पत्र लेखन मराठी : आज दळणवळणाच्या दृष्टीने जग जवळ आले आहे. म्हणजे जगात दूरवर असलेल्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे विविध मार्ग आज उपलब्ध आहेत. उदा., दूरध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी. तरीपण आजही माणसे एकमेकांना पत्रे लिहीत असतात. पत्राच्या माध्यमातून आपण आपले मन दुसऱ्याजवळ व्यक्त करू शकतो. म्हणून पत्रलेखन आजही अपरिहार्य आहे. पत्राचे मुख्य दोन प्रकार आढळतात : 1. औपचारिक पत्रे 2. अनौपचारिक पत्रे.
[printfriendly current=’yes’]

पत्र लेखन मराठी 10वी, 9वी – Marathi Letter Writing for 10th Standard 2021 – Marathi Patra Lekhan – पत्रलेखनासंबंधी थोडी माहिती
Table of Contents
पत्र लेखन म्हणजे काय?
एखादी व्यक्ती कागदाच्या तुकड्यावर लिहून दुसर्या व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करते, तर अशा प्रक्रियेला पत्र लेखन म्हणतात. पत्र लेखनाला पत्र असेही म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भावना दुस-यासमोर व्यक्त करते, तेव्हा पत्र घेणारी व्यक्ती त्या पत्राचे उत्तर त्या व्यक्तीला पत्राद्वारे पाठवते. पूर्वी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी संदेश पाठवण्याचे एकमेव साधन पत्र होते.
पत्रलेखनाचे प्रकार
- औपचारिक पत्रे
- अनौपचारिक पत्रे
(1) औपचारिक पत्रे
दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते. आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांना ‘औपचारिक पत्रे’ म्हणतात.
कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागते. हेही ‘औपचारिक पत्र’च होय. आपली कामे कोणालाही त्रास न होता, बिनचूक व त्वरेने होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात. त्यांची एक ठरलेली रूपरेषा असते. त्यात शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात. या पत्रांत पाल्हाळ, फापटपसारा नसतो. कामाचे स्वरूप थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट करावे लागते. मित्रांना किंवा नातेवाइकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलगी व्यक्त होते, तशी सलगी औपचारिक पत्रात नसते. ही औपचारिक पत्राची वैशिष्ट्ये आहेत.
औपचारिक पत्रांचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे काही उपप्रकार मानले जातात :
- निमंत्रणपत्र
- आभारपत्र
- अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र
- चौकशीपत्र
- क्षमापत्र
- मागणीपत्र
- विनंतीपत्र
- तक्रारपत्र
- स्व-परिचयपत्र
ई-मेलवरील पत्रलेखनाची एक विशिष्ट पद्धत आहे. पारंपरिक पत्रलेखनाहून ती थोडी वेगळी आहे. ई-मेलवरील पत्रलेखनाचे संकेतही थोडे वेगळे आहेत. यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारेच पत्रव्यवहार प्राधान्याने होणार असल्याने त्या पद्धतीचा परिचय होणे आवश्यक आहे. म्हणून पत्राचे प्रारूप ई-मेल पद्धतीनुसार स्वीकारले आहे.
औपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता :
- पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा.
- प्रति यांचे नाव दिलेले असल्यास, तेच लिहावे. तसेच हुद्दाही लिहावा. यांचीही सुरुवात डावीकडे करावी.
- प्रति यांचा पत्ता जर प्रश्नपत्रिकेत दिलेला असेल, तर तोच लिहावा; पत्ता दिलेला नसेल, तर तो काल्पनिक लिहावा.
- प्रति यांचा पत्ता लिहिल्यानंतर पत्राचा विषय लिहावा.
- विषयानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे ‘महोदय’/’महोदया’ हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम दयावा. (‘मा. महोदय/महोदया’ किंवा ‘माननीय महोदय/महोदया’ असे लिहू नये. फक्त ‘महोदय’/’महोदया’ एवढेच लिहावे.)
- त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी. यातील प्रत्येक परिच्छेदाची सुरुवात डावीकडे करावी.
- ‘आपला विश्वासू’, ‘आपला कृपाभिलाषी’ या किंवा यांसारख्या शब्दांनी शेवट करून त्याखाली प्रश्नात प्रेषकाचे नाव आणि पत्ता दिलेला असल्यास तो लिहावा. प्रेषकाचे नाव दिलेले नसल्यास अ. ब. क./ य. र. ल. असे नाव लिहून, काल्पनिक पत्ता लिहावा. हे तपशीलही डावीकडे लिहावेत.
- पत्त्यानंतर पत्रलेखकाने स्वत:चा e-mail id लिहावा.
(1) स्व-परिचयपत्र :
एखादया पदावरील नेमणुकीसाठी अर्ज करणे किंवा एखादया स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज करणे हा पत्रलेखनाचा एक प्रकार आहे. अशा पत्रामध्ये मुख्य पत्राबरोबर स्वत:ची माहितीही जोडावी लागते. अशा स्वत:च्या माहितीसह असलेल्या पत्राला स्व-परिचयपत्र म्हणतात.
स्व-परिचयपत्रामध्ये आपण त्या पदाला किंवा स्पर्धेसाठी योग्य असा एक उमेदवार आहोत, अशा स्वरूपाची माहिती दिलेली असते.
(2) मागणीपत्र :
- एखादया वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र.
- मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते.
- पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा केवळ व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो.
- सार्वजनिक जीवनात सौजन्याने वागण्याचे संकेत म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते.
मागणीपत्राच्या विषयाची कक्षा :
- शालेय वस्तूंची मागणी करणे. (वया, पुस्तके, स्टेशनरी, तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे.) .
- घरगुती उपयोगासाठी आवश्यक वस्तूंची मागणी करणे.
- कॅटरर्सकडे अल्पोपाहाराची मागणी नोंदवणे
- वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणे. .
- शाळेसाठी नियतकालिकांची मागणी नोंदवणे.
- माहितीपत्रके (वस्तू, वास्तू, परिसर, परिवहन, सहल आयोजन, निवास व्यवस्था वगैरे).
- आपत्तिग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मागणी करणे.
(3) तक्रारपत्र :
- कशाबद्दल तरी, कोणाविरुद्ध तरी तक्रार केलेली असते.
- तक्रारीची कारणे-फसवणूक, नुकसान, अन्याय इत्यादींबाबत संबंधित व्यक्ती, संस्था किंवा शासन यांच्याकडे तक्रार.
- तक्रारपत्रात तक्रारनिवारणाची विनंती केलेली असते. तरीही हे विनंतिपत्र नव्हे. पत्राच्या गाभ्यामध्ये तक्रारच असते.
तक्रारपत्राच्या विषयाची कक्षा :
- फसवणूक होणे
- नुकसान होणे
- अन्याय होणे
- हक्क हिरावून घेतला जाणे
- समाजधारणेला घातक बाबी असणे
- मानवी जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या बाबी (उदा., वृक्षतोड) इत्यादी प्रकारांविरुद्ध तक्रार नोंदवणे.
औपचारिक ई-पत्राचा आराखडा
[printfriendly current=’yes’]

(2) अनौपचारिक पत्रे
आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही ‘अनौपचारिक पत्रे’ होत. हल्ली संदेशवहनातील प्रचंड क्रांतीमुळे अनौपचारिक पत्रे लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली फारच कमी प्रमाणात होतो.
इंटरनेट, संगणक, मोबाइल फोन यांमुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार मंदावला आहे, हे खरे असले, तरी त्यांच्यामुळे पत्रव्यवहार चालूसुद्धा राहिला आहे. काही वेळा माणसे कामात असतात. संपर्क होऊ शकत नाही. अशा वेळी ई-मेलद्वारे पत्रे पाठवली जातात. किंबहुना आता तंत्रज्ञानाचा प्रभाव व सुलभता यांमुळे ई-मेलचा प्रसार खूपच वाढला आहे. या वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमात अनौपचारिक पत्रांपैकी कौटुंबिक स्वरूपाच्या पत्रांचा समावेश केलेला आहे.
अनौपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता :
- पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी.
- पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही.
- पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा. आईवडिलांना ‘शिरसाष्टांग नमस्कार किंवा ‘शि. सा. नमस्कार’ आणि कुटुंबातील इतरांना ‘सा. न./साष्टांग नमस्कार/नमस्कार/आशीर्वाद’ यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.
- पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.
- पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.
- पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा.
पूर्वी आईवडिलांना पत्र लिहिताना मायन्यात ‘तीर्थरूप’, लिहिण्याची पद्धत रूढ होती. तसेच, , वडीलधाऱ्या नातलगांना ‘तीर्थस्वरूप’ आणि आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना ‘चिरंजीव’ लिहिण्याची पद्धत होती. मात्र अलीकडे ‘तीर्थरूप’, ‘तीर्थस्वरूप’ व ‘चिरंजीव’ या शब्दांऐवजी ‘प्रिय’ हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. इतकेच नव्हे, तर अन्य नातेवाइकांसाठी ‘प्रिय दादा’, ‘प्रिय ताई’, ‘प्रिय आजोबा’, ‘प्रिय आजी’, ‘प्रिय काका/काकी’, ‘प्रिय मामा/मामी’ वगैरे शब्द मायन्यात योजले जातात.
‘प्रिय’ या शब्दातून अधिक जवळीक साधलेली दिसून येते. तसेच, अभिवादनदर्शक मजकुरात आईवडिलांना ‘शिरसाष्टांग नमस्कार’, “शि. सा. नमस्कार’ व अन्य ज्येष्ठ नातेवाइकांना ‘साष्टांग नमस्कार’ किंवा ‘स्नेहपूर्वक नमस्कार’ हे शब्द लिहिले जातात; तर लहानांसाठी ‘अनेक आशीर्वाद’ असेही शब्द लिहिले जातात.
अनौपचारिक ई-पत्राचा आराखडा
[printfriendly current=’yes’]

लिफाफ्याची नमुना प्रतिकृती – Lifafa Format in Marathi

औपचारिक पत्र लेखन मराठी – Formal Letter in Marathi – Format of Formal Letter in Marathi- Aupcharik Patra in Marathi
१) मागणी पत्र लेखन मराठी – Magani Patra in Marathi
मागणी पत्र नमुना १ (औपचारिक पत्र)
दिनांक : १ जून २०२१
प्रति,
माननीय संचालक,
निसर्ग ट्रस्ट,
महात्मा गांधी मार्ग,
परळी वैजनाथ,
बीड – ४३१ ५१५.
विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.
महोदय,
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण शाळांना रोपांचे मोफत वाटप करणार आहात. आपल्या ट्रस्टने तशी जाहिरात केली आहे. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल का? की आपण आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल? याबाबत कळवल्यास सोयीचे होईल.
रोपांच्या नावांची यादी सोबत जोडत आहे :
अनु. क्र. | रोपांचे प्रकार | संख्या |
---|---|---|
१. | विविध फुलझाडे | ५० |
२. | विविध औषधी रोपे | २५ |
३. | अशोक | ५० |
४. | निलगिरी | ५० |
आपला कृपाभिलाषी,
पत्रलेखकाचे नाव
अ. ब. क.
विदयार्थी प्रतिनिधी,
ज्ञानदीप विद्यालय,
परळी वैजनाथ,
बीड – ४३१ ५१५.
ई-मेल : marathimecontact@gmail.com

मागणी पत्र नमुना २ (औपचारिक पत्र)
दि. २० जून २०२१
प्रति,
मा. व्यवस्थापक,
चौफुला नर्सरी,
क-हाड – XXX XXX
विषय : फुलझाडांची मागणी.
महोदय,
आम्हांला आमच्या शाळेच्या बागेसाठी पुढीलप्रमाणे फुलझाडांची आवश्यकता आहे :
अनु. क्र. | फुलझाडे | संख्या |
---|---|---|
(१) | निशिगंध, बकुळ, कांचन, सुरंगी | प्रत्येकी ५ |
(२) | मोगरा, जाई, जुई, चाफा, जास्वंद, बटमोगरा, अनंत | प्रत्येकी ३ |
(३) | सदाफुली | १० |
(४) | गुलाब (लाल, गुलाबी, सफेद) | प्रत्येकी ५ |
कृपया वरीलप्रमाणे रोपटी पाठवावीत. व्यवहार पूर्ण झाल्यावर पैसे त्वरित पाठवू. या वर्षी आपल्या नर्सरीचा दहावा वर्धापन दिन. आपण आपल्या नर्सरीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर केल्याप्रमाणे सवलत दयावी, ही विनंती. सोबत बिलही पाठवण्याची व्यवस्था करावी. कृपया कार्यवाही करावी.
मी हे पत्र आमच्या मा. मुख्याध्यापकांच्या संमतीने लिहीत आहे.
आपली विश्वासू,
विभा पाटोळे
विदयार्थी प्रतिनिधी
श्री. तात्यासाहेब नाशिककर विदयालय,
महादेव गंज,
क-हाड – XXX XXX
ई-मेल : marathimecontact@gmail.com
मागणी पत्र नमुना ३ (औपचारिक पत्र)
दि. : २८ मार्च २०२१
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
तृप्ती कॅटरर्स,
गिरगाव, मुंबई – ४०० ००४.
विषय : पाकीटबंद पदार्थांची मागणी नोंदवणे.
महोदय,
आमचा दहा विदयार्थ्यांचा एक गट ‘अभिनव सहल’ या सहल आयोजकांबरोबर काश्मीर सहलीला जात आहे. तरी कृपया आम्हांला पुढील पदार्थांचा पुरवठा करावा, ही विनंती.
अनु. क्र. | पदार्थाचे नाव | पाकिटाचे वजन | एकूण नग |
---|---|---|---|
१. | सुका मेवा | १०० ग्रॅम | २० |
२. | पालक शेव | १०० ग्रॅम | २० |
३. | बाकरवडी | १०० ग्रॅम | २० |
४. | मेथी खाखरा | १०० ग्रॅम | २० |
येणाऱ्या व्यक्तीकडे या वस्तू दयाव्यात. कृपया बिलसुद्धा दयावे, ही विनंती.
कळावे,
आपली नम्र,
स्नेहा पटवर्धन
७२/७४, विदया सदन,
बी ४, पहिला माळा,
ग्रँट रोड, मुंबई – ४०० ००७.
ई-मेल : marathimecontact@gmail.com
२) विनंती पत्र लेखन मराठी – Vinanti Patra in Marathi
विनंती पत्र नमुना १ (औपचारिक पत्र)
दि. ७-१०-२०२१
प्रति,
माननीय अध्यक्ष,
साई नवरात्र मंडळ,
धारावी, माहीम (पूर्व), मुंबई – ४०० ०१७
विषय : दांडिया उत्सवातील वादयांचा आवाज रात्री १० नंतर बंद ठेवण्याबाबत.
महोदय,
मी कामगार मैदानाच्या जवळच राहते. गेले काही दिवस आपल्या मंडळातर्फे नवरात्रौत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. रात्री ८ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत वादयसराव होत असतो. या आवाजाचा आम्हांला खूप त्रास होतो. मी दिव्यांग असल्याने मला तर खूपच त्रास होतो. ब्रेललिपी आणि वाचक यांच्या मदतीने मी अभ्यास करते. रात्री ९ पासून सर्वत्र शांतता पसरल्यावर माझा अभ्यास सुरू होतो. गेले काही दिवस आपल्या सराव कार्यक्रमातील वादयांच्या आवाजामुळे माझ्या अभ्यासात व्यत्यय येऊ लागला आहे.
आपल्या मंडळास माझी अशी विनंती आहे की, आपण आपला सराव ध्वनिक्षेपक बंद करून घ्यावा. आपले मंडळ याबाबत सहकार्य करेल, अशी आशा आहे.
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
नमिता जोगी
८ अ/१२०, नवी वाडी,
धारावी, माहीम (पूर्व), मुंबई – ४०० ०१७.
ई-मेल : jnamita@xxxx.com

विनंती पत्र नमुना २ (औपचारिक पत्र)
दि.२३ एप्रिल २०२१
प्रति,
मा. श्री. विनय गायकवाड
विनय ॲकॅडमी,
२, सोमवार पेठ,
पुणे – XXX XXX
विषय : मराठी सुलेखन वर्गात प्रवेश घेण्याबाबत.
महोदय,
आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात पाहिली. १ मे ते ३१ मे या कालावधीतील पहिल्या तुकडीमध्ये मी प्रवेश घेऊ इच्छितो. कृपया माझा प्रवेश निश्चित करावा.
मी इयत्ता दहावीचा विदयार्थी आहे. माझे अक्षरलेखन खूप सुंदर असावे, असे मला वाटते. आपण एकदा दूरदर्शनवरील कार्यक्रमामध्ये सुलेखन म्हणजे काय, अक्षरलेखनाचा सराव कसा करावा, सुलेखनाची विविध साधने कोणती वगैरे बाबतींत चांगले मार्गदर्शन केले होते. मी त्याप्रमाणे सराव करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. त्यात मला थोड्या प्रमाणातच यश आले. मी आता आपल्या सुलेखन वर्गामध्ये प्रवेश घेऊ इच्छितो. कृपया माझा प्रवेश निश्चित करावा, ही पुन्हा एकदा विनंती.
कळावे,
आपला नम्र,
अ. ब. क.
शांती निवास
गोकुळ नगर, पुणे – XXX XXX
मेल : abc@xxxx.com
विनंती पत्र नमुना ३ (औपचारिक पत्र)
दिनांक : २७ जानेवारी २०२१
प्रति,
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
शहापूर, जिल्हा ठाणे ४२१ ६०१.
विषय : आपल्या परिसरातील चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी विनंती.
महोदय,
सध्या वाशिंद परिसरात विजेचे मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होत आहे. अनेकदा रात्रभर वीजच नसते. संपूर्ण परिसर काळोखात बुडून जातो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
चोर-दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत आहेत. संध्याकाळनंतर रस्त्यावर लुटालुटीचे प्रकार घडत आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी घरांवर दरोडे पडू लागले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नागरिक भयभीत झालो आहोत.
कृपया रात्रीच्या वेळी आमच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी आणि आम्हांला दिलासा दयावा, ही कळकळीची विनंती.
कळावे,
आपला नम्र,
विशाल केशव शिरगावकर
मु. पो. वाशिंद,
ता. शहापूर ४२१६०४.
ई-मेल : vks@xxxxxx.com
३) स्व परिचय पत्र लेखन मराठी ९वी – Swa Parichay Patra Lekhan in Marathi
स्व परिचय पत्र नमुना १ (औपचारिक पत्र)
अ. ब. क.
४, विश्रामयोग, धन्तोली,
नागपूर-४४० ०१२.
दि. ६ ऑगस्ट २०२१
प्रति, उन्हाळ्या
माननीय क्रीडा विभाग प्रमुख,
अभिनव विदयालय,
लातूर. xxxxxx
विषय : कबड्डी संघात प्रवेश मिळण्यावावत.
महोदय,
आपल्या विदयालयाच्या मैदानात दरवर्षी आंतरशालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. या वर्षीही आयोजन केले जाणार आहे असे कळले, मी शारदाश्रम विद्यामंदिर, धन्तोली या शाळेत शिकत आहे. मी आमच्या शाळेच्या कबड्डी संघाचा संघनायक आहे. २६ ते २८ डिसेंबरला होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धेतील आपल्या शाळेच्या कबड्डी संघात मला प्रवेश मिळावा, यासाठी स्व-परिचयपत्र सोबत पाठवत आहे :
स्व-परिचय :
संपूर्ण नाव : अ. ब. क.
पत्ता : ४, विश्रामयोग, धन्तोली, नागपूर -४४० ०१२.
संपर्क क्रमांक : XXXXX७९८६
जन्मतारीख : १६ जून २००३.
उंची : १६५ सेमी
वजन : ५५ किलो
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ९ वीमध्ये शिकत आहे.
इतर आवडणारे खेळ : टेनिस, फूटबॉल, लगोरी.
गत वर्षी प्राप्त केलेले यश : (१) या वर्षी मी शाळेच्या कबड्डी संघाचा संघनायक आहे. (२) व्यक्तिश: मला अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. (३) मधल्या फळीतला कुशल खेळाडू म्हणून माझा लौकिक आहे.
आपला नम्र,
अ. ब. क.

स्व परिचय पत्र नमुना २ (औपचारिक पत्र)
अ. ब. क.
१०३, प्रसाद सोसायटी,
मैत्री संकुल,
अकोला-४४४ ००२
दि. xx-xx-xxxx
प्रति,
माननीय संचालक,
विज्ञान छंद मंडळ,
प्रभात रोड,
पुणे – ४११ ०३०.
विषय : प्रकल्प सादरीकरणासाठी प्रवेश मिळण्याबाबत.
महोदय,
आपण वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेबाबतची बातमी वाचली. मी या विज्ञान प्रकल्प सादरीकरणात सहभागी होऊ इच्छितो. पुढे माझे परिचयपत्र देत आहे. आपण मला मोबाइलद्वारे अथवा ई-मेलद्वारे प्रवेशनिश्चिती कळवावी ही विनंती.
स्व-परिचय :
संपूर्ण नाव : अ. ब. क.
पत्ता : १०३, प्रसाद सोसायटी, मैत्री संकुल, अकोला ४४४ ००२.
संपर्क क्रमांक : XXX XX XXX
ई-मेल : XXXXXXXXXX@gmail.com
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ९ वीमध्ये शिकत आहे.
आवडती विज्ञान शाखा : जीवशास्त्र
प्रकल्प सादरीकरणाचा अनुभव : ५ वी ते ७ वीपर्यंत सातत्याने आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प सादर केले आहेत.
गत वर्षी प्राप्त केलेले यश : ‘अंधश्रद्धा’ या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाला जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर प्रथम क्रमांक.
आपली कृपाभिलाषी,
अ. ब. क.
स्व परिचय पत्र नमुना ३ (औपचारिक पत्र)
प. फ. ब.
कानजी धरमसी गर्ल्स हायस्कूल,
देवरे आळी, चिंचणी,
जि. पालघर -४०१ ४०४.
दि. ५ ऑक्टोबर २०२१
प्रति,
माननीय क्रीडा विभाग प्रमुख,
विकास विद्यालय, तारापूर,
जि. पालघर – ४०१ ४०२.
विषय : फूटबॉल संघात प्रवेश मिळण्याबाबत.
महोदय,
मी माझ्या बालवयापासून मैदानी खेळांची आवड जोपासली आहे. तसेच इयत्ता पाचवीपासून शाळेच्या फूटबॉल संघात सराव करीत आहे. मला आपल्या शाळेतील संघातून आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत खेळण्याची खूपच इच्छा आहे. माझी संघात खेळाडू म्हणून भरपूर मेहनत घेण्याची तयारी आहे. सोबत माझे स्व-परिचयपत्र देत आहे. तरी कृपया या अर्जाचा विचार व्हावा, ही विनंती.
स्व-परिचय :
संपूर्ण नाव : प. फ. ब.
पत्ता : ५, गुलमोहर, देवरे आळी, मु.पो. चिंचणी-४०१ ४०४ जिल्हा : पालघर.
संपर्क क्रमांक : XXXXXX३४
जन्मतारीख : ५ जुलै २००२
उंची : १५५ सेमी
वजन : ५० किलो
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ९ वीमध्ये शिकत आहे.
इतर आवडणारे खेळ : व्हॉलीबॉल, बास्केटबॉल
गत वर्षी प्राप्त केलेले यश : आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल केल्याबद्दल चषक प्राप्त.
आपली विश्वासू,
प. फ. भ.
३) तक्रार पत्र लेखन मराठी 9वी – Takrar Patra Lekhan in Marathi
तक्रार पत्र लेखन नमुना १ (औपचारिक पत्र)
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यालय,
बोरिवली (पूर्व),
मुंबई-४०० ०६६.
दि. १० नोव्हेंबर २०२१
प्रति,
मा. व्यवस्थापक,
रसिक कला मंडळ,
समर्थनगर, पुणे-४११ ०३०.
विषय : वस्तूंच्या सदोष पुरवठ्याबाबत तक्रारपत्र.
महोदय,
दिनांक ४ व ५ नोव्हेंबर २०१७ रोजी रानडे सभागृहात आपण आकाशकंदील आणि पणत्या तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेतून आमच्या शाळेसाठी सजावट वस्तूंचा आपण पुरवठा केला होता.
आपण पाठवलेल्या पणत्यांमधील काही पणत्या तडा गेलेल्या अवस्थेत होत्या. तसेच काही आकाशकंदील फाटलेल्या अवस्थेत होते. या सदोष वस्तूंमुळे आम्हांला कार्यक्रमाचा पूर्णपणे आनंद घेता आला नाही. गेली अनेक वर्षे आपण उत्तम प्रतीच्या वस्तू आम्हांला पुरवत आला आहात. तथापि, या वर्षी वस्तू निवडताना, वेष्टनबद्ध करताना योग्य काळजी घेतली नाही, असे दिसते. तरी सदोष माल आपण परत घ्यावा अथवा बिलाच्या रकमेमध्ये पुरेशी सवलत दयावी, ही विनंती.
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
अ. ब. क. (विदयार्थी प्रतिनिधी)

तक्रार पत्र लेखन नमुना २ (औपचारिक पत्र)
सौरभ लांजेवार
१०३, प्रसाद सोसायटी,
मैत्री संकुल,
नाशिक-४२२ ००५.
दि. १५ एप्रिल २०२१
प्रति,
मा. व्यवस्थापक,
कोणार्क इलेक्ट्रॉनिक्स, कॉलेज रोड,
नाशिक-४२२ ००५.
विषय : खरेदी केलेला मोबाईल निकृष्ट दर्जाचा असल्याने बदलून देणे.
महोदय,
मी आपल्याकडून सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल काही दिवसांपूर्वी विकत घेतला. सात-आठ दिवस तो व्यवस्थित चालला. मात्र नंतर त्याच्या स्पीकरचा आवाज हळूहळू मंद होत गेला. आता तर त्यातून आवाजच येत नाही. तसेच, चार्जिंग करताना तो खूपच गरम होतो. एकंदरीत, हा मोबाईल निकृष्ट दर्जाचा आहे. आपण तो परत घेऊन मला अन्य कंपनीचा दर्जेदार मोबाईल दयावा, ही विनंती. सोबत या मोबाईलचे खरेदीचे बिल जोडले आहे.
मोबाईल खरेदीचा तपशील :
मॉडेल : World connect wc10
पावती क्र. : १४३.
खरेदी दिनांक : २.४.२०२१
कळावे, त्वरित प्रतिसादाच्या प्रतिक्षेत…
आपला नम्र,
सौरभ लांजेवार
तक्रार पत्र लेखन नमुना ३ (औपचारिक पत्र)
विनिता साबळे
विदयार्थी प्रतिनिधी,
पंडितराव देशमुख विदयालय,
बारामती – ४१३ १०२.
जिल्हा-पुणे.
दि. ४ जुलै २०२१
प्रति,
मा. वनअधिकारी,
छत्रपती शिवाजी महाराज
राष्ट्रीय उदयान,
पुणे-४११ ०१२.
विषय : सदोष रोपांच्या पुरवठ्याबद्दल तक्रार.
महोदय,
आपल्या राष्ट्रीय होता. परंतु शाळेत रोपे उद्यानातून ३० जून २०१७ रोजी आमच्या शाळेच्या मागणीप्रमाणे आपण २०० रोपांचा पुरवठा केला आणल्यावर पुढील गोष्टी आमच्या लक्षात आल्या :
- काही रोपांची मुळे सुकलेली होती.
- काही रोपांना किडींचा प्रादुर्भाव झाला होता.
- काही रोपे लावल्यानंतर दोन-तीन दिवसांतच सुकून गेली.
या सदोष रोपांमुळे दोनशे रोपे लावण्याचा आमचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आपण या गोष्टीची दखल घ्यावी. तसेच भविष्यात आम्हांला लागवडीसाठी योग्य रोपे उपलब्ध करून दयावीत, ही विनंती.
आपली कृपाभिलाषी,
विनिता साबळे
(विदयार्थी प्रतिनिधी)
अनौपचारिक पत्र लेखन मराठी – Informal Letter in Marathi – Informal Letter Format in Marathi – Anopcharik Patra in Marathi for Class 10
नोंद : अनौपचारिक पत्राचा आराखडा साधारणतः औपचारिक पत्राप्रमाणेच आहे. मात्र त्यामध्ये प्रेषकाचा पत्ता, विषय संबोधन आदी बाबी येत नाहीत, हे खास लक्षात ठेवावे.
१) अभिनंदन पत्र लेखन मराठी इयत्ता दहावी – Abhinandan Patra Lekhan in Marathi
अभिनंदन पत्र लेखन नमुना १ (अनौपचारिक पत्र)
दि. ६ जून २०२१
प्रिय मित्र शशांक,
सप्रेम नमस्कार.
तुझे खास अभिनंदन करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.
तुझ्या घरी आलो होतो. तुझ्या घराभोवतालची तुझी बाग तू दाखवलीस. किती सुंदर सजवली आहेस ती बाग! विविध फुलांची झाडे लावली आहेस. ती लावतानाही तू रंगसंगती सुरेख साधली आहेस. सर्व फुले टवटवीत दिसतात. त्या झाडांची पाने हिरवीगार, सतेज व तरतरीत आहेत. एकाही पानावर किंवा फुलावर जरासुद्धा धूळ दिसली नाही. मला तर वाटले की, ओला रुमाल घेऊन तू प्रत्येक पान व प्रत्येक फुलाची पाकळीन् पाकळी अलगद पुसून काढलीस की काय!
मुख्य फाटकापासून घरापर्यंत गाडी येण्यासाठी तुम्ही रस्ताही केला आहे. त्या रस्त्याच्या कडेला तू छान शोभेची रोपटी लावली आहेस. त्यामुळे तर रस्ताच खुलून दिसतो! त्यातही तू रस्त्याच्या दोन्ही कडांना सुपारीची झाडे लावली आहेस. ही झाडे खांबासारखी वाढतात. वर टोकाला फांदया असतात. त्यामुळे फाटकाजवळ उभे राहिल्यावर संपूर्ण आवार शोभिवंत वाटते. सावली देणारी मोठी झाडेही तुझ्या बागेत आहेत. संपूर्ण दृश्यच सुंदर दिसते.
घरासमोर बांधलेल्या झोपाळ्यावर बसून आपण किती वेळ गप्पा मारल्या, नाही का? मी घरी आल्यावर माझ्या आईबाबांनाही हे सर्व सांगितले. त्यांना तुझे खूप कौतुक वाटले. असो.
तुझ्या बाबांना व आईला माझा नमस्कार सांग.
कळावे,
तुझा मित्र, रोहन
४, उत्सव भारती नगर,
परळी, बीड – ४३१ ५१५.
ई-मेल rohan@xxxx.com

अभिनंदन पत्र लेखन नमुना २ (अनौपचारिक पत्र)
दिनांक : २४ जानेवारी २०२१
मा. श्री. सतीश चौसाळकर,
यांस स. न. वि. वि.
सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन करतो. फार मोठ्या संकटांपासून आपण आम्हांला वाचवले आहे. या परिसरात चोरदरोडेखोरांनी हैदोस घातला होता. लोडशेडिंगमुळे अनेकदा रात्रभर वीज नसायची. संपूर्ण परिसर काळोखात बुडून जायचा. संध्याकाळनंतर अंधारात लुटालूट होई. घरांवर दरोडे पडत होते. आम्ही सर्व नागरिक भयभीत झालो होतो. अशा स्थितीत तुम्ही पुढाकार घेतला. सर्व नागरिकांना एकत्र केले. सभा घेऊन सर्वांना बोलते केले. एक समिती स्थापन केली. सर्व नागरिकांना सुरक्षिततेच्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या. दरोडे पडू नयेत म्हणून काय करावे, दरोडे पडल्यावर कोणती कृती करावी याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. शिवाय तुम्ही समितीसह पोलीस ठाणे, तालुका समिती, जिल्हाधिकारी अशा संबंधित सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या. सर्वांना अर्ज दिले. एक प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाची चळवळच उभारली. आपल्या प्रयत्नांमुळे सर्वांमध्ये जागृती आली आहे. सर्वांमध्ये सहकार्य वाढले आहे. वातावरण अधिक उत्साहपूर्ण बनले आहे.
या सर्व गोष्टींबद्दल आपले पुन्हा एकदा अभिनंदन!
आपला नम्र,
भाऊ विशे
मु. पो. वाशिंद,
ता. शहापूर, जि. ठाणे – ४२१ ६०१.
ई-मेल : bhauv@xxxxxx.com
अभिनंदन पत्र लेखन नमुना ३ (अनौपचारिक पत्र)
दि. १५ जून २०२१
प्रिय मित्र राहुल,
सप्रेम नमस्कार.
राहुल, तुझे मनापासून अभिनंदन! सुलेखन वर्गात तुला उत्कृष्ट सुलेखनकार हे पारितोषिक मिळाले, याबद्दल तुझे पुन्हा पुन्हा अभिनंदन!
आजच आमच्या शाळेत सुलेखनावर एक कार्यक्रम झाला. पाहुणे होते श्री. विनय गायकवाड. त्यांनी सुलेखनाचे समजावून महत्त्व सांगितले. सुलेखन आयुष्यभर उपयोगी पडते. आपल्याला आनंद देते हे त्यांनी पटवून दिले. या प्रसंगी त्यांनी तुझे खूप कौतुक केले. त्या वेळी मला तुझा खूप खूप अभिमान वाटला.
श्री. विनय यांनी तुझ्या हस्ताक्षराचे खूप कौतुक केले. तुझ्या हस्ताक्षराची काही वैशिष्ट्येसुद्धा त्यांनी आम्हांला समजावून सांगितली. तुझ्या अक्षरांची उंची सारखी असते. दोन अक्षरांमधील अंतरही सारखे असते. त्यामुळे तुझे लेखन मनाला आकषून घेते, असे त्यांनी सांगितले. या सर्व कौशल्यांमुळे तुझी सर्व अक्षरे देखणी व डौलदार बनतात.
हे सर्व ऐकताना मला खूप खूप आनंद होत होता. तुझा अभिमान वाटत होता.
राहुल, तू खूप मोठा सुलेखनकार होणार हे निश्चित ! माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा! पुन्हा एकदा तुझे अभिनंदन!
तुझा मित्र,
पुष्कर
नाथनिवास,
२०३, अभिनव नगर,
सांगली – XXX XXX
ई-मेल : pushkar2003@xxxx.com
अभिनंदन पत्र लेखन नमुना ४ (अनौपचारिक पत्र)
दि. ११-१०-२०२१
प्रिय अवधूतमामा,
यांस सप्रेम नमस्कार.
मामा, तुझे खूप खूप अभिनंदन!
मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. तुझे नाव वर्तमानपत्रात वाचले आणि मला खूप आनंद झाला. आईला ती बातमी दाखवली. त्या वेळी आईचा चेहरा आनंदाने आणि अभिमानाने फुलला. तू धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेस. काल तुझे पथक धारावीच्या साई नवरात्र मंडळात गेले. त्यांना ध्वनिप्रदूषणाबद्दल सज्जड दम दिलास. कठोर कारवाईचा इशाराही दिलास. हे सर्व वर्तमानपत्रात छापून आले आहे. त्या बातमीत तुझे नावही आहे मामा!
त्या दिवसापासून आमच्या परिसरात शांतता आहे. या ध्वनिप्रदूषणाचा आम्हांला खूप त्रास होत होता. तुला माहीत आहेच की, मी दहावीमध्ये शिकत आहे. सध्या माझी सहामाही परीक्षा चालू आहे. हा परीक्षांचाच कालावधी आहे. ध्वनिप्रदूषणाच्या गदारोळात आम्ही विदयार्थी अभ्यास करू शकत नाही. लहान बालके, आजारी माणसे, ज्येष्ठ नागरिक यांना तर अतोनात त्रास सहन करावा लागतो. ध्वनिप्रदूषणाचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
अशा स्थितीत तू कर्तव्यदक्ष बनलास. ध्वनिप्रदूषण रोखलेस. याबद्दल तुझे खरोखरच मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन.
कळावे,
तुझी लाडकी भाची,
नम्रता
१० ब/१०४,
सुंदरवाडी, धारावी,
मुंबई – ४०० ०१७.
ई-मेल : namrata@xxxx.com
२) विनंती पत्र मराठी – विनंती पत्र इयत्ता दहावी – Vinanti Patra Lekhan in Marathi
विनंती पत्र लेखन नमुना १ (अनौपचारिक पत्र)
दि. २० जुलै २०२१
प्रिय आजोबा,
साष्टांग नमस्कार.
आमच्या शाळेचे या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या संदर्भात आमच्या शाळेच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे आमच्या शाळेच्या बागेचे सुशोभन होय.
आमच्या शाळेला दोन एकरांचे आवार लाभले आहे. त्यांपैकी एका एकरामध्ये बाग निर्माण करायची आहे. बागेचे नियोजन वेगात चालू आहे. आजोबा, माझी एक इच्छा आहे. येत्या २५ तारखेला माझा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी माझ्या शाळेला सावली देणाऱ्या झाडांची पाच रोपटी देऊ इच्छिते. माझी ही कल्पना मी माझ्या वर्गशिक्षकांना व मुख्याध्यापकांना सांगितली. त्यांना ती खूप आवडली. त्यांना मी हेही सांगितले की, या झाडांची काळजी मी घेईन. त्यांना खतपाणी देण्याचे काम मी करीन, त्यांची निगराणी करीन. त्यांनी मला परवानगी दिली आहे. यासाठी आजोबा, मला पाच रोपटी दयाल ना? रोपटी न्यायला माझा मित्र येणार आहे.
आजोबा, रोपटी कशी लावायची? रोपट्यांमध्ये अंतर किती ठेवायचे? त्याला पाणी किती व कधी दयायचे? खत किती घालायचे? कधी घालायचे? इत्यादी प्रश्न माझ्यासमोर आहेत. याबाबत मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवे आहे. कराल ना? याबाबत मला तुम्ही मेल पाठवावा, ही विनंती. म्हणजे रोपटी मिळाल्यावर मला लगेच कामाला सुरुवात करता येईल.
कळावे,
तुमची नात,
सोफिया पटेल
१२, सावली.
ज्ञानविदया नगर,
क-हाड – ४१५ ११०.
ई-मेल : patels@xxxxxx.com

विनंती पत्र पत्र लेखन नमुना २ (अनौपचारिक पत्र)
दिनांक : २४ मार्च २०२१
प्रति,
श्री. किशोरकाका,
यांस सप्रेम नमस्कार.
काका, या वर्षी आम्हांला काश्मीरच्या सहलीला जायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला होता. पण त्याच वेळी आमची लाडकी मैत्रीण स्नेहा सहलीला येणार नाही, म्हणून आमच्या सर्व आनंदावर विरजण पडले आहे! कांका, स्नेहा ही आमची केवळ मैत्रीणच नाही; तर ती आमची लिडर आहे. अनेक उपक्रम आम्ही तिच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. तिचा स्वभाव खेळकर आहे. ती कल्पकही आहे. ती छान छान गमतीजमती करून वातावरण आनंदी ठेवते. तिचा आवाज छान आहे आणि तिला गाणीही खूप येतात. ती सोबत असेल, तर आम्हां सर्वांचाच आनंद खूप खूप वाढणार आहे.
काका, आमचे हे शाळेतले शेवटचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी आम्ही सर्वजणी कुठे कुठे असू, हे कोण जाणे? आम्ही एकत्र असणारी कदाचित ही आमची शेवटची सहल असेल. म्हणून सहलीत सामील होण्याची स्नेहाला परवानगी दया ना! आम्हां मैत्रिणींच्या वतीने तुम्हांला मी कळकळीची विनंती करीत आहे. आता विचार-बिचार काहीही करीत बसू नका. आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत.
तुमची नम्र,
तनया माने
८, वृंदावन सोसायटी, टोपीवाला लेन,
दादासाहेब भडकमकर मार्ग,
गिरगाव, मुंबई – ४०० ००४.
ई-मेल : tmane@xxxxxx.com
मित्रांनो जर तुम्हाला (Marathi Patra Lekhan) पत्र लेखन मराठी हा लेख आवडला असेल तर जरूर शेअर करा व आपल्या मित्रांना सांगा.
पुढे वाचा:
- 1500+ सुविचार मराठी
- 350+ मराठी उखाणे
- 500+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
- 30+ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- 150+ शुभ सकाळ मराठी संदेश
FAQ: पत्र लेखन मराठी
प्रश्न १. पत्र लेखन म्हणजे काय?
उत्तर – एखादी व्यक्ती कागदाच्या तुकड्यावर लिहून दुसर्या व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करते, तर अशा प्रक्रियेला पत्र लेखन म्हणतात. पत्र लेखनाला पत्र असेही म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भावना दुस-यासमोर व्यक्त करते, तेव्हा पत्र घेणारी व्यक्ती त्या पत्राचे उत्तर त्या व्यक्तीला पत्राद्वारे पाठवते. पूर्वी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी संदेश पाठवण्याचे एकमेव साधन पत्र होते.
प्रश्न २. पत्रलेखनाचे प्रकार कोणते आहेत?
उत्तर – औपचारिक पत्रे, अनौपचारिक पत्रे, निमंत्रणपत्र, आभारपत्र, अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र, चौकशीपत्र, क्षमापत्र, मागणीपत्र, विनंतीपत्र, तक्रारपत्र, स्व-परिचयपत्र.
Thank you so much for solving the problem of patra lekhan in marathi. As non-Maharastrian it is very difficult to understand the basic Marathi language. now I am able to speak some marathi.
Nice me too
Thanks for solving the problem