दारूबंदी निबंध मराठी | Darubandi Nibandh in Marathi

दारूबंदी निबंध मराठी – Darubandi Nibandh in Marathi

भारतातल्या अनेक सामाजिक समस्यांपैकी दारू पिणे ही एक फारच मोठी समस्या आहे. ह्या व्यसनाचे दुष्परिणाम भयंकर आहेत. दारूपानाला प्रतिष्ठा मिळू नये ह्यासाठी समाजाने त्या विरूद्ध पावले उचलायला हवीत.

मानवाचा इतिहास आपण पाहिला तर दारूचा उल्लेख अगदी प्राचीन काळापासून आपल्याला आढळतो. पुराण काळातील सोमरस म्हणजेच मद्य होय असे ब-याच विद्वानांचे म्हणणे आहे परंतु मद्यपान हे निश्चितपणे केव्हा आणि कसे सुरू झाले हे सांगता येणार नाही. दारूला संस्कृतमध्ये मद्य, मदिरा, वारुणी अशी अनेक नावे आहेत.

दारूमध्ये मुख्यत्वेकरून अल्कोहोल हा रासायनिक पदार्थ असतो परंतु दारूचे रासायनिक नाव आहे, ‘ इथाईल अल्कोहोल.’ ह्या पेयाच्या सेवनामुळे शरीराचा हळूहळू -हास होतो. सुरूवातीला माणसाला वाटते की आपला ह्या व्यसनावर ताबा आहे. परंतु हळूहळू दारूच त्या माणसावर ताबा बसवते आणि त्याला पशूपेक्षाही हीन पातळीवर घेऊन जाते.

दारूसेवनामुळे माणसाची विचारशक्ती मंदावते, त्याला योग्य-अयोग्य ह्यातील फरक समजेनासा होतो. धुंदी चढल्यामुळे तो नैतिकता गमावून बसतो. नशेमुळे मद्यप्याचा स्वतःचा विनाश होतोच, त्याशिवाय त्याचे घरही नरकासमान बनते. कारण नसताना तो आपल्याच पत्नीला आणि मुलांना बेताल होऊन मारहाण करतो. अनेकदा मद्यप्याकडे फार पैसे टिकत नसल्यामुळे तो हलक्या प्रतीची दारू पिऊ लागतो. त्यामुळे तर त्याच्या तब्येतीची आणखीनच नासाडी होते.

कधीकधी हातभट्टीची दारू विषारीसुद्धा असते. त्यामुळे हजारो लोक मरतात, अपंग बनतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे हाल आणखीच गहिरे बनतात. दारू प्यायल्याने यकृत खराब होते, कर्करोगासारखे आजारही गाठतात म्हणून शहाणेसुरते लोक म्हणतात की “दारूपासून दूरच रहा.”

आजकाल फॅशनच झाली आहे की कुठलाही आनंदाचा प्रसंग घडला की दारूपार्टी करायची. बढती मिळाली, कचेरीतील परीक्षा उत्तीर्ण झाली तर दारूपार्टी होतेच, त्याशिवाय वाढदिवस असला तरीही दारूपार्टी होते. कधीकधी सहज बसायला आणि पत्ते खेळायला मंडळी बसतात, मग दारूपार्टी होते. लग्न, साखरपुडा अशा आनंदी प्रसंगी हे लोक दारू पितातच पण मग दुःख घालवायला आणि कामाचा ताण कमी करायलाही दारू पिऊ लागतात. तिथूनच दारूचे व्यसन लागायला सुरूवात होते.

नशा करणे हे कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत खीळ बसते. म्हणूनच सरकारने दारूबंदी करावी, प्रसारमाध्यमांनी ह्या व्यसनाविरूद्ध चळवळ उभारावी. विद्यार्थ्यांना नशेमुळे होणा-या नुकसानाबद्दल सांगावे. व्यसनांपेक्षा आपला वेळ खेळ, व्यायाम अशा विधायक कार्यात घालवावा ह्याविषयी प्रचार झाला पाहिजे. आज कित्येक गावातील स्त्रिया दारूची स्थानिक दुकाने बंद पाडतात कारण त्यांच्या दुःखाचे मूळ तिथूनच सुरू होते. अनेक स्वयंसेवी संस्था व्यसनमुक्ती केंद्रचालवतात. त्यामुळेही ब-याच मद्यप्यांचे पुनर्वसन झाले आहे.

सरकारने दारूपासून मिळणा-या महसुलाकडे न बघता दारूमुळे होणा-या विनाशाची आकडेवारी पाहावी. प्रबोधनातून दारूबंदी हेच आजचा समाज सुखी करण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे.

पुढे वाचा:

Leave a Comment