भ्रष्टाचार निबंध मराठी – Corruption Essay in Marathi

मानव हा समाजात राहाणारा प्राणी आहे. तो एकटादुकटा राहू शकत नाही. समाजात राहूनच तो जीवन जगतो आणि स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा विकास करतो. ज्या समाजात सत्प्रवृत्ती अधिक असतात तो समाज श्रेष्ठ समाज म्हणून गणला जातो. समाज सत्प्रवृत्त असेल तर राष्ट्राची प्रगती होते. ह्याविरूद्ध समाजात एकी नसेल, लाचलुचपत, भ्रष्टाचार ह्यांची कीड लागली असेल तर त्या समाजाची प्रगती होत नाही. पर्यायाने त्या देशाचीही प्रगती होत नाही. भ्रष्टाचार हा असा महाभयंकर रोग आहे ज्यामुळे देशात अशांती, स्वार्थी वृत्ती, अनैतिकता ह्यांचा बुजबुजाट होतो. भारताबाबतीत म्हणायचे झाले तर लोकसंख्यावाढीच्या समस्येसोबत गरीबी, महागाई, अशिक्षितपणा, बेकारी इत्यादी प्रश्न निर्माण झाले आणि त्यात भ्रष्टाचाराची भर पडल्यामुळे ह्या समस्या आणखीनच भीषण झाल्या.

आज असे दिसते की ब-याच क्षेत्रांत भ्रष्टाचाराने आपली पावले रोवलेली आहेत. वरपासून खालपर्यंत ही कीड लागली आहे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमावून आपले घर भरण्यात आणि त्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यात लोकांना काहीही गैर वाटेनासे झाले आहे. लाच दिली नाही तर कचेरीतील फाईल पुढे सरकत नाही. फायदा मिळावा म्हणून भेटवस्तू द्याव्या लागतात. मूठ गरम केली की नोकरी मिळते. काळा बाजार, करांची चोरी ह्यात समाजातील सर्व थरातील मंडळी गुंतलेली असतात. शिपायापासून ते मंत्र्यापर्यंत सर्व लोक खरीदले आणि विकले जाऊ शकतात. औषधे, दूध, अन्नपदार्थ ह्यात भेसळ होते, ती कधीकधी जीवावर उठणारी ठरू शकते. येनकेन प्रकारेण मला पैसा मिळाला पाहिजे मग त्यासाठी दुस-या कुणाचे वाट्टोळे का होईना अशी मानसिकता निर्माण झाली आहे. खरोखर भ्रष्टाचारी व्यक्तींनी ह्या देशाची जेवढी लूटमार केली आहे तेवढी देशावर आलेल्या परचक्रामुळेही झाली नसेल.

भ्रष्टाचाराचा हा महारोग नष्ट करण्यासाठी तो समाजातूनच नष्ट व्हायला हवा. त्यासाठी काळ्या पैशावर चाप लावला पाहिजे. आधारकार्ड आणि पॅनकार्डाची सक्ती, तसेच वीस हजार रूपयांवरील रक्कम देताघेताना चेकनेच दिली पाहिजे अशी काही स्तुत्य पावले सरकारने त्या बाबतीत उचलली आहेत, त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागेल. शासनव्यवस्थेतही परिवर्तन झाले पाहिजे. राजकारणी आणि गुन्हेगारांचे संबंध तुटले पाहिजेत. राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी लागणारे पैसे चेकने स्वीकारता आले पाहिजेत. भ्रष्टाचाराचा उगम तिथूनच होतो. गृहबांधणी उद्योगातही काळ्या पैशाची खूप उलाढाल होते. ह्या सर्व गैर गोष्टींना चाप लावण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची जरूरी आहे.

म्हणूनच चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत, शिस्त आणि नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे.भ्रष्टाचा-यांना कठोर शासन झाले पाहिजे आणि नैतिकतेचे संस्कार बालवयापासूनच झाले पाहिजेत. तरच भ्रष्टाचाराच्या रोगाचा समूळ बिमोड करता येईल.

भ्रष्टाचार निबंध मराठी – Corruption Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply