किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या : युवावस्थेतील मुलींच्या समस्या आणि मुलांच्या समस्या भिन्न असतात. मुलींच्या समस्या बहुतांशी शारीरिक स्वरूपाच्या असतात, तर मुलांच्या समस्या काम स्वरूपाच्या असतात. वयात आल्यावर मुलांना संभोगाचे आकर्षण निर्माण होते तितके ते मुलींमध्ये दिसून येत नाही.

सोळावर्षीय तरुणी आकर्षक व ‘सेक्सी’ दिसत असली तरी ती प्रत्यक्षात संभोगाविषयी अनभिज्ञ व उदासीन असते. तिला प्रेमाचे आकर्षण असते, संभोगाचे नसते. वयात आल्यावर वाढणारे स्तन, उंची, पाळी येणे, शारीरिक बदल तिला सामावून घ्यायचे असतात; पण कामविषयक ताण निर्माण होत नसल्यामुळे मुलांप्रमाणे तिचे लक्ष अभ्यासापासून विचलित होत नाही. पाळी येणे यासंबंधी तिला माहिती दिली नाही, तर प्रथम होणारा रक्तस्राव पाहून ती घाबरण्याची शक्यता असते.

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या
किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या

युवावस्थेतील मुलींच्या समस्या

मुलीला तिच्यात होणारे बदल सांगणे गरजेचे असते. आपल्याकडे बहुतांशी पालक मुलींना अब्रूच्या जागरूकपणाविषयी अवाजवी इशारे देतात. पालकांची चिंता रास्त असते, कारण गर्भधारणा ही फक्त मुलींनाच होऊ शकते. त्याचे परिणाम मुलींनाच भोगावे लागतात. या परिणामांची जाणीव असलेली आई आपल्या मुलीवर भाराभर बंधने घालते. अशी बंधने मुलीला आवडत नाहीत. यासाठी या बंधनांची कारणे तिला समजावून द्यायला हवीत.

मुलांनी व मुलींनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे हे सुदृढ मानसिकतेचे लक्षण होय; कारण पुढे एका पुरुषाबरोबर तिला जीवन व्यतीत करायचे असते. तिला मैत्रिणी असाव्यात तसे मित्रही असावेत; परंतु आपली मर्यादा तिला कळली पाहिजे. ही मर्यादा ओलांडल्यास त्याचे परिणाम काय होतात हेदेखील तिला कळले पाहिजे.

शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, कुमारी माता बनण्याचे बहुतांशी कारण गर्भधारणेविषयीचे अज्ञान होय. कळी उमलताना थांबवू शकत नाही, तसेच वयात आल्यावर ‘प्रेमात पडणे’ यापासून त्यांना परावृत्त करता येत नाही. कथा, कादंबऱ्या आणि चित्रपट यातून प्रेमाचे अवाजवी उदात्तीकरण केले जाते. त्यामुळे प्रेमात पडणे म्हणजे काहीतरी जगावेगळे करणे असे तिला वाटते; परंतु खरे तर निसर्गाने निर्माण केलेले नर-मादीतील हे स्वाभाविक आकर्षण असते.

किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

प्रेम हे सहवासाने, आदराने, तडजोडीने, त्यागाने निर्माण करायचे असते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम हे आकाशातून पावसासारखं एकाएकी बरसत नाही. जमिनीत रोप रुजवावं तसं ते सावकाश रुजवावं लागतं…’त्यामुळे प्रेमात पडणे म्हणजे अक्षरश: ‘पाय घसरून पडणे’ असे होत असते. म्हणून प्रेम आणि आकर्षण यातील फरक मुलींना कळायला हवा.

वयात आल्यावर मुलींना आरशात वारंवार पाहणे, चांगले कपडे वापरणे, सौंदर्याविषयी जागरूक असणे, कथा-कादंबर्‍यांचे आकर्षण वाटणे, सिनेतारका आदर्श वाटणे, दिवास्वप्ने रंगवायला आवडणे, हे स्वाभाविक असते. मुली आपल्या मैत्रिणींबरोबर तासन्तास फोनवर बोलत असतात. आपल्या दिनचर्येतील बारीकसारीक गोष्टी आपल्या मैत्रिणीला सांगाव्याशा वाटतात. यात वेळेचा अपव्यय होतो, हे पालकांनी त्यांना सौम्यपणे समजावून सांगावे.

शरीराची वाढ झाली असली, मुलीचे रूपांतर स्त्रीत झाले असले तरी मनाची परिपक्वता आलेली नसते, अनुभवांची जोड नसते. आई मुलीला कधी म्हणते, ‘‘तू मोठी झालीस, नीट वाग.’’ तर तीच आई इतर वेळी म्हणते, ‘‘तू अजून लहान आहेस, तुला काही समजत नाही.’’ आई-मुलीमधील नाते मैत्रीचे असावे. युवाअवस्थेत पदार्पण करताना मुलींना अनेक समस्या उद्भवतात त्या अशा.

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या

पोटदुखी :

पाळीदरम्यान किंवा पाळीपूर्वी पोट दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, उलट्या होणे, डोके दुखणे हे बहुतेक मुलींमध्ये आढळून येते. ही विकृती नव्हे. विकसनाचा हा एक टप्पा असतो. गर्भाशयातील रक्तसंचय, गर्भाशयाचे आकुंचन किंवा गर्भाशयातील अस्तर विघटित होऊन ते बाहेर फेकले जाताना गर्भाशयमुखाचे स्नायू शिथिल न झाल्यामुळे ओटीपोटात वेदना होतात.

रक्तातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या स्त्रीजन्य अंतस्रावाचे प्रमाण बदलते; त्यामुळे मळमळणे, चक्कर येणे असा त्रास होतो. कालांतराने हे आपोआप थांबते. काहींना विवाहानंतर, तर काहींना प्रसूतीनंतर वेदना होण्याचे थांबते. आपले मन इतरत्र गुंतवणे, सौम्य रेचक घेणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘डायसायक्लोमिन’ गोळी घेणे आवश्यक असते. औषध शक्य तितके कमी घेणे बरे. नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. ओटीपोटाला किंवा कंबरेला गरम पाण्याचा शेक द्यावा.

अजून वाचा: ब्लड कॅन्सर म्हणजे काय?

अनियमित पाळी :

मुलींना सर्वसाधारणपणे तेराव्या वर्षी पाळी यायला सुरुवात होते. हा सर्वसाधारण नियम असला तरी काही मुलींना अकराव्या वर्षीसुद्धा पाळी येते, तर काही मुलींना पंधराव्या वर्षी पाळी येते. हे स्वाभाविक मानले जाते; पण दहाव्या वर्षापूर्वी पाळी आली किंवा सोळाव्या वर्षांपर्यंत पाळी आली नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आनुवंशिकता, हवामान, राहणीमान, सामाजिक स्थिती, स्वास्थ्य यांवर पाळी येण्याचे वय अवलंबून असते.

योनिपटलाला छिद्र नसणे यामुळे पाळी येत नाही. क्षयाची बाधा किंवा पोषणदोष असल्यामुळे पाळी येत नाही. यातील काहींवर इलाज होतो; तर काहींवर होत नाही.

पांंढरी धुपणी (श्वेतप्रदर) :

योनीद्वारे पांढरा स्राव जाणे म्हणजे श्वेतप्रदर. आपल्या नाकातोंडात ओलावा असतो तसा योनीतही ओलावा असतो. मासिक पाळीच्या मध्यावर, मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा येऊन गेल्यावर हा ओलावा वाढणे स्वाभाविक असते; पण योनिद्वारातून सतत पांढरा स्राव होत असल्यास श्वेतप्रदर मानावे. बहुतांशी अस्वच्छतेमुळे श्वेतप्रदराचा विकार होतो.

गुदद्वार धुतलेले पाणी योनिद्वारावर आल्यासही असा स्राव होतो. योनीतून पांढरा फेसाळ स्राव येऊन त्या भागाला खाज सुटत असेल किंवा दुर्गंधी येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एकपेशी जीवाणूंचा संसर्ग किंवा बुरशीचा संसर्ग झाल्यामुळे असा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (कामभावना उद्दीपित झाली असताना योनीतून रंगहीन स्राव येणे हे स्वाभाविक असते.)

अजून वाचा: ब्लड कॅन्सरची लक्षणे

मुरमे :

मुलांप्रमाणे मुलींनाही या वयात मुरमांचा त्रास होतो. इस्ट्रोजेन संप्रेरकामुळे त्वचा जाड होते आणि त्वचेतील रंध्रे बुजतात. त्यामुळे आतील सीबम नावाचा स्राव बाहेर येऊ शकत नाही. त्यातच जंतूचा संसर्ग झाला की मुरमे येतात आणि ती पिकतात. मुरमे नखाने फोडू नयेत. तसे केल्यास चेहऱ्यावर कायमचे क्रण राहतात.

मुरमे येणे हे आनुवंशिकतेवरही अवलंबून असते. मुरमांचा त्रास कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात. दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. चेहऱ्याला गरम पाण्याचा शेक द्यावा. आहारात पालेभाज्या, फळे, दूध, डाळी, कडधान्ये यांचा समावेश असावा. चॉकलेट, आइस्क्रीम, मिठाई, तूप, लोणी, तेल यांचा वापर कमी करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘टेट्रासायक्लीन’ कॅप्सूल घ्याव्यात.

एकदा मुरमे नाहीशी झाली तरी काही महिन्यांनी पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चेहऱ्याला यूडायना/ परसॉल जेल लावल्यासही गुण येतो. कालांतराने मुरमे येण्याचे आपोआप बंद होते. काही मुलींना चेहऱ्यावर आणि पाठीवरदेखील मुरमे येतात, तर काहींना अजिबात मुरमे येत नाहीत. काही मुलींच्या चेहऱ्यावर मुरमांमुळे इतके व्रण होतात की चेहरा ओबडधोबड होतो आणि सौंदर्यात बाधा येते. अशा वेळी अनुभवी प्लॅस्टिक सर्जनला भेटावे. सँडपेपर सर्जरी केल्यास चेहरा बराचसा सुधारतो.

अजून वाचा: मॉइस्चराइजर चे फायदे 

स्तन :

वयात येताना छातीवर स्तनांचे उंचवटे आले की काही मुली ओशाळतात आणि आपले स्तन लपवण्यासाठी पोक काढून चालतात. निसर्गनियमांनुसार स्तनांचा आकार वाढत जातो आणि मुलींनाही त्याची सवय होते; पण पोक काढण्याची सवय मात्र जात नाही. वयात आल्यावर स्तन वाढणे ही नैसर्गिक बाब असते. जे निसर्गाने दिले आहे ते मान्य करावे आणि पाठीचा कणा ताठ ठेवून चालावे.

आपले स्तन वाजवीहून लहान असले तर मुलींना काळजी वाटते व वाजवींहून मोठे असले तरी काळजी वाटते. स्तनाविषयी न्यूनगंड नसावा. स्त्रीला आपले स्तन हे आपल्या सौंदर्याचे एक अंग वाटत असले तरी निसर्गाचा हेतू वेगळाच असतो. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूल प्रसवल्यानंतर त्या नवजात अर्भकाचे पोषण मातेच्या दुधावर व्हावे, म्हणून निसर्गाने स्तनांचे वरदान दिलेले असते.

स्तनांच्या आकारावर दुधाचे प्रमाण अवलंबून नसते. लहान स्तन असले तरी त्यात दूध भरपूर निर्माण होऊ शकते. जे निसर्गाने बहाल केले आहे आणि ज्यात कसलीही उणीव आणि आजार नाही, ती बाब आनंदाने स्वीकारणे हीच खरी गरज आहे, यातच मनाचा मोठेपणा आहे. स्तनांचा आकार गोल गरगरीत चेंडूसारखा असावा, अशी काही मुलींची समजूत असते. हळेबीड,

बेलूर, अजंठा, खजुराहो येथील शिल्पात स्त्रीचे स्तन गोल चेंडूप्रमाणे दाखवलेले असले तरी प्रत्यक्षात ते तसे नसतात. स्तनांच्या आकारात विविधता असते. एक स्तन लहान व दुसरा किंचित मोठा असणे हेदेखील नॉर्मल मानावे. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत मुलींना पाळी येणे आणि स्तनांची वाढ होणे अपेक्षित असते. तसे न झाल्यास संप्रेरकांची उणीव असू शकते. म्हणून अशा मुलींनी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटावे.

पाळीपूर्वी स्तन जड वाटणे किंवा दुखणे याचे कारण शरीरात वाढलेले इस्ट्रोजेन संप्रेरक हे असते. पाळी आली की इस्ट्रोजेन संप्रेरकाचे प्रमाण कमी होते आणि म्हणून स्तन दुखणे थांबते. ही बाब स्वाभाविक असते.

मुरमे येणे किंवा स्तनांचा आकार या दोन बाबी युवावस्थेत असताना मुलींना फार महत्त्वाच्या वाटतात खऱ्या; परंतु कालांतराने जीवनातील नवनवीन आव्हाने पेलताना पुढे याच बाबी नगण्य वाटतात.

अजून वाचा: ब्रेस्ट कॅन्सर मराठी माहिती 

वजन कमी / अधिक असणे :

आपण सुंदर दिसावे, तरुण मुलांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाटावे असे बहुतेक मुलींना वाटत असते. अंगकाठी किरकोळ असली किंवा स्थूल असली तर सौंदर्यात बाधा येते. वजन वाढवण्यासाठी मुलींनी अधिक उष्मांक असलेला आहार घ्यावा.

दिवसांतून दोन ते चार वेळा आहार घ्यावा. तूप, लोणी, तेल, साखर, गूळ, चीज, अंडी, केळी यांचा समावेश असलेला आहार घेतल्यास वजन वाढते. जास्त वजन असल्यास याउलट करावे. त्यांनी वरील खाद्यवस्तू टाळाव्यात.

सूप, पालेभाज्या, फळभाज्या, सॅलड, संत्रे, मोसंबी, टोण्ड दूध, साखरेशिवाय दूध/चहा, अंड्याचा पांढरा बलक, क्रीमक्रॅकर बिस्किटे असा आहार घ्यावा. भात, पोळी यांचे प्रमाण कमी करावे. पोळीला तेल-तूप लावू नये. पोहणे, सायकल चालवणे, धावणे, जलद चालणे, सूर्यनमस्कार असा व्यायाम घ्यावा.

अकाली मातृत्व :

एखादा मुलगा प्रेमाचे नाटक करून मुलीशी शरीरसंबंध ठेवतो. ती गर्भार होते तेव्हा काखा वर करून तो मोकळा होतो. कधीकधी अज्ञानापोटी मुलगी गर्भार राहते. एका संभोगामुळे गर्भधारणा होते, हे तिला माहीत नसते. परिणाम एकच असतो. विवाहपूर्वीचे मातृत्व कलंकित असते. आता त्यासाठी गर्भपाताची सोय असली तरी वीस आठवड्यांहून अधिक मुदतीचा गर्भ असल्यास गर्भपातास कायद्यान्वये परवानगी नाही. म्हणून तत्पूर्वीच गर्भपात करायला हवा.

गर्भ बारा आठवड्यांहून कमी मुदतीचा असेल तर गर्भपात करणे फार सोपे असते. (शेवटची पाळी ज्या दिवशी आली त्या दिवसापासून मोजणी केली जाते.) याहून महत्त्वाचे म्हणजे असा प्रसंग उद्भवू न देणे. मुलाने शरीरसंबंधासाठी गळ घातली तर मुलीने ठामपणे नकार द्यावा, कारण गर्भारपणाची जबाबदारी व त्यातून निर्माण होणारे दु:ख हे तिलाच भोगावे लागते. याबाबतीत आत्महत्येचा विचारदेखील मनात आणू नये. दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वत: प्रायश्चित का म्हणून करायचे?

वयाच्या 18 वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही काही समाजात वयाच्या 18 वर्षांपूर्वी मुलीचे लग्न लावून देतात. या वयात ती गर्भार राहिल्यास मूल व आई या दोघांच्याही जिवाला धोका असतो; प्रसूती गुंतागुंतीची होऊ शकते, बाळाची वाढ नीट होत नाही, आईला पंडुरोग होण्याची शक्यता असते. म्हणून वयाच्या 18 वर्षानंतरच मुलीचा विवाह करावा.

वयाच्या एकवीस वर्षांपर्यंत गर्भारपण टाळावे, कारण तिला तोवर आई होण्यासाठी आवश्यक असणारे सक्षम शरीर लाभलेले नसते. बालसंगोपनाची जबाबदारी आता ती सांभाळू शकते. शिक्षण पूर्ण झालेले असते व तिला मानसिक परिपक्वताही लाभलेली असते.

अजून वाचा:

बर्ड फ्लू मराठी माहिती | Bird Flu Information in Marathi

पाठदुखी-कंबरदुखी संपूर्ण माहिती | कारणे, उपचार, लक्षणे, पथ्ये, आहार, घ्यावयाची काळजी

फॅट्स् म्हणजे काय?| फॅट्स्-चरबी वाढण्याची कारणे आणि उपाय

आपल्याला भूक का लागते? – भूक म्हणजे काय?

लठ्ठपणा कशामुळे होतो? | लठ्ठपणा मुळे होणारे आजार

वजन कमी करण्याचे उपाय | Weight Loss Diet Plan in Marathi

गर्भधारणा झाली कसे ओळखावे? | गर्भधारणा व प्रसूती माहिती मराठी | Pregnancy Information in Marathi

मासिक पाळी माहिती मराठी | Masik Pali in Marathi Information

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या व उपाय

लैंगिक आजाराची सुरुवातीची लक्षणे | लैंगिक आजार म्हणजे काय?

Leave a Reply