

कोयना नदी : कोयना नदी महाबळेश्वर पठारावर उगम पावते. ही नदी जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, मेढा व क-हाड तालुक्यातून वाहत जाऊन प्रितीसंगम येथे कृष्णा नदीस मिळते. या नदीवर पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. कैरा व वांग या कोयनेच्या उपनद्या आहेत.

निरा नदी : सातारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून निरा नदी वाहते. बाणगंगा ही निरा नदीची उपनदी आहे.

माणगंगा नदी : ही नदी दहिवडी तालुक्यातून वाहत जाऊन सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. या नदीवर रानंद तलाव व म्हसवड तलाव आहेत.

सातारा जिल्ह्यातील नद्या व काठावरील गावे/शहरे

नदी काठावरील गाव/शहर
कृष्णावाई, कराड
बाणगंगाफलटण
येरळावडूज
वेण्णामेढे
माणगंगादहिवडी
सातारा जिल्ह्यातील नद्या व काठावरील गावे/शहरे

सातारा जिल्ह्यातील हवामान

सातारा जिल्ह्याचे हवामान साधारणत: उष्ण व कोरडे आहे. सह्याद्री पर्वत व इतर डोंगरांमुळे जिल्ह्याचा पश्चिम भाग जास्त उंचीचा डोंगराळ आहे. येथील हवामान थंड असते. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी यासारखी थंड हवेची ठिकाणे आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागात तापमान जास्त असते. पूर्वेकडील काही भुभाग हा खुरट्या झुडपांनी व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील उंच भाग डोंगराळ व वनाच्छादीत असल्यामुळे ढग अडवले जाऊन येथे पाऊस पडतो. येथील महाबळेश्वर सारख्या ठिकाणी ६०० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे तर पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामध्ये माण, खटाव यासारख्या तालुक्यांच्या समावेश होतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते.

सातारा जिल्ह्यातील धरणे व सिंचन प्रकल्प

जिल्ह्यात मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प व लहान धरणे बांधली आहेत. त्याचबरोबर विहिरी, बंधारे, पाझर तलाव, यातूनही जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो.

सातारा जिल्ह्यातील मोठे प्रकल्प :

कृष्णा प्रकल्प, खंडाळा तालुक्यातील वीर धरण, भोर तालुक्यातील निरा-देवधर प्रकल्प, सातारा तालुक्यातील उरमोडी प्रकल्प, पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्प, वाई तालुक्यातील धोमबलकवडी प्रकल्प, कृष्णा व कोयना नद्यांवरील उपसा सिंचन, कराड तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन, कोरेगाव तालुक्यातील जिहे कठापूर उपसा सिंचन, कराड तालुक्यातील नवीन खुडशी बंधारा, येरळा नदीवरील नेर तलाव (ता. खटाव), वाघिरी नाल्यावरील रानंद तलाव (ता. माण), माणगंगा नदीवरील म्हसवड तलाव (ता. माण) असे काही मोठे प्रकल्प आहेत.

सातारा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प :

कृष्णा कालवा, आंधळी प्रकल्प (ता. माण), येरवाडी धरण (ता. खटाव), येवती-म्हासोली (ता. कराड), मोरणा प्रकल्प (ता. पाटण), उत्तरमांड प्रकल्प (ता. पाटण), कडाळी प्रकल्प (ता. जावळी) (यात हातेघर प्रकल्प व महू प्रकल्पांचा समावेश आहे), नागेवाडी प्रकल्प (ता. वाई), वांग प्रकल्प (ता. पाटण), इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश होतो.

सातारा जिल्ह्यातील नदी व त्यावरील धरणे

नदी धरण नदी धरण कोयना नदी निरा नदी वेण्णा नदी कोयना धरण वीर धरण कृष्णा नदी धोम धरण कन्हेर धरण

सातारा जिल्ह्यातील मृदा

जिल्ह्यातील कृष्णा, वेण्णा, कोयना, नीरा आदी नद्यांच्या खोऱ्यांतील जमीन सुपीक व गाळाची जाड थर असलेली आहे. पूर्वेकडील डोंगराळ भागात विशेषत: खंडाळा, फलटण, खटाव या तालुक्यांमधील जमीन खडकाळ व हलक्या प्रतीची आहे तर पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण आदी तालुक्यातील जमीन लाल मातीयुक्त आहे. यास लॅटेराईट या प्रकारची मृदा म्हणतात.

सातारा जिल्ह्यातील खनिज संपत्ती

या जिल्ह्यात खनिज संपत्ती अत्यल्प प्रमाणात आढळून येते. यात बॉक्साईट, चुनखडी व मँगनीज मिळते. तसेच जांभा खडक व नदीपात्रातील वाळू बांधकामासाठी काढली जाते.

सातारा जिल्ह्यातील वनसंपदा

या जिल्ह्यामध्ये एकूण वनक्षेत्र १, ५९२.३५ चौ. कि. मी. इतके आहे. या जिल्ह्यात मुख्यतः पश्चिमेकडील सह्याद्री पर्वत आणि डोंगररांगांमध्ये वने आहेत. या वनांत साग, धावडा, बांबू, जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात. या वनांतून बांधकामासाठी व इंधनसाठी लाकडे, आवळा, बेहेडा, हिरडा, अडुळसा, मध, डिंक इत्यादी उत्पादने मिळतात. त्याचबरोबरीने ससा, वानर, बिबटे, अस्वल, रानमांजर इत्यादी प्राणी आढळतात.

कोयना नदीच्या खोऱ्यात पाटण व जावळी या तालुक्यात सुमारे ४२३.५५ चौ. कि. मी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य पसरलेले आहे. मायणीच्या तलावातील क्षेत्र पक्ष अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी रोहीत, बदके, बगळे, माळढोक इत्यादी पक्षी येतात. महाबळेश्वर येथे प्रतापसिंह वनोद्यान आहे. तसेच प्रतापगड येथेही एक वनोद्यान उभारण्यात आले आहे. जागतिक वारसा यादीमध्ये युनेस्कोने सन २०१२ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश केलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील शेती व इतर पूरक व्यवसाय

या जिल्ह्यात हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागापेक्षा पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. या भागात तांदूळ हे पीक जास्त होते. पूर्व भागात पाऊस कमी असल्यामुळे ज्वारी, बाजरी, ही पिके अधिक होतात. ज्वारीचे पीक दोन्हीही हंगामात घेतले जाते. खरीप ज्वारीस येथे ‘जोंधळा’ असे म्हणतात, तर रब्बी ज्वारीस ‘शाळू’ असे म्हटले जाते. याशिवाय ऊस, भुईमूग, हळद, आले, कापूस, गहू, सूर्यफूल इत्यादी पिके घेतली जातात. कृष्णेकाठची वांगी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील कराड येथील केळी, फलटण येथील द्राक्षे व डाळिंबे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वर व वाई तालुक्यात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. काही भागात फुलांची शेती केली जाते.

जिल्ह्यात दहा नियंत्रित बाजारपेठा असून बाजार समित्यांनी कृषी उत्पादन साठवणुकीची सोय केली आहे. कराड येथील बाजारपेठ गुळासाठी, लोणंदची बाजारपेठ कांद्यासाठी, सातारा येथील बाजारपेठ आल्यासाठी, कोरेगाव भुईमूग व घेवड्यासाठी आणि फलटण येथील बाजारपेठ ज्वारी व बाजरीसाठी तर नागठाणे येथील बाजारपेठ आल्यासाठी प्रसिद्ध आहे. देशातील पहिले आले (आद्रक) संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यात रहिमतपूर येथे आहे. खंडाळा तालुक्यात पाडेगाव येथे १९३२ साली ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले. महाबळेश्वर येथे १९४० साली गेरवा गहू संशोधन केंद्र स्थापन झाले आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात शेळी व मेंढीपालनाचा व्यवसाय केला जातो. लोणी, एनकूळ, नागठाणे येथे एमूपालन केले जाते.

सातारा जिल्ह्यातील उद्योगधंदे

सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आठ वसाहती आहेत. यामध्ये कराड, सातारा, वाई, शिरवळ, खंडाळा, फलटण, कोरेगाव व पाटण यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात ऊस उत्पादनामुळे साखर कारखाने विकसित झाले आहेत. जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने ९ आहेत तर खासगी साखर कारखाने ६ आहेत. असे एकूण १५ साखर कारखाने जिल्ह्यामध्ये आहेत.

सहकारी साखर ६ कारखान्यांमध्ये पाटण तालुक्यात दौलतानगर येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, कराड तालुक्यात रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड तालुक्यात यशवंतनगर येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना, वाई तालुक्यात भुईंज येथे किसनवीर सहकारी साखर कारखाना, फलटण येथे श्रीराम सहकारी साखर कारखाना, सातारा तालुक्यातील सेंद्रे येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, कोरेगाव जवळ जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना इत्यादी सहकारी तत्वावरील साखर कारखाने जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर फलटण तालुक्यात साखरवाडी येथे न्यू फलटण इंडस्ट्रिजचा खासगी क्षेत्रातील साखर कारखाना ‘न्यू फलटण इंडस्ट्रिज’ या सारखे खासगी साखर कारखाने जिल्ह्यामध्ये आहेत.

जिल्ह्यातील सातारा तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामानाचा कारखाना आहे. सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कूपर कंपनीचा ऑईल इंजिनचा कारखाना आहे. सातारा येथे मोटार, स्कूटर, सूटकेस, वाहनांचे सुटे भाग, खेळणी इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. महाबळेश्वर, पाचगणी व वाई येथे फळप्रक्रिया उद्योग आहेत. सातारा तालुक्यात ठोसेघर, चाळकेवाडी तसेच पाटण तालुक्यातील मल्हारपेठ व खटाजवळ उंच पठारावर वाऱ्याच्या सहाय्याने वीजनिर्मिती केली जाते.

सातारा या जिल्ह्यात मध गोळा करणे, तेल काढणे, गूळ तयार करणे, हातामागावर कापड विणणे हे लघुउद्योग केले जातात. याचबरोबर पूर्व भागात घायतापासून दोरखंड करणे, घोंगड्या विणणे, बुरूडकाम हे कुटीरोद्योग केले जातात. महाबळेश्वर, पाचगणी येथील मधमाश्या पाळण्याचा व त्यापासून मध मिळविण्याचा उद्योग महत्त्वाचा आहे. कातडी कमावणे, मातीची भांडी बनवणे, लोणची-पापड तयार करणे इत्यादी कुटिरोद्योगही केले जातात.

सातारा जिल्ह्यातील वाहतूक व दळणवळण

या जिल्ह्यातील वाहतूक मुख्यतः रस्ते व लोहमार्गाने केली जाते. सातारा जिल्ह्यातून मुंबई-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जातो. या महामार्गावर शिरवळ, खंडाळा, पाचवड, सातारा, उंब्रज, कराड ही महत्त्वाची सातारा जिल्ह्यातील ठिकाणे आहेत. याशिवाय पुणे-बंगळूर हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. सातारा व कराड ही महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. कोयना व धोम धरणाच्या जलाशयांभोवतीच्या गावांना वाहतुकीसाठी यांत्रिक होड्यांची सोय केली आहे.

सातारा जिल्ह्यातील लोकजीवन

या जिल्ह्यात ग्रामीण, शहरी व आदिवासी लोकजीवन पाहायला मिळते. सण, उत्सव, पारंपरिक लोककलांचा वापर करून मनोरंजन केले जाते. माण तालुक्यात गजे (लेझीम) ही लोककला प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य समाज ग्रामीण भागात राहतो. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. बेंदूर, दसरा, दिवाळी, इत्यादी सण साजरे करतात. सणासुदीला लोकगीते, लेझीम यातून मनोरंजन केले जाते.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, प्रतापगडावरील शिवप्रतापदिन, शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा, मांढरदेवीची यात्रा, पालीची खंडोबा यात्रा, औंधची यमाई यात्रा, म्हसवडची सिद्धनाथ यात्रा, सज्जनगडचा दासनवमी उत्सव इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात.शिवप्रतापाला वंदना म्हणून किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रतापदिन’ जिल्हा प्रशासनाच्यावतीने साजरा करण्यात येतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात भिल्ल, कातकरी हे आदिवासी राहतात. कृष्णा, कोयना नद्यांच्या उगमाकडील भागात यांच्या वस्त्या जास्त प्रमाणात आढळतात.

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वे

सातारा जिल्ह्यातील वडगावचे संतश्रेष्ठ श्री जयराम स्वामी हे प्रभावी कीर्तनकार होते. दासबोध व मनाचे श्लोक यांची अजरामर रचना करणारे समर्थ रामदास स्वामी यांची कर्मभूमी याच जिल्ह्यातील, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील धावडशी येथील, महाराणी ताराबाई यांचा जन्म तळबीड, क्रांतीसिंह नाना पाटील, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, औंध संस्थानचे राजे भगवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी, कर्मवीर भाऊराव पाटील, राजमाता सुमित्रा राजेभोसले, किसन वीर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, काका कालेलकर, शाहीर साबळे (कृष्णराव साबळे), अभिनेते राजा गोसावी, ऑलिंम्पिक पट्ट खाशबा जाधव, धावपटू ललिता बाबर यासारखे अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांची सातारा ही जन्मभूमी व कर्मभूमी राहिली आहे.

सातारा जिल्ह्यातील पर्यटन

सातारा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे जलमंदिर, अजिंक्यतारा किल्ला, चारभिंती, हुतात्मा स्मारक, नटराज मंदिर, छत्रपती वस्तुसंग्रहालय इत्यादी उल्लेखनिय स्थळे आहेत, शहरापासून जवळच सज्जनगड हा किल्ला आहे. कास तलाव, ठोसेघर ही सहलीची ठिकाणे आहेत. महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. कास पठारावर फुलांचा हंगाम पाहण्यासाठी पर्यटक आवर्जुन गर्दी करत असतात.

वाई हे शहर गणपती मंदिर व घाटांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे. कराड हे कृष्णाकोयनेच्या संगमावर आहे. येथे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. त्याचबरोबरीने ठोसेघर, ओझर्डे व भांबवलीचे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झालेली असते. चांदोली, कोयना ही अभयारण्ये व मायणी तलाव हे पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

चाळकेवाडी, ठोसेघर, खटाव व मल्हारपेठ या ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहेत. वेण्णा नदीवर कन्हेर धरण, धावडशी येथील ब्रह्मेद्र स्वामींची समाधी, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामींची समाधी, लिंब येथील बारा मोटीची विहिर इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. सजनगड, प्रतापगड व अजिंक्यतारा हे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले आहेत. फलटण व चाफळ येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहेत.

पाली येथील खंडोबाचे देवस्थान, औंध येथील यमाई मंदिर, राजावाडा व वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. शिंगणापूर येथे शंभुमहादेवाचे मंदिर असून या ठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र शासनाने अलिकडेच ‘भिलार’ हे पुस्तकांचे गाव जाहीर केलेले आहे. यामुळे पर्यटक या भागाकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे

सातारा जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे

सातारा : सातारा हे शहर महाराणी ताराबाई व छत्रपती राजाराम यांच्या कारकिर्दीत मराठाशाहीच्या राजधानीचे ठिकाण बनले. सातारा येथेच छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. .

अजिंक्यतारा : सातारा शहराच्या जवळ असलेला हा किल्ला ‘अजिमतारा’ किंवा ‘मंगळाईचा डोंगर’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ. स. ११९० मध्ये बांधला आहे. त्यानंतर १६७३ मध्ये शिवरायांनी या किल्ल्यावर कब्जा मिळविला. .

सज्जनगड : सातारा शहरापासून साधारणत: ११ किलोमीटर अंतरावर सज्जनगड हा किल्ला आहे. या गडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे.

माहुली : सातारा तालुक्यातील माहुली येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला आहे. येथे शाहु महाराजांची समाधी आहे. माहुली हे गाव पेशव्यांचे न्याय मंत्री रामशास्त्री प्रभुणे यांचे जन्मगाव आहे.

महाबळेश्वर : महाबळेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्री क्षेत्र महाबळेश्वराचे मंदिर आहे. याच परिसरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम झाला आहे. तसेच ऑर्थर सीट पॉईंट, एल्फिस्टन पॉईंट, विल्सन पॉईंट (सर्वात उंच पॉईंट), बॉम्बे पॉईंट इत्यादी अनेक पॉईंट पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. महाबळेश्वर पठारावरील शिंदोला’ हे सर्वात उंच शिखर आहे.

पाचगणी : पाचगणी येथे टेबल लॅण्ड, सिडनी पॉईंट, मॅप्रो गार्डन, मॉरल रिआर्मामेंट सेंटर इत्यादी महत्त्वाची ठिकाणे आहेत . पाचगणी येथील ‘टेबल लॅण्ड’ (सपाट माथ्याचा प्रदेश) पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. येथे रेशीम संशोधन केंद्र आहे. पाचगणी येथे अनके निवासी शाळा असल्यामुळे हे ठिकाण महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे.

प्रतापगड : महाबळेश्वरवरून घाटमार्गे पोलादपूरला जाताना प्रतापगड लागतो. याच प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध (१० नोव्हेंबर १६५९) केला. छत्रपती शिवाजीअफझलखान यांची या गडाच्या पायथ्याशी झालेली भेट इतिहास प्रसिद्ध आहे. गडाच्या पायथ्याला अफझलखानाची कबर आहे.

वासोटा किल्ला : जावळी तालुक्यात वासोटा या किल्ल्याला शिवरायांनी वज्रगड असे नाव ठेवले. वाई : कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाई हे तालुक्याचे ठिकाण असून येथील गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. येथे ढोल्या गणपती मंदिर आहे. तसेच विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय आहे. वाईपासून जवळच मेणवली येथे नाना फडणवीस यांचा प्रसिद्ध वाडा आहे. पांडव त्यांच्या वनवासात विराट नगरीत राहिले होते. विराट नगरी म्हणजे सध्याची ‘वाई’ आहे असे मानले जाते.

रायरेश्वर : वाई तालुक्यातील रायरेश्वर डोंगरावर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती.

भुईंज : वाई तालुक्यातील भुईंज येथे भृगू ऋषींची समाधी आहे. हे गाव पुणे-बंगळूरू महामार्गावर आहे.

मांढरदेवी : वाई तालुक्यातील मांढरदेवी येथे सुमारे ३५० वर्षे जुने काळुबाई देवीचे मंदिर आहे.

भिलार : वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून भिलार गावाची निवड केली आहे. असंख्य विषयांवरची पुस्तके गावातील घरांमध्ये उपलब्ध आहेत.

औंध : खटाव तालुक्यातील औंध येथे यमाई देवीचे मंदिर आहे. येथे पूर्वी औंध संस्थान होते. औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. या वस्तु संग्रहालयात ८ हजारांपेक्षा जास्त वस्तु आहेत.

कासपठार : पावसाळ्यानंतर रानफुलांनी सजलेले कासपठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. यावेळी विविध रंगांच्या फुलांबरोबरच व विविध रंगांची फुलपाखरेही आढळून येतात. या स्थळास सन २०१२ मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला आहे.

ठोसेघर : सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील धबधबा प्रसिद्ध आहे.

चाफळ : चाफळ हे गाव पाटण तालुक्यात आहे. रामदास स्वामींनी चाफळ येथे मारुतीची स्थापना केली. राज्यातील मारुतीच्या अकरा स्थानांपैकी दोन स्थाने येथे आहेत. याच ठिकाणी श्रीरामांचे मंदिरही बांधले.

कराड : कराड येथील कृष्णा व कोयना नद्यांचा प्रितीसंगम असून याच ठिकाणी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. तसेच येथे कृष्णामाईचे मंदिर आहे. कराड तालुक्यात चांदोली अभयारण्य व सागरेश्वर अभयारण्याची हद्द येते. खूप जुन्या ऐतिहासिक दस्ताऐवजात कराडचा उल्लेख ‘करहाकड’ असा सापडतो.

पाली : कराड तालुक्यातील पाली येथे खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. येथील खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे.

शिखर शिंगणापूर : माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभु महादेवाचे देवस्थान आहे. पाटण : पाटण हे तालुक्याचे ठिकाण कोयना व केरा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. पाटण येथून जवळच हेळवाक येथे ‘शिवीजीसागर’ हा कोयना धरणाचा जलाशय आहे.

कोयनानगर : कोयना नदीवर बांधलेल्या धरणाच्या जलाशयाला ‘शिवाजीसागर’ असे म्हणतात. विद्युत निर्मितीसाठी येथे ‘लेक टॅपिंग’ चा यशस्वी प्रयोग करण्यात आला. कोयनानगर येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतीउद्यान आहे.

सातारा जिल्हा माहिती, Satara District Information in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न १. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे?

उत्तर – पुणे जिल्हा

प्रश्न २. सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत

उत्तर – ११ (सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा.)

Leave a Comment