
माझे आजोळ निबंध मराठी – Majhe Ajol Nibandh in Marathi
मला माझे आजोळ अतिशय प्रिय आहे. मी अभिमान बाळगावा असेच माझे आजोळ आहे. माझे आजोबा हे एक विद्वान शास्त्री आहेत. संस्कृत भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे. या ‘देववाणी’च्या चरणीच त्यांनी आपले जीवनपुष्प वाहिले आहे. आजोबांजवळचा अमूल्य ग्रंथांचा ठेवा तर दृष्ट लागण्यासारखा आहे. माझे दोन्ही मामाही उच्च विद्याविभूषित आहेत आणि आपापल्या क्षेत्रात ते उच्च स्थानावर कार्यरत आहेत. आजोबा आणि आजी कोकणातल्या घरी राहतात आणि दोन्ही मामा नोकरीनिमित्ताने नेहमी बाहेरगावी असतात. पण आमच्याकडे असा अलिखित नियमच झाला आहे की सुट्टी पडली की सर्वांनी कोकणातल्या घरी जमायचे.
मग या आजोळच्या घराचा उल्लेख आम्ही ‘मोठे घर‘ म्हणून करतो. या मोठ्या घरात शहरातील शिस्तीचे नियम नसतात. पण तरीही स्नेहाचे बंधन प्रत्येकाने स्वखुशीने स्वीकारलेले असते. येथे सकाळी लवकर उठण्याचा बडगा नसतो, पण जाग मात्र अगदी भल्या पहाटे येते. परसातील झाडांवरील पक्ष्यांची किलबिल आम्हांला जाग आणते. काही वेळ आमचे आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण चालते. मामा त्यांच्याविषयी माहिती सांगत असतो. कधी भल्या पहाटे उठून गिर्यारोहणाचा कार्यक्रम आखला जातो. त्यामुळे घरी आल्यावर सपाटून भूक लागलेली असते. घरच्या गाई-म्हशीचे दूध व आजीच्या हातचा खमंग पदार्थ यामुळे न्याहारीला लज्जत येते. आजीने केलेली साधी भाजी-भाकरीही चवदार लागते. मला वाटते आजीचे प्रेमच त्यात मिसळलेले असावे.
दुपारी दोन्ही मामींनी बनवलेले रुचकर जेवण पोटभर जेवल्यावर आजोबांच्या दरबारात आम्ही नातवंडे हजर होतो. सुट्टीच्या दिवसांतही दुपारचे लोळत पडणे आजोबांना रुचत नाही. त्या घराला तसे वळणच नाही. मग आजोबा, आम्हां सर्व नातवंडांना संस्कृत भाषेतील सौंदर्य समजावून देतात. यावेळी इतर मोठी माणसे, अगदी आजीसुद्धा, काही ना काही वाचत असते. कधी एखादा बैठा खेळ रंगत असतो, त्यात सर्वजण भाग घेतात. माझ्या आजोळी ‘काव्यशास्त्रविनोदात’ कसा वेळ जातो, ते उमगतही नाही. गावातील विहिरीत डुंबत राहण्यात, रानोमाळी काजू, करवंदे गोळा करण्यात आणि स्वच्छंद भटकण्यात सुट्टी कधी संपते ते समजत नाही. अशा या मंतरलेल्या वातावरणातून परतण्याचा दिवस उगवतो. गावातून आणलेल्या सामानात आजीने दिलेल्या डांग-मेतकुटाची भर असते आणि आजी-आजोबांच्या सहवासातील अमृतमधुर आठवणी मनात रुंजी घालत असतात.

पुढे वाचा:
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
- माझा जिवलग मित्र मराठी निबंध
- माझे कुटुंब निबंध मराठी
- शिक्षक दिन निबंध मराठी
- माझी शाळा निबंध 10 ओळी