महापुरुषांचे मोठेपण निबंध मराठी

आपण प्राचीन काळापासूनचा इतिहास पाहत आलो, तर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे महापुरुष निर्माण झाल्याचे आपल्या लक्षात येईल. कधी आपण त्यांना महामानव म्हणतो, कधी महात्मा वा महर्षी म्हणून गौरवतो. कधी कुणी त्यांना परमेश्वराचे अवतार मानतात.

असा वेगळेपणा, मोठेपणा त्यांना का मिळतो? कारण ते जगतातच जगावेगळे! ते कधी स्वत:साठी जगत नाहीत, तर सदैव दुसऱ्यांसाठीच जगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित-पीडितांच्या विकासासाठी सदैव धडपड केली. त्यामुळे सर्व अन्यायग्रस्तांना, अत्याचारग्रस्तांना बाबासाहेब हे परमेश्वरी अवतार वाटतात.

अण्णासाहेब कर्वे यांनी कधीही स्वत:च्या सुखदु:खांचा विचार केला नाही. ते स्त्री-शिक्षणासाठीच धडपडले. म्हणून जनतेने त्यांना ‘महर्षी’ ठरवले. स्वत:च्या सुखी जीवनाचा त्याग करून बाबा आमटे सदैव कुष्ठरोग्यांच्याच सुखासाठी झटले. म्हणून कवी कुसुमाग्रजांनी त्यांना ‘महामानव’ म्हणून संबोधले.

असे हे महापुरुष आणि त्यांचे कर्तृत्व हे जगाला प्रकाश दाखवतात, मार्ग दाखवतात. महापुरुषांच्या या प्रकाशातच जगाची प्रगती होत असते.

पुढे वाचा:

Leave a Reply