Sambhaji Maharaj Rajyabhishek: छत्रपती संभाजी राजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. त्यावेळी, मराठ्यांचा सर्वात शक्तिशाली शत्रू, मुघल सम्राट औरंगजेब याने भारतातून विजापूर आणि गोलकोंडाची सत्ता संपुष्टात आणण्यात मोठी भूमिका बजावली. संभाजी राजे त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला म्हणून १६ जानेवारी हा दिवस संभाजी राजे राज्याभिषेक दिन म्हण साजरा केला जातो.

संभाजी राजांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत २०१ युद्धे लढली आणि त्यातील एक मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या सैन्याचा एकाही लढाईत पराभव झाले नाहीत. त्याच्या पराक्रमाने व्यथित होऊन औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीराजे पकडले जात नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावर किमोन्श ठेवणार नाही. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली.

संभाजी राजे राज्याभिषेक दिन माहिती-Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Marathi

(१६ जानेवारी) संभाजी राजे राज्याभिषेक दिन माहिती – Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Marathi

संभाजी राजे राज्याभिषेक इतिहास

पन्हाळगडावर संभाजीराजांच्या समोर उभ्या केलेल्या राजद्रोही प्रधानांना देहदंडाच्या शिक्षा दिल्या गेल्या असत्या तरी बखरींनी वर्णन केलेल्या राजाच्या ‘उग्र व क्रूर’ प्रकृतीस ते साजेसेच झाले असते; पण संभाजीराजांनी अशा शिक्षा न करता त्यांना फक्त कारागृहात घातले. राजधानीवर जाऊन लगेच राज्याभिषेक करण्याचा उतावळेपणा त्यांनी केलेला नाही. पुढे १८ जून १६८० रोजी ते या राजबंद्यांसह रायगडावर आले.

संभाजीराजे रायगडावर

बखरकार मल्हार रामराव चिटणिसास या घटनांची वार्ताही नाही! त्याने संभाजीराजे पन्हाळ्याहून लगेच रायगडी आले आणि त्यांनी अनेकांचे शिरच्छेद‚ कडेलोट इ. क्रूर कृत्ये करून सावत्र आईस भिंतीत चिणून मारले‚ अशी अतिरंजित वर्णने केली आहेत. चिटणिसाची ही वर्णने कशी असत्य व काल्पनिक आहेत‚ हे पुराव्यांनिशी सिद्ध करून बेंद्र्यांनी मराठ्यांच्या इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी मोलाची कामगिरी केली आहे‚ हे नमूद केले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई पुढे दीड वर्षे जिवंत होती‚ हा सत्येतिहास त्यांच्या संशोधनामुळे प्रकाशात आल्याने बखरकारांच्या व त्यांच्या पठडीतील इतिहासकारांच्या विवेचनामधील हवाच काढून टाकली गेली!

रायगडावर येताच संभाजीराजांनी सोयराबाई व आपल्या इतर तीन माता यांचे सांत्वन केल्याचे अनुपुराण सांगते; तर इंग्रज बातमीपत्रात प्रधानांच्या घरी चौक्या बसविल्या असल्या तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही‚ तसेच राजाराम महाराजांस फार प्रेमाने वागविले जाते‚ अशी बातमी आलेली आहे

संभाजीराजांनी या वेळी आपले मन शांत ठेवून अपराधी प्रधान व सावत्र माता यांना जी वागणूक दिली आहे ती आश्चर्य वाटण्याइतकी सौम्य व सौजन्यशील आहे!

पुढे १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला; पण तत्पूर्वी त्यांनी एक विधायक पाऊल उचलले. झाले गेले सर्व विसरून त्यांनी कैदेत असणाऱ्या सर्व प्रधानांना व अधिकाऱ्यांना मुक्त करून त्यांना सन्मानाने पूर्ववत अधिकारांच्या जागांवर नेमले. मोरोपंत पेशवे कैदेत असतानाच निवर्तले होते; पण त्यांच्या पुत्रास-निळोपंतास पेशवाई दिली गेली. आण्णाजी दत्तोस सन्मानपूर्वक अमात्यपद बहाल केले गेले! आण्णाजीचे पूर्वीचे सचिवपद यापूर्वीच संभाजी महाराजांनी रामचंद्र पंडितास दिल्याने त्यास अमात्यपदावर विराजमान केले गेले.

प्रल्हाद निराजीस न्यायाधीश पद दिले. बाळाजी आवजीकडे राज्याची चिटणीशी पूर्ववत चालू ठेवली. संभाजी महाराजांनी या वेळी दाखविलेली क्षमाशीलता‚ औदार्य‚ मनाचा मोठेपणा इत्यादींना इतिहासात तोड नाही. संभाजी महाराजांच्या चरित्रामधील ह्या त्यांच्या मनाच्या मोठेपणाकडे टीकाकार सोयीस्कर दुर्लक्ष करतात आणि त्यांना ‘शिवाजीने कष्टाने पैदा केलेल्या माणसांची अंत:करणे वश करता आली नाहीत’ २ म्हणून त्यांच्यावरच ठपका ठेवतात‚ ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे!

संभाजीराजांविरुद्ध दोन कट

राज्याभिषेकाच्या वेळी प्रधानांच्या झालेल्या नेमणुका पाहून सर्वांना वाटले की‚ स्वराज्यात उठलेले दुहीचे व यादवीचे वादळ शांत झाले. संभाजी महाराजांचा कारभार निर्विघ्न चालण्यास हरकत नव्हती. तथापि‚ राज्याभिषेकानंतर अवघ्या     सहा-सात महिन्यांत जुलै-ऑगस्टच्या दरम्यान राजांविरुद्ध दोन कट लागोपाठ झाले. पहिला कट झाला राजास विष घालून ठार मारण्याचा; तर दुसरा कट झाला शहाजादा अकबराचे सहकार्य घेऊन राजास पदच्युत करण्याचा!

३० ऑगस्ट १६८१ रोजी मुंबईकर इंग्रज लिहितात : ‘‘संभाजीराजा प्राणावरील मोठ्या संकटात सापडला होता. त्याच्या जेवणातील मत्स्यान्नाचे पोटी घातलेल्या विषाने तो मरायचाच; परंतु अल्पवयी नोकराने त्याला ते सेवण्यापासून थांबविले. तेव्हा त्यातील थोडा भाग नोकरांपैकी एकाला व कुत्र्याला घातला. दोघेही थोडाच तासांत मेले. संभाजीराजांविरुद्ध हा कट ज्यांनी केला त्यात आण्णाजी पंडित‚ केसो पंडित‚ प्रल्हाद पंडित वगैरे होते. त्या सर्वांना शृंखला ठोकविल्या आहेत.’’

पुढे याच कटाच्या संदर्भात ८सप्टेंबर रोजी ते लिहितात ‘‘संभाजीराजाविरुद्ध केलेल्या कटात आण्णाजी पंडित‚ रामराजाची आई (सोयराबाई)‚ हिरोजी फर्जंद होते. त्यात त्यांनी सुलतान अकबरालाही गोवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो त्यांस बधला नाही. उलट त्याने एक गुप्त दूत पाठवून संभाजीराजाला ताबडतोब माहिती दिली. त्यामुळे राजाची त्याचेवर फार मोठी मर्जी बसली.’’

जेधे शकावलीतही या कटाचा पडसाद उमटला आहे. शकावली म्हणते : ‘‘भाद्रपद मासी (ऑगस्ट १६८१) संभाजी राजे याणी कवि कलशाच्या बोले मागती आणाजी दत्तो व सचीव याजवर इतराजी करून मार दिल्हा. त्या माराने राजश्री आनाजी पंत व बाळ प्रभु व सोमाजी दत्तो व हिराजी फर्जंद परळीखाले कैद करून मारिले. कर्नाटकात शामजी नाईक यास कैईद करविले.’’

दोन्ही कट एकाच वेळी शिजले असावेत; आणि एकामागून एक याप्रमाणे उघडकीस आले असावेत. या कटात राणी सोयराबाई‚ आण्णाजी दत्तो‚ सोमाजी दत्तो‚ बाळाजी आवजी‚ हिरोजी फर्जंद अशी २५/३० माणसे गोवली गेली होती. त्यांना पकडून संभाजी महाराजांनी देहान्ताची शिक्षा दिली. सोयराबाईने आपली बेअदबी टाळण्यासाठी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी. सोयराबाईच्या मृत्यूने शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या गृहकलहाच्या नाट्यावर अखेरचा पडदा पडला! गृहकलहाच्या आगीत राणीची व तिच्या पक्षपाती प्रधानांची त्यांच्याच कृष्णकृत्यांनी आहुती दिली गेली!

स. १६८१च्या ऑगस्ट महिन्यात राजद्रोह्यांना दिलेल्या शिक्षा बखरकारांनी स. १६८०मध्ये संभाजी महाराज पन्हाळगडाहून रायगडावर आल्या आल्या केल्या‚ अशी कथेची एकूण रचना केल्यामुळे संभाजी महाराजांची क्रूर प्रतिमा तयार करणे त्यांना सोपे गेले; पण त्यामुळे मराठ्यांच्या अनेक इतिहासकारांची फसगत झाली.

संभाजी महाराजांनी राजद्रोह्यांना केलेल्या शिक्षा क्रूर वाटत असल्या तरी त्या मध्ययुगीनच नव्हे तर आधुनिक युगातील राजनीतीत बसणाऱ्या आहेत. राजाला पदच्युत करण्याची किंवा ठार मारण्याची तीन कारस्थाने लागोपाठ करणाऱ्या राजद्रोह्यांना अशा शिक्षा का केल्या‚ असे जगातील कोणतेही राजनीतिशास्त्र विचारू शकणार नाही. उलट राजनीतिशास्त्राचा अभ्यासक अशा राजद्रोह्यांना प्रथमच राजाने क्षमा करून अधिकारावर पूर्ववत स्थापायला नको होते‚ असेही प्रतिपादन करू शकेल. आणि त्याचे म्हणणे एका अर्थाने बरोबरही ठरेल. मराठी राजाने त्याच्या प्रधानांना क्षमा केली होती; पण प्रधानांनी राजास क्षमा केली नव्हती‚ हेच खरे!

कटवाल्यातील एक प्रमुख हिरोजी फर्जंद याजवर संभाजी महाराजांनी विश्वास टाकून आपल्या राज्यात आश्रयास आलेल्या अकबराकडे वकील म्हणून पाठविले होते. ६ पण वकील म्हणून आलेल्या हिरोजीनेच राजाविरुद्धच्या कारस्थानात अकबरास ओढण्याचा प्रयत्न करावा‚ हे मराठी राज्याचे केवढे दुर्दैव!

रियासतकार सरदेसाईंनी या कटवाल्या मंडळींची बाजू मांडताना म्हटले आहे : ‘‘हिरोजी फर्जंद शहाजाद्याची भेट घेऊन रायगडास परत गेला‚ तेव्हा त्याची खात्री झाली की संधी मोठी नामी आलेली आहे; परंतु तिचा उपयोग करण्याचे कसब संभाजीस नाही. व्यसनी व लहरी राजाचे हातून राष्ट्रसंरक्षण होणे शक्य नाही‚ अशी रायगडावरील पुष्कळ जाणत्या मंडळींची भावना झाली होती. हिरोजी परत रायगडावर गेल्यानंतर सोयराबाई‚ आनाजीपंत वगैरे मंडळींशी त्याचा विचारविनिमय झाला असला पाहिजे. पहिल्या एक-दोन महिन्यांत संभाजी व अकबर दोघेही आपापल्या कुचंबणेच्या स्थितीत असता रायगडावर एक गुप्त कट करण्यात आला. त्याचा उद्देश संभाजीस काढून राजारामास गादीवर बसवावे असा होता. हा कट कदाचित शहाजाद्याचे कानावर गेला असेल‚ कदाचित त्याची संमतीही घेण्यात आली असेल; परंतु त्यानेच त्याची बातमी संभाजीचे कानावर घालून सावध केले असे उल्लेख आढळतात.’’

रियासतकारांच्या लिखाणाचा रोख असा आहे की‚ अकबराच्या रूपाने चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याचे कसब संभाजी महाराजांच्या अंगी नाही‚ याची खात्री झाल्यावर त्यास पदच्युत करण्याचा कट रायगडावरील ‘जाणत्या मंडळींनी’ केला. अकबर स्वराज्याच्या सीमेवर त्र्यंबकेश्वर येथे ११ मे १६८१ रोजी पोहोचला. नंतर मे अखेर उत्तर कोकणातील पाली येथे मुक्कामास आला. हिरोजी फर्जंद १५ जूनला त्याला संभाजीराजाचा वकील म्हणून भेटला. तोपर्यंत शहाजादा कसा आहे‚ त्याचे दक्षिणेत येण्याचे प्रयोजन खरे की खोटे याची हिरोजीसही कल्पना नव्हती. या वेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर आहेत त्यांनाही ही कल्पना असणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत केवळ १५ दिवसांच्या अवधीत संभाजीराजा शहाजाद्याच्या रूपाने चालून आलेल्या ‘नामी संधीचा’ कसा काय उपयोग करून घेणार होता‚ हे रियासतकार सांगत नाहीत.

संभाजी महाराज रायगडावर आल्यापासून (जून १६८०) ते हे कट होईपर्यंत (ऑगस्ट १६८१) त्यांच्या ‘व्यसनी आणि लहरी’ वर्तनाचा एकही दाखला उपलब्ध इतिहासात दाखवता येत नाही. अशा परिस्थितीत स्वराज्याचा गाडा व्यवस्थित चालू असता त्यास खीळ घालणारी रायगडावरील माणसे ‘जाणती मंडळी’ कशी काय होऊ शकतात?

या संदर्भात सेतुमाधवराव पगडींनी वस्तुनिष्ठ मत दिले आहे. ते म्हणतात : ‘‘महाराष्ट्राच्या सुदैवाने संभाजीराजे या तिन्ही कारस्थानांतून सुखरूपपणे पार पडले. औरंगजेबाच्या रूपाने स्वराज्यावर भयंकर संकट कोसळू पाहत असता आण्णाजी दत्तो‚ हिरोजी फर्जंद‚ बाळाजी आवजी इत्यादी शिवाजी महाराजांच्या काळच्या कसलेल्या मुत्सद्यांनी अकबराची मदत घेऊन संभाजीला गादीवरून काढून टाकण्याचे कारस्थान करावे ही अत्यंत दुर्दैवाची घटना होय. हे कृत्य राष्ट्रद्रोहीच म्हटले पाहिजे. हे कारस्थान यशस्वी झाले असते तर हिंदवी स्वराज्याचा ग्रंथच आटोपला असता.’’

बादशहा औरंगजेबाच्या स्वारीचे स्वराज्यावर संकट

शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन संभाजी महाराज राज्याचे अधिकारी होण्याच्या दरम्यान उत्तर हिंदुस्थानात बऱ्याच राजकीय उलाढाली चालू होत्या. औरंगजेब बादशहाचे राजपुतांशी युद्ध सुरू होऊन त्यामध्ये त्याचा आवडता पुत्र शहाजादा अकबर यानेच राजपुतांची बाजू घेतल्याने युद्धाचा रंगच पालटला होता. अकबराने रजपुतांच्या साहाय्याने स्वत:ला बादशहा म्हणून जाहीर करून औरंगजेबाशी उघडउघड शत्रुत्व स्वीकारलेले होते (१जाने. १६८१). तथापि‚ औरंगजेबाच्या कपटनीतीसमोर त्याची हार होऊन त्याला आपला जीव वाचविण्यासाठी आपला सहकारी दुर्गादास राठोड (मारवाडचा दिवाण) याच्यासह दक्षिणेचा रस्ता धरावा लागला होता.

हिंदुस्थानात लहान-मोठ्या अनेक सत्ता होत्या. दक्षिणेत आदिलशाही‚ कुतुबशाही ही मोठी राज्ये होती; पण या सर्वांमध्ये कोणासही बादशहा औरंगजेबाच्या सामर्थ्यास आव्हान देण्याचे सामर्थ्य नव्हते. असे सामर्थ्य होते फक्त मराठी राज्यात − मराठी राजाजवळ. अशी आव्हाने देत देतच शिवाजी महाराजांनी आपल्या सत्तेची उभारणी केली होती. त्या शिवाजीराजाचा पुत्र संभाजीराजा हाच केवळ आपणास आश्रय देऊ शकेल‚ अन्य कोणी नाही‚ अशी अकबराची व दुर्गादासाची भावना झाल्यास नवल नव्हते.

मोगल साम्राज्यास अखिल हिंदुस्थानात सर्वांत मोठा धोका मराठ्यांपासूनच होता. याचे कारण मराठी सत्तेचे लष्करी सामर्थ्य फार मोठे होते असे नाही; पण काही विशिष्ट तत्त्वप्रणालींवर‚ काही विशिष्ट अधिष्ठानांवर‚ शिवाजी महाराजांनी या सत्तेची उभारणी केली होती व ही तत्त्वप्रणालीच या सत्तेचे खरे सामर्थ्य होते. हे सामर्थ्य बादशहा ओळखून असल्यामुळे आदिलशाही-कुतुबशाहीपेक्षा मराठी सत्तेने त्याला बेचैन केलेले होते. अशा परिस्थितीत आपला एक बंडखोर पुत्र स्वत:ला बादशहा म्हणून जाहीर करून मराठ्यांच्या आश्रयास जावा‚ ही बाब साम्राज्याच्या व वैयक्तिक त्याच्या हिताच्या दृष्टीने मोठी गंभीर धोक्याची होती. म्हणूनच त्याने प्रथम आपला दुसरा पुत्र शहाजादा आज्जम यास अकबराच्या पाठलागावर तातडीने ससैन्य रवाना केले आणि एकट्या आज्जमच्या हातून हे कार्य पार पडणार नाही‚ हे जाणून  तो स्वत: अफाट फौजफाट्यासह दक्षिणेच्या मोहिमेवर अजमेरहून निघाला- (८ सप्टें. १६८१).  

११ नोव्हेंबरास आज्जम औरंगाबादेस पोहोचला तर त्याच्या मागून येणारा बादशहा दोनच दिवसांनी नर्मदेच्या काठावरील बुऱ्हाणपुरास पोहोचला – (१३ नोव्हेंबर). इकडे कोकणात त्याच दिवशी संभाजी महाराज व शहाजादा अकबर यांची पहिली भेट झाली!

शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी मराठ्यांचे मोगलांशी युद्ध चालूच होते. संभाजी महाराज राज्यावर आल्यावर त्यांनीही हा संघर्ष चालूच ठेवला होता. जानेवारी १६८१मध्ये खुद्द संभाजी महाराजांनी मोगलांच्या बुऱ्हाणपुरावर स्वारी करून ते लुटून फस्त केले होते. अशा उद्ध्वस्त बुऱ्हाणपुरावर पोचल्यावर बादशहाची मन:स्थिती कशी झाली असेल‚ हे मासिरे आलमगिरीतील साकी मुस्तैदखानाच्या एका नोंदीवरून सूचित होते : तो लिहितो‚ ‘‘बादशहा शाहा अब्दुल लतीफच्या समाधीपाशी हजर झाला. इस्लामाच्या शत्रूंचा नाश करण्यात आपल्याला साहाय्य मिळावे म्हणून त्याने समाधीपाशी करुणा भाकली.’’

औरंगजेब म्हणजे कोणी सामान्य शत्रू नव्हता. काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मिरपासून दक्षिणेत भीमानदीपर्यंत त्याचे अफाट साम्राज्य पसरले होते. त्याच्या साम्राज्याचा फक्त जमीन महसूलच ३३ कोटी २५ लाख होता. १० मराठ्यांचे सगळे राज्यच मुळी त्याच्या एका सुभ्याएवढेसुद्धा नव्हते. त्याच्या लष्कराची संख्या अॅबे कॅरे या प्रवाशाने ‘तीन लाख घोडेस्वार व चार लाख पायदळ’ अशी दिली आहे. खुद्द बादशहाच्या छावणीत साठ हजार घोडेस्वार‚ एक लाख पायदळ‚ पन्नास हजार उंट व तीन हजार हत्ती असल्याची तो एके ठिकाणी नोंद करतो.

याउलट पगडींनी असा अंदाज बांधला आहे की‚ मराठ्यांचे सर्व मिळून सैन्यबल तीस चाळीस हजारांवर होते असे वाटत नाही. १२ मोगलांच्या लष्करात फक्त उमराव मनसबदार यांचीच संख्या साडेचौदा हजार होती! १३ बादशहाबरोबर दक्षिणेत त्याचे पुत्र आज्जम‚ मुअज्जम‚ कामबक्ष‚ नातू मुइजुद्दीन‚ बेदारबख्त‚ नामांकित सरदार असदखान‚ जुल्फिकारखान‚ शहाबुद्दीनखान‚ रुहुल्लाखान‚ हसनअलीखान‚ दाऊदखान‚ तरबियतखान असा सेनानींचा प्रचंड ताफाच होता.

औरंगजेब बादशहा अशा प्रकारच्या मोठ्या फौजफाट्यासह व अनेक नामांकित सेनानींसह दक्षिणेत उतरला होता. आपल्या बंडखोर पुत्रास शिक्षा करणे व त्याचबरोबर त्यास आश्रय देणाऱ्या मराठी सत्तेस बुडविणे‚ हे जरी त्याचे प्रधान हेतू असले तरी त्याला आदिलशाही – कुतुबशाहीसह सर्व दक्षिण जिंकून घ्यायची होती. ते मोगलांचे फार वर्षांपासून एक स्वप्न होते. आलमगीर बादशहा आपल्या सामर्थ्याच्या जोरावर ते स्वप्न साकार करणार होता.

तथापि‚ प्रारंभी तरी त्याने अकबर व मराठी राज्य यांनाच बुडविण्याचा उद्योग हाती घेतला व त्यावरच आपले सारे प्रयत्न व लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्याने मराठी राज्याला लागून असणाऱ्या आदिलशाही सुलतानाला‚ सिद्दी‚ पोर्तुगीज व इंग्रज या सागरी सत्तांना व कर्नाटकातील नायकांना संभाजी महाराजांविरुद्ध चिथावणी देऊन उठाव करण्यासंबंधी फर्माने पाठविली. आदिलशहाने त्यास दाद दिली नाही; पण सिद्दीस चांगलेच प्रोत्साहन मिळून त्याने मराठी राज्याच्या किनारी प्रदेशावर हल्ले सुरू केले. पोर्तुगिजांनीही स्वार्थापोटी बादशाही सैन्याशी सहकार्य आरंभिले. मराठी राज्यातील वतनदारांनाही बादशाही फर्माने मिळाली होती. काहींना ही मोठी पर्वणी वाटली; तर स्वराज्यनिष्ठ वतनदारांसमोर मोठे संकट उभे राहिले.

संभाजी राजे राज्याभिषेक दिन माहिती-Sambhaji Maharaj Rajyabhishek

पुढे वाचा:

Q1. Sambhaji Maharaj Rajyabhishek Date in Marathi

A1. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला

Leave a Reply