खेळाचे महत्व निबंध मराठी – Khelache Mahatva in Marathi Essay
अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलांचा, शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. खेळांची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे करम, पत्ते, बुद्धिबळं, सोंगट्या या खेळांमुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.
‘स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो” जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.
मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा, खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.
खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवने केले पाहिजे. स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे.
खेळाचे महत्व निबंध मराठी – Khelache Mahatva Nibandh Marathi
आम्हा लहान मुलांना खेळायला खूप आवडते. आम्हाला मुळी हे सारे जगच नवे असते, त्यातच आमच्या शरीराचीही दिसामासा वाढ होत असते. ही वाढ होत असताना आमच्या शरीरात प्रचंड उर्जा ठासून भरलेली असते. त्या उर्जेचा निचरा होण्यासाठी आम्हा मुलाला खेळायला मिळाले पाहिजे, भरपूर खेळायला मिळाले पाहिजे. पण आजकाल तसे होत नाही. कारण आजकाल आम्ही राहातो त्या सोसायटीत खेळायला जागा नसते, आसपास मैदाने किंवा बागा नसतात. मग घरात बसून टीव्ही पाहाणे किंवा मोबाईलवर खेळ खेळणे ह्यात आम्हाला आमचा वेळ घालवावा लागतो. त्यातच भर म्हणून शाळा लांब असल्याने रोज दोन दोन तास शाळेत जाण्यायेण्यातच वाया जातात.
शिवाय अभ्यास, शिकवणी ह्या सगळ्या रगाड्यातून वेळ मिळाला तर आम्ही मैदानावर जाणार ना? अर्थात् मी मुंबईत राहातो म्हणून मुंबईतले सांगतो आहे. इतर ठिकाणी मुलांना खेळायला मिळत असेलच. माझ्या बाबांना ह्याची जाणीव असल्यामुळे ते आम्हाला दर सुट्टीत फुटबॉलच्या प्रशिक्षणाला पाठवतात. त्याशिवाय दर रविवारी त्यांच्यासोबत आम्हाला पोहायला घेऊन जातात. कधीकधी बॅडमिंटनचे कोर्ट बुक करून आम्ही सोसायटीतील मुले तिथे खेळायला जातो.सायकलही चालवतो.
माझ्या बाबांचे सांगणे असे आहे की मुलांना खेळाची आवड लावली की ती बहकत नाहीत, वाममार्गाला लागत नाहीत. म्हणून सर्वच मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.
मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीही खेळले पाहिजे. कारण त्यामुळे व्यायाम घडतो. सर्व स्नायू लवचिक होतात. हृदयाचे स्नायूही बळकट झाल्यामुळे हृदयविकारासारखा आजार होत नाही.खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहातेच.मग अशा ह्या तंदुरूस्त शरीरातले मनही घट्ट, समतोल आणि आनंदी का बरे राहाणार नाही?
खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच खेळांचे महत्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे.
पुढे वाचा:
- खेळ आणि खिलाडूपणा मराठी निबंध
- कालचे खेळ व आजचे खेळ मराठी निबंध
- क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे मराठी निबंध
- केल्याने देशाटन मराठी निबंध
- कुलपाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- काश्मीरचे मनोगत निबंध मराठी
- कार्टून मराठी निबंध
- कागदाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- कागदाची गोष्ट मराठी निबंध
- कागदाची कहाणी मराठी निबंध
- काखेत कळसा गावाला वळसा मराठी निबंध
- कष्टेविण फळ नाही | यत्न तो देव जाणावा | मराठी निबंध
- कटू कधी बोलू नये मराठी निबंध
- ऐतिहासिक वास्तूंच्या सहवासात मराठी निबंध
- एकीचे बळ निबंध मराठी