Set 1: नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध – Nadiche Atmavrutta Nibandh Marathi
दुपारच्या वेळी आम्ही नदीकाठी फेरफटका मारायला गेलो होतो. नदीकाठच्या वाळूत खूप खेळलो. खूप डुंबलो. झाडावर चढून खोल पाण्यात सूर मारले. आंघोळीचे आवरल्यावर घरी परतण्यासाठी निघालो. इतक्यात….
इतक्यात, एक धीर गंभीर आवाज आला. नदी आमच्याशी बोलू लागली, “बाळांनो, निघालात कुठे? थोडा वेळ थांबणार नाही का? माझे दुःख, दु वेदना ऐकणार नाही का?” नदीने आपले दु:ख सांगायला सुरुवात केली…
“माझा उगम ज्या ठिकाणी झाला आहे, त्या ठिकाणाला काळम्मादेवी असे म्हणतात. स्वच्छ दुधासारखे, नितळ पाणी पाहून लोक मला ‘दूधगंगा’ या नावाने ओळखू लागले. माझे पाणी अडवून काळम्मावाडी येथे धरण बांधले आहे. अडवलेल्या पाण्याने माझ्या काठचा परिसर सुजलाम् सुफलाम् झालाय. मला या गोष्टीचा आनंद आहे.
पण…. पण अलीकडे सर्वांचेच माझ्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे अमृतासारखे मधुर असणारे माझे पाणी पिताना लोकांच्या अंगावर शहारे येताहेत. गावातील सांडपाणी सगळेजण माझ्याकडेच सोडतात. कोणी माझ्या पाणवठ्यावर जनावरे घेऊन येतो. त्यांच्या अंगावरील घाण, शेण, मूत्र यामुळे माझे पाणी दूषित होते. गावोगावी पाणवठ्यावर कित्येक स्त्रिया, धोबी कपडे धुण्यासाठी येतात. साबणामुळे माझे पाणी खराब होते. असे पाणी पिताना लोक नाक मुरडणारच ना ! माझे पावित्र्य टिकण्यासाठी तुम्हीच काहीतरी कराल अशी आशा वाटते.’
नदीचे बोलणे संपले. मला मात्र तिच्यासाठी काहीही करू शकत नसल्याची हूरहूर लागून राहिली.
Set 2: नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध – Nadiche Atmavrutta Nibandh Marathi
अशीच गंगेच्या काठावर भटकत होते. मन स्थिर होत नव्हते. हृदयात कुठेतरी हूरहूर लागून राहिली होती. माझा स्वैरसंचार पाहून की काय पण एक हाक माझ्या कानी आली अन् मी बावरुन इकडे तिकडे पाहिले. पण कोणीच दिसेना म्हणून भास झाला असे वाटून तशीच पुढे निघाले पण आणखी एकदा हाक कानी पडली.
बेबी ! अगं घाबरतेस काय! मला ओळखले नाहीस का ? किती वेळा माझ्या पात्रात डुंबलीस, हुंदडलीस तीच मी महाराष्ट्र माता, नदी आता ओळख विसरलीस का ? थांब माझी कहाणी ऐक मग विचार कर.
माझा जन्म हिमालयाच्या अत्युच्च शिखरावर झाला. लहानपणी मी फार अवखळ होते. कधी एका जागेवर न थांबता मागे पुढे न पाहता एकसारखी हुंदडायचे. दगडगोटे, झाडेझुडूपे यांच्यामधुन रस्ता काढत फक्त धावत रहायचे. वाटेतील वेली माझी वाट अडविण्याचा प्रयत्न करत पण मी कुणालाही दाद न लागू देता एकसारखी धावायचे. मला अनेक भाऊबहिणी येवून मिळायचे. त्यामुळे माझा वेग वाढतच जात असे. कळसापासून पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात अनेक संकटे येत. त्यांचा निकराने सामना करत ध्येय गाठत असे. एखाद्या योद्ध्याप्रमाणे माझी अवस्था असे. नंतर मात्र वाट चालणे मुश्किल होई कारण सपाट रस्त्यावर शेते, वने असे अनेक अडथळे पार करणे जिकीरीचे होई. त्यांच्याशी तह करत माझी स्वारी तशीच आपले घोडे पुढे दामटत असे. पण माझ्या बहिणभावांनी मला शेवटपर्यंत खूप साथ दिली आणि मी मैलोनमैल धावत सर्व गावांना माझे शुद्ध जल वाटत राहिले. त्यावर कित्येक हेक्टर जमिनींनी आपले पोट भरुन घेतले.
शेते पिकली दैनंदिन व्यवहार यांत तसेच शहरातील कारखान्यात देखील माझा बिन बोभाट वापर होत असे पण कारखान्यातील प्रदूषित रसायन मिश्रीत पाणी माझ्या पात्रात सोडले जाऊ लागले आणि माझे धाबे दणाणले.
शंकराच्या माथ्यावर देखील स्थान मिळवलेली मी आता दूषित बनले. माझ्या पात्रात जगणारे जलचर प्राणी, वनस्पती मृत पावू लागले पण मानवाला त्याची काय क्षिती. त्याला फक्त पाण्याचा निर्धोक वापर करण्याचे तंत्र माहित आहे, दुसऱ्यांची काय फिकीर ? लोक आपली जनावरे, रोग्याची कपडे त्यातच धुवून प्रदूषणात भरच टाकत त्यामुळे माझ्यातुन अनेक रोगजंतू वाहू लागले व निष्पाप लोक त्या रोगांना बळी पडू लागले. मनुष्याला आपल्या बुद्धिचा खूपच अभिमान आहे त्यामुळे जलशुद्धीकरण वगैरे केले जाते पण तेच प्रदुषण न करता सर्वांना शुद्ध पाण्याचा उपभोग घेऊ दिला तर जलचर तरी सुखाने जगतील पण पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी माझ्या पात्राचे व पाण्याचे प्रदूषण करत आहे. वाळू व माती नेऊन मला कोरडे ठणठणीत करत आले. कशी होणार माझी व माझ्या सहवासातील जलचरांची जोपासना ? पण हे मनुष्याला केव्हा कळणार. आज मनुष्य प्राण्याला सावधान करणे गरजेचे झाले म्हणून मी माझी कथा तुला सांगून आपले मन मोकळे केले. तुमच्या नवीन पिढीने यातुन काहीतरी बोध घ्यावा आणि योग्य त्या उपाययोजना अमलात आणाव्या म्हणून धडपड.
Set 3: नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध – Nadiche Atmavrutta Nibandh Marathi
मी एक नदी आहे. माझा जन्म एका पर्वतमय प्रदेशात झाला. माझे लहानपण ह्या हिरव्यागार पर्वतमय प्रदेशात गेले. सुंदर वेली आणि झाडांबरोबर खेळत मी पुढे आले. पर्वतावरून उतरून मी मैदानावर आले व वाहू लागले. मैदानात येताच माझ्या वाहण्याचे प्रमाण कमी झाले. नेहमी वाहणे हा माझा स्वभावधर्म आहे.
माझ्या काठावर बरीच गावे व शहरे वसलेली आहे. मी त्यांना सर्वांना पाणी देते. वर्षोशतकापासून लोक पाणी पिणे, आंघोळीसाठी, धुण्यासाठी आणि शेतीसाठी उपयोगात आणतात. पक्षी-प्राणी सुद्धा माझे पाणी पिऊन तृप्त होतात. आता माझ्यावर बरीच धरणे बांधली गेली आहेत. जागोजागी कालवे काढले गेले आहेत. त्यांचा उपयोग शेतीसाठी होतो.
जेव्हा खूप पाऊस पडतो त्यावेळी खूप पूर येतो. तेव्हा माझ्या काठावर वसलेली गावे, शहरे उद्ध्वस्त होऊन जातात. शेती वाहून जाते. पुरात स्त्री, पुरुष, मुले आणि प्राणी बुडून मरून जातात. अशा प्रकारे पुराच्या वेळी मी नाशपण करते. ह्या गोष्टींमुळे मला दुःख होते. मी लोकांचे पोषण करते म्हणून मला लोकमाता म्हणतात. शेवटी मी सागराला मिळून धन्य होऊन जाते.
Set 4: माझ्या गावची नदी मराठी निबंध
माझे गाव एका नदीकाठी वसले आहे. त्या नदीचे नाव स्त्यमुनाआहे. नदीचे पाणी खूप गोड आहे. त्या नदीमध्ये लोक आंघोळ करतात. आम्हाला नदीत पोहायला खूप आवडते. गुरांना पाणी पिण्यासाठी आणि शेतीला देण्यासाठी यमुनेच्या पाण्याचा उपयोग करतात. पावसाळ्यात यमुनेला पूर येतो. तेंव्हा आम्हाला खूप भिती वाटते. नदीमध्ये खूप मासे . आहेत. माझ्या गावाला यमुना नदी जीवनच देते असे वाटते.
Set 5: मी आहे नदी मराठी निबंध
मी आहे नदी. डोंगरावरून स्वच्छ पाणी घेऊन मी झुळझूळ वाहत पुढे निघाले. पुढे अनेक उपनदया, झरे, ओहोळ मला येऊन मिळाले, म्हणून माझे पात्र विशाल झाले.
गावागावांतून वाहताना मला सुरुवातीला खूप आनंद झाला होता. कारण अनेक गावांतील लोकांना मी ‘जीवन’ देत होते. हाच माझ्या जीवनाचा उद्देश होता. माझ्या काठावर गावे वसली. देवळे, घाट बांधले गेले. मुलेमाणसे पोहायला येऊ लागली. स्त्रिया पाणी भरायला येऊ लागल्या. मी आनंदित झाले. खूश होऊन पुढे पुढे जात राहिले.
पण… अरेरे! याच लोकांनी माझे पाणी दूषित केले. केरकचरा, निर्माल्य, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि घरातले दूषित पाणी सर्व आणून माझ्या पाण्यात सोडले. त्यांनी कारखान्यांतले दूषित, मलिन पाणी माझ्या स्वच्छ पाण्यात मिसळले. त्यामुळे माझे पाणीही खराब झाले. आता गावागावांतून रोगराई पसरली की, लोक मलाच दोष देतात.
लोकहो, तुम्ही जलप्रदूषण ताबडतोब थांबवले नाही, तर तुम्हीच नष्ट व्हाल. पाण्यातील सर्व सजीव नष्ट होतील. शेतीला पाणी मिळणार नाही. प्यायला पाणी मिळणार नाही. तेव्हा त्वरित जागे व्हा! जलप्रदूषण थांबवा!
Set 6: नर्मदा नदीचे मनोगत मराठी निबंध
मी आहे नर्मदा नदी.मी मध्यप्रदेशातील अमरकंटक पर्वताच्या मैकल पर्वतराजीत उगम पावते. माझ्या उगमाच्या ठिकाणी एक छोटेसे कुंड आहे. त्याला नर्मदा कुंड हेच नाव आहे. त्या ठिकाणी उगम पावून मी प्रामुख्यानं मध्य भारतात वाहाते. उगमाच्या ठिकाणी मी अगदी अवखळ असते. एखादी लहान मुलगी असावी ना तशी उत्साहाने खळखळत मी धावत सुटते. पर्वतकड्यावरून अनेक धबधबे आणि ओढे एकत्र येतात. त्या सर्वांचे प्रवाह एकत्र येऊन मला नर्मदा हे माझे नाव मिळते. मला रेवा असंही म्हणतात. माझी एकुण लांबी १२८९ किमी आहे. मी पश्चिमवाहिनी नदी असून भरोंच ह्या ठिकाणी येऊन मी अरबी समुद्राला मिळते.
नदीला लोकमाता म्हणतात त्यामुळे मी लोकमाता आहे. माझ्या काठावरची हिरवाई फुलवत फुलवत मी पुढे जात असते. मी सतत वाहाती असते त्यामुळेच मी निर्मळ असते. वाटेत मला माझ्या पुष्कळ सख्या येऊन मिळतात. त्यांनाच तुम्ही लोक माझ्या उपनद्या म्हणता. ह्या माझ्या सख्या कोण आहेत ते सांगू का? त्या आहेत बुरनर, बंजार, शेर, शक्कर, दुधी, तवा, गंजल, छोटा तवा, कुंडी, गोई आणि कर्जन. ह्या सगळ्या जणींना माझ्या पोटात मी सामावून घेते आणि तिथून पुढे जाऊन मी अरबी समुद्राला मिळते. I
मी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ह्या तीन राज्यांतून वाहाते, मध्य प्रदेशाची तर मी जीवनदायिनीच आहे.
मला भारतातील पवित्र नद्यांपैकी एक नदी मानतात. नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आजही अनेक हिंदू भक्तजन येत असतात. माझ्यात स्नान केलं की पापक्षालन होतं अशी हिंदूधर्मीयांची श्रद्धा आहे.
आज माझ्यावर आणि माझ्या उपनद्यांवर ३२०० ठिकाणी धरणे बांधून मानवाने आमचे पाणी अडवले आहे आणि त्यावर जलविद्यूत प्रकल्प काढलेले आहेत. त्यापैकी ३० धरणे मोठी आहेत, १३५ धरणे मध्यम आहेत तर उर्वरित सर्व लहान आहेत. त्यामुळे माझ्या काठावरच्या गावात वीज आली आहे. उद्योगधंद्यांनाही वीज त्यामुळेच मिळाली आहे.
ह्या उद्योगधंद्यातील सांडपाण्यामुळे माझ्या पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे माझ्या उदरातील मत्स्यजीवन धोक्यात येते आहे. माझ्या काठच्या वाळूचा अंदाधुंद उपसा झाल्यामुळे माझ्या काठावरची जमीन खचते आहे. .
माझी काळजी वेळीच घ्या, असे तुम्हाला ह्या तुमच्या मातेचे कळकळीचे सांगणे आहे.
Set 7: माझ्या गावची नदी मराठी निबंध
माझे गाव बीड. हे गाव मराठवाड्यात आहे. आमच्या गावाला नदी आहे, तिचे नाव बिंदुसरा. बिंदुसरा नदी काही फार मोठी नदी नाही. ती सिंधुफणा नावाच्या नदीची उपनदी आहे. सिंधूफणा आमच्या नदीला पोटात घेते आणि पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते.
पावसाळ्याच्या दिवसातच नदीला पाणी असते. तेव्हा आम्ही मुले नदीच्या पाण्यात पोहायला जातो. पाण्यात पाय सोडून बसले की बारकेबारके मासे येऊन पायांना लुचतात तेव्हा गुदगुल्या होतात. नदीच्या काठाशी बारीकबारीक शंख, शिपले आणि तांदुळमणी सापडतात ते मी आईला आणून देतो. त्यापासून आई छानछान भेटवस्तू बनवते.
उन्हाळ्यात नदीला पाणी नसल्यामुळे तिचे पात्र कोरडेकोरडेच असते. तेव्हा तिथे खाचखळग्यात पाणी साठलेले तेवढे आम्हाला दिसते.
बिंदुसरेच्या काठावर महादेवाचे जुने मंदिर आहे. हे मंदिर बाराव्या शतकात बांधलेले आहे. तिथेही आईसोबत श्रावणातल्या सोमवारी जायला मला खूप आवडते. श्रावणात रिमझिम पाऊस पडत असताना नदीही गिरक्या घेत पुढे जात असते. तिच्या काठावरील झाडे हिरवीगार दिसतात, त्यामुळे डोळ्यांना अगदी थंडथंड वाटते. नदीचे हे रूपमला खूप आवडते. अशी ही माझ्या गावची नदी.
पुढे वाचा:
- नदीची कैफियत निबंध मराठी
- नदीची आत्मकथा मराठी निबंध
- नको हा मेला पोरीचा जन्म निबंध मराठी
- नंदीबैल निबंध मराठी
- ध्वनी प्रदूषण निबंध मराठी
- मी पाहिलेला एक देशभक्त निबंध मराठी
- दूरदर्शनचे फायदे व तोटे
- दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी
- दूरचित्रवाणी निबंध मराठी
- दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी
- दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी
- दूध निबंध मराठी
- दिल्लीची कथा निबंध मराठी
- भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
- भारताची राजधानी कोणती आहे
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- ताजमहाल निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- दिनदर्शिका निबंध मराठी
- दारूबंदी निबंध मराठी
I liked this