सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती | Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi : एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पाच फूट अकरा इंच उंची, बारीक सडपातळ बांधा, गंभीर तेजस्वी मुद्रा, सोनेरी चौकटीचा चष्मा, त्यातून चमकणारे तेजस्वी तपकिरी रंगाचे डोळे, भव्य कपाळ, त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र टोकदार फेटा, तलम पांढरे पण काहीसे आखूड नेसलेले धोतर, त्यावर रेशमी कोट, संपूर्ण जगभरात विख्यात असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्!

सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती-Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi
सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती, Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

अत्यंत बुद्धिमान आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, उत्तम प्रशासक, पारदर्शी व्यक्तित्व, थोर वेदांती पंडित, अशा थोर व्यक्तीचा परिचय करून घेणे यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणतीही नाही.

तत्त्वज्ञानाच्या पायावर संस्कृतीची भव्य विशाल इमारत उभी असते. संस्कृतीचा आत्मा ” म्हणजे तत्त्वज्ञान.

हे बोधप्रद वाक्य ज्यांच्या लेखणीतून उतरलेले आहे, त्या भारताच्या तत्त्वज्ञा’ची ओळख करून घ्यायला आजच्या पिढीला नक्कीच आवडेल.

सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती – Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

Table of Contents

नाव : डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
जन्म :५ सप्टेंबर १८८८
जन्मस्थान :दक्षिण भारतातील तिरुत्तनी
वडील :सर्वपल्ली वीरस्वामी
पत्नी :सिवकामू
आईचे नाव :सीताम्मा
मुले :सर्वपल्ली गोपाळ
मृत्यू :१७ एप्रिल १९७५

सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म आणि बालपण

भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडू राज्यात चित्तूर प्रांतात, तिरुत्ताणी या छोट्याशा गावात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये एका मध्यमवर्गीय धार्मिक तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील साधे तहसीलदार होते.

घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच; पण कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. राधाकृष्णन् यांच्या आयुष्याचा बालपणीचा काळ तिरुत्ताणी या गावात गेला. तिरुत्ताणीपासून अगदी जवळ तिरुपती हे पुण्यक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर म्हणजे शब्दब्रह्म’ उडुपी म्हणजे ‘अन्नब्रह्म’ आणि तिरूपती म्हणजे ‘नादब्रह्म’. या तीर्थक्षेत्री अनेक भाविक येतात. अशा धार्मिक वातावरणाचा परिणाम राधाकृष्णन् यांच्यावर झाला. त्यामुळेच त्यांच्या मनात ईश्वर व धर्म यांच्याविषयी कुतूहल निर्माण झाले आणि त्यांच्या विचारांना चालना मिळाली.

लहानपणी मुले खेळण्यात रमतात, समवयस्क मुलांच्यात मिसळतात, दंगा करतात, गप्पा मारतात, भांडतात, एकटेपणाला घाबरतात, कंटाळतात; पण राधाकृष्णन् मात्र याला अपवाद होते. त्यांना मुलांच्यात मिसळायला, खेळायला आवडत नसे. ते ते एकांतप्रिय व शांतताप्रिय होते. जेव्हापासून त्यांना वाचता येऊ लागले, तेव्हापासून ते वाचनात रममाण होऊ लागले. विविध विषयांवरील पुस्तके वाचणे हाच त्यांचा छंद बनला. ग्रंथ हेच त्यांचे जिवलग मित्र, गुरू बनले. वाचन, मनन, चिंतन यामुळे ते अधिक गंभीर व अंतर्मुख बनले. ते म्हणत. “मौनसृष्टीत आनंद होतो.

विहार करताना मला अधिक मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात. ते या मुलाच्या बाबतीत खरे ठरले. हाच मुलगा पुढे थोर तत्त्ववेत्ता बनला.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण

राधाकृष्णन् यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्ताणी येथे झाले. गाव लहान असल्यामुळे पुढील शिक्षणाची सोय नव्हती; म्हणून पुढील शिक्षणासाठी त्यांना तिरुपती येथील ‘लूथरन मिशन हायस्कूल’मध्ये घालण्यात आले. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी ते मिशन हायस्कूलमध्ये शिकू लागले. तेव्हा त्या शाळेत ख्रिस्ती धर्माचे नि त्यातील तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले जाई. बायबलचा अभ्यास करावा लागे. राधाकृष्णन् यांचे वाचन अफाट होते. गाढा अभ्यास होता. त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला. दोन्ही धर्मांची तत्त्वे समजून घेतली; त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. तेव्हा त्यांना समजले की, आपला हिंदू धर्मच सर्वांत श्रेष्ठ धर्म आहे. त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास व आदर वाढला.

पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी राधाकृष्णन् मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी वेलोरच्या ह्यूरिस कॉलेज’मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. लवकरच ते एफ्. वाय.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यापुढील शिक्षणासाठी त्यांनी मद्रास येथील ‘ख्रिश्चन कॉलेजात प्रवेश घेतला. पदवी परीक्षेसाठी त्यांनी ‘तत्त्वज्ञान’ हा विषय निवडला. तत्त्वज्ञान हा विषय अवघड असूनही त्यांनी तो निवडला; कारण त्यांना या विषयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. नंतर ते बी. ए. ची परीक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी हा विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त राधाकृष्णन्नच उत्तीर्ण झाले. या परीक्षेतील नेत्रदीपक यशामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक वाढला.

राधाकृष्णन् मिशनरी शिक्षण संस्थेत शिकले. त्यामुळे त्यांना ख्रिश्चन धर्माची ओळख झाली खरी; पण त्यांना जाणवले की, ख्रिश्चन लोक हिंदू धर्मातील कर्मफल, पुनर्जन्म, वेदांत, अद्वैत यावर टीका करतात आणि हिंदू धर्माची उपेक्षा करतात. ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. त्यामुळे त्यांनी ठरविले की, हिंदू धर्मशास्त्राचा व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आणि हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान लोकांसमोर मांडायचे. त्यासाठी त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानावरील सर्व ग्रंथ बारकाईने वाचून त्यावर टिपणे काढली. या सुमारास स्वामी विवेकानंदांच्या धार्मिक पराक्रमाची व अमोघ वक्तृत्वाची छाप त्यांच्यावर पडली.

राधाकृष्णन् यांनी एम. ए. साठी तत्त्वज्ञान’ हाच विषय निवडला. त्यानंतर त्यांनी ‘वेदांतातील नीतिशास्त्र’ या विषयावर प्रबंध लिहिला. त्यासाठी त्यांना जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ प्रा. ए. जी. हॉग यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा हा प्रबंध सर्व परीक्षकांच्या पसंतीस उतरला व सर्वोत्कृष्ट ठरला. हा प्रबंध पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला. हा प्रबंध लिहिला तेव्हा त्यांचे वय अवघे २० वर्षे होते. या वयात तत्त्वज्ञानासारख्या गूढ, कठीण, क्लिष्ट विषयावर प्रबंध लिहून आपल्या बुद्धिमत्तेची चमक जगाला दाखवून दिली. प्रा. हॉगसाहेबांनी त्यांचे खूप कौतुक व प्रशंसा केली. त्यांनी दिलेले प्रशस्तिपत्र म्हणजे त्यांच्यासाठी एक अमूल्य ठेवाच होता.

राधाकृष्णन् यांनी बी. ए. आणि एम्. ए. या ए परीक्षांमध्ये सुवर्णपदके मिळविली. इतकेच नाही तर कॉलेजमध्ये दाखल झाल्यापासून ते थेट एम. ए. होईपर्यंत सर्व बक्षिसे, पदके व शिष्यवृत्त्या त्यांनी मिळविल्या. असे होते त्यांचे शैक्षणिक जीवन.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अध्यापन क्षेत्रात पदार्पण

राधाकृष्णन् यांना एम्. ए. ची पदवी मिळताच मद्रास येथील ‘प्रेसिडेंसी कॉलेजा’त तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी अध्यापनकार्य अत्यंत निष्ठेने केले. नंतर त्यांना ‘म्हैसूर विश्वविद्यालया’त ‘तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून सन्मानाने आमंत्रित केले गेले.

राधाकृष्णन् यांच्या यशाची कमान उंचावत गेली. कलकत्ता विश्वविद्यालयात प्रोफेसर ऑफ मेंटल अँड मॉरल सायन्स’ या उच्चपदावर त्यांची निवड व नियुक्ती झाली. याठिकाणी त्यांनी सुमारे दहा वर्षे काम केले.

या कार्यकालात त्यांचे लेखन चालूच होते. पुढे त्यांनी ‘समकालीन तत्त्वज्ञानामध्ये धर्माचे स्थान’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात पाश्चिमात्य विचार आणि उपनिषदे यांची तौलनिक मीमांसा केली आहे. या ग्रंथाच्या आधी त्यांचा ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला होता.

राधाकृष्णन् हे पट्टीचे वक्ते असल्याने त्यांना ‘केंब्रिज विद्यापीठा’ने व्याख्यानासाठी आमंत्रित केले. ऑक्सफर्डच्या ‘ऑप्टन व्याख्यानमालेतही व्याख्यान देण्याचा मान मिळाला. त्यांनी तीन वर्षांत इंग्लंडमध्ये जी भाषणे दिली, त्या सर्व भाषणांचा संग्रह ‘प्राच्य धर्म आणि पाश्चिमात्य विचार’ या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

नंतरच्या कालावधीत ते आंध्र विश्वविद्यालया’चे उपकुलगुरू म्हणून कार्यरत होते. जिनिव्हा येथील ‘लीग नेशन्स्’ ह्या संस्थेचा ‘बौद्धिक सहकार्य समिती’ च्या उपसमितीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आंध्र विद्यापीठाने त्यांचा आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञ’ म्हणून गौरव करून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली.

त्यानंतर परदेशी निघण्यापूर्वी राधाकृष्णन् यांनी महात्मा गांधींची भेट घेतली व आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रोफेसरशिप स्वीकारल्याचे त्यांना सांगितले. महात्मा गांधीजींना राधाकृष्णन् यांच्याबद्दल जिव्हाळा होता. तसेच, राधाकृष्णन्देखील महात्मा गांधीजींचा आदर करीत असत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. अध्यापनक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महात्मा गांधीजींचे आशीर्वाद घेतले होते.

सर्वपल्ली राधाकृष्णन बनारस विश्वविद्यालयाचे कुलपती

डॉ. राधाकृष्णन् ऑक्सफर्ड विद्यापीठात असताना त्यांच्याकडे एक स्वातंत्र्यसैनिक व एक आदर्श शिक्षणतज्ज्ञ असलेले पंडित मदन मोहन मालवीय यांचे लक्ष गेले. त्यांनी डॉ. राधाकृष्णन् यांची ‘बनारस विश्व हिंदू विद्यापीठाचे कुलपती म्हणून नेमणूक केली. बरीच वर्षे त्यांनी ते पद भूषविले. या कारकीर्दीत त्यांनी विद्यापीठाची प्रगती घडवून आणली. तेथे पोहण्याचे तलाव, नगरपालिका, पिण्याच्या पाण्याची सोय, दवाखाने इ. सुखसोई केल्या. या विद्यापीठातून अनेक नामवंत, जागतिक कीर्तीचे विद्यार्थी तयार झाले. त्यापैकी डॉ. जयंत नारळीकर हे एक.

विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा खरा हाडाचा शिक्षक

इ. स. १९४२ साली चलेजाव’चा ठराव झाला. देशात क्रांतीचे वारे वाहू लागले. सभा होऊ लागल्या. मिरवणुका निघू लागल्या. महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांचे सळसळते रक्त त्यांना स्वस्थ बसू देईना. क्रांतिपर्वात त्यांचा सहभाग लक्षणीय होता. इंग्रज सरकार अशा क्रांतिकारकांना मारत असत आणि पकडून जेलबंद करीत असे. या गोष्टींपासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् प्रयत्नशील असत. विद्यार्थ्यांना यापासून परावृत्त करण्यात त्यांना यश आले नाही, तरी ते विद्यार्थ्यांवर कधीच रागावत नसत. उलट त्यांना त्रास होऊ नये म्हणून सतत त्यांच्याबरोबर राहत असत.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विद्यापीठात मार्शल लॉ’ लागू करून विद्यापीठ ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. आणीबाणी लक्षात घेऊन डॉ. राधाकृष्णन् यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना तातडीने आपापल्या घरी परत जाण्याचा आदेश दिला. जाण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून जमा रकमेतून पैसे तातडीने मिळण्याची सोयदेखील केली.

पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाले. दक्षिण भारतातील विशाखापट्टण, काकीनाडा या बंदरांवर बॉम्ब फेकण्यात आले. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. असुरक्षित असल्याने विद्यार्थ्यांच्यात भीती निर्माण झाली. विद्यार्थी घरी जाण्याची इच्छा व्यक्त करू लागले. तेव्हा डॉ. राधाकृष्णन् यांनी सर्व विद्यार्थ्यांची तातडीची सभा बोलावली आणि त्यांना तुम्ही इथेच कसे सुरक्षित आहात, हे पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती पळाली व डॉ. राधाकृष्णन् यांच्यावरील त्यांचा विश्वास वाढला.

सर्वपल्ली राधाकृष्णन कुशल प्रशासक व न्यायप्रियता

डॉ. राधाकृष्णन् यांना पक्षपातीपणा केलेला आवडत नसे. सर्वांना समान न्याय मिळावा, याकडे त्यांचा कटाक्ष असे. वशिलेबाजीचा त्यांना तिरस्कार होता. कोणी गुणवत्ता नसताना उच्च शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा आग्रह करीत, तेव्हा ते त्यांना सांगत.

अधिक अभ्यास करा, उत्तम गुण मिळवा आणि मग अभिमानाने छाती पुढे काढून सांगा, मला प्रवेश द्या. तोंड वेंगाडणे, वशिला लावणे मला पसंत नाही. तेव्हा असा प्रयत्न व्यर्थ ठरेल’, असे रोखठोकपणे सांगत.

डॉ. राधाकृष्णन् यांनी कधीच मोठेपणा मिरवला नाही. विद्यार्थ्यांवर कधीच अन्याय होऊ दिला नाही. कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेऊन योग्य असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्नच केला. कधीही अधिकाराचा दुरुपयोग केला नाही, की अहंकार बाळगला नाही. ते नेहमी म्हणत, ‘जेव्हा आपणास समजते, असा अहंकार आपल्यात निर्माण होतो, त्यावेळी आपले ज्ञान व शिक्षण त्याच क्षणी संपते.”

ते सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत. त्याचमुळे ते लोकप्रिय झाले. त्यांनी बनारस विद्यापीठाला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली आणि विद्यापीठाचा लौकिक वाढविला. ते कुशल प्रशासक होते. आपल्या जीवनात ४० वर्षे त्यांनी शिक्षणक्षेत्रात सेवा केली. त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विश्वविद्यालयाची पाहणी करण्यासाठी भारत सरकारने जेव्हा युनिव्हर्सिटी कमिशन’ नेमले, तेव्हा त्याचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना बहाल केला.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा राजकारणात प्रवेश

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताची नवीन राज्यघटना अंमलात आली. गव्हर्नर जनरलच्या अधिकाराची समाप्ती होऊन ती जागा स्वतंत्र भारताच्या अध्यक्षाने घेतली. हा अध्यक्ष म्हणजेच ‘राष्ट्रपती’. भारताची राज्यघटना बनविली जात होती.

ते म्हणत, तेव्हा त्या परिषदेचे डॉ. राधाकृष्णन् हे सदस्य होते. या समितीचे कामकाज संपले आणि त्यांची नेमणूक रशियातील राजदूत म्हणून झाली. अशा प्रकारे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. डॉ. राधाकृष्णन् हे सामाजिक, धार्मिक, प्रश्नांवर जेवढे बोलत, तेवढे प्रचलित राजकीय प्रश्नांवर बोलत नसत. राजकारण व संस्कृती यांची भेसळ करणे अत्यंत धोक्याचे आहे. राजकारणापेक्षा संस्कृती कितीतरी श्रेष्ठ आहे. संस्कृतीमध्ये चिरंतन मूल्ये असतात; तर राजकारण क्षणिक व चंचल असते. संस्कृतीचा संबंध मानवी मनाशी व आत्म्याशी पोहोचतो. राजकीय सामर्थ्याच्या बळावर शंभर विद्वानांना वेठीस धरता आले, तरी राजकारणी मनुष्य आणि संस्कृतिसंपन्न मनुष्य यांची स्थाने भिन्न आहेत.” आजच्या . राजकारणी लोकांसाठी हा विचार किती महत्त्वाचा आहे, हे जाणवते.

डॉ. राधाकृष्णन् यांना समाजाविषयी प्रेम होते, कळकळ होती; आणि त्याचमुळे त्यांना गांधीजींबद्दल आदर होता. त्यांना सर्वधर्मसमभाव हा विचार फार महत्त्वाचा वाटत होता. म्हणूनच राजकारणात राहून त्यांनी या विचाराचा प्रचार केला. जेव्हा गांधीजींचे निधन झाले, तेव्हा त्यांच्याविषयी ते म्हणाले, आम्ही त्यांच्या शरीराचा अंत केला; पण ते स्वत:च एक दैवी प्रकाश आहेत, त्यामुळे त्यांचा आत्मा दीर्घकाळपर्यंत संचार करीत राहील व आमच्या असंख्य पिढ्यांना उच्च जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देत राहील.’

डॉ. राधाकृष्णन् यांच्या विचारांना तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया होता; त्याचमुळे त्यांच्यापाशी नम्रता व सौजन्य हे गुण होते. ह्या गुणांसाठी ते प्रसिद्ध होते; त्याचमुळे त्यांनी जगात लौकिक मिळविला होता.

डॉ. राधाकृष्णन् ‘नवीन हिंदू धर्म’ या चळवळीचे जनक होते. पुरातन कल्पना झुगारून देऊन त्यात नवचैतन्य निर्माण करणे, हाच त्यांच्या चळवळीचा उद्देश होता. नवीन कल्पना स्वीकारताना जुने काय काय टाकायचे, याविषयी ते जागरूक असत. जे जे वर्तमानकाळात उपयोगी आहे, ते जुने ठेवलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

स्त्री व पुरुष ही समाजरथाची दोन चाके आहेत. म्हणूनच स्त्री व पुरुष यांच्यात समानता असली पाहिजे, असे त्यांचे मत होते. याचसाठी स्त्रियांना समाजात योग्य तो मान मिळाला पाहिजे, असे त्यांचे मत ते ठामपणे मांडत असत.

त्यांच्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या उज्वल राजकीय कालखंडास सुरुवात झाली. पदवीधर झाल्यापासून अनेक अधिकाधिक मानाची पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या स्वयंसिद्ध गुणांमुळे त्यांची कीर्ती वाढत गेली. त्यांच्यातील गुण प्रकाशात आणण्याचे काम केले युनेस्कोने. युनेस्को ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेचे संपूर्ण नाव आहे ‘युनायटेड नेशन्स् एज्युकेशनल अॅण्ड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन’

या संघटनेची सुरुवात झाली आणि डॉ. राधाकृष्णन् यांनी या संघटनेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या संघटनेच्या कामानिमित्त त्यांना अनेक वेळा पॅरिसला जावे लागले. त्यावेळी होणाऱ्या परिषदा व बैठका यांच्यामुळे अनेक नामवंत विद्वान, शास्त्रज्ञ, कलाकार, तत्त्वज्ञ यांच्याशी त्यांचा संबंध आला. पुढे त्यांना ‘युनेस्को’चे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

त्याचप्रमाणे बंगालच्या ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ या ख्यातनाम संस्थेचे सभासद होण्याचा मान त्यांना मिळाला. या दोन्ही संघटनांच्यासाठी त्यांनी खूप काम केले. युनेस्कोच्या विविध सांस्कृतिक समित्यांवर अध्यक्ष या नात्याने त्यांनी भरीव कार्य केले. हे कार्य संघटनेच्या इतिहासात नोंदले गेले. त्यांच्या या मौलिक कार्याबद्दल त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी देशोदेशीचे मोठे लोक उपस्थित होते. या सर्वांनीच त्यांची तोंड भरून स्तुती केली.

डॉ. राधाकृष्णन् यांचे युनोसंबंधीचे मत होते की, सर्वांना समान संधी आणि वैयक्तिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. नुसते उच्च ध्येय असून चालत नाही; तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तशी साधनेदेखील हवीत आणि त्याचसाठी यूनो’चा जन्म झाला आहे. राष्ट्राराष्ट्रात शांतता, सामंजस्य हवे; युद्ध नको. सर्व राष्ट्रांना संरक्षण, न्याय व स्वातंत्र्य देण्यासाठी ही संस्था आहे. विश्व हे कुटुंब आहे, ह्या भावनाचा प्रसार झाला पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदावर नियुक्ती

पूर्वी म्हणजेच पारतंत्र्याच्या काळात भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या तंत्राने चालत असे. भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक देशभक्त व क्रांतिकारकांनी प्राण पणाला लावले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. परकीय सत्ता संपुष्टात आली. जरी आपण स्वतंत्र झालो असलो, तरी आपला कायदा तयार व्हावयाचा होता. २६ जानेवारी १९५० रोजी भारताची नवीन राज्यघटना अंमलात आली. ही राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी त्यावेळचे कायदेमंत्री डॉ. भीमराव ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होती.

डॉ. बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट घेऊन, बहुमोल अभ्यास करून आपल्या देशाची राज्यघटना लिहीली. हे त्यांचे कार्य महान होते. या घटनासमितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची नियुक्ती झाली होती. ब्रिटन व अमेरिका यांच्या नमुन्यावरून आपली घटना तयार करण्यात आली व भारत हे स्वतंत्र, सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्य आहे, असे घोषित करण्यात आले. हे प्रजासत्ताक राज्य २६ जानेवारी १९५० रोजी अस्तित्वात आले. तेव्हापासून गव्हर्नर जनरलच्या अधिकाराचा शेवट झाला व ती जागा स्वतंत्र भारताच्या अध्यक्षाने घेतली. या अध्यक्षास राष्ट्रपती’ या नावाने संबोधले जाते. आणि तेव्हापासून घटनेनुसार राज्यकारभाराची सुरवात झाली.

या घटना समितीचे कामकाज संपताच डॉ. राधाकृष्णन् यांची रशियातील ‘भारताचे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आणि राधाकृष्णन् यांनी खऱ्या अर्थाने राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. रशियासारख्या देशात भारत देशाचा राजदूत पाठवावयाचा म्हणजे तो तेवढाच तोलामोलाचा, योग्य व जबाबदार हवा. डॉ. राधाकृष्णन् हे या पदासाठी अगदी योग्य होते.

इ.स. १९४९ मध्ये ते रशियाची राजधानी मास्को येथे गेले. तेव्हा रशियात स्टॅलिनची कारकीर्द चालू होती. स्टॅलिन हा जगातील एक प्रसिद्ध हुकुमशहा होता. तो कधीही कोणाच्या स्वागतासाठी जात नसे. परंतु डॉ. राधाकृष्णन् यांच्यासारखी तत्त्वज्ञ व्यक्ती ‘भारतीय राजदूत’ म्हणून आपल्या देशात येत आहे, हे वृत्त समजताच त्या पोलादी पुरुषाला मनापासून आनंद झाला व त्याने त्यांचे सहर्ष स्वागत केले.

स्टॅलिनने डॉ. राधाकृष्णन् यांची दोन वेळा मुलाखतदेखील घेतली. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची स्टॅलिनशी भेट होऊ शकली नव्हती; परंतु स्टॅलिन अधून-मधून राधाकृष्णन् यांची भेट घेत असे. एकदा एका वृत्तपत्रात एका हातात गीता व दुसऱ्या हातात छडी घेऊन राधाकृष्णन् शिकवीत आहेत; तर त्यांच्यासमोर विद्यार्थी म्हणून स्टॅलिन व मोलोटिव्ह बसले आहेत, असे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते आणि त्या व्यंगचित्राच्या खाली ओळ होती-

“एका वेळचे शिक्षक आणि जन्मभरचे विद्यार्थी”

आपल्या रशियातील वास्तव्यात डॉ. राधाकृष्णन् यांनी आपली ‘भारतीय राजदूत’ ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली. भारत व रशिया यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ केले. रशियात त्यांनी अनेक व्याख्याने दिली. भारतीय संस्कृतीबद्दल माहिती देऊन भारतीय धर्माची शान वाढविली. याठिकाणी तीन वर्षे राधाकृष्णन् यांचे वास्तव्य होते. या कालावधीत त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली.

इ. स. १९५२ साली डॉ. राधाकृष्णन् रशियाहून भारतात परतले. याच सुमारास भारताची राज्यघटना येथे अंमलात आलेली होती. या राज्यघटनेच्या आदेशानुसार डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती व डॉ. राधाकृष्णन् यांना उपराष्ट्रपती म्हणून नेमण्यात आले. डॉ. राधाकृष्णन् यांच्या उज्ज्वल कालखंडाची सुरुवात १९५२ पासूनच झाली. त्यांचे युनेस्कोचे कार्य आणि अध्यक्षपद यामुळे त्यांची कीर्ती जगभर पसरली. त्यावर खरा कळस चढला, तो उपराष्ट्रपती या पदामुळेच!

उपराष्ट्रपतिपदाचा श्रीगणेशा झाला. जगभर दौरे सुरू झाले. व्याख्याने वाजू लागली. पुढे तर त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी खास निमंत्रण देऊन बोलावून घेतले. त्या काळात अमेरिकन जनतेला त्यांच्या मौलिक भाषणांचा लाभ झाला. देशभर त्यांची प्रशंसा झाली. त्याच वेळी अमेरिकेतील हॉवर्ड विश्वविद्यालयाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही बहुमानाची पदवी देऊन त्यांचा गौरव केला. या गौरवामुळे भारताचाही गौरव झाला.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताचे महत्त्व पं. जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे वाढत होते; तर भारताच्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाची पताका जगभरात फडकविण्याचे काम डॉ. राधाकृष्णन् करीत होते. ज्या ज्या देशात डॉ. राधाकृष्णन् गेले, त्या त्या देशाने त्यांचे व भारताचे कौतुक केले. पण सर्वाधिक कौतुक केले ते जर्मनीने! जर्मनीचे सर्वात मानाचे चिन्ह श्रेष्ठ गुणवत्ता’ त्यांना बहाल करून त्यांचा यथोचित गौरव केला. जर्मनीने इतरही अनेक मानसन्मान त्यांना दिले. एवढेच नव्हे, तर ‘शांतता पारितोषिक देऊन त्यांचा बहुमान केला.

त्यानंतर डॉ. राधाकृष्णन् यांनी अमेरिका, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रशिया, बल्गेरिया, आफ्रिका, चीन, मंगोलिया, हाँगकाँग, इ. देश व शहरे यांना भेटी दिल्या. सर्वत्र त्यांचे भव्य स्वागत झाले, जाहीर सत्कार झाले आणि त्यांच्यावर पदव्यांचा वर्षाव झाला.

याच सुमारास होनोलूलू येथे आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञांची परिषद भरली होती. या परिषदेस ते भारताचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. आपले व्यक्तित्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांनी त्यांनी परिषद गाजविली. ही आंतरराष्ट्रीय परिषद संपल्यावर त्यांनी अमेरिकेचा धावता दौरा केला. त्यांनी तब्बल दहा वर्षे भारताचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी भारताचे व जगाचे सांस्कृतिक संबंध दृढतर करण्याची जबाबदारी मोठ्या कौशल्याने समर्थपणे पार पाडली. तत्त्वज्ञान, साहित्य व राजकारण यांच्या तपश्चर्येतून त्यांच्या बुद्धीचे तेज अधिक प्रखर बनले. या सगळ्यांच्या . जोडीला त्यांचा प्रचंड अनुभव हे फार मोठे यश त्यांनी आपल्या गाठीशी बांधले.

सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्वश्रेष्ठ पदवी ‘भारतरत्न’चे मानकरी

जागतिक कीर्ती मिळविणारे थोर तत्त्वज्ञ, श्रेष्ठ विचारवंत, दीर्घानुभवी शिक्षणतज्ज्ञ, महान पंडित डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी आपल्या मायभूमीची बहुमोल सेवा केली. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने त्यांचा ‘भारतरत्न’ हा सवोच्च मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

पारतंत्र्याच्या काळात राजनिष्ठेबद्दल व साम्राज्यसेवेबद्दल विविध पदव्या दिल्या जात असत; परंतु स्वातंत्र्योत्तर काळात या पदव्या बंद करण्यात आल्या. विविध क्षेत्रांतील श्रेष्ठ शास्त्रज्ञ, कलावंत, सामाजिक कार्य, थोर विचारवंत यांना त्यांच्या कार्याबद्दल पारितोषिके देण्याचा उपक्रम सन १९५० नंतर सुरू झाला. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री असे या पारितोषिकांचे चार प्रकार आहेत. ही पारितोषिके २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिली जातात. हा सरकारी किताब नसून राष्ट्रीय मानसन्मान आहे.

भारतरत्न’ हे सर्वोच्च पारितोषिक कला, वाङ्मय व विज्ञान यातील असाधारण कार्य केल्याबद्दल व उच्च प्रतीची सार्वजनिक सेवा केल्याबद्दल दिले जाते.

भारतरत्न’ या पदकाचा आकार पिंपळाच्या पानासारखा असून ते ब्रांझ या धातूपासून बनविलेले असते. त्याच्या एका बाजूला सूर्य व दुसऱ्या बाजूला राजमुद्रा व ब्रीदवाक्य असते.

आतापर्यंत ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी पं. जवाहरलाल नेहरू, चक्रवर्ती राजगोपालचारी, विश्वेश्वरय्या, सी. व्ही. रामन्, डॉ. भगवानदास पं. गोविंदवल्लभ पंत, धोंडो केशव कर्वे, पुरुषोत्तमदास टंडन, बिधानचंद्र रॉय, डॉ. झकीर हुसेन, महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी, वराहगिरी व्यंकटगिरी, कुमारस्वामी कामराज, मदर तेरेसा, आचार्य विनोबा भावे, अब्दुल गफार खान, एम्. जी. रामचंद्रन्, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. नेल्सन मंडेला, वल्लभभाई पटेल, राजीव गांधी, मोरारजी देसाई, मौलाना आझाद, जे. आर. डी. टाटा, सत्यजीत रे, गुलझारीलाल नंदा, अरुणा आसफ अली, श्रीमती सुब्बालक्ष्मी, सी. सुब्रमणियम्, डॉ. ओ. पी. जे. अब्दुल कलाम, जयप्रकाश नारायण, अमर्त्य सेन, पं. रविशंकर, गोपीनाथ बोर्डोलाई, लता मंगेशकर, बिस्मिल्ला खान, पं भीमसेन जोशी यांना देण्यात आली आहे.

१९५५ साली डॉ. राधाकृष्णन् यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मानदर्शक किताब मिळाला. नंतर त्यांनी जगात सदिच्छा दौरे काढले. नंतरच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा उपराष्ट्रपती म्हणून निवडून देण्यात आले. नंतर त्यांनी पुन्हा दौरे काढले. ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेचे अधिवेशन पॅरिस येथे भरले होते. त्या अधिवेशनाला ते हजर राहिले.

राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद हे २० जुलै १९६० रोजी दोन आठवड्यांकरिता दौऱ्यावर रशिया येथे गेले होते. तेव्हा त्यांच्या जागी डॉ. राधाकृष्णन् यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नेमणूक करण्यात आली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद भारतात परतले; परंतु प्रकृती ठीक नसल्याने विश्रांतीसाठी आपली राष्ट्रपतिपदाची सूत्रे दुसऱ्या हाती सोपविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नंतर त्यांनी राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. तो स्वीकृत करण्यात येऊन त्यांच्या जागी डॉ. राधाकृष्णन् यांची निवड करण्यात आली आणि उपराष्ट्रपती म्हणून डॉ. झकिर हुसेन यांची निवड झाली.

डॉ. राधाकृष्णन् भारतरत्न राष्ट्रपती कारकीर्द

१३ मे १९६२ पासून डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मद्रास येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “जगात ज्ञान आणि विज्ञान झपाट्याने वाढत चालले आहे, पण ज्ञानाबरोबर सौजन्याची किंवा शहाणपणाची वाढ होत गेली नाही, तर तारक ज्ञान मारक ठरते. अनिष्ट व विध्वंसक प्रवृत्ती माणसामध्ये कधीपासून वास करीत आल्या आहेत.

ज्ञानाच्या बळावर या विध्वंसाची महान आणि भयानक साधने त्याने आता शोधून काढली आहेत. नवीन विद्येचा सदुपयोग करण्याइतके सौजन्य माणसात पैदा झालेले नसेल, तर जगाचे भवितव्य अंध:कारमय आहे, असे म्हणावयास हरकत नाही. त्यांचे हे विचार शिलालेखावर कोरून ठेवण्यासारखे अमूल्य आहेत.

राष्ट्रपतिपदावरून त्यांनी मांडलेले हे विचार विशेष शोभून दिसतात.

राष्ट्रपती म्हणून त्यांची कारकीर्द खूपच गाजली.

त्यांनी इंग्लंड-अमेरिकेची मने जिंकली. त्यांनी आपले अवघे जीवनच धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासात व चिंतनात घालविले, जवळजवळ सर्व जगभर भ्रमण केले व भारताचे नाव साऱ्या जगात उज्ज्वल केले.

डॉ. राधाकृष्णन् राष्ट्रपती असताना एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे दुःखद निधन. या घटनेची वार्ता त्यांनी त्याच रात्री साडेआठ वाजता भारतीय नभोवाणीवरून जनतेला दिली. त्यांनी केलेल्या भाषणात पं. नेहरूंचे वर्णन ‘मानवसमाजाचा थोर हितकर्ता’ या शब्दांत केले. त्यांनी या प्रसंगी नभोवाणीवरून केलेले भाषण खरोखरच संग्राह्य आहे.

डॉ. राधाकृष्णन् यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर याही क्षेत्रात ते कसलेल्या व अनुभवी मुत्सद्यांप्रमाणे भाषण करीत. त्यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी, इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व, तत्त्वज्ञान हा वक्तृत्वाचा गाभा व त्याभोवती राजकारणाची गंफण ते करीत असतः त्यामळे त्यांच्या वक्तत्वाची छाप कोठेही भाषण केले, तरी पडत असे.

इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान सर अँथनी इडन हे हे एकदा भारतीय संसदेत आले होते. त्यांचा परिचय डॉ. राधाकृष्णन् यांनी करून दिला. इडन यांना त्यांच्यानंतर बोलणे फार कठीण झाले. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले की, “डॉ. राधाकृष्णन् यांच्या भाषणाने मी इतका भारावून गेलो की, मला काय बोलावे, हेच सुचेना. राधाकृष्णन् यांच्याइतके सफाईदार इंग्रजी बोलणारे वक्ते फार थोडेच असतील. आपले इंग्रजी त्यांच्यापुढे खूपच फिके आहे.” हे एका इंग्रजी माणसाचे उद्गार म्हणजे डॉ. राधाकृष्णन् यांच्या वक्तृत्व व भाषेवरील प्रभुत्व यांचे प्रशस्तिपत्रच!

डॉ. राधाकृष्णन युद्ध करणे पसंत यांना नव्हते. ‘शांतता शांतता’ म्हणून नुसते ओरडण्यापेक्षा युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्तीची कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. सध्याच्या कारभारात काही तरी उणीव आहे आणि ती उणीव भरून काढल्याशिवाय लढाया होणे थांबणार नाही की जगात शांतता नांदणार नाही. मनुष्यप्राण्याचा योग्य तो दर्जा ओळखणे, कबूल करणे, हेच लोकशाहीचे मुख्य तत्त्व असले पाहिजे.

‘राजकारणाला अध्यात्माचे अधिष्ठान पाहिजे’, ही गोष्ट ते आपल्या भाषणातून मांडत असत.

डॉ. राधाकृष्णन् राष्ट्रपतिपदावर आले आणि सांस्कृतिक क्षेत्रात भर पडली. देशोदेशीचे अनेक थोर राष्ट्रप्रमुख देशाला भेट देण्यासाठी आले. त्यात इंग्लंडचे दर्यासारंग व ग्रेट ब्रिटनच्या आरमारी दलाचे प्रमुख लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनी भारतास भेट दिली. अमेरिकेचे परराष्ट्रखात्याचे चिटणीस डीन रस्क यांनी भारत-दौरा काढला. सिलोनच्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके, रशियाचे राष्ट्राध्यक्ष अनास्कस मिकेयान व रोमन कॅथॉलिकांचे धर्मगुरू पोप सहावे पॉल भारतास भेट देऊन गेले.

डॉ. राधाकृष्णन् यांच्याच कारकीर्दीत पंचशील तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या आमच्या शेजारच्या राष्ट्राने भारतावर आक्रमण करून शांतताभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राष्ट्रपती या नात्याने त्यांनी नभोवाणीवर भाषण करून भारतीय जनतेला धीर दिला.

डॉ. राधाकृष्णन् यांनी त्यानंतर अमेरिकेचा दौरा केला, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात न्यूयॉर्क व पेनसिल्व्हानिया या विद्यापीठांनी त्यांना एल. एल. डी. ही सन्मानदर्शक पदवी बहाल केली. अमेरिकेच्या निःशस्त्रीकरण मंडळाला त्यांनी भेट दिली. यूनोच्या खास बैठकीत त्याचे ‘विश्वैक्य व जागतिक शांती’ या विषयावर लक्षवेधक भाषण झाले.

नंतर ते इंग्लंडला आले. राणी एलिझाबेथ यांनी त्यांचे स्वागत केले. अशा प्रकारे त्यांनी इंग्लंडअमेरिकेची मने जिंकली.

डॉ. राधाकृष्णन् यांची ग्रंथसंपदा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् हे एक महान लेखक होते. त्यांनी जवळजवळ १५-१६ ग्रंथ लिहिले. त्यातील बरेच ग्रंथ जागतिक कीर्तीचे बनले. त्यांचे ‘रिलिजन इन वेस्टर्न थॉट’ हे पुस्तक प्रकाशित झाले व ते जगभर गाजले.

याशिवाय त्यांनी तत्त्वज्ञान व धर्म’ या विषयांवर अनेक लेख लिहिले. ‘माइंड’ च्या आंग्ल मासिकातून त्यांचे किती तरी लेख प्रसिद्ध झाले. तत्त्वज्ञानावरील त्यांचे लेख अभ्यासपूर्ण व वाचनीय आहेत. त्यांच्या पुस्तकांचे पाश्चात्य देशांत खूपच कौतुक झाले. जे. एच्. म्युरहेड, जे. एस्. मॅकेंझी यांनी त्यांची स्तुती केलेली आहे.

उपनिषदांतील तत्त्वज्ञान’ व ‘हिंदी तत्त्वज्ञान’ या पुस्तकांनी कीर्तीचा कळस गाठला. हॉवर्ड येथील तत्त्वज्ञान परिषदेत त्यांनी ‘आधुनिक सुधारणेतील आध्यात्मिक उणीव’ या विषयावरील दिलेल्या व्याख्यानांचे पुस्तक ‘कल्की’ या नावाने प्रसिद्ध झाले.

डॉ. राधाकृष्णन् यांची ग्रंथसंपदा

 1. अर्वाचीन तत्त्वज्ञानात धर्माचे स्थान
 2. भारतीय तत्त्वज्ञान भाग पहिला
 3. भारतीय तत्त्वज्ञान – भाग दुसरा
 4. हिंदू तत्त्वज्ञानाची जीवनविषयक तत्त्वे
 5. आजचा आवश्यक नवा धर्म’
 6. तत्त्वज्ञानाची जीवन विषयक मते
 7. पौर्वात्य धर्म आणि पाश्चात्य शास्त्रे
 8. अर्वाचीन भारतीय तत्त्वज्ञान
 9. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य धर्म
 10. परमपूज्य महात्मा गांधी
 11. भगवद्गीतेवर भाष्ये
 12. धर्म आणि समाज
 13. भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्मपद
 14. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास
 15. प्रमुख उपनिषदे व त्यांचे तत्त्वज्ञान

राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांचा वाढदिवस म्हणजे शिक्षकदिन

५ सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन् यांचा जन्मदिन. महाविद्यालयात काही वर्षे अध्यापनाचे काम करून ते अखिल विश्वाचेच शिक्षक बनले. भारतीय शिक्षणकार्यामध्ये त्यांनी अत्यंत भरीव कामगिरी केली. शिक्षक कसा असावा, याचा आदर्श घालून दिला. म्हणूनच ‘नॅशनल टीचर्स फाउंडेशन’ने पुढाकार घेऊन डॉ. राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन म्हणून निवडला.

डॉ. राधाकृष्णन् यांच्यासारखे तत्त्वचिंतकच समाजाचे खरे शिक्षक होण्यास योग्य आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षकाने भावी नागरिकांच्या जीवनाला विधायक वळण दिले पाहिजे. त्या दृष्टीने आदर्श ठरणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांचा, त्यांच्या भरीव कार्याचा गौरव करण्याची सरकारने योजना आखली आहे.

५ सप्टेंबरला भारतात पाळण्यात येणारा शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांबद्दलच्या समाजाच्या ऋणाची जाणीव. शिक्षक आपल्या जवळचे ज्ञानभांडार शिष्यांपुढे खुले करतो. निरपेक्ष बुद्धीने तो ज्ञानाचीच उपासना करीत असतो. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ हे तो विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवतो. ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी आहेत, त्याचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव व्हावा, ही यामागची भूमिका या दिवशी दिल्लीला मोठा समारंभ भरविण्यात येतो. आदर्श शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतो.

डॉ. राधाकृष्णन् यांचे कौटुंबिक जीवन

डॉ. राधाकृष्णन् यांच्या पत्नीचे नाव शिवकमुअम्मा. त्यांचे कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी होते. शिवकमुअम्मा एक आदर्श भारतीय स्त्री होत्या. त्या आपल्या पतीच्या सेवेतच समर्पित झाल्या होत्या. आपल्या पतीच्या कार्यात त्यांनी कधीही अडथळा आणला नाही; तर उलट त्यांना प्रोत्साहन व सहकार्यच दिले. शिवकमुअम्मांचे देहावसान झाले. त्यावेळी डॉ. राधाकृष्णन् जपानच्या दौऱ्यावर गेले होते.

ही वार्ता समजताच ते दौरा पूर्ण न करता ताबडतोब खास विमानानेच भारतात परतले. आपल्या सुशील पत्नीच्या निधनाने ते दुःखी झाले. त्यांना पाच कन्या आणि एक पुत्र अशी अपत्ये होती. मुलगा गोपाळ याने ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाचे एम्. ए., पीएच्. डी. शिक्षण पूर्ण झाल्यावर आंध्र विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागात उच्च अधिकारी म्हणून सेवा केली.

डॉ. राधाकृष्णन् हे कौटुंबिक जीवनात समाधानी होते. त्याविषयी त्यांनी लिहिले आहे – “मनुष्याला आपल्या आवडीप्रमाणे पत्नी मिळणे म्हणजे त्याच्या जीवनात एक मोठीच सफलता प्राप्त होणे होय. हे प्रख्यात तत्त्ववेत्ता हेगेल यांचे सुवचन मला नेहमीच स्मरते…. मलादेखील माझ्या जीवनात अनेकदा चिंता आणि दुःखे यांच्याशी सामना करावा लागलेला आहे; परंतु त्याचबरोबर मला सुखाचे व सौभाग्याचे वरदानही लाभलेले आहे.” “

डॉ. राधाकृष्णन् यांचे तत्त्वज्ञान – डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार

तत्त्वज्ञान समजण्यास कठीण. आचरणात आणणे त्याहूनही कठीण. डॉ. राधाकृष्णन् म्हणतात,

 • ज्या अमूर्त व अदृश्य पायावर संस्कृतीची इमारत उभी असते, तो पाया म्हणजे तत्त्वज्ञान.
 • इतरांकडे बघताना स्वत:चेच प्रतिबिंब पाहण्यास शिकणे, ही गोष्ट फार अवघड आहे. परंतु अशी सवय झाली, तर इतरांबरोबर जीवन घालविणे सहज शक्य होईल.
 • ज्यांच्या अंगी त्याग आणि सेवावृत्ती आहे, तेच खरे साधू व तेच खरे संत.
 • देव, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व काही देतो, तो कृतार्थ होतो. त्यागातच खरे वैभव आहे. संचयात नाही.
 • अत्यंत पापी माणसालासुद्धा पश्चात्तापाने व श्रद्धेने उज्ज्वल भविष्यकाळ लाभतो.
 • शरीर, मन व आत्मा या तीनही वस्तू मिळून एक अविभाज्य अशी वस्तू बनली आहे अन् तिचे नाव आहे संस्कृती.
 • जी व्यक्ती सदाचरणी आहे, त्याच व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश असतो.
 • समाजाचे स्वराज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही नुसती राजकीय सोय नसून मानसिक प्रवृत्ती आहे.
 • मानवाचे आध्यात्मिक ध्येय म्हणजे परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार करून घेणे, हे आहे. नुसते ऐहिक वैभव उपभोगणे नव्हे.
 • आपण पक्ष्याप्रमाणे विहार करावयास शिकलो, माशाप्रमाणे पाण्यात तरंगावयास शिकलो; परंतु अद्याप माणसांप्रमाणे जगात वावरण्यास शिकलो नाही.
 • असा हा भारतीय संस्कृतीचा उपासक म्हणजे भारतमातेचा लाडका सुपुत्र राष्ट्रपतिपदावरून निवृत्त होताच मद्रासला गेला आणि अखंड वाचन लेखनात मग्न झाला, संपूर्ण जीवन ज्ञानयज्ञासाठी समर्पित केले आणि कृतार्थ जीवन जगले.

२४ एप्रिल १९७५ रोजी डॉ. राधाकृष्णन् अनंतात विलीन झाले. ते देहाने या देशात, जगात नसले, तरी त्यांच्या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने अमरच राहतील.

मरावे परि कीर्तिरूपी उरावे. या रामदासांच्या उक्तीप्रमाणे ते कीर्तिरूपाने आपल्यातच आहेत.

पुढे वाचा:

FAQ: सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १. डॉ राधाकृष्णन यांचे निधन कधी झाले?

उत्तर – 17 एप्रिल 1975

प्रश्न २. राधाकृष्णन यांचा मृत्यू कुठे झाला?

उत्तर – चेन्नई

प्रश्न ३. सर्वपल्ली राधाकृष्णन का प्रसिद्ध आहेत?

उत्तर – सर्वपल्ली राधाकृष्णन (5 सप्टेंबर 1888 – 17 एप्रिल 1975) हे भारतीय तत्त्वज्ञ होते. ते तुलनात्मक धर्म, तुलनात्मक पूर्व आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान या विषयावरील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध होते आणि ते भारतातील आणि युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठातही शिक्षक होते.

Leave a Comment