महाराष्ट्राची शान म्हणजे आपली मायबोली मराठी भाषा. २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
आज आपण माझी मायबोली मराठी निबंध, मराठी असे माझी मायबोली निबंध, राजभाषा मराठी निबंध, मराठी असे आमुची मायबोली निबंध अशा विषयांवर म्हणजे मराठी भाषेबद्दल निबंध लिहिले आहेत त्याचा तुम्ही उपयोग करू शकता.

माझी मायबोली मराठी निबंध – Majhi My Boli Marathi Nibandh
Table of Contents
माझी मायबोली मराठी निबंध लेखन – Essay on Marathi Language in Marathi
[मुद्दे : महाराष्ट्रात राहणाऱ्याची मायबोली मराठी – जुनी परंपरा – एकाच वेळी मधुर व कठोर लाचार नाही – सर्व शास्त्र, विदया, कला यांना पेलू शकते.]
‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राज्यभाषा नसे।’ असे कवी माधव जूलियन यांनी म्हटले आहे. त्या काळात मराठीला राज्यभाषेचे स्थान नव्हते. तरीही प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा प्रखर अभिमान वाटत होता आणि आता तर मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे.
माझ्या मराठीला फार मोठी जुनी परंपरा आहे. अगदी नवव्या-दहाव्या शतकात मराठीत कोरलेले शिलालेख आज उपलब्ध आहेत. तेराव्या शतकात लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ हा मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ. तेव्हापासून आजपर्यंत मराठी भाषा अनेक अंगांनी समृद्ध होत गेली आहे.
आता ज्ञानाची कोणतीही शाखा मराठीला अनोळखी राहिलेली नाही विज्ञान, यंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, वैदयक, न्याय, सर्व शास्त्रे, विविध कला इत्यादी अनेक विषयांवर शेकडो उत्तमोत्तम ग्रंथ मराठी भाषेत लिहिले जातात, ज्ञानेश्वरांपासून आजच्या अनेक नामवंत लेखकांपर्यंत अनेकांनी उत्तमोत्तम वाङ्मय निर्माण केले आहे
मराठी भाषेतील ग्रंथांचे आता अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. माझी मराठी भाषा अमृताहूनही श्रेष्ठ दर्जाची आहे. अशा या मराठीचा मला खूप अभिमान वाटतो.
कवी कुसुमाग्रजही सांगतात –
‘माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा।’

राजभाषा मराठी निबंध – Marathi Rajbhasha Nibandh
खूप पूर्वी म्हणजे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस माधव जुलियन ह्या कवींनी एक गीत लिहिले होते.’
मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे,
नसो आज ऐश्वर्य ह्या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे.’
आणि खरेच कवीची ही इच्छा सार्थ ठरली कारण भाषावार प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्र हे वेगळे राज्य स्थापन झाले आणि मराठीला त्या राज्याच्या राजभाषेचा दर्जा मिळाला.
मराठी भाषेला तेराशे वर्षांपूर्वीपासूनची जुनी परंपरा आहे. त्यामुळे ती अभिजात भाषांमध्ये मोडते. तिच्या कुशीत शिवाजी महाराज, झाशीची राणी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राम गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर अशा थोर थोर माणसांचा जन्म झाला. तसेच संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत एकनाथ, जनाबाई ह्या प्राचीन काळातील कवींनी तिच्यावर साज चढवले.
त्यानंतरच्या काळात पाहिले तर बहिणाबाई, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, बा.सी. मकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके आदी साहित्यिकांनी मराठी भाषेत मोलाचे योगदान दिले. अशी ही मराठी भाषा महाराष्ट्र ह्या राज्याची राजभाषा झाली आणि तिला तिचे योग्य स्थान मिळाले.
आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत अनेकविध. संस्थानांमध्ये आणि ब्रिटिशांची सत्ता असलेल्या प्रांतांमध्ये विभागला गेला होता. ह्या सर्व प्रदेशांमध्ये कुठलाही मेळ नव्हता. म्हणजे वेगवेगळी भाषा बोलणारे प्रदेश एकाच संस्थानाच्या अखत्यारीत किंवा ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीत होते. स्वातंत्र्या- नंतर लोकांच्या कल्याणासाठी काम करायचे झाले तर प्रशासनयंत्रणा लोकाभिमुख असणे गरजेचे होते. त्यासाठी एकच भाषा असलेल्या लोकांचे राज्य स्थापन केले तर ते अधिक चांगल्या त-हेने झाले असते. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेचा कायदा १९५६ साली करण्यात आला आणि त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशी वेगवेगळी राज्ये निर्माण करण्यात आली.
सुरूवातीला महाराष्ट्रात मुंबई नव्हती. परंतु मराठी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे मोठे आंदोलन उभारले. त्यात आचार्य अत्र्यांसारख्या मोठमोठ्या लोकांनी नेतृत्व केले होते. त्या आंदोलनात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले. सरतेशेवटी लोकेच्छेला मान देऊन १ मे, १९६० ह्या दिवशी वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले आणि मराठीही त्या राज्याची अधिकृत राजभाषा बनली.
आज महाराष्ट्र राज्यात सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना मराठी भाषा येणे आवश्यक मानले जाते. शासनाशी पत्रव्यवहार, वेगवेगळी प्रमाणपत्रे मराठीत दिली जातात. स्थानिक भाषेचे वापरातील प्रमाण आणि अनिवार्यता इतर राज्यांनी जेवढ्या प्रभावीपणाने केली आहे तेवढ्या प्रभावीपणे आपणही करणे गरजेचे आहे. म्हणजे मराठीची शान आणि तिला मिळणारामान नक्कीच वाढेल ह्यात शंका नाही.
माझी मराठी निबंध मराठी – Majhi Marathi Nibandh
माझा मराठीची बोलू कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके मेळविन ।
या पंक्ती थोर तत्वज्ञ, आत्मानुभवी योगी, प्रतिभासंपन्न कवी, भूतदयावादी संत, वारकरी, नाथ, भक्तीसंप्रदायाचा प्रेरक अशा ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या काव्यग्रंथातील आहेत. जेव्हा ‘याचि देही याचि डोळा’ त्यांनी समाजसृष्टीचे अवलोकन केले तेव्हा समाजातील सत्य परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. अशिक्षित, गरीब समाज उच्चवर्णियांच्याकडून नागविला जातो. पिळला जाण्याचे कारण अज्ञान होते.
सर्वसामान्य माणसाची बोलीभाषा मराठी होती आणि भगवद्गीता संस्कृत भाषेत प्रचलीत होती म्हणून ज्ञानेश्वरांनी ‘भगवद्गीतेतील’ सार सर्वसामान्य वर्गासाठी ज्ञानेश्वरीरुपे निरुपित केले आणि माझ्या मायबोलीचे हे अलंकाररुपी रसाळ दालन वाचकांसाठी खुले केले. विद्वानांना लवकर न गवसणारे व शब्द कोशातही सहसा न आढळणारे शब्द ज्ञानेश्वरीत आले आहेत. हे शब्द आईच्या भाषेतून किंवा ग्राम्य बोलीत सहजी आढळतात. संस्कृत व देशी भाषा, यांचे स्वरुप पाहिले तर येथे ‘अलंकारिले कवण कवणे’ असा प्रश्न पडतो.
अशी ही आपली मायबोली रसाळ आणि मधूर आहे की तिची गोडी अवीट आहे. मराठी संस्कृती फार प्राचीन आहे. तिच्यातील ठोकताळे तिचे माधुर्य चक्रधर, तुकाराम, एकनाथ तसेच रामदास या थोर संतांनी आपल्या अभंग, कीर्तने आणि श्लोकातून अलगदपणे रसिकांपर्यंत पोहचवले आहेत. त्यामुळेच या मराठीवर आणि महाराष्ट्रावर कित्येक वर्षे परकीयांनी राज्य केले. बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली. पण त्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य व मनोबल या जीवननिष्ठेनेच दिले. या मायबोलीचा ठसा सामान्यजनांवर उमटवला गेला की हे प्रबोधन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला बराच काळ प्रेरणा देत राहिले.
मराठीतील काव्यदेखील अनेक प्रकारात आहे. जसे संतकवींनी अध्यात्मिक ज्ञानामृत पाजले तसेच मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत या पंतकवींनी अध्यात्माबरोबर पौराणिक ज्ञानाचे भांडार खुले केले. यातून शब्दालंकार व अर्थालंकार विविधवृत्तरचना, दीर्घसमास, संस्कृत काव्यातील संकेत व कलात्मक निवेदन मराठीतून केले आहे. विषय जुनेच पण रसिकतेचे रंग भरल्याने आपल्या समकालीन जीवनाचे आदर्श त्यांनी समाजाला उलगडून दाखविले आहेत. संतांनी हृदय हेलावून सोडण्याचे सामर्थ्य दाखविले व पंतकवींनी प्रसंगानुरुप भावनोत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला. मराठीला संस्कृतीचा डौल, प्रौढी मिळवून दिली.
महाकाव्य, लघुकाव्य, स्तोत्र, चंपूकाव्य असे विविध काव्यप्रकार, प्राचीन मराठी कवितेत आणून विविध अलंकार व वृत्तरचना मराठीत आणण्याचे काम पंतकवींनी केले. एकंदरीत मराठी भांडार समृद्ध करण्याचे श्रेय संत, पंत आणि तंत कवींचे आहे. संतांच्या रचनेपेक्षा अगदी स्वतंत्र वळणाची तारुण्याला मदहोश करणारी व पराक्रमाला उद्युक्त करणारी तंतरचना शाहीरीरचना म्हणून ओळखली जाते. पोवाडे व लावण्या म्हणजे डफावरील थाप व चाळ बांधुन थिरकणारे पाय म्हणजे यौवनाला आव्हानच आहे. संत आणि पंत कवींनी लोकजीवनाला ईश्वरभक्ती शिकवली परंतु शहिरांनी लोकांच्या भावना त्यांच्याच शब्दात व भाषेत मांडल्या.
लावणी म्हणजे यौवन, शृंगार व पराक्रम यांचे मिश्रणच आहे. भोवतालच्या वातावरणातील रगेल आणि रंगेलपणा यांच्या संस्कारातून शाहिरी कवने तयार झाली. पढे बापूरावांसारख्या कुलकर्ण्याच्या पोराला या छंदापायी घर, गाव सोडावा लागला. यामुळेच कवि म. ना. अदवंत म्हणतात, ‘संतकाव्य हे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक जीवनाचे प्रतिबिंब आहे तर शाहिरी काव्य महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे.’ शाहिरांनी आपली कवने नवरसाने भरलेली म्हणजेच वीररस, शृंगाररस यांच्या माध्यमातून प्रसृत केली. रुचिपालट म्हणून वत्सल व हास्यरसही यात ओतप्रोत भरले आहेत व पोवाडे हे वीररस व करुण रसाचे अंग आहेत.
शाहिरांनी भूपाळ्या, फटके यातुन समाजमनाचे विकृत कंगोरे दाखवले आहेत व नितिमत्तेचे पाठ पढवले आहेत. मराठी भाषेला राजकीय स्वरुप प्राप्त करुन देण्याचे महान कार्य प्रथम शिवाजीराजांनी केले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदवी स्वराज्य स्थापन करुन त्यांनी मराठीला राजभाषेचे स्थान प्राप्त करुन दिले. त्यामुळे मराठीतील बखर साहित्य हा शिव आणि पेशवेकालीन गदयाचा कलात्मक आविष्कार आहे. मराठेशाहीतील गद्य सारस्वताचा एक नमुना इतके वाङ्मयसौंदर्य त्यात आहे. अशी ही मराठी संस्कृती, मराठी भाषा सालंकृत असुन हा अमूल्य ठेवा जपण्याचे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
मराठी असे आमुची मायबोली निबंध – Marathi Ase Amuchi Mayboli Nibandh
काही महिन्यांपूर्वी एका कॉलेजमध्ये कामानिमित्त गेलो होतो. एका मराठी वृत्तपत्राकरिता कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मला घ्यायच्या होत्या. “मराठी पेपरला ओपिनिअन दयायचं. आम्ही मराठी ‘रीड’च नाही करत. वुई डोन्ट लाइक टू रीड मराठी’, असे उत्तर त्या विद्यार्थ्याने दिलं. माझं मन विचार करू लागलं ते मराठी भाषेबद्दल. आज ‘मराठी’ विषयाची अनास्थाच दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणूनच ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयापुढे मला एक प्रश्नचिन्ह दयावसं वाटतं.
प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असायलाच हवा. मराठीविषयाच्या अनास्थेला जबाबदार कोण असेल, तर पहिला घटक ‘पालक’. आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावं की इंग्रजी माध्यमात. येथून पहिली वादाला सुरूवात होते. ‘मराठी शाळेचा दर्जा घसरत चाललाय’ असा एक आरोप केला जातो. पण हा दर्जा घसरायला जबाबदार कोण आहे ? आपण मराठी माणसंच ना ? आम्ही कशाला सेंट झेविअर्स आणि सेंट टेरेसाच्या रांगा लावतो? का नाही आम्हाला मराठी माध्यमात घालावंसं वाटतं ? कारण आम्हालाच आमच्या मराठी भाषेचा अभिमान राहिलेला नाही.
घरामध्ये मराठी वृत्तपत्र यायला हवं, मराठी वाहिन्या, मराठी नाटकं, मराठी चित्रपट यांचा आस्वाद घ्यायला हवा. “शी….. मराठी सिनेमा…. नॉट ॲट ऑल, अशी ओरड अनेक मराठी मुलंच करतात. फक्त ‘श्वास’ची झेप ऑस्करपर्यंत पोचली की आमचा मराठी बाणा जागृत होतो. इंग्रजी माध्यमातल्या कित्येकांना बालकवी, कुसुमाग्रज माहीत नसतात. रामायण – महाभारत त्यांना इंग्रजीतून ट्रान्सलेट करून समजवावं (?) लागतं.
लोकभाषा व ज्ञानभाषा या दोन्हीत वर्षानुवर्षे आपल्याकडे फारकतच झाली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ‘मातृभाषेतून शिक्षण द्यावे’ हा मुद्दा मांडला. पण सध्या आपल्या सरकारनेच ‘मराठी’ भाषेला पर्याय म्हणून जर्मन, आय.टी. असे विषय ठेवले आहेत. साहजिकच अधिक गुण मिळवण्यासाठी अनेक जण जर्मन किंवा आय.टी.ची. निवड करतात. पुन्हा मराठी माणूसच मराठी भाषेपासून दुरावतो. परकीय भाषा शिकायला माझा विरोध पण आपल्या मातृभाषेला विसरून चालणार नाही.
मराठी संस्कृतीतला ‘मातृदिन’ आम्हाला माहीत नसतो. आम्ही ‘मदर्स डे’ सेलिब्रेट (?) करतो. ‘श्रावण महिन्यात १५ ऑगस्ट येतो’ असे विधान जेंव्हा मुलं निबंधात लिहितात, तेंव्हा त्यांच्या अगाध ज्ञानाची प्रचिती येते. मातृभाषेतून शिकून आपण मागे पडत नाही, हा मुद्दाच कोणी लक्षात घेत नाही. दाक्षिणात्य राज्यात गेल्यावर तर आपल्याला तेथील लोक मातृभाषेचे कट्टर पुरस्कर्ते असल्याचे जाणवते.
आपली मराठी भाषा नऊ रसांनी समृद्ध आहे. ‘खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’, ऐकताना मनातील स्फूर्ती जागृत होते. हे वीररसाचे उदाहरण. तर रेशमाच्या रेघांनी’ ऐकताना आपले पाय ताल धरू लागतात, हे शृंगाररसाचे उदाहरण ! अशी कित्येक उदाहरणं देता येतील. ‘ऐका दाजिबा’ सारख्या गीतात गीतकाराला हिंदी लिहिताना ‘मराठी शब्द’ वापरावेच लागले. कशामुळे ? मराठी भाषेच्या गोडीमुळे !
‘मातृभाषेतून शिक्षण’ हा वादाचा मुद्दा कधीही न संपणारा आहे. सध्याचं मराठी माणसाचं बदलत चाललेलं मराठी पाहून हे विचार मांडले, इतकंच.
पुढे वाचा:
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
- माझा जिवलग मित्र मराठी निबंध
- माझे कुटुंब निबंध मराठी
- शिक्षक दिन निबंध मराठी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
FAQ: माझी मायबोली
प्रश्न १. मराठी भाषादिन कधी असतो?
उत्तर- २७ फेब्रुवारी
प्रश्न २. महाराष्ट्र राज्य कधी निर्माण करण्यात आले?
उत्तर- 1 मे 1960 ह्या दिवशी वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले