जीवनात कलेचे स्थान निबंध मराठी | Importance of Arts Essay in Marathi

जीवनात कलेचे स्थान निबंध मराठी – Importance of Arts Essay in Marathi

सध्या खाजगी वाहिन्यांवर ‘रियालिटी शो’ नावाचा प्रकार वाढत चाललाय. संगीत, नृत्य, अभिनय या कलाप्रकारांना व्यासपीठ मिळतंय. कुणाला महागायक महागायिका व्हायचंय, तर कुणाला हास्यसम्राट व्हायचंय. कुणाला एकापेक्षा एक’ ठरायचंय, तर कुणाला ‘इंडियन आयडॉल’. म्हणजेच सध्याच्या जगात कलांना खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय…

पूर्वीचा काळ वेगळा होता. तेव्हा संगीत, नृत्य यांसारख्या कलाप्रकाराकडे तेवढ्या महत्त्वपूर्ण दृष्टीकोनातून पाहिलं जातं नव्हतं. आता कला ही माणसाचं जीवन घडवणारी, त्याच्या जीवनात टर्निंग पॉइन्ट आणणारी ठरली आहे. कलेमुळे जगात त्याचं नाव होतं. लेखन, वक्तृत्व, चित्रकला, शिल्पकला, युद्धनीति, धनुर्विदया, जलतरण, शब्दभ्रम अशा एकंदर चौसष्ट कला आहेत. या चौसष्ट कलांचा अधिपती म्हटलं जातं ते गणपती बाप्पाला.

माणूस धनवान आहे, श्रीमंत आहे पण त्यांच्याकडे कला नसेल तर नुसत्या श्रीमंतीला काहीच अर्थ नाही, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. तेच एखादा गरीब आहे, पण तो जर का कला शिकला, कलावंत झाला, तर हीच ‘कला’ त्याच्या जीवनाचं चित्र पालटू शकते. विचार करा, एकेकाळी ज्या गायक-गायिकांनी स्ट्रगल केलंय, ते गायक-गायिका आज कलेच्या बळावर सारं जग जिंकत आलेत. –

एकेकाळी कलेसाठी जीवन’ की ‘जीवनासाठी कला’ या विषयावर बरीच चर्चा झाली होती. एक मात्र खरं की आपल्या जगण्यासाठी कला आवश्यक आहे. कला ही जीवनाला कायम पूरक ठरत आली आहे. कलावंताचं स्थान जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे, हे सांगताना कवी केशवसुत म्हणतात,

“आम्हाला वगळा, गतप्रभ झणी होतील तारांगणे, “
आम्हाला वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जीणे”

‘शब्दभ्रम’ ही एक वेगळी कला. पण या कलेच्या जोरावर रामदास पाध्ये हे नाव सातासमुद्रापलीकडे पोचलं. ‘निवेदन’ या कलेबद्दल बोलायचं तर सुधीर गाडगीळ, मंगला खाडीलकर, भाऊ मराठे ही नावं आदरानं घेतली जातात. संगीत, गायन आणि नृत्य या क्षेत्रात तर कलावंत इतके आहेत की त्यांची नाव लिहायला जागाही अपुरी पडेल.

‘छंद’ म्हणून एखादी कला जोपासली जात असते आणि एक वेळ अशी येते की त्या छंदाचं रूपांतर व्यवसायात होतं. कला हे मानवाचे खरोखरच भूषण आहे. पण सध्या या क्षेत्रालाही राजकारणाचं ग्रहण लागलंय. माणसाला पुढे जायचं आहे. पण पुढे जाण्यासाठी तो कलेतही राजकारण आणू पहातोय. त्यामुळे कलेचं पावित्र्य कमी होत चाललंय.

या क्षेत्रात स्पर्धा वाढतेच आणि त्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या अट्टाहासामुळे त्या कलेचा मूळ गाभाच कुठंतरी हरवत चालला आहे. हे चित्र बदलण्याची आज गरज आहे, हे नक्की !

पुढे वाचा:

Leave a Comment