Set 1: दसरा निबंध मराठी – Essay on Dussehra in Marathi
दसरा म्हणजे मंगल, प्रसन्न वातावरण. संपूर्ण भारतात हा सण अत्यंत आनंदात साजरा होतो. हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी करतात. दसऱ्याच्या आधी नऊ दिवस ‘नवरात्री’चा उत्सव असतो. हा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. सर्वत्र उल्हासाचे वातावरण असते. म्हणून तर म्हणतात’दसरा सण मोठा। नाही आनंदा तोटा।’
या सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात. या दिवशी दाराला तोरण बांधतात. तोरणात आंब्याची पाने व नवीन धान्याच्या लोंब्या बांधतात. या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. त्याबरोबरच, आपल्या शस्त्रास्त्रांची व व्यवसायाच्या साधनांची पूजा करतात.
या दिवशी गोड पक्वान्नांचे भोजन करतात. संध्याकाळी नवीन वस्त्रे परिधान करून सीमोल्लंघन करतात. सोने म्हणून एकमेकाला आपट्याची पाने देतात आणि आलिंगन देऊन शुभेच्छा देतात.
असा हा दसरा आनंद घेऊन येतो.
Set 2: दसरा निबंध मराठी – Essay on Dussehra in Marathi
कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त शोधले जातात. परंतु दसरा या दिवशी शुभ मुहूर्त असल्यामुळे सर्व लोक, व्यापारी आपले नवीन कार्य या दिवशी सुरु करतात.
व्यापारी, सावकार, शेतकरी आपली पुस्तके, वह्या, चोपड्यांचे पूजन करतात तर शेतकरी आपल्या अवजारांची पूजा मनोभावे करतात. शाळेतील विद्यार्थी आपली पाटी, पुस्तके यांची पूजा करतात.
दसऱ्याला विजयादशमीही म्हणतात. कारण मराठी महिना अश्विन या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून दुर्गामातेने नवमीपर्यंत दानवांबरोबर युद्ध करुन महिषासूर या राक्षसाचा दशमीला वध केला. म्हणून तोच दिवस आनंदाने साजरा केला जातो.
या दिवशी दुष्ट प्रकृतींचा नायनाट केला जातो असे मानून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. या दिवशी थोरांना सोने देण्याची प्रथा आहे. म्हणून शमीच्या (आपट्याच्या) झाडांची पाने दिली जातात व एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. म्हणूनच म्हणतात ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा.’

Set 3: दसरा निबंध मराठी – Essay on Dussehra in Marathi
‘ दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा,’ अशी आपल्या इथे म्हणच आहे. आम्ही लहान मुले दस-याची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो कारण दस-यानंतर बरोबर वीस दिवसांनी दिवाळी येते आणि त्या आधी आम्हाला दिवाळीची सुट्टीही लागते.
आपल्या भारताला सणांचा देश म्हणतात कारण प्रत्येक ऋतूत कुठला ना कुठला तरी सण असतोच. विजया दशमी किंवा दसरा हा हिंदूंचा एक मोठा सण आहे. शरद ऋतूच्या आरंभी म्हणजे अश्विन महिन्याच्या शुक्ल दशमीला हा सण येतो. हा सण उत्साहाने करण्याची अनेक कारणे आहेत.
पौराणिक कथांमध्ये असे वर्णन आले आहे की ह्याच दिवशी दुर्गादेवीने महिषासुर, शुंभ आणि निशुंभ ह्या राक्षसांवर विजय मिळवला होता. बंगाल प्रांतात नवरात्राच्या ह्या काळात दुर्गामातेची पूजा होते. गुजरातमध्ये ह्या काळात रोज रासगरबा खेळला जातो तर आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया आणि मुली भोंडला खेळतात.
ह्या काळात लोक नऊ दिवस उपवास करतात, श्रद्धेने आणि भक्तीने दुर्गामातेची पूजा केली जाते. ह्याच काळात उत्तर भारतात रामलीला खेळली जाते आणि दस-याच्या दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम होतो. दस-याचा संबंध रावणाशी आहे कारण ह्याच दिवशी रामरावणाचे युद्ध झाले आणि त्या युद्धात रामाने रावणाला हरवून त्याचा वध केला.
महाभारतातही दस-याचा उल्लेख आहे कारण ह्याच दिवशी पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली आपली शस्त्रे बाहेर काढली. म्हणूनच ह्या दिवशी शमीची म्हणजेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा पडली.
दस-याचे आणखी एक महत्व म्हणजे ह्या काळापर्यंत धान्य शेतातून उगवून घरात आलेले असते. त्यामुळे शेतकरी राजा प्रसन्न असतो. मग तो नाना त-हेचे सण साजरे करायला उत्साहाने तयार होतो.
जुन्या काळी दस-याच्या दिवशीच मोठमोठे राजे आपल्या युद्धाच्या मोहिमा काढत. त्यासाठी राज्याच्या सीमेचे उल्लंघन केले जाई म्हणूनच त्याला सीमोल्लंघनाचा किंवा शिलंगणाचा सण असेही नाव पडले.
म्हैसुर येथील राजवाडादस-याच्या काळातच खूप छान सजवला जातो. तसेच हिमाचल प्रदेशातील कुलू येथील रघुनाथ मंदिरात भगवान श्रीरामाची मोठी शोभायात्रा काढली जाते. हे सर्व उत्सव बघण्यासाठी भारतात देशीविदेशी पर्यटकांची गर्दी लोटते. म्हणूनच दसरा हा सण सर्वांना आवडतो.
मला हा सण आवडतो कारण ह्या दिवशी शाळेला सुट्टी मिळते शिवाय आई श्रीखंडपुरीचे मस्त जेवण करते. संध्याकाळी सोने लुटायला आम्ही मुले शेजारीपाजारी जातो तेव्हा खूप मजा येते. फक्त ह्या काळात आमची सहामाही परीक्षा जवळ आलेली असते म्हणून त्याही दिवशी थोडा अभ्यास करावा लागतो एवढेच काय ते.
Set 4: दसरा निबंध मराठी – Essay on Dussehra in Marathi
दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे म्हणतात ते काही खोटे नाही. हा सण उत्साहाने साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. पुराणकथांचा शोध घेतला तर ह्याच दिवशी दुर्गादेवीने महिषासूर, शुंभ आणि निशुंभ ह्या राक्षसांवर विजय मिळवला होता. बंगाल प्रांतात त्या निमित्त नवरात्राचे नऊ दिवस दुर्गापूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दस-याच्या दिवशी दुर्गामातेच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते.
त्याशिवाय दस-याचा संबंध रामायणाशीसुद्धा आहे. रामाने ह्याच दिवशी रावणाचा वध करून आपली पत्नी सीता हिला त्याच्या तावडीतून सोडवले. त्यामुळे दस-याच्या दिवशी रावणदहन करण्याची प्रथा उत्तर भारतात आहे. त्यापूर्वी रामलीलेचे खेळही तिथे केले जातात.
दस-याचा संबंध महाभारताशीसुद्धा आहेच. तो असा की ह्याच दिवशी पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली आपली शस्त्रे खाली काढली. त्या स्मृतीनिमित्त दस-याच्या दिवशी शमीची म्हणजेच आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा पडली.
नंतरच्या काळातही दसरा सण फार महत्वाचा होता कारण जुन्या काळातले राजे लोक ह्याच दिवशी युद्धाच्या नव्या मोहिमेवर निघत असत. तसेच शेतीचा हंगाम संपलेला असे. शेतक-याच्या घरात धान्य येऊ लागलेले असे त्यामुळे शेतकरी राजाही खुशीत असे. लोक घराला तोरण लावीत आणि देवाची पूजा करून आनंद साजरा करीत.
कारागीर ह्याच दिवशी आपल्या हत्यारांची पूजा करतात. शाळेत ह्या दिवशी सरस्वतीपूजन केले जाते. आजही आपण दसरा किंवा विजयादशमी हा सण तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो.
Set 5: दसरा निबंध मराठी – Essay on Dussehra in Marathi
दसरा हा सण हिंदूंच्या दृष्टीने खूप मोठा सण आहे. ह्याच सणाला विजयादशमी असेसुद्धा म्हणतात. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाचे पहिले नऊ दिवस नवरात्र असते. दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. वाईट प्रवृत्तीच्या रावणाचा ह्या दिवशी वध केला जातो. जेवायला काहीतरी गोड पक्वान्न केले जाते. लोक आनंदाने एकमेकांना भेटतात. शाळेला आणि सर्व आस्थापनांना सुट्टी असते.
ह्याच दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले. त्यांनी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे खाली काढली म्हणून ह्या दिवशी शमीची किंवा आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे.
तसेच ह्या शुभ दिवशी लढाईसाठी आपल्या राज्याच्या सीमेबाहेर पडण्याची प्रथा होती. म्हणून ह्या दिवसाला सीमोल्लंघनाचा किंवा शिलंगणाचा दिवस असे नाव आहे.
आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. चार महिने पावसाळा झाल्यामुळे अश्विन महिन्यात धान्य घरात येते, शेतक-याला कामातून विश्रांती मिळते म्हणूनच तो दसरा आणि दिवाळीसारखे सण साजरे करतो. अन्नधान्य चांगले पिकल्यामुळे त्याच्या चेह-यावर आनंद दिसत असतो. म्हणूनच तर म्हटले आहे…
दसरा सण मोठा… नाही आनंदा तोटा..
Set 6: दसरा निबंध मराठी – Essay on Dussehra in Marathi
भारतात अनेक जातींचे लोक राहतात. ते आपापले सण उत्साहाने साजरे करतात. राष्ट्र जीवित असल्याचा हा संकेत आहे. भारताला सणांचा देश म्हणतात कारण प्रत्येक ऋतूत कोणता ना कोणता सण असतोच. विजयादशमी किंवा दसरा हा हिंदुंचा प्रसिद्ध सण आहे. हा सण वर्षा ऋतू संपताच शरद ऋतूच्या आरंभी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला येतो.
दसरा हा सण उत्साहाने साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. पौराणिक कथांमध्ये असे वर्णन आले आहे की, याच दिवशी दुर्गादेवीने महिषासुर, शुंभ-निशुंभ राक्षसांवर विजय मिळविला होता. बंगालमध्ये शक्तीची देवी भगवती दुर्गेची पूजा होते. लोक नऊ दिवस उपवास करतात. श्रद्धा आणि भक्तीने दुर्गेची शोभायात्रा काढली जाते. दुर्गादेवीच्या प्रतिमेचे दसऱ्याच्या दिवशी पाण्यात विसर्जन केले जाते.
दसऱ्याचा संबंध श्रीरामाशी आहे. रामाने लंकापती रावणाशी युद्ध करून आपली पत्नी सीतेला त्याच्या तावडीतून सोडविले. हे युद्ध दोन व्यक्तींमधील नसून दोन विचारांमधील युद्ध होते. ज्याच्यात एका बाजूला भोगी रावण तर दुसऱ्या बाजूला संयमी राम होता. या युद्धात रामाचा विजय झाला. महाभारतातील उल्लेखानुसार पांडवांचा अज्ञातवास पूर्ण झाल्यावरही दुर्योधनाने त्यांचे राज्य परत केले नाही म्हणून युद्ध झाले. दसऱ्यालाच पांडवांनी शमीच्या वृक्षाखाली लपविलेली आपली शस्त्रे बाहेर काढली. त्याची आठवण म्हणून दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना देण्याची प्रथा आहे. पेन, पेन्सिली, चाकू व तत्सम शस्त्रांची या दिवशी पुजा केली जाते. कारण आजच्या युगात अन्याय, दुर्गुण व वाईट प्रथांशी लढा देणारी ही साधने आहेत. देशातील काही भागात छोट्या मातीच्या भांड्यात किंवा जमिनीत धान्य पेरले जातात. नऊ दिवसांनतर ही कोवळी रोपे उपटून भावाच्या डोक्यावर ठेवतात व भावास ओवाळतात. त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात.
दसरा साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दसऱ्यापूर्वी नऊ दिवस रामलीलेचे खेळ सुरू होतात. ज्यात रामायणाचे दर्शन घडविले जाते. दसऱ्याच्या दिवशी शोभायात्रा रामलीला मैदानावर जाते. तिथे राम-रावणाचे युद्ध होते. तिथे उभे केलेले रावण, कुंभकर्ण, मेघनादाचे भले मोठे पुतळे जाळले जातात. तत्पूर्वी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ती पाहून लहान मुले आनंदित होतात. असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा.
प्राचीन काळापासून हा सण साजरा होतो-जो आपली सभ्यता, प्राचीनता आणि संस्कृतीचा पवित्र विचार सांगतो.
पुढे वाचा:
- दसरा निबंध मराठी 10 ओळी
- दिवाळी निबंध मराठी
- दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
- माझा जिवलग मित्र मराठी निबंध
- माझे कुटुंब निबंध मराठी
- शिक्षक दिन निबंध मराठी
- माझी शाळा निबंध मराठी लेखन
- माझी आई निबंध मराठी
- माझी शाळा निबंध 10 ओळी