महात्मा गांधी जयंती मराठी माहिती – Mahatma Gandhi Jayanti Information in Marathi
२ ऑक्टोबर १८६९ या दिवशी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. २ ऑक्टोबर रोजी या महान नेत्याचे स्मरण भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांत केले जाते. इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले; पण देशातील अत्यंत गरीब आणि इंग्लंडच्या सामर्थ्याशी लढा देण्यास ज्यांच्याकडे कोणतेच शस्त्र नव्हते अशा भारतीय जनतेला सत्याग्रहासारखे विलक्षण प्रभावी साधन महात्मा गांधींनी दिले.
सत्याग्रह म्हणजे सरकारच्या अन्यायाला विरोध तर करायचा; पण उलट हात उचलायचा नाही. याचा फायदा असा झाला की, पुरुष, स्त्रिया, मुले असे सर्वजण या स्वातंत्र्याच्या लढाईत सामील झाले.

दुसरे शस्त्र म्हणजे स्वदेशीचे व्रत. इंग्रज मुळात व्यापारी होते. इंग्लंडच्या गिरण्यांमध्ये तयार होणार्या कापडाला भारतात बाजारपेठ हवी होती; पण स्वदेशीच्या व्रतानुसार लोकांनी परदेशी कपडा वापरायचे सोडून दिले. चरख्यावर सूत कातून त्यापासून हातमागावर विणलेले बनलेले जाडेभरडे खादीचे कपडे लोक वापरू लागले.
परंतु मोठेपणी एवढे मोठे कार्य करणारे गांधीजी लहानपणी मात्र अगदी भित्रे आणि लाजाळू होते. ते खोटेही बोलत; पण मग त्यांनी नेहमी खरे बोलण्याचा निश्चय केला आणि तो जन्मभर पाळला.
पोरबंदरला शालेय शिक्षण झाल्यावर गांधीजी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले. परत आल्यावर त्यांनी राजकोटला वकिली चालू केली; पण ती चालेना, तेव्हा १८९५मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत गेले.
दक्षिण आफ्रिकेत गोर्या लोकांच्या हातात सत्ता होती. ते आफ्रिकेतल्या काळ्या आणि हिंदी लोकांना अतिशय वाईट पद्धतीने वागवत. गांधीजींनाही तेथे खूप अपमान सोसावा लागला. दक्षिण आफ्रिकेत असतानाच गांधीजींना सत्याग्रहाचा मार्ग सापडला व तो त्यांनी तेथे वापरला.
भारतात परत आल्यावर गांधीजींनी कार्य सुरू केले. गोपाळ कृष्ण गोखले यांना ते आपले गुरु मानीत.
भारतात आल्यावर गांधीजींनी फक्त एक आखूड धोतर व पंचा एवढेच कपडे वापरायला सुरुवात केली. ते रोज चरख्यावर सूत कातत. साबरमती येथे त्यांनी आश्रम स्थापन केला. त्यांनी ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ही वर्तमानपत्रे सुरू करून त्यांतून लोकजागृतीचे काम केले. अस्पृश्यांना ते ‘हरिजन’ म्हणत व अस्पृश्यतेला विरोध करत. सर्व लोक त्यांना प्रेमाने ‘बापूजी’ म्हणू लागले.
चंपारण्यातला निळीचा सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांतून चळवळ पुढे जाऊ लागली. १९४२मध्ये आठ ऑगस्टला मुंबईला झालेल्या सभेत गांधीजींनी ‘छोडो भारत’ ही घोषणा दिली. पण त्याच रात्री त्यांना अटक झाली. ‘छोडो भारत’, ‘चले जाव’, ‘करेंगे या मरेंगे’ अशा अनेक घोषणांनी देश पेटून उठला. अखेर १५ ऑगस्ट १९४७ला भारत स्वतंत्र झाला.
हिंदू-मुसलमानांत बेबनाव व्हावा, अशी इंग्रजांची इच्छा होती. कारण त्यामुळे देशाच्या ऐक्यप्रक्रियेत अडचणी आल्या असत्या. महात्मा गांधींना वाटे की, या दोन्ही धर्मांच्या लोकांनी प्रेमाने एकत्र राहावे; परंतु स्वातंत्र्य मिळाले तरी देशाची फाळणी टाळता आली नाही. भारत व पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले.
स्वातंत्र्य मिळाल्यावर राजकारणातून निवृत्त होऊन जनसेवा करावी, असे गांधीजींनी ठरवले होते; पण दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी ते संध्याकाळच्या प्रार्थनेला जात असताना नथूराम गोडसे याने त्यांची हत्या केली.
दिल्लीला ‘राजघाट’ येथे गांधीजींची समाधी आहे.
२ ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन. हा दिवस देशभर ‘गांधी जयंती’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती, पंतप्रधान व इतर महत्त्वाच्या व्यक्ती राजघाटावरील समाधीवर पुष्पचक्र वाहतात. सरकारी कार्यालयांमध्ये गांधीजींच्या प्रतिमेला हार घातला जातो. आकाशवाणी व दूरदर्शनवर गांधीजींच्या जीवनावर कार्यक्रम होतात.
गांधी जयंती हा दिवस या थोर नेत्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. भारताचा एक नागरिक म्हणून आपल्या देशाची सेवा करण्याचा निश्चय प्रत्येकाने या दिवशी केला पाहिजे.
पुढे वाचा:
- शिक्षक दिन माहिती मराठी
- स्वातंत्र्य दिन माहिती मराठी
- लोकमान्य टिळक पुण्यतिथी
- 1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती
- गुड फ्रायडे मराठी माहिती
- ख्रिसमस नाताळ माहिती मराठी
- रमजान ईद माहिती मराठी
- बकरी ईद माहिती मराठी
- मोहरमची संपूर्ण माहिती
- पतेती सण माहिती मराठी
- गुरू नानक जयंती विषयी माहिती
- बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी
- भगवान महावीर जयंती माहिती
- दत्तजयंती माहिती मराठी
- धनत्रयोदशी माहिती मराठी
- नवरात्र – दसरा माहिती मराठी
- गणेश चतुर्थी माहिती मराठी
- बैल पोळा सणाची माहिती
- नारळी पौर्णिमा माहिती मराठी
- नागपंचमी माहिती मराठी
- गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी
- आषाढी एकादशी माहिती
- वटपौर्णिमा संपूर्ण माहिती
- हनुमान जयंती माहिती
- गुढीपाडवा माहिती
- होळी सणाची माहिती
- दिवाळी सणाची माहिती
- रामनवमी माहिती मराठी