Set 1: भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी – Bhagwan Gautam Buddha Essay in Marathi

भगवान गौतम बुद्ध हे एक युगप्रवर्तक महामानव होत. त्यांचा जन्म इ. स. पू. ५६३ साली झाला. नेपाळमधील लुंबिनी हे त्यांचे जन्मगाव होय.

भगवान बुद्ध हे राजपुत्र होते. त्यांचे बालपण मोठ्या सुखात गेले. परंतु इतर माणसांना दु:खी पाहून त्यांना खूप दु:ख झाले. हे दु:ख का निर्माण होते? ते नाहीसे कसे करता येईल? हे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. या प्रश्नांमुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्या केली.

एके दिवशी भगवान बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. दु:खमुक्तीचा मार्ग सापडला. तोच त्यांनी लोकांना सांगितला. हिंसा करू नये. खोटे बोलू नये. चोरी करू नये. सुखाचा हव्यास बाळगू नये. सर्वांविषयी मनात करुणा बाळगावी. हेच विचार त्यांनी लोकांना सांगितले. या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी एका धर्माची स्थापना केली. तोच जगातील महान धर्म ‘बौद्ध धर्म’ होय.

Set 2: भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी – Bhagwan Gautam Buddha Essay in Marathi

भगवान बुद्ध ह्यांचा जीवनकाल ख्रिस्तपूर्व सहावे ते चौथे शतक ह्या दरम्यानच्या काळात केव्हातरी आहे असे जुन्या शिलालेखांवरून अनुमान करण्यात येते.

त्यांचा जन्म कपिलवस्तू राज्याचा राजा शुद्धोदन आणि त्याची पत्नी राणी मायावती ह्यांच्या पोटी झाला. त्यांचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्यांच्या पहिल्या वाढदिवसालाच राजज्योतिष्यांनी भविष्यवाणी वर्तवली की हा मुलगा मोठेपणी राज्यत्याग करून संन्यासी होईल. तसे होऊ नये म्हणून राजाने त्याच्यासाठी सर्व सुखोपभोग हजर केले. त्याला दुःखाचा वाराही कधी लागू नये म्हणून खूप काळजी घेतली. परंतु राजाला ते कसे शक्य होणार होते? कारण जगात दुःख होतेच आणि घराबाहेर पाऊल टाकल्यावर ते पावलोपावली दिसत होते.

राजपुत्र सिद्धार्थ एकदा राजधानीत फिरत असता त्याला एक प्रेतयात्रा दिसली. तोपर्यंत त्याला बिचा-याला मृत्यू म्हणजे काय तेही माहिती नव्हते. त्याबद्दल चौकशी करता त्याला समजले की प्रत्येक जिवंत माणूस हा मरतोच. मेल्यावर त्याला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक मिळतो. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक वृद्ध माणूस आणि एक खूप आजारी माणूसही दिसला. ही सर्व दृश्ये पाहिल्यावर राजपुत्र सिद्धार्थ विचार करू लागला की जगात सगळीकडे दुःखच भरले आहे. जन्म, वृद्धावस्था आणि मृत्यूचा फेरा कुणालाही चुकत नाही. मग ह्या क्षणभंगुर ऐषारामांचा काय उपयोग? जीवनाचा खरा अर्थ शोधायला हवा. म्हणून मग एके दिवशी तो घर सोडून निघून गेला. त्याच्या पित्याला जी भीती वाटत होती तसेच झाले. खरे तर सिद्धार्थ तरूण होताच त्याचा विवाह राजानं राजकन्या यशोधरा हिच्याशी करून दिला होता. त्या दोघांना राहुल नावाचा पुत्रही झाला होता. पत्नी आणि पुत्राच्या मोहाने तरी तो संसारात थांबेल ही राजाची अटकळ खोटी ठरली.

घरदार सोडून सिद्धार्थ बराच काळ सुख, शांती आणि सत्याच्या शोधात फिरत राहिला. त्यानंतर निरंजना नदीच्या काठी बसून त्यांनी घोर तपश्चर्या केली. बौद्धगया येथे बोधीवृक्षाच्या खाली समाधी लावून बसले असता त्यांना साक्षात्कार झाला. त्यानंतर सिद्धार्थ ‘बुद्ध’ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले.

हळूहळू लोक त्यांचे अनुयायी बनू लागले. सुरूवातीला सारनाथ आणि काशी येथे त्यांनी लोकांना उपदेश केला. बुद्धांची तत्वे ही पंचशील तत्वे म्हणून प्रसिद्ध आहेत. हिंसा करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, मद्यपान करू नका आणि नेहमी सत्याचे पालन करा ही ती पाच जीवनतत्वे होती.

अशा त-हेने आपल्या धर्माचा शांततामय मार्गाने प्रचार करताकरता वयाच्या ऐशीव्या वर्षी कुशीनगर येथे भगवान बुद्धांनी देह ठेवला खरा, परंतु आजही त्यांचा धर्म केवळ भारतात नव्हे तर चीन, जपान आदी राष्ट्रांपर्यंत पसरलेला आपल्याला दिसतो.

भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी – Bhagwan Gautam Buddha Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply