इच्छा तिथे मार्ग निबंध मराठी-Iccha Tithe Marg Essay in Marathi
इच्छा तिथे मार्ग निबंध मराठी-Iccha Tithe Marg Essay in Marathi

इच्छा तिथे मार्ग निबंध मराठी – Iccha Tithe Marg Essay in Marathi

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे तो विचार करू शकतो, मनात इच्छा धरू शकतो आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गही शोधू शकतो. जर एखादी गोष्ट आपल्याला तीव्रतेने हवी असेल तर त्यासाठी माणूस प्रसंगी आकाशपाताळ एक करायला मागे पाहात नाही असे कित्येक दाखले आपण दाखवून देऊ शकतो.

संस्कृत भाषेत एक श्लोक आहे,’ उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः’ ह्याचा अर्थ असा की झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण काही आपोआप येऊन पडत नाही. त्याला जर भुकेची इच्छा झाली तर ती भागवण्याचा शिकारीचा मार्ग त्याला शोधून काढावाच लागतो. जीवनांचे कुठलेही क्षेत्र असले तरी त्यात कठोर परिश्रमाला पर्याय नसतोच. म्हणूनच संगीत असो, साहित्य, समाजसेवा किंवा राजकारण ह्यातील काहीही असो, ज्या व्यक्तीला इच्छाशक्ती आहे तीच व्यक्ती त्यातून मार्ग काढू शकते, जिला ध्यास लागला आहे तीच व्यक्ती नवा इतिहास घडवू शकते.

इच्छा म्हणजे नुसतीच साधीसुधी किरकोळ इच्छा नव्हे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. काहीतरी मोठे कार्य करण्याची इच्छा असेल आणि त्या जोडीला जिद्द, ध्यास आणि परिश्रम करण्याची वृत्ती ह्या गोष्टीही असतील तर यशाचा मार्ग शोधून काढणे अवघड नसते. जगातील सर्व थोर व्यक्तींनी असेच तर केले आहे आणि आपापले मार्ग शोधून काढले आहेत. एकदा दृढनिश्चय केल्यावर आणि ध्यास घेतल्यावर त्यांनी आपला वेळ व्यर्थ गोष्टींसाठी वाया घालवला नाही आणि आपली शक्ती विनाकारण वाया घालवली नाही. वाटेत येणा-या कित्येक मोहांना त्यांनी नाही म्हटले कारण ध्येय गाठण्याचा त्यांचा रस्ताच एवढा सुंदर होता की त्यांना दुसरा कसला मोह पडणे अशक्यच होते.

म्हणूनच भीमसेन जोशी वयाच्या नवव्या वर्षीच संगीत शिकण्यासाठी घर सोडून पळाले. अब्राहम लिंकन बरेचदा निवडणुक हरले परंतु त्यांनी आपला लोकसेवेचा वसा सोडला नाही कारण निवडणुकीच्या माध्यमातूनच त्यांना सत्ता राबवता आली असती आणि चांगले कार्य करता आले असते. सरते शेवटी ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेच आणि त्यांनी कृष्णवर्णीयांवर गुलामगिरी लादण्याचा अन्यायकारक कायदा रद्दबातल केला.

एकलव्यालाही गुरू द्रोणाचार्यांकडून शिकायचे होते. त्यांनी शिकवायला नकार दिला परंतु एकलव्य हिंमत हरला नाही. त्याने गुरू द्रोणांचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले. इच्छा असली की मार्ग दिसतोच, तो हा असा.

इच्छा तिथे मार्ग निबंध मराठी – Iccha Tithe Marg Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply