गोडा मसाला रेसिपी मराठी – Goda Masala Recipe in Marathi
गोडा मसाला : (यालाच काळा मसाला म्हणतात)

गोडा मसाला साहित्य :
चार वाट्या धने, एक वाटी खोबऱ्याचे तुकडे, अर्धी वाटी तीळ, पाव वाटी जिरे, तीन चमचे शहाजिरे, दोन चमचे भरून (किंवा पाच ग्रॅम) लवंगा, दालचिनीचे बोटभर लांबीचे चार-पाच तुकडे, दोन चमचे भरून पूड होईल, एवढा हिंगाचा खडा (अंदाजे दहा ग्रॅम), तमालपत्राची पाच ते सहा पाने, दोन-तीन दगडफुले, एक चमचा भरून हळदपूड, अर्धी वाटी तिखट, पाव वाटी मीठ व तेल, आवडत असल्यास, एक चमचा मोहरी व अर्धा चमचा मेथी.
गोडा मसाला रेसिपी कृती :
तीळ भाजून घ्यावेत. तेलावर हिंग तळून घ्यावा. त्याच तेलात खोबरे तांबूस रंगावर तळावे. नंतर त्या तेलात लवंगा, दालचिनी, जिरे, शहाजिरे, तमालपत्र, दगडफुल, मेथी, मोहरी व धने क्रमाक्रमाने तळून घ्यावे. नंतर तीळ व खोबरे व हिंग निरनिराळे कुटून घ्यावे. मग तळून घेतलेले बाकीचे सर्व जिन्नस कुटून, चाळणीने चाळून घ्यावेत. नंतर कुटलेले सर्व जिन्नस एकत्र करून, त्यांत हळद, तिखट व मीठ मिसळून, पुन्हा एकदा बारीक कुटावे. हळद-पुडीच्या ऐवजी हळकुंडे तेलात तळून व कुटून ती पूड मसाल्यात घालावी. त्यामुळे मसाल्याला जास्त खमंगपणा येतो. अर्थात हळकुंडे कुटावयास जरा जड जाते. मसाला तयार झाल्यावर बरणीत भरून घट्ट झाकण लावून ठेवावा. मसाला जास्त केला असल्यास, तो जास्त दिवस टिकण्याच्या दृष्टीने बरणीत मसाला भरल्यावर त्यावर थोडे मीठ पसरावे.
पुढे वाचा: