गरिबी एक शाप मराठी निबंध – Poverty Essay in Marathi

संस्कृतमध्ये अशी एक म्हण आहे, ‘ उत्पद्यन्ते विलियन्ते, दरिद्राणां मनोरथः

ह्याचा अर्थ असा की गरीब लोकांच्या मनात पुष्कळ इच्छा निर्माण होतात, परंतु पैशाच्या पाठबळा अभावी त्या मनातल्या मनातच नाहीशा होतात.

खरोखर, एखाद्या विकसनशील राष्ट्राच्या दृष्टीने गरीबी हा शापच ठरतो. आपल्या देशानेही बराच काळ ह्याच शापाला तोंड दिले आहे. गरिबीमुळे विकासप्रक्रियेत खीळ बसते. गरिबीमुळे उपजीविकेसाठी पुरेशी साधने मिळत नाहीत आणि उपजिविकेची पुरेशी साधने न मिळाल्यामुळे गरीबी तशीच राहाते. असे हे गरीबीचे दुष्टचक्र ब-याच काळापासून चालूच आहे.

आजही आपल्या देशात चाळीस टक्के जनता गरीब आहे. गरिबीमागोमाग अनेक वाईट गोष्टी येतातच. गरीबीमुळे माणूस अडाणी बनतो कारण त्याला योग्य शिक्षण घेण्याची आणि आपल्या अंगातील कला विकसित करण्याची संधीच मिळत नाही. खूपच लहान वयापासून त्याला स्वतःचे पोट भरण्यासाठी अकुशल कामे करावी लागतात. अकुशल कामाला पगारही कमीच मिळतो. अशा त-हेने तो गरिबीतून कधी वरच येत नाही. अशा माणसाला ख-याखोट्यातील अंतर कळत नाही. निर्धन माणसाला घरात आणि समाजात मान मिळत नाही. त्यामुळे अशा घरातील पुरूष जीवनातील नैराश्य घालवण्यासाठी दारूसारखी व्यसने करू लागतात. त्यामुळे तर त्यांच्या बायकामुलांची पार धूळदाण होते आणि ते अधिकच गरीबीच्या गाळातरूततात.

भारतात एके काळी सोन्याचा धूर निघत होता. भरपूर संपत्ती होती. सर्व खेडी स्वयंपूर्ण होती. शेती आणि त्यावर आधारित उद्योग होते, तसेच कुंभार, विणकर, लोहार, सुतार, चांभार, सोनार इत्यादी कसबी कारागीरही प्रत्येक गावात होते. भारतातील लघुउदयोग भरभराटीला आलेले होते. परंतु इंग्रज आले आणि त्यांनी भारताला अक्षरशः लुटून नेले. इथल्या कारागीरांचे व्यवसाय धोक्यात आणले. इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे तिथे यंत्रावर स्वस्त माल बनू लागला. भारतातून कच्चा माल कवडीमोलाने न्यायचा आणि आपल्या देशातील यंत्रावर बनलेला पक्का माल इथे आणून विकायचा अशी त्यांची कार्यपद्धती होती. त्यामुळे इथले उद्योगधंदे बसले आणि शेतीवर अवलंबून असणा-यांचा भारवाढला.

स्वातंत्र्यानंतरही आपण गरीबी हटवण्याचे खूप प्रयत्न केले आहेत. परंतु वाढती लोकसंख्या, भ्रष्टाचार, सुस्त कारभारयंत्रणा ह्या कारणांमुळे ते कठीण जात आहे. शिवाय चीन आणि पाकिस्तानसारखे कुरापतखोर शेजारी लाभल्यामुळे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा जवळजवळ तीस टक्के हिस्सा आपल्याला संरक्षण सामग्रीवर खर्च करावा लागतो जो एरवी आपल्याला विकासकार्यासाठी वापरता आला असता. म्हणून आपल्या देशातील गरीबी हटत नाही.

तशी ती हटावी ह्यासाठी लोकसंख्येवर काबू, उत्पादनवृद्धी, भांडवलवृद्धी, संपत्तीचे समान वितरण, आर्थिक योजनांची कार्यक्षमतेने अंमलबजावणी, भ्रष्टाचार आणि नाहक उधळपट्टीला लगाम ही पावले आपण उचलली पाहिजेत. तसे झाले तर आपल्या देशाला लागलेला हा गरीबीचा शाप नाहीसा होईल.

पुढे वाचा:

Leave a Reply