चांदण्या रात्रीतील वाळवंट निबंध मराठी

हल्लीच म्हणजे नाताळच्या सुट्टीत मी माझ्या आईबाबांसोबत कच्छच्या वाळवंटात गेलो होतो. ह्या वाळवंटाला कच्छचे रण असे म्हणतात. ह्याचे दोन भाग आहेत. ग्रेट रण आणि लिटील रण. हल्लीच गुजरात सरकारने ग्रेट रण ह्या भागात रणोत्सव सुरू केला आहे त्यामुळे स्वदेशी तसेच परदेशी पर्यटक तिथे मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. आम्हीही तिथेच गेलो होतो. ह्या रणात खूपच मीठयुक्त दलदल असते. त्यामुळे रणातून चालले असताना सारखे पाय जमिनीत जातात. कोरड्या वाळूचा आणि ह्या रणाचा काहीच संबंध नाही हे लक्षात घ्यायला हवे.

डिसेंबर महिन्यातील पौर्णिमा २५ तारखेला होती, तो मुहुर्त साधून आम्ही रणात जायचे नक्की केले.आमची उतरण्याची सोय तंबू असलेल्या एका हॉटेलात करण्यात आली होती. आम्ही दुपारी आमच्या तंबूत पोचलो. थोडी विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास रणात जायला बाहेर पडलो. सहा वाजून दोन मिनिटांनी आम्हाला सूर्यास्त दिसणार होता. ती संधीही काही केल्या आम्हाला चुकवायची नव्हती. रणात मुद्दामच कुठेही वीजेची सोय केलेली नाही कारण त्याशिवाय नैसर्गिक देखावा कसा बघायला मिळणार? लोकांची अगदी झुंबड लोटली होती. त्यातच उंटवाले आणि घोडेवाले आपापल्या गाड्या घेऊन गि-हाईकांना पटवण्यासाठी हाकारे देत होते. एरवी तिथे खूपच गर्दी झाली असती परंतु रणाचा विस्तार एवढा प्रचंड असल्याने ती गर्दी जाणवतच नव्हती.

पावणेसहा वाजता सूर्य केशरी गोळ्यासारखा दिसू लागला. आता तो अस्तास जाण्याची तयारी करीत होता. त्याच वेळी पश्चिम क्षितिजावर पौर्णिमेचा गोल चंद्रमा आकाशात ब-यापैकी वर आलेला दिसत होता परंतु सूर्याचा प्रकाश अजूनही असल्यामुळे चंद्राचे अस्तित्व जाणवतही नव्हते. तेवढ्यात रणात सूर्य बुडाला आणि पश्चिम दिशा लाल रंगाने भरून गेली. थोड्याच वेळाने तो लालिमाही विझून गेला. तेव्हा आम्हाला चंद्राचे खरे रूप दिसू लागले. रणाच्या पांढ-या वाळूवर पडलेलं ते चंद्राचं चांदणं मनाला अगदी मोहून टाकत होतं. चंदेरी रंगाची सगळीकडे उधळण झाली होती. वीजबाई कुठेच नसल्यामुळे खरा नैसर्गिक प्रकाश म्हणजे काय ते कळत होतं.

आसपासची सगळी गर्दी अगदी मूक होऊन वाळवंटातील चांदण्या रात्रीचा अनुभव लुटत होती. आम्ही ते चांदणं, तो चंद्र आणि ते वाळवंट डोळ्यांनीच पित होतो. कुणीच भानावर नसल्यासारखं वाटत होतं. जरा वेळानं वाळवंटातील गार वारे वाहू लागले. सगळ्यांना हुडहुडी भरू लागली. उंटांच्या गाड्या आम्हाला परत नेण्यासाठी तयार होत्याच. आम्ही उंटाच्या गाडीत बसलो खरे परंतु आमच्या डोळ्यात ते चंदेरी वाळवंटच होतं.

पुढे वाचा:

Leave a Reply