
लांब उडी खेळाची माहिती – Long Jump Information in Marathi
१) उडी मारताना टेक्-ऑफ (Take off) एकाच पायावर घेतला पाहिजे.
२) धावण्याच्या मार्गाची लांबी ४५ मीटरपेक्षा कमी नसावी. आखलेल्या धाव मार्गाची रुंदी १.२२ मी. असावी.
३) खड्ड्याची लांबी ९ मीटर व रुंदी २.७५ मीटर ते ३ मीटर असावी.
४) लांब उडीसाठी खड्डा व दबाव फळी (Take-off Line) यांच्यामध्ये १ मीटरपेक्षा कमी अंतर नसावे. तिहेरी उडीसाठी दबाव फळी व खड्डा यांमध्ये किमान १३ मीटर अंतर असावे. महिलांसाठी हे अंतर ११ मी. असावे.
५) दबाव फळी पुढील मापाची असावी –
लांबी – | १.२१ मीटर ते १.२२ मीटर |
रुंदी – | १९.८ सें.मी. ते २०.२ सें.मी. |
जाडी – | १० सें.मी. |
दबाब फळीला पांढरा रंग द्यावा. दबाब फळी जमिनीच्या पातळीबरोबर घट्ट बसवावी.
६) दबाव फळीच्या खड्ड्याकडील बाजूच्या स्पर्श रेषेला (Take-off Line) लागून ओलसर वाळू अगर मातीचा भराव फळीच्या लांबीइतका‚ १० सें.मी. रुंदीचा व १ सें.मी. ते १.३ सें.मी. जाडीचा पट्टा तयार करावा आणि त्याला ३० अंशांचा कोन द्यावा. (यामुळे स्पर्धकाचा स्पर्श रेषेपुढील फाउल समजण्यास मदत होते.)
७) प्राथमिक फेरीत स्पर्धकाला तीन उड्या मारता येतील. (ज्यूनिअर गटासाठी दोन उड्या)
८) प्राथमिक फेरीतील प्रावीण्यावरून आठ सर्वोत्कृष्ट स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडावेत. आठव्या क्रमांकाबाबत पेच निर्माण झाल्यास संबंधित स्पर्धकांच्या त्या फेरीतील दुसऱ्या क्रमांकाचे प्रावीण्य विचारात घेऊन पेच सोडवावा. येथेही पेच सुटला नाही‚ तर तिसऱ्या उडीतील प्रावीण्य विचारात घ्यावे आणि सरस प्रावीण्य असणाऱ्या स्पर्धकाची अंतिम फेरीसाठी निवड करावी.
९) अंतिम फेरीमध्ये प्रत्येकाला तीन उड्या मारता येतील. लांब उडी व तिहेरी उडी या विभागातील अंतिम फेरीत आलेल्या स्पर्धकांच्या पाळीचा क्रम प्राथमिक फेरीतील क्रमाप्रमाणेच राहील.
१०) स्पर्धेत एकूण आठ किंवा त्यापेक्षा कमी स्पर्धक असतील‚ तर प्रत्येकाला सहा उड्या मारण्याची संधी द्यावी. (प्राथमिक फेरी ३ उड्या अंतिम फेरी ३ उड्या)
११) क्रमांक ठरविताना प्राथमिक व अंतिम फेरीतील उड्यांचा विचार करावा.
१२) खड्ड्यात खुणा ठेवता येणार नाहीत. समितीने पुरविलेल्या खुणा धावण्याच्या मार्गाच्या बाजूस ठेवता येतील.
१३) दबाव फळीच्या मागून उडी मारली‚ तर तो फाउल नाही.
१४) दबाव फळीच्या बाजूने उडी मारली‚ तर तो फाउल आहे.

१५) उडी मारल्यानंतर खड्ड्यातून दबाव फळीकडे परत आल्यास तो फाउल आहे. तसेच खड्ड्यात उडी पडताना खड्ड्यात झालेल्या स्पर्शापेक्षा स्पर्शरेषेच्या बाजूस खड्ड्याबाहेर स्पर्धकाचा स्पर्श झाला‚ तर तो फाउल आहे.
१६) खड्ड्यात दबाव फळीच्या बाजूस ज्या ठिकाणी स्पर्धकाचा स्पर्श झाला असेल‚ तेथून स्पर्शरेषेपर्यंतचे लंबांतर मोजावे.
१७) लांब उडी व तिहेरी उडीमध्ये स्पर्शरेषेपुढे स्पर्धकाचा स्पर्श झाला‚ तर तो फाउल समजावा.
१८) तिहेरी उडीमध्ये दबाव फळीवरील पायानेच लंगड (Hop) घ्यावी. दुसरा पाय पुढे टाकून (Step) त्या पायावर उडी (Jump) मारावी.
१९) तिहेरी उडीत स्थिर पायाचा (Sleeping Leg) जमिनीस स्पर्श झाला‚ तर तो फाउल आहे.
२०) अंतिम फेरीनंतर प्रथम क्रमांक ठरविताना पेच निर्माण झाल्यास संबंधित स्पर्धकांच्या प्राथमिक फेरीतील व अंतिम फेरीतील एकूण उड्यांचे प्रावीण्य (performances) विचारात घ्यावे लागेल. त्या उड्यांतील ज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रावीण्य अधिक असेल‚ त्याला प्रथम क्रमांक द्यावा. तेथेही पेच सुटला नाही‚ तर तिसऱ्या/चौथ्या/पाचव्या/सहाव्या क्रमांकाचे प्रावीण्य विचारात घेऊन सरस प्रावीण्य असणाऱ्या स्पर्धकास प्रथम क्रमांक द्यावा.
उड्यांच्या प्रावीण्यावरून प्रथम क्रमांक ठरविण्यासाठी पेच सुटत नसेल‚ तर पेच सुटेपर्यंत संबंधित स्पर्धकांना उड्यांची एक… एक पाळी देऊन संबंधित पाळीत सरस प्रावीण्य नोंदविणाऱ्या स्पर्धकास प्रथम क्रमांक द्यावा.
पुढे वाचा: