गर्भधारणा झाली कसे ओळखावे : आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि गर्भधारणा झाली कसे ओळखावे? अनेकांचा मनात गर्भधारणा व प्रसूती बद्दल खूप प्रश्न असतात, या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला गर्भधारणा व प्रसूती सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

स्त्री-पुरुष यांचा संभोग होतो. संभोगात पुरुषाचे ताठर शिश्न स्त्रीच्या योनीत जातो. योनीत पुरुषाचे वीर्यस्खलन होते. वीर्यात शुक्राणू, पुर:स्थग्रंथीचा स्राव व शुक्राणुकोशाचा स्राव असतो. या दोन स्रावांची रासायनिक क्रिया घडते तेव्हा दुधी रंगाचे वीर्य पाण्यासारखे पातळ होते व त्यातील शुक्राणू सचेतन होतात. वीर्य गर्भाशयात शिरते तेव्हा शुक्राणूंचाही प्रवास गर्भाशयात सुरू होतो व ते स्त्रीबीजाचा शोध घेत पुढे पुढे धाव घेतात.

मासिक पाळी आलेल्या दिवसापासून चौदा दिवसांनी स्त्रीच्या ओटीपोटातील स्त्रीबीजग्रंथीतील एक पुटक परिपक्व होऊन फुटते व त्यातील स्त्रीबीज बाहेर पडून गर्भाशयनलिकेत (बीजवाहिनीत) स्थिरावते आणि शुक्राणूंची (पुरुषबीजाची) वाट पाहत राहते.

स्त्रीबीज आले असताना शुक्राणूही तेथे आले तर असंख्य शुक्राणू स्त्रीबीजाभोवती पिंगा घालतात. त्यातील एक शुक्राणू स्त्रीबीजात शिरतो या क्रियेला ‘बीजफलन’ म्हणतात.

गर्भधारणा झाली कसे ओळखावे, Pregnancy Information in Marathi
गर्भधारणा झाली कसे ओळखावे? Pregnancy Information in Marathi

गर्भधारणा झाली कसे ओळखावे? | Pregnancy Information in Marathi

Table of Contents

फलित बीजाचे विभाजन होत जाते व ते गर्भाशयाकडे सरकू लागते. फलित बीजाच्या स्वागतासाठी व पोषणासाठी गर्भाशयात एक अस्तर तयार झालेले असते. या अस्तरात फलित बीज रुतून बसते व ते तेथे वाढू लागते. त्यामुळे स्त्रीला त्यानंतर मासिक पाळी येत नाही. स्त्रीबीज कोणत्या दिवशी फलित झाले हे कळायला मार्ग नसतो.

मासिक पाळी आली नाही की तिला गर्भारपणाचा संशय येतो; परंतु मानसिक ताण, आजार, पोषणदोष, परीक्षा यामुळेही पाळी येत नसते. संभोग घडला असेल व त्यानंतर पाळी आली नसेल तर गर्भधारणा झाली आहे असे समजावे.

शिवाय स्त्रीला सकाळी पोटात मळमळणे, उलट्या होणे ही गर्भारपणाची लक्षणे असतात. पाळी चुकल्यावर दोन आठवड्यांत स्तन जड व भरल्यासारखे लागतात. स्तनाच्या आकारात वाढ होते, स्तन पिळल्यास स्तनाग्रातून पिवळसर द्रव येतो, स्तनमंडलाचा तांबूस रंग जाऊन काळा रंग येतो, हीदेखील गर्भारपणाची लक्षणे होत.

मासिक पाळी आली नाही तर प्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी?

मासिक पाळी आली नाही तर प्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी?
मासिक पाळी आली नाही तर प्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी? Pregnancy Information in Marathi

पाळी अपेक्षित तारखेला आली नाही की स्त्री संभ्रमात पडते. गर्भारपणामुळे पाळी चुकली असेल की इतर काही कारणांमुळे, हे समजण्यासाठी तिने पाळी चुकल्यावर पाच दिवस वाट पाहावी. कधीकधी पाळी उशिरा येते. पाच दिवसांनंतरही पाळी आली नसेल तर लघवी तपासावी. लघवीची ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ ही चाचणी केली असता ती होकारात्मक (पॉझिटिव्ह) आली तर स्त्री गर्भार आहे हे नक्की होते.

‘प्रेग्नन्सी टेस्ट’ची पट्टी औषधविक्रेत्याकडे मिळते. ही टेस्ट कशी करायची याविषयीचे माहितीपत्रकही सोबत दिलेले असते. तीन थेंब लघवी पट्टीवर टाकली असता तीन मिनिटांनंतर दोन उभ्या रेषा दिसल्या तर ‘पॉझिटिव्ह’ म्हणजे गर्भधारणा झालेली आहे असा अर्थ होतो.

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ कशी होते आणि कालावधी कसा असतो?

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ कशी होते आणि कालावधी कसा असतो?
गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ कशी होते आणि कालावधी कसा असतो?

बीज फलित कधी झाले (गर्भधारणा नेमकी कधी झाली) हे समजणे शक्य नसल्यामुळे शेवटची पाळी ज्या दिवशी आली त्या दिवसापासून गर्भारपणाच्या दिवसांची मोजणी करतात.

 • ही पाळी आल्यावर चौदा दिवसांनी स्त्रीबीजाचे फलन होत असते.
 • सतराव्या दिवशी फलित बीज गर्भाशयाच्या अस्तरात रुतून बसते.
 • चौथ्या आठवड्यांत गर्भाच्या पाठीचा कणा, आतडी, हृदय तयार होऊ लागते.
 • पाच आठवड्यांनंतर मेंदू, यकृत तयार होऊ लागते.
 • सातव्या आठवड्यात डोळे, नाक ओळखू येते.
 • आठ आठवडे झाले की भुवया, बोटे, कान ओळखू येतात.
 • बारा आठवड्यांनंतर हात, पाय, नखे दिसू लागतात.
 • चौथ्या महिन्यात गर्भ गर्भजलात तरंगताना दिसतो, गर्भाचे लिंग तयार होऊ लागते.
 • पाचव्या महिन्यांत गर्भाची हालचाल होऊ लागते, हृदयाचे ठोके ऐकू येतात.
 • सहाव्या महिन्यात सुरकुतलेली त्वचा व डोळ्यांच्या पापण्या दिसू लागतात.
 • सातव्या महिन्यात गर्भाचे वृषण/स्त्रीबीजग्रंथी ओळखू येतात. पुढे वृषण पोटातून बाहेर वृषणकोशात उतरतात.
 • आठव्या महिन्यात गर्भाच्या अंगावर लव दिसते.
 • नवव्या महिन्यात त्वचा नितळ होते.
 • कॅलेंडरचे नऊ महिने व सात दिवसांनंतर (280 दिवसांनंतर) स्त्री प्रसूत होते व मूल जन्माला येते.
गर्भाची वाढ, Fetal growth, गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ कशी होते आणि कालावधी कसा असतो
Pregnancy Information in Marathi

बाळ आईच्या पोटात असताना वारेद्वारे नाळेतून बाळाचे पोषण होत असते. वार ही बनपावासारखी असून ती गर्भाशयाला आतून चिकटलेली असते. वारेत रक्तवाहिन्यांचे जाळे असते. नाळ दोरखंडासारखी असून ती सुमारे 45 सें.मी. लांब असते. नाळेचे एक टोक वारेला व दुसरे टोक बाळाच्या बेंबीला जोडलेले असते. आपल्या शरीराची मुटकुळी करून, डोके खाली व पाय वर अशा स्थितीत बाळ गर्भाशयात विसावते. बाळाच्या शरीराभोवती गर्भजलाने भरलेली पिशवी असते.

मातेचे रक्त वारेत येते. नाळेतून बाळाचेही रक्त वारेत येते. येथे मातेच्या रक्तातील अन्नघटक व प्राणवायू बाळाच्या रक्तात शोषले जातात. बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ व कार्बन-डाय-ऑक्साइड आईच्या रक्तात शोषला जातो. बाळाच्या रक्तात शोषलेले अन्नघटक व प्राणवायू नाळेद्वारे बाळाच्या शरीराला पोहोचवले जातात.
बाळाच्या शरीराभोवती एक गर्भजल पिशवी असते. यातील गर्भजलात बाळ तरंगत असते.

शेवटची पाळी आली त्या दिवसापासून 280 दिवसांनी प्रसूतीला सुरुवात होते. प्रथम गर्भाशयाचे आकुंचन होते. त्यामुळे स्त्रीच्या पोटात दुखू लागते. सुरुवातीला योनीतून रक्तमिश्रित श्लेष्मा बाहेर येतो. पहिल्यांदाच होणाऱ्या प्रसूतीला सुमारे बारा ते पंधरा तासांचा अवधी लागतो. नंतरच्या प्रसूतीत हा अवधी कमी होतो.

सोयीसाठी प्रसूतीची विभागणी तीन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात स्त्रीला पोटात कळा यायला लागतात, गर्भाशय-ग्रीवेचे मुख उघडू लागते. वारंवार येणाऱ्या कळांमुळे गर्भाशय-ग्रीवेचे तोंड विस्तार पावत जाते. गर्भाशय-ग्रीवा व योनी हा भाग सलग तोटीसारखा होतो.

आता दुसरा टप्पा सुरू होतो. यात गर्भाशयाच्या आकुंचनामुळे गर्भ खाली सरकत जातो. गर्भजल पिशवी फुटते व गर्भजल बाहेर येते. प्रथम योनीबाहेर बाळाचे डोके दिसते. डोके बाहेर आल्यावर चेहरा, शरीर व नाळ बाहेर येताना दिसते. संपूर्ण बाळ बाहेर आले की दुसरा टप्पा संपतो. नाळ कापतात व आईपासून बाळ विलग केले जाते.

बाळाच्या या प्रवासाला अर्धा-पाऊण तास लागतो. योनिद्वारातून बाळाचे डोके बाहेर येताना बाळाला त्रास होऊ नये किंवा योनिद्वार वाकडेतिकडे फाटू नये यासाठी कात्रीने योनिद्वारावर एक चीर देतात. (भगच्छेदन/एपिजिऑटॉमी) बधिरीकरणाचे इंजेक्शन दिल्यामुळे ही चीर देताना किंवा प्रसूतीनंतर टाके मारताना स्त्रीला दुखत नाही. प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात गर्भजल पिशवी, नाळ व वार बाहेर येते. अशा रीतीने प्रसूती समाप्त होते.

VIDEO: गर्भधारणा झाली कसे ओळखावे?

प्रसूतीविषयक प्रश्न

प्रसूतीविषयक प्रश्न

बाळ जन्माला येताना फार वेदना व खूप रक्तस्राव होतो का?

नाही. गर्भधारणा व प्रसूती ही निसर्गाची किमया असते. तोच तजवीज करतो, संरक्षण देतो. ही क्रिया व्यवस्थितपणे लाखो वर्षांपासून होत आली आहे. केवळ माणसात नव्हे, तर सर्व सस्तन प्राण्यांत अशाच पद्धतीने गर्भधारणा व प्रसूती होते. गर्भारपणात स्वच्छता बाळगणे, सकस व भरपूर अन्न घेणे, माफक व्यायाम करणे, अंग सैल सोडण्याच्या क्रियेची सवय (शवासन) करणे व धनुर्वातप्रतिबंधक लस घेणे, हे सर्व केल्यास स्त्रीची प्रसूती सुलभ रीतीने होते.

प्रसूतीच्या पहिल्या टप्प्यात कळा आल्या असता लांब श्वास घेणे व दुसऱ्या टप्प्यात कळा आल्या असता जोर देणे निसर्गाला साहाय्यभूत ठरते. काही शहरांत ‘गर्भसंस्कार क्लासेस’ द्वारा हे शिक्षण गर्भार स्त्रीला मिळू शकते.

गर्भारपणात स्त्रीच्या जिवाला धोका असतो का?

95 टक्के प्रसूती स्वाभाविक रीतीने होतात. बाकी राहिलेल्या पाच टक्के स्त्रियांना डॉक्टरी मदतीची गरज असते. आज विज्ञानाची घोडदौड झालेली असल्यामुळे आणि इस्पितळांची सोय व प्रसूतितज्ज्ञ उपलब्ध असल्यामुळे धोका राहिलेला नाही.

पूर्वी गर्भारपणाच्या सातव्या महिन्यात इस्पितळात नाव नोंदवीत. आता गर्भारपणाच्या सुरुवातीपासून गर्भार स्त्रिया डॉक्टरी देखरेखीखाली असतात. त्यामुळे प्रसूती सुलभ होण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करता येतात.

गर्भवती स्त्रीला मासिक पाळी का येत नाही?

गर्भाच्या पोषणासाठी म्हणून स्त्रीच्या गर्भाशयात दर महिन्याला एक अस्तर तयार होत असते. स्त्रीबीज फलित होऊन ते गर्भाशयात वस्तीसाठी आले नाही, तर या अस्तराचा उपयोग नसतो, म्हणून ते झडून जाते. यालाच मासिक पाळी येणे असे म्हणतात; परंतु फलित बीज आले व ते अस्तरात रुतून बसले तर याच अस्तरावर गर्भाचे पोषण होत असते, म्हणून ते अस्तर झडून जात नाही; म्हणजे मासिक पाळी येत नाही.

स्त्रीच्या स्तनातून दूध कधीपासून येते?

प्रसूतीनंतर लगेच दूध येऊ लागते. हेदेखील नैसर्गिक वरदानच आहे. सुरुवातीला तीन दिवस स्तनातून घट्ट दूध येते, त्याला ‘चीक दूध’म्हणतात. प्रसूती झाल्यावर अर्ध्या तासात बाळाला पाजायला घेतले पाहिजे. सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास प्रसूतीनंतर तीन तासांत बाळाला पाजायला घ्यावे. आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते (चीकट दुधासह). वेळेवर दूध द्यायला सुरुवात न केल्यास दूध तयार होईनासे होते.

अपुऱ्या दिवसांच्या बाळाला कोणते धोके असतात?

बाळ 28 आठवड्यांपूर्वी जन्मल्यास ‘अपुऱ्या दिवसांचे बाळ’असे म्हणतात. बाह्यसृष्टीला तोंड देण्यास त्याला क्षमता आलेली नसते. सात महिने पूर्ण होण्यापूर्वी बाळाचा जन्म झाल्यास ते जगणे शक्य नसते. काळजी घेतल्यास सात महिन्यांचे मूलही जगू शकते.

गर्भाशयाचे मुख उघडे असणे, जुळी मुले, कमजोर गर्भाशय, गर्भाशयाचा संसर्ग, गर्भाशयात गाठ असणे, गर्भजल जास्त असणे, अशा कारणांमुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्माला येते. पुरेशी ऊब व योग्य पोषण मिळणे आणि जंतुसंसर्ग टाळणे यासाठी अशा बाळाला बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात ठेवावे लागते.

गर्भपात म्हणजे काय?

गर्भाची वाढ पूर्ण होण्यापूर्वीच तो बाहेर पडणे म्हणजे गर्भपात. गर्भात विकृती असेल किंवा गर्भाशयात दोष असतील, तर गर्भपात होतो. गर्भपात होताना पोटात दुखते, योनिद्वारे रक्तस्राव होतो, रक्ताच्या गाठी पडतात व गर्भही बाहेर पडतो. गर्भाचे अवशेष पोटात राहिल्यास डॉक्टरांकडून ‘क्युरेटिंग’करून घ्यावे लागते.

अंडी, पपया खाल्यास गर्भपात होतो का?

नाही. ग्रहणावेळी भाजी चिरल्यास ओठ फाटलेले मूल जन्मते हादेखील गैरसमज आहे. दोरीवरून उड्या मारणे, गरम मसाल्याचे पदार्थ खाणे, अंडी, पपया, खरवस खाणे यामुळे गर्भपात होत नाही.

गर्भसमाप्ती म्हणजे काय?

गर्भसमाप्तीचा कायदा 1972 पासून अस्तित्वास आला. मातेला शारीरिक किंवा मानसिक धोका असेल, मूल विकृत असेल, बलात्कारामुळे किंवा कुटुंबनियोजनाचे उपाय फसल्यामुळे गर्भारपण आले असेल, तर गर्भपात करवून घ्यायला मुभा आहे. विवाहापूर्वी मातृत्व आले असेल तर त्यातून मुक्त व्हायला या कायद्यामुळे वाट सापडली आहे. मात्र ‘मुलगी नको’ या कारणासाठी गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरतो.

गर्भसमाप्तीचा कायद्यामुळे व्यभिचार वाढला नसेल का?

नाही. खंजीर सोन्याचा आहे म्हणून कुणी खुपसून घेत नाही. गर्भपाताची सोय आहे म्हणून कुणी राजीखुशीने गर्भार होणार नाही. अनपेक्षित किंवा अज्ञानामुळे गर्भारपण येते; अशावेळी गर्भसमाप्तीचा कायदा मदतीला येतो. पूर्वी वैदू किंवा दाईकडून गर्भपात करवून घ्यायचे व त्यात स्त्रियांना रक्तस्राव किंवा जंतुसंसर्ग होऊन मृत्यू यायचा. गर्भसमाप्तीच्या कायद्यामुळे हे मृत्यू टळले आहेत.

टेस्टट्यूब बेबी म्हणजे काय?

गर्भाशयनलिका (बीजवाहिनी) बंद पडल्या असतील तर स्त्रीबीजाचे फलन होत नाही; म्हणजे दांपत्याला मूल होत नाही. अशा वेळी स्त्रीच्या पोटात लॅपरोस्कोप नावाची नळी घालून स्त्रीबीज बाहेर काढतात, ते एका काचेच्या बशीत पतीच्या शुक्राणूने फलित करतात. फलित बीजाचे विभाजन होऊ लागते. आठ पेशी झाल्या की, हे फलित बीज योनिमार्गे पुन्हा गर्भाशयात सोडले जाते. गर्भाशयात गर्भ संपूर्ण वाढतो तेव्हा सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळाचा जन्म होतो. अशी पहिली टेस्ट ट्यूब बेबी 6 ऑगस्ट 1986 रोजी मुंबईच्या केईएम इस्पितळात जन्माला आली.

बाईला राक्षस मूल झाले, रेडकू झाले अशा वर्तमानपत्रात बातम्या येतात. यात खरे किती?

विद्रपू मूल जन्माला आले तर ‘राक्षस’मूल जन्माला आले असे म्हणतात. ते वाढते, आईला खाते, असे सांगतात, यात तथ्य नाही. असे मूल जन्मत: किंवा जन्मल्यावर तत्काळ मृत्यू पावते. बाईला रेडकू होत नाही. ते होणे शक्य नाही. सजातीय प्राण्याचे स्त्रीबीज व पुरुषबीज यांचा संयोग होऊ शकतो. स्त्रीच्या स्त्रीबीजात पुरुषाचेच पुरुषबीज विलीन होऊ शकते व माणूसच जन्माला येऊ शकतो.

जुळी मुले कशी होतात?

स्त्रीबीज फलित झाले की ते विभागून दोन पेशी होतात. या दोन पेशी विलग होऊन पुढे स्वतंत्रपणे वाढतात. यांना ‘एकबीज जुळे’ म्हणतात. ही दोन मुले एकाच गर्भजल पिशवीत वाढतात. प्रत्येक गर्भाची नाळ वेगळी असते. मात्र वार एकच असते. ही मुले हुबेहूब एकसारखी दिसतात. दोन्ही मुले किंवा दोन्ही मुली जन्मतात; म्हणजे दोघांचे लिंग समान असते.

कधीकधी एकाऐवजी दोन स्त्रीबीजे गर्भाशयनलिकेत येतात. शुक्राणूंना कमतरता नसल्यामुळे दोन्ही बीजे फलित होतात व दोन मुले जन्माला येतात. प्रत्येकाची नाळ वेगळी, वार वेगळी व लिंग वेगळे असू शकते (एक मुलगा, एक मुलगी). ही मुले दिसायला सारखी नसतात. यांना ‘द्विबीज जुळे’ म्हणतात.

विवाहापूर्वी गर्भधारणा झाली तर मुलीने काय करावे?

मातृत्व हे पूज्य असते; परंतु विवाहपूर्वीचे मातृत्व हे कलंकित असते. असे मूलही अनौरस म्हणून ओळखले जाते. फक्त संभोगामुळेच गर्भधारणा होते. विवाहापूर्वी पुरुषाने कितीही गळ घातली तरी स्त्रीने संभोगाला प्रवृत्त होऊ नये. ‘नाही’असे ठासून सांगावे. चूक घडलीच तर पाळी येते की नाही ते पाहावे. पाळी चुकली तर गर्भारपणाची शंका घ्यावी. लघवीची ‘प्रेग्नसी टेस्ट’करावी. ती होकारात्मक आल्यास आईला कळवावे. गर्भपात करणे याशिवाय इलाज नसतो.

आता कायद्याने गर्भपाताला परवानगी दिली आहे. तरीही अशी चूक होणार नाही यासाठी सावध असावे. तसेच ‘झाले गेले गंगेला मिळाले’ही वृत्ती हवी. अपराधाची किंवा पापाची भावना उराशी बाळगून जगू नये. जीवनाचे नवे कोरे पान सुरू करावे. अखेर चूक होणे हा मनुष्यधर्म असतो; कारण चूक ही जाणूनबुजून केलेली नसते. गर्भारपणास कारणीभूत असणाऱ्या पुरुषाशीच लग्न केल्यास असे लग्न सहसा यशस्वी होत नाही, असे आढळून येते.

लागोपाठ मुली होणे यात स्त्रीचा दोष असतो का?

नाही. स्त्रीच्या स्त्रीबीजात नेहमी ‘एक्स’हे लिंगगुणसूत्र असते. पुरुषाचे शुक्राणू मात्र दोन प्रकारचे असतात. निम्म्या शुक्राणूत ‘एक्स’हे लिंगगुणसूत्र असते व निम्म्या शुक्राणूत ‘वाय’हे लिंगगुणसूत्र असते. ‘एक्स’लिंगगुणसूत्र असलेला शुक्राणू स्त्रीबीजात विलीन झाला, तर मुलगी होते व वाय लिंगगुणसूत्र असलेला शुक्राणू स्त्रीबीजात विलीन झाला, तर मुलगा होतो. म्हणजेच मुलगा किंवा मुलगी होणे याला पुरुषाचा शुक्राणू जबाबदार असतो. कोणत्या शुक्राणूने स्त्रीबीज फलित व्हावे हे पुरुषालाही नियंत्रित करता येत नाही.

मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी यासाठी कोणताही उपाय नाही. मुलगा किंवा मुलगी होणे हा एक योगायोग असतो. जगातील स्त्री-पुरुषांची संख्या समान राहावी यासाठी निसर्गाचे प्रयत्न असतात. आपण त्यात ढवळाढवळ करून निसर्गाचे संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करू नये.

पुरुषप्रधान समाजात स्त्रीला दुय्यम स्थान मिळाले, तिचे हाल केले गेले; यामुळे मुलगी नको असे स्त्रीलाही वाटत असते. यावर उपाय म्हणजे स्त्रीला शिक्षण देणे, तिला स्वातंत्र्य देणे, तिच्या कर्तृत्वाला वाव देणे, तिला स्वत:च्या पायावर उभी राहू देणे, तिला समानतेने वागवणे हे होत. स्त्रीही ‘पुरुषार्थ’ दाखवू शकते यात शंका राहिलेली नाही.

‘पुत्र’म्हणजे वंशाचा दिवा, तो आपल्याला म्हातारपणी पोसणार, आधार देणार, आपला वंश चालवणार, या खुळ्या समजुती आता इतिहासजमा झाल्या पाहिजेत.

काही स्त्रियांना मुले होत नाहीत याचे कारण काय?

10 टक्के दांपत्यांना मुले होत नाहीत. मूल न होण्याचे कारण फक्त स्त्रीत असते असे नव्हे. पुरुषही मूल न होण्याला कारणीभूत असतो. संभोगाविषयी अज्ञान असल्यास मूल होत नाही. मूल न होण्याचे पुरुषातील कारण म्हणजे नपुंसकत्व, वीर्यस्खलन न होणे, वीर्यात पुरेसे शुक्राणू नसणे किंवा विकृत शुक्राणू असणे किंवा शुक्राणूंना हवी तितकी गती नसणे, गुप्तरोग, संप्रेरकांचा अभाव किंवा जननेंद्रियात दोष हे होय.

स्त्रीतील मूल न होण्याची कारणे म्हणजे गर्भाशयातील दोष, संप्रेरकांची उणीव, स्त्रीबीज-विमोचन न होणे गर्भाशयनलिका बंद पडणे, जंतुसंसर्ग इ.

विवाह झाल्याववर एका वर्षात मूल न झाल्यास डॉक्टरी तपासणी करायला सुरुवात करावी. एक-दोन वर्षे इलाज करूनही यश न आल्यास एक मूल दत्तक घ्यावे.

Leave a Reply