देव जरी मज कधी भेटला निबंध मराठी
लहानपणी आजी मला गोष्टी सांगायची, त्यात नेहमी असायचे की एक गरीब ब्राम्हण तपश्चर्या करीत होता आणि त्याला शंकर प्रसन्न झाले. किंवा मग प्रल्हादाच्या हाकेला नरसिंहाच्या रूपात देव धावून आला. द्रौपदीच्या हाकेला कृष्ण धावून आला आणि त्याने तिला वस्त्रे पुरवली. संत नामदेवांना वाटले की देवाने नैवेद्य खावा म्हणून ते पांडुरंगाच्या मूर्तीसमोर प्रसाद ठेवून हटून बसले तेव्हा साक्षात् देवांनी येऊन प्रसाद खाल्ला.
ह्या अद्भुतरम्य गोष्टी ऐकून आणि पुढील काळात वाचून मलाही वाटू लागले की आपल्यालाही देव भेटला पाहिजे. मी आजीला विचारले की तुला भेटला होता का देव? तिचे उत्तर नकारार्थीच होते. आमच्या शेजारचे आजोबा रोज सकाळी देवाची पूजा करायचे. तेव्हा मी तिकडे जाऊन बसत असे कारण नंतर ते खारीक खोब-याचा प्रसाद देत. त्यांनाही देव भेटला नव्हता. मी आईबाबांसकट पुष्कळ जणांना विचारले पण कुणालाच देव भेटला नव्हता. मग आता काय करणार? आता ह्या देवाला भेटणार तरी कसे? एकदा मला कळले की नवरात्रात अष्टमीच्या दिवशी आमच्या शेजारच्या साळवीकाकूच्या अंगात देवी येते.मग काय? आईबरोबर मी अष्टमीच्या दिवशी त्यांच्याकडे गेले पण काय सांगू? केस मोकळे सोडून त्या घुमत होत्या.
तिथे भरपूर उदबत्त्या लावल्या होत्या आणि देवीला कोंबडीचा नैवेद्य दे असेच त्या सारखे सांगत होत्या. त्या मला मुळीच देवी वगैरे वाटल्या नाहीत. त्यांची खाष्ट सासू त्यांच्या पाया पडताना मात्र मी पाहिली. शिवाय आमची आईसुद्धा उपास आणि व्रतवैकल्येही करीत असे. हे सर्व का तर देव आपले चांगले करील, जन्मोजन्मी हाच पती मिळेल म्हणून करायचे असे तिने मला उत्तर दिले. पण मग जन्मोजन्मी हीच बायको मिळावी म्हणून बाबा उपास कुठे करतात ह्या प्रश्नाला तिच्यापाशी उत्तरच नव्हते. शिवाय लोक नवस बोलतात. मग तो पुरा झाला की देवाला जाऊन नवस फेडतात हेसुद्धा मला कळले. तेव्हा मला वाटले की देवाशी ही सौदेबाजी कशी काय करायची बरे? देव काय दुकानदार थोडाच आहे अशी सौदेबाजी करायला?
एकुणच मी मोठी झाले आणि मला कळायला लागले की देव कर्मकांडात नाही. ‘दुस-यांशी चांगले वागा, गरजूंना मदत करा, कुणाच्या मनाला लागेल असे बोलू नका, विनाकारण दुस-याला छळू नका’ असे केल्याने तुमच्या मनातला देव तुम्हाला नक्कीच भेटेल. कुणाचे फुकाचे पैसे लुबाडायचे आणि मग शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन वाहायचे ह्याला काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा वाईट मार्गाने धन मिळवूच नका. तीच साईंना मोठी भेट ठरेल.
पण हे कळतंय कुणाला? आम्ही तर लहान मुलं. आम्हाला कळतंय ते ह्या मोठ्यांना कळू नये?
पुढे वाचा:
- दूरदर्शनचे फायदे व तोटे
- दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी
- दूरचित्रवाणी निबंध मराठी
- दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी
- दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी
- दूध निबंध मराठी
- दिल्लीची कथा निबंध मराठी
- भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
- भारताची राजधानी कोणती आहे
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- ताजमहाल निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- दिनदर्शिका निबंध मराठी
- दारूबंदी निबंध मराठी
- गरिबी एक शाप मराठी निबंध