Basketball Information in Marathi: ऑलिम्पिकमध्ये असे अनेक खेळ आहेत, जे इतर खेळांसारखे दिसतात. बास्केटबॉल देखील यापैकी एक आहे. हे जवळजवळ दिसायला हँडबॉलसारखे आहे, परंतु प्रत्यक्षात हँडबॉल बास्केटबॉल पेक्षा बरेच वेगळे आहे आणि या दोन खेळांच्या नियमांमध्ये बरेच फरक आहेत. बास्केटबॉल खेळणे खूप सोपे असले तरी ते खेळण्यासाठी तुम्हाला चांगली उंची आणि तग धरण्याची गरज आहे.

बास्केटबॉलची उत्पत्ती कॅनडामध्ये १८९१ मध्ये झाली आणि १९३६ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक स्पर्धा म्हणून बास्केटबॉलचा समावेश करण्यात आला. तर महिलांच्या बास्केटबॉलची सुरुवात १९७६ च्या ऑलिम्पिकपासून झाली. आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या बास्केटबॉल बद्दल संपूर्ण माहिती देत ​​आहोत, तर चला बास्केटबॉलचे नियम, Basketball Information in Marathi जाणून घेऊया.

बास्केटबॉल खेळाची माहिती, Basketball Information in Marathi
बास्केटबॉल खेळाची माहिती, Basketball Information in Marathi

बास्केटबॉल खेळाची माहिती – Basketball Information in Marathi

बास्केटबॉल खेळाचा इतिहास

बास्केटबॉलचा इतिहास फार जुना नाही, बास्केटबॉल या खेळाचा शोध 1891 साली डॉ.जेम्स नाइस्मिथ नावाच्या कॅनेडियन वैद्यकाने लावला. डॉ.जेम्स बास्केटबॉलचे जनक म्हणून ओळखले जातात. डॉ. नैस्मिथ यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी स्प्रिंगफील्डमधील वायएमसीए प्रशिक्षण शाळेत जाण्यापूर्वी मॅकगिलचे एथलेटिक संचालक म्हणून काम केले. जेव्हा नैस्मिथ स्प्रिंगफील्ड वायएमसीए इंटरनॅशनल ट्रेनिंग कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून काम करत होते.

बर्फवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना हिवाळ्याच्या हंगामात मैदानी खेळ खेळण्याची परवानगी नव्हती. वायएमसीएने क्रीडापटूंना थंड हिवाळ्यात तंदुरुस्त ठेवण्यासाठी इनडोअर गेम तयार करण्याच्या सूचना दिल्यानंतर बास्केटबॉल खेळ सुरू झाला. नैस्मिथच्या नियमांनुसार, बास्केटबॉलचा पहिला गेम ९-९ खेळाडूंमध्ये खेळला गेला.

तथापि, खेळाच्या नियमांनुसार, तो काळानुसार आणखी चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आला, ज्याला आज आपण आधुनिक काळातील बास्केटबॉल म्हणून ओळखतो. बास्केटबॉल हा खेळ भारतात १९५० मध्ये खेळला गेला आणि त्याच वर्षी बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना झाली. सध्या हा खेळ शाळा आणि विद्यापीठ स्तरावर आयोजित केला जातो.


बास्केटबॉल मैदान माहिती

बास्केटबॉलचे मैदान / क्रीडांगण

लांबी – २८ मीटर (रुंदीकडील अंतिम रेषांच्या आतील कडांमधील अंतर)
रुंदी – १५ मीटर (बाजूंच्या रेषांच्या आतील कडांमधील अंतर)

बॅडमिंटन खेळाचे मैदान  क्रीडांगण
बॅडमिंटन खेळाचे मैदान / क्रीडांगण

बास्केटबॉल मध्य रेषा (Centre Line)

अंतिम रेषांशी समांतर असणारी व क्रीडांगणाचे दोन समान भाग करणारी रेषा. (मध्यरेषा क्रीडांगणाच्या बाजूच्या रेषेबाहेर १५ सें.मी. वाढविलेली असते.)

अंतिम रेषा (End Lines)

क्रीडांगणाच्या रुंदीच्या बाजूच्या रेषा.

बाजूच्या रेषा (Side Lines)

क्रीडांगणाच्या लांबीच्या बाजूच्या रेषा.

मध्य वर्तुळ (Centre Circle)

मध्यरेषेच्या मध्यबिंदूतून १.८० मी. त्रिज्येने काढलेले वर्तुळ. (मध्यबिंदूपासून वर्तुळाची बाहेरची कडा १.८० मीटर असते.)

फ्री थ्रो रेषा (Free Throw Lines)

क्रीडांगणाच्या दोन्ही भागांत अंतिम रेषेपासून ५.८० मी. अंतरावर अंतिम रेषेशी समांतर व बाजूच्या रेषांपासून समान अंतरावर असणाऱ्या क्रीडांगणातील ३.६० मी. लांबीच्या रेषा. (अंतिम रेषेच्या आतील कडेपासून (Edge) फ्री थ्रो रेषेच्या बाहेरील कडेपर्यंतचे अंतर ५.८० मी. असते. फ्री थ्रो रेषेच्या बाहेरच्या कडेपासून फळ्यापर्यंतचे अंतर ४.६० मी. असते.)

बास्केटबॉलचे मैदान क्रीडांगण
बास्केटबॉलचे मैदान क्रीडांगण

बास्केटबॉलचे नियंत्रित क्षेत्र (Restricted Area)

क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूंना अंतिम रेषेच्या मध्यबिंदूपासून अंतिम रेषेवर दोन्ही बाजूंना २.४५ मी. अंतरावर खुणा कराव्यात. फ्री थ्रो रेषांची टोके दोन्ही बाजूंना प्रत्येकी ६५ सें.मी. वाढवावी. वाढविलेल्या फ्री थ्रो रेषांची टोके अंतिम रेषांवरील खुणांशी जोडावीत. अशा प्रकारे तयार झालेल्या आयताकृती क्षेत्रास नियंत्रित क्षेत्र म्हणतात.

फ्री थ्रो लेन्स (Free Throw Lanes) Rebound Places फ्री थ्रो करताना वापरण्यासाठी लेन्सची आखणी पुढीलप्रमाणे करतात. नियंत्रित क्षेत्राच्या रेषांवर प्रत्येकी ८५ सें.मी. रुंदीच्या तीन लेन्स असतात. पहिली लेन अंतिम रेषेपासून १.७५ मी. अंतरावरून सुरू होते. पहिल्या लेननंतर ४० सें.मी. रुंदीचे न्यूट्रल क्षेत्र असते. न्यूट्रल क्षेत्रानंतर फ्री थ्रो रेषेच्या बाजूस पुन्हा प्रत्येकी ८५ सें.मी. रुंदीच्या दोन लेन्स आखतात. लेन्सच्या रेषांची रुंदी ५ सें.मी. व लांबी १० सें.मी. असते. या रेषा नियंत्रण रेषेशी काटकोन करून काढलेल्या असतात.

बास्केटबॉलचे थ्री-पॉइंट गोलक्षेत्र

बाजूच्या रेषांशी समांतर व बाजूच्या रेषांपासून ९० सें.मी. अंतरावरून अंतिम रेषेवर (Endlines) १.५७५ मी. लांबीच्या रेषा लंबरूपाने काढल्या जातात. बास्केटच्या मध्यबिंदूतून (अंतिम रेषेच्या मध्यबिंदूपासून १.५७५ मी. अंतरावरून) ६.७५ मी. त्रिज्येने क्रीडांगणात अर्धवर्तुळे काढली जातात. या अर्धवर्तुळांची टोके वरीलप्रमाणे काढलेल्या १.५७५ मी. लांबीच्या रेषांच्या टोकांना जोडली जातात. अशा तयार झालेल्या क्षेत्राला थ्री-पॉइंट गोलक्षेत्र म्हणतात.

बास्केटबॉलचे नो-चार्ज सेमी-सर्कल

मैदानावर‘नो-चार्ज सेमी-सर्कल’ (No-Charge Semi-Circle) आखलेले असते. हे सेमी-सर्कल आखण्यासाठी बास्केटच्या मध्यबिंदूतून अचूकपणे मैदानावर खूण करतात. या बिंदूतून फळ्याच्या पुढे १.२५ मीटर त्रिज्येने एक वर्तुळखंड काढला जातो. फळ्याच्या पुढील बाजूपासून लंबरूपाने मैदानावर खूण केली जाते. या खुणेच्या दोन्ही बाजूंना मागील अंतिम रेषेशी समांतर अशी काल्पनिक रेषा मानून त्या वर्तुळखंडाची टोके जोडली जातात.

बास्केटच्या खाली निर्माण होणारी चार्ज / ब्लॉक परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी सेमी-सर्कलचा उपयोग होतो. सेमी-सर्कलमध्ये आक्रमक खेळाडूकडे चेंडू असेल आणि त्याच्या पायांचा सेमी-सर्कलमधील जमिनीशी संपर्क नसताना त्याचा संरक्षक खेळाडूच्या शरीराशी संपर्क (Contact) झाला असेल तर तो आक्रमक खेळाडूचा प्रमाद मानू नये. जर आक्रमक खेळाडूने आपल्या हाताचा‚ पायाचा किंवा शरीराचा वापर अवैधरीत्या केला असेल तर तो त्याचा प्रमाद मानावा.

आक्रमक खेळाडू हवेत असताना फील्डगोल करण्याच्या प्रयत्नात असेल किंवा आपल्या संघाच्या खेळाडूकडे चेंडू पास करण्याच्या प्रयत्नात असेल आणि त्या वेळी संरक्षक खेळाडूचा एक किंवा दोन्ही पाय सेमी-सर्कलमध्ये असतील त्या वेळीच वरील नियमाची अंमलबजावणी केली जाते.

बास्केटबॉल फळा व बास्केट (Back board & Basket)

अंतिम रेषेच्या मध्यभागी‚ भक्कम खांबावर‚ अंतिम रेषेशी समांतर असा फळा बसविलेला असतो. फळ्याची रुंदी १.८० मी. आणि उंची १.०५ मी. असते. फळा शक्यतो फायबर ग्लासचा‚ पारदर्शक असावा. (लाकडी फळाही चालेल.) त्याला पांढरा रंग दिलेला असावा. फळ्याच्या चारी कडांना ५ सें.मी. जाडीची काळी रेषा असावी.

फळ्याची खालची बाजू जमिनीपासून २.९० मी. उंचीवर असते. फळा अंतिम रेषेच्या आतील बाजूपासून १.२० मी. क्रीडांगणात असतो. ज्या खांबांवर फळा बसविलेला असतो‚ ते खांब अंतिम रेषेपासून २ मी. क्रीडांगणाच्या बाहेर असतात. खांबांना पांढरा रंग दिलेला असतो. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी खांबांना स्पंजचे पॉडिंग केलेले असावे.

जमिनीपासून ३.०५ मी. उंचीवर फळ्याला २० मि. मी. जाडीची एक लोखंडी कडी (Ring) घट्ट बसविलेली असते. कडीचा आतील व्यास ४५ सें.मी. असतो. कडीचा फळ्याकडील आतील भाग फळ्यापासून १५ सें.मी. अंतरावर असतो. कडीच्या भोवती ४० सें.मी. लांबीची जाळी बसविलेली असते. कडी व जाळी मिळून ‘बास्केट’ तयार होते.

कडीच्या मागे फळ्यावर ५ सें.मी. जाडीच्या रेषांनी एक आयत काढलेला असतो. आयताची उंची ४५ सेंमी व रुंदी ६० सें.मी. असते. आयताच्या खालील रेषेची वरची कडा लोखंडी कडीच्या पातळीत असते.

टीप –
१) क्रीडांगणाच्या सर्व रेषांची जाडी ५ सें.मी. असते.
२) क्रीडांगणाच्या बाहेर चारही बाजूंना २ मी. मोकळी जागा असावी.
३) क्रीडांगणाच्या वर जमिनीपासून ७ मी. उंचीपर्यंत कोणताही अडथळा नसावा.


बास्केटबॉलचे साहित्य

चेंडू : चेंडूचा आकार गोल असतो. त्याचे बाह्यावरण सिंथेटिक मटेरिअलचे असते. चेंडूचा परीघ ७५ सें.मी. पेक्षा कमी नसावा व ७८ सें.मी. पेक्षा अधिक नसावा. चेंडूचे वजन (पुरुष) ५६७ ग्रॅमपेक्षा कमी नसावे व ६५० ग्रॅमपेक्षा अधिक नसावे.

घड्याळे : सामन्यासाठी किमान तीन घड्याळे असावीत. त्यांपैकी एक घड्याळ गेम क्लॉक असावे व दुसरे (Stop Watch) असावे. तिसरे घड्याळ २४ सेकंदांची वेळ दर्शविणारे असावे.


बास्केटबॉल संघ व खेळाडू

प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. त्यांपैकी एक कप्तान असतो. प्रत्यक्ष मैदानावर पाच खेळाडू खेळतात आणि बाकीचे राखीव खेळाडू असतात. राखीव खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळू शकतात. संघातील प्रत्येक खेळाडूने गणवेश वापरलाच पाहिजे. मैदानावर खेळणाऱ्या संघांचे गणवेश वेगवेगळे असतील. खेळाडूंना टी-शर्ट वापरता येणार नाही. त्यांनी शर्टच वापरला पाहिजे.

प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर व छातीवर क्रमांक असतो. खेळाडूंचे क्रमांक ४ पासून पुढे दिलेले असतात. एका संघातील दोन खेळाडू एकच क्रमांक वापरणार नाहीत.

प्रत्येक संघाला कोच असेल. सामना सुरू होण्यापूर्वी कोच २० मिनिटे अगोदर आपल्या संघाच्या कप्तानाचे नाव‚ इतर खेळाडूंची नावे आणि त्यांचे क्रमांक गुणलेखकाकडे देईल. बदली खेळाडू घेण्यासाठी व विश्रांतीसाठी तो त्रुटित काळाची मागणी करू शकतो. (कोच नसेल‚ तर कप्तान कोचचे काम करू शकतो.)

गुणलेखकाच्या टेबलाच्या बाजूंना दोन्ही संघांचे कोच व राखीव खेळाडू यांची बसण्याची सोय केलेली असते.


बास्केटबॉल खेळाचे नियम

बास्केटबॉल खेळाची वेळ किती असते?

बास्केटबॉल खेळाची वेळ ४० मिनिटांची असते, बास्केटबॉल सामन्याचा कालावधी – सामना प्रत्येकी १० मिनिटांच्या चार सत्रांत खेळला जातो. पहिल्या व दुसऱ्या सत्रांमध्ये २ मिनिटांची विश्रांती‚ दुसऱ्या व तिसऱ्या सत्रांमध्ये १५ मिनिटांची विश्रांती आणि तिसऱ्या व चौथ्या सत्रांमध्ये २ मिनिटांचा विश्रांती काळ राहील.

पूर्ण वेळ सामना खेळूनही सामन्याचा निर्णय लागला नाही‚ तर २ मिनिटांच्या विश्रांतीनंतर ५ मिनिटांचा जादा वेळ सामना खेळला जाईल. जादा वेळेच्या खेळातही निर्णय लागला नाही‚ तर २ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ५ मिनिटांचा जादा वेळ खेळ होईल. सामन्याचा निकाल लागेपर्यंत याप्रमाणे खेळ सुरू राहील. जादा वेळेच्या खेळासाठी नाणेफेक करून बाजूची निवड करावी.

बास्केटबॉल खेळाची सुरुवात कशी करावी?

१) नाणेफेक जिंकणारा संघ क्रीडांगणाच्या बाजूची निवड करील. दुसऱ्या सत्रानंतर क्रीडांगणाच्या बाजूंची अदलाबदल केली जाईल. जादा वेळेसाठी खेळताना संघ चौथ्या सत्रात ज्या बाजूने खेळत होते त्या बाजूत बदल होणार नाही.

२) सामना सुरू होताना एखाद्या संघाचे ५ पेक्षा कमी खेळाडू क्रीडांगणावर असतील‚ तर सामना सुरू होणार नाही. सामना सुरू होण्याच्या वेळेनंतर १५ मिनिटांच्या आत संबंधित खेळाडू उपस्थित न झाल्यास प्रतिस्पर्धी संघास पुढे चाल दिली जाईल.

३) पहिल्या सत्राची सुरुवात करताना सरपंच मध्य वर्तुळात चेंडू दोन्ही खेळाडूंना उडी मारून स्पर्श करता येणार नाही इतका वर उडवतील (Jump ball). त्या वेळी दोन्ही संघांचा एक-एक खेळाडू आपापल्या अंगणातील मध्य वर्तुळाच्या अर्ध्या भागात असेल. (त्यांचे दोन्ही पाय त्यांच्या अंगणात असतील.) चेंडू वरून खाली येताना दोघेही खेळाडू चेंडूला मारू (Tap) शकतील. त्यानंतर त्यांच्याशिवाय इतर आठ खेळाडूंपैकी किमान एक खेळाडू‚ जमीन‚ फळा‚ बास्केट याला चेंडूचा स्पर्श झाल्याशिवाय त्यांना चेंडूला पुन्हा स्पर्श करता येणार नाही.

वर उडविलेल्या चेंडूला मध्य वर्तुळातील खेळाडूचा स्पर्श होईपर्यंत इतर खेळाडू मध्य वर्तुळाच्या बाहेर उभे असतील.

चेंडूने उंची गाठण्यापूर्वीच खेळाडूने चेंडूला स्पर्श केला किंवा दोघांचाही चेंडूला स्पर्श न होता चेंडू जमिनीवर पडला किंवा सरपंचाने चेंडू योग्य रीतीने वर उडविला नाही‚ तर सरपंच पुन्हा मध्य वर्तुळात चेंडू वर उडवून खेळ सुरू करतील.

४) वर उडविलेल्या चेंडूला स्पर्श होण्यापूर्वीच वर्तुळातील खेळाडूचा वर्तुळाबाहेरील जमिनीस स्पर्श झाला किंवा बाहेरील खेळाडूचा वर्तुळास स्पर्श झाला‚ तर दोषी स्पर्धकाच्या प्रतिस्पर्ध्यास थ्रो-इन् देऊन खेळ सुरू होईल.

५) दुसऱ्या‚ तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील खेळाची सुरुवात तसेच जादा वेळेसाठी होणाऱ्या खेळाची सुरुवात थ्रो-इन करून केली जाते. पहिल्या सत्रातील जंप बॉलनंतर चेंडू ज्या संघाच्या ताब्यात आला असेल त्याचा प्रतिस्पर्धी संघ दुसऱ्या सत्राची सुरुवात मध्यरेषेच्या बाहेरून थ्रो-इन करून करेल. पहिल्या सत्रात जंप बॉलनंतर चेंडू ताब्यात आलेला संघ तिसऱ्या सत्राची सुरुवात मध्यरेषेबाहेरून थ्रो-इन करून करेल. दुसऱ्या सत्राची सुरुवात थ्रो-इन ने करणारा संघ चौथ्या सत्राची सुरुवात मध्यरेषेबाहेरून थ्रो-इन करून करेल.

विश्रांतीसाठी खेळ थांबला असताना कोच किंवा खेळाडू यांच्याकडून घडलेल्या प्रमादासाठी फ्री थ्रो करून नंतरच पुढील सत्राच्या खेळाची सुरुवात होईल.

बास्केटबॉल खेळामध्ये चेंडू कसा खेळला जातो?

बास्केटबॉल खेळताना संघाने आपल्या बास्केटचे संरक्षण करून प्रतिपक्षाच्या बास्केटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करावयाचा असतो. प्रत्येक खेळाडूने नियमभंग होणार नाही व प्रमाद घडणार नाही याची दक्षता घ्यावयाची असते.

बास्केटबॉल हातांनी खेळावयाचा असतो. चेंडू हातांनी पकडता येईल‚ फेकता येईल‚ घरंगळत सोडता येईल किंवा ड्रिबल (Dribble) करता येईल. हाताच्या मुठीने चेंडू मारता येणार नाही. चेंडू लाथाडणे (Kicking)‚ मुद्दाम पायांनी अडवणे हा नियमभंग आहे. चेंडू केवळ पायाला लागला म्हणून तो नियमभंग मानू नये.

चेंडू ताब्यात असताना खेळाडू आपला एक पाय क्रीडांगणात एके ठिकाणी ठेवून दुसरा पाय कोणत्याही दिशेस टाकू शकतो (Pivot). चेंडू ताब्यात असताना खेळाडू चेंडू ड्रिबल करू शकतो. आपल्या ताब्यात असलेला चेंडू फेकणे‚ एका हाताच्या बोटांनी चेंडूला टप्पी-टप्पी करीत कितीही पावले पुढे जाणे‚ जमिनीवर आपटणे (Bouncing) किंवा जमिनीवर घरंगळत सोडणे आणि दुसऱ्या खेळाडूचा चेंडूस स्पर्श होण्यापूर्वी पुन्हा त्या चेंडूला स्पर्श करणे या क्रियेला ‘ड्रिबल’ म्हणतात. ड्रिबल करताना चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला पाहिजे. (हवेमध्ये एक वेळ चेंडू ड्रिबल करता येतो‚ म्हणजेच जमिनीवर चेंडू पडण्यापूर्वी त्याला चेंडूला स्पर्श करता येतो.)

चेंडू हवेत असताना खेळाडूला कितीही पावले पुढे टाकता येतील. खेळाडूने ड्रिबल करून पुढे ढकललेला चेंडू त्याच्या एका किंवा दोन्ही हातांत थांबतो किंवा त्याच्या दोन्ही हातांना चेंडूचा एकाच वेळी स्पर्श होतो‚ त्या वेळी ड्रिबल ही क्रिया संपते. ड्रिबलची क्रिया संपल्यावर त्याच खेळाडूला लगेच दुसऱ्यांदा चेंडू ड्रिबल करता येणार नाही. ड्रिबलची क्रिया संपल्यावर त्या चेंडूचा अन्य खेळाडूला‚ प्रतिस्पर्ध्याच्या बास्केटला किंवा फळ्याला स्पर्श झाल्याशिवाय ड्रिबलची क्रिया पुन्हा सुरू करणे‚ हा नियमभंग आहे.

आपल्या ताब्यात असलेला चेंडू घेऊन खेळाडू कोणत्याही दिशेस जाऊ शकतो. मात्र‚ त्याला पुढील मर्यादा पाळाव्या लागतात-

१) उभा असलेला खेळाडू चेंडू स्वीकारून एका पायाचा जमिनीशी संपर्क ठेवून दुसरा पाय कोणत्याही दिशेस टाकू शकतो (Pivot).

२) पुढे जात असताना चेंडू हातात आल्यानंतर किंवा ड्रिबलची पहिली क्रिया संपल्यानंतर चेंडू दुसरीकडे टाकण्यासाठी किंवा थांबण्यासाठी खेळाडू दोन अंकी तालाचा (Two Count Rhythm) उपयोग करू शकतो. (चेंडू स्वीकारण्याच्या वेळी त्याच्या कोणत्याही पावलाचा जमिनीशी संपर्क असेल किंवा चेंडू स्वीकारताना त्याची हवेत असलेली दोन्ही पावले चेंडू स्वीकारल्यानंतर एकाच वेळी जमिनीस टेकली असतील‚ तर एक अंक मोजावा. पहिला अंक पूर्ण झाल्यावर त्याच्या एका पायाचा किंवा एकाच वेळी दोन्ही पायांचा जमिनीस स्पर्श झाला‚ तर दुसरा अंक पूर्ण होतो.)

आपल्या ताब्यात चेंडू असताना व स्वत: प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात असताना (Front court) खेळाडूला आपल्या अंगणात (Back court) जाता येणार नाही.

नियमभंगानंतर बाजूच्या रेषेच्या मध्यावरून थ्रो-इन् करणारा खेळाडू मैदानात कुठेही थ्रो-इन करू शकतो.

३) एका जागी उभे असताना चेंडू हातात आल्यावर मागील पाय (Pivot foot) उचलला किंवा चेंडू फेकण्यासाठी खेळाडूने उडी मारली तरी चालते. परंतु पायांचा जमिनीस पुन्हा स्पर्श होण्यापूर्वी चेंडू हातातून सुटला पाहिजे.

४) ड्रिबल सुरू करताना चेंडू हातातून सुटण्यापूर्वी मागील पाय उचलता येणार नाही. या मर्यादांचा भंग झाला‚ तर थ्रो-इन करण्यासाठी चेंडू प्रतिपक्षाकडे दिला जातो.

एखाद्या खेळाडूने आपल्या हातातील चेंडू पाच सेकंदांच्या आत दुसरीकडे टाकला नाही‚ घरंगळत सोडला नाही‚ हाताने मारला नाही किंवा ड्रिबल केला नाही; तर त्या वेळी त्या खेळाडूचा ‘हेल्ड बॉल’ (Held ball) हा नियमभंग मानावा. तसेच दोन्ही संघांचे दोन किंवा अधिक खेळाडू चेंडू घट्ट धरून ठेवतात‚ त्या वेळी त्यांचा ‘हेल्ड बॉल’ नियमभंग मानून जवळच्या वर्तुळाजवळ संबंधित दोन खेळाडूंमध्ये चेंडू उडवून खेळ सुरू करावा. कोणते वर्तुळ जवळचे आहे याबाबत शंका निर्माण झाल्यास मध्य वर्र्तुळात चेंडू उडवावा.

बास्केटबॉल तीन सेकंदांचा नियम

आपल्या संघाच्या ताब्यात चेंडू असताना खेळाडूला प्रतिस्पर्ध्याच्या अंगणातील नियंत्रित क्षेत्रात तीन सेकंदांपेक्षा अधिक वेळ थांबता येणार नाही. खेळाडूचा नियंत्रित क्षेत्राच्या रेषेला स्पर्श झाला असला‚ तरी तो नियंत्रित क्षेत्रात आहे‚ असे मानले जाते. नियमभंगाबद्दल प्रतिपक्षाला थ्रो-इन मिळतो. (बास्केटकडे फेकलेला चेंडू हवेत असताना किंवा फळ्याला लागून परत येत असताना चेंडू कोणत्याच संघाच्या ताब्यात नाही‚ असे या वेळी मानले जाते.)

बास्केटबॉल आठ सेकंदांचा नियम

आपल्या अंगणात (Back court) ताब्यात असलेला चेंडू आठ सेकंदांच्या आत प्रतिपक्षाच्या अंगणात (Front court) नेला नाही‚ तर तो नियमभंग ठरतो व प्रतिपक्षास थ्रो-इन मिळतो. मध्यरेषेच्या पलीकडील प्रतिपक्षाच्या अंगणाला किंवा मध्यरेषेच्या पलीकडील अंगणात असलेल्या खेळाडूला चेंडूचा स्पर्श झाला‚ तर चेंडू प्रतिपक्षाच्या अंगणात गेला‚ असे मानले जाते. प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात नेलेला चेंडू आपल्या अंगणात परत टाकता येणार नाही.

बास्केटबॉल चोवीस सेकंदांचा नियम

चेंडू ताब्यात आल्यापासून संबंधित संघाने चोवीस सेकंदांच्या आत गोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चेंडू ताब्यात असताना चेंडू क्रीडांगणाच्या बाहेर गेला आणि त्याच संघाला चेंडू मिळाला‚ तर नवीन चोवीस सेकंद कालावधी सुरू होत नाही.

बास्केटबॉल क्रीडांगणाबाहेर गेलेला चेंडू नियम

खेळाडूचा अंतिम रेषेवर किंवा बाजूच्या रेषेवर किंवा अंतिम रेषेच्या बाजूच्या रेषेच्या बाहेरील जमिनीस स्पर्श झाला असेल‚ तर तो खेळाडू क्रीडांगणाबाहेर गेला‚ असे मानले जाते. क्रीडांगणाबाहेर गेलेला खेळाडू‚ अंतिम रेषेच्या किंवा बाजूच्या रेषेच्या बाहेरील जमीन‚ अंतिम रेषेबाहेरील किंवा बाजूच्या रेषेबाहेरील वस्तू‚ फळ्याची मागील बाजू किंवा फळ्याच्या आधाराचे खांब यांना चेंडूचा स्पर्श झाला‚ तर चेंडू क्रीडांगणाबाहेर गेला‚ असे मानले जाते.

ज्या खेळाडूचा स्पर्श होऊन चेंडू बाहेर गेला असेल‚ त्याच्या प्रतिस्पर्ध्यास थ्रो-इन मिळतो. निश्चित कोणत्या संघाच्या खेळाडूचा शेवटी स्पर्श होऊन चेंडू बाहेर गेला याबाबत साशंकता असेल‚ तर जवळच्या वर्तुळाजवळ चेंडू उडवून खेळ सुरू करावा.

बास्केटबॉल थ्रो-इन (Throw in)

क्रीडांगणाबाहेरून चेंडू थ्रो-इन करणारा खेळाडू क्रीडांगणाच्या बाजूच्या / अंतिम रेषेच्या बाहेर उभा राहून क्रीडांगणात उभ्या असलेल्या खेळाडूकडे चेंडू फेकील‚ घरंगळत सोडील किंवा आपटील. चेंडू पाच सेकंदांच्या आत खेळाडूच्या हातातून सुटला पाहिजे. चेंडू थ्रो-इन करताना त्याच्या पायाचा बाजूच्या रेषेशी किंवा क्रीडांगणाशी स्पर्श नको. तसेच चेंडू फेकल्यानंतर दुसऱ्या खेळाडूचा चेंडूस स्पर्श झाल्याशिवाय त्याने चेंडूस स्पर्श करावयाचा नाही.

फील्ड गोल झाला किंवा शेवटच्या फ्री थ्रोमुळे गोल झाला‚ तर अंतिम रेषेच्या बाहेरून थ्रो-इन केला जाईल. कोचच्या तांत्रिक प्रमादाबद्दल मिळालेल्या फ्री थ्रोमुळे गोल झाला‚ तर बाजूच्या रेषेबाहेरून थ्रो-इन केला जाईल. थ्रो-इन केला जात असताना इतर खेळाडू क्रीडांगणात असतील. खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात थ्रो-इन करणार असेल‚ तर पंचाने / सरपंचाने त्या खेळाडूकडे चेंडू थ्रो-इन करण्यासाठी द्यावा.

बास्केटबॉल डेड बॉल (Dead Ball)

‘डेड बॉल’ म्हणजे खेळात नसलेला चेंडू. पुढील प्रसंगांनंतर चेंडू ‘डेड’ आहे‚ असे मानले जाते आणि खेळ तात्पुरता थांबविला जातो :

१) गोल झाला.
२) नियमभंग झाला.
३) चेंडू खेळात असताना प्रमाद (Foul) घडला.
४) खेळाडूंनी चेंडू पकडून ठेवला.
५) बास्केटच्या आधारावर चेंडू अडकून राहिला.
६) खेळ सुरू असताना पंचाने / सरपंचाने शिट्टी वाजविली.
७) कोच किंवा बदली खेळाडूच्या तांत्रिक प्रमादाबद्दल फ्री थ्रो केलेला चेंडू बास्केटमध्ये गेला नाही.
८) चेंडू खेळात असताना २४ सेकंदांचा इशारा झाला.
९) दोन/तीन फ्री थ्रोंपैकी पहिला/दुसरा फ्री थ्रो केल्यावर चेंडू बास्केटमध्ये गेला नाही.

(चेंडू हातातून सुटून बास्केटकडे जात असताना मध्यंतरासाठी खेळ थांबण्याचा इशारा झाला किंवा प्रतिस्पर्ध्याचा नियमभंग झाला‚ पंचाची शिट्टी वाजली तरी त्या वेळी चेंडू डेड होत नाही. त्या वेळी गोल झाला‚ तर त्याची नोंद होईल. नियमभंगाबद्दल मिळालेल्या फ्री थ्रोनंतर खेळ थांबेल.)

चेंडू खेळात येतो

जंप बॉलमध्ये चेंडू सरपंचांनी वर उडविला; थ्रो-इन करण्यासाठी सरपंचाने खेळाडूच्या हाती चेंडू सोपविला; फ्री थ्रो करण्यासाठी सरपंचांनी चेंडू फ्री-थ्रो करणाऱ्याकडे सोपविला‚ तर चेंडू खेळात आला असे मानले जाते.


बास्केटबॉल वर्तनप्रमाद

क्रीडांगणावर खेळत असताना सामना अधिकारी व प्रतिस्पर्धी खेळाडू यांच्याशी वर्तन करताना प्रमाद घडला‚ तर शासन केले जाते. प्रमादाचे तांत्रिक प्रमाद (Technical Fouls) आणि वैयक्तिक प्रमाद (Personal Fouls) असे दोन प्रकार मानले जातात.

बास्केटबॉल तांत्रिक प्रमाद

खेळाडूकडून पुढील कृती घडल्यास तो त्याचा तांत्रिक प्रमाद मानला जातो.

१) पंच / सरपंच यांच्याबद्दल अनादर दाखविणे.

२) असभ्य अभिनय किंवा अपशब्द यांचा वापर करणे.

३) पंचाने / सरपंचाने वैयक्तिक प्रमाद जाहीर केल्यावर आपला हात योग्यरीत्या वर न करणे.

४) गुणलेखक किंवा सरपंच यांना सांगितल्याशिवाय आपला क्रमांक बदलणे.

५)खेळ सुरू असताना गुणलेखक‚ पंच किंवा सरपंच यांना कळविल्याशिवाय बदली खेळाडूने क्रीडांगणात प्रवेश करणे.

६)    थ्रो-इन घेताना अडथळा आणून खेळ सुरू होण्यास अकारण विलंब करणे.

७) बास्केट होण्यापूर्वी बास्केटची कडी पकडणे.

८) प्रतिपक्षाच्या खेळाडूपुढे हात हलवून त्याला अडथळा आणणे किंवा त्रास देणे. वरील प्रमाद जाणूनबुजून घडले असतील व त्याद्वारे आपल्या संघाचा फायदा व्हावा असा हेतू असेल‚ तर त्या प्रमादाची संबंधित खेळाडूच्या नावे नोंद होईल आणि प्रतिपक्षास दोन फ्री थ्रो दिले जातील. कप्तान सांगेल त्या खेळाडूला फ्री थ्रो करता येईल. गंभीर प्रमादाची पुनरावृत्ती घडत असेल‚ तर त्या खेळाडूस सामन्यातून बाद करता येईल.

९) संघाचे पाचपेक्षा अधिक खेळाडू मैदानावर असणे.

१०) निर्धारित त्रुटित काळ संपल्यावर पुन्हा त्रुटित काळाची मागणी करणे. कोच किंवा बदली खेळाडू यांनी सामना अधिकारी किंवा प्रतिस्पर्धी यांच्याबद्दल अनादर दाखविणारे उद्गार काढले किंवा पंचाच्या / सरपंचाच्या परवानगीशिवाय अंगणात प्रवेश केला किंवा आपल्या जागा सोडून खेळ सुरू असताना खेळाडूंना सूचना दिल्या‚ तर तो तांत्रिक प्रमाद मानावा आणि त्याबद्दल प्रतिपक्षास एक फ्री थ्रो द्यावा. (सामना सुरू होण्यापूर्वी‚ मध्यंतरासाठी खेळ थांबला असताना किंवा जादा वेळेतील खेळ सुरू होण्यापूर्वी घडलेल्या तांत्रिक प्रमादाबद्दल प्रतिस्पर्धी संघास दोन फ्री थ्रो मिळतील.)

कोच किंवा खेळाडू यांच्याकडून अनवधानाने तांत्रिक प्रमाद घडला असेल व त्याचा खेळावर परिणाम झाला नसेल‚ तर शासन न करता ताकीद द्यावी. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक वारंवार प्रमाद घडले‚ तर खेळाडूला सामन्यातून बाद करावे आणि कोचला क्रीडांगणापासून हद्दपार करावे.

बास्केटबॉल वैयक्तिक प्रमाद

प्रतिस्पर्ध्याशी शारीरिक संघर्ष करून दांडगाईचा खेळ केला‚ तर तो वैयक्तिक प्रमाद समजला जातो. संबंधित खेळाडूच्या नावे प्रमादाची नोंद होते. पुढील कृती घडल्यास खेळाडूचा वैयक्तिक प्रमाद घडतो:

१) प्रतिस्पर्ध्याजवळ चेंडू असताना अगर नसताना त्याच्या प्रगतीत अडथळा आणणे. (Blocking)

२) प्रतिस्पर्ध्यास हालचाल करण्यास प्रतिबंध करणे. (Holding)

३) चेंडू खेळण्याच्या योग्य स्थितीत नसताना प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मागून येऊन दांडगाई करून त्याच्या जवळचा चेंडू घेण्याचा प्रयत्न करणे. (Guarding from the rear)

४) पायात पाय अडकवून प्रतिस्पर्ध्यास पाडणे‚ त्याला धरून ठेवणे‚ धक्का मारणे किंवा बाजूस ढकलणे.

५) आडदांडपणाच्या अन्य युक्त्या वापरणे.

६)    दांडगाईचा खेळ करून प्रतिस्पर्ध्यास जखमी करणे (खेळाडूस सहेतुकपणे जखमी करणाऱ्या खेळाडूस मैदानाबाहेर काढले जाईल आणि त्याच्या संघाविरुद्ध दोन फ्री थ्रो दिले जातील.

गोल करण्यासाठी चेंडू टाकत असलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध वैयक्तिक प्रमाद घडला असेल व त्या वेळी गोल झाला असेल‚ तर गोलाची नोंद होईल आणि प्रतिपक्षास एक जादा फ्री थ्रो मिळेल. गोल झाला नसल्यास गोल करण्याच्या प्रयत्नात असलेला खेळाडू त्या वेळी थ्री पॉइंट सर्कलच्या बाहेर असेल‚ तर तीन फ्री थ्रो मिळतील आणि तो खेळाडू थ्री पॉइंट सर्कलच्या आत असेल‚ तर दोन फ्री थ्रो मिळतील.

गोलात चेंडू टाकत नसलेल्या खेळाडूविरुद्ध वैयक्तिक प्रमाद घडला असेल‚ तर प्रतिपक्षास बाजूच्या रेषेबाहेरून थ्रो-इन मिळेल.

बास्केटबॉल सहेतुक प्रमाद (Intentional Foul) –

चेंडू खेळण्याऐवजी चेंडूचा ताबा असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूशी दांडगाई करण्याचा प्रयत्न केला‚ तर तो सहेतुक प्रमाद होतो. (हातात चेंडू असलेला खेळाडू सहेतुक प्रमाद करीत नाही‚ असे नाही.) प्रमादी खेळाडूच्या नावे वैयक्तिक प्रमादाची नोंद होईल आणि प्रतिपक्षास दोन फ्री थ्रो मिळतील. वारंवार सहेतुक प्रमाद करणारा खेळाडू बाद होण्यास पात्र ठरतो. गोल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खेळाडूविरुद्ध सहेतुक प्रमाद घडला व गोल झाला‚ तर त्याची नोंद होईल आणि प्रतिपक्षास एक जादा फ्री थ्रो मिळेल. गोल झाला नाही‚ तर कोणत्या जागेवरून (थ्री पॉइंट सर्कलच्या बाहेरून की आतून) गोल करण्याचा प्रयत्न केला होता‚ ते पाहून तीन किंवा दोन फ्री थ्रो दिले जातील.

बास्केटबॉल दुहेरी प्रमाद (Double Foul)

दोन विरोधी खेळाडूंचा परस्परांविरुद्ध एकाच वेळी वैयक्तिक प्रमाद घडला असेल‚ तर त्याला दुहेरी प्रमाद मानून संबंधित खेळाडूंच्या नावे वैयक्तिक प्रमादाची नोंद केली जाईल. जवळच्या वर्तुळात चेंडू संबंधित खेळाडूंमध्ये उडवून खेळ पुढे सुरू होईल. या वेळी फ्री थ्रो दिला जात नाही.

बास्केटबॉल बहुविध प्रमाद (Multiple Foul)

एका संघाचे दोन किंवा अधिक खेळाडू एकाच प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध एकाच वेळी वैयक्तिक प्रमाद करतात. संबंधित प्रमादी खेळाडूंच्या नावे एका वैयक्तिक प्रमादाची नोंद होईल आणि प्रतिपक्षाला एकूण दोन फ्री थ्रो मिळतील. गोल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खेळाडूविरुद्ध बहुविध प्रमाद घडला व गोल झाला‚ तर त्याची नोंद होईल आणि एक जादा फ्री थ्रो दिला जाईल.

बास्केटबॉल खेळाडूंचे पाच प्रमाद

ज्या खेळाडूच्या नावे पाच प्रमादांची (तांत्रिक व वैयक्तिक) नोंद होते‚ तो खेळाडू सामना पुढे खेळण्यास अपात्र ठरतो. त्याने क्रीडांगणाबाहेर गेले पाहिजे. खेळाडूचा पाचवा प्रमाद हा कोचचा प्रमाद मानून कोचच्या नावे तशी नोंद केली जाईल. पाच प्रमाद करणारा खेळाडू बाहेर जाताच ३० सेकंदांच्या आत बदली खेळाडू क्रीडांगणात आला पाहिजे.

बास्केटबॉल संघ प्रमाद

सामन्याच्या एका सत्रात संघातील खेळाडूंचे एकूण चार प्रमाद (तांत्रिक व वैयक्तिक) झाले‚ तर त्या सत्रातील उर्वरित खेळात संघाच्या खेळाडूंच्या प्रत्येक वैयक्तिक प्रमादाबद्दल प्रतिपक्षास दोन फ्री थ्रो मिळतात. (जादा वेळेसाठी सामना खेळला गेला‚ तर तो खेळ दुसऱ्या डावाचाच भाग मानला जाईल.)


बास्केटबॉल फ्री थ्रो (Free Throw)

खेळाडू‚ बदली खेळाडू किंवा कोच यांच्याकडून तांत्रिक प्रमाद घडला किंवा खेळाडूकडून वैयक्तिक प्रमाद घडला‚ तर प्रतिपक्षाला फ्री थ्रो करावयास संधी मिळते.

प्रतिपक्षाच्या अंगणातील फ्री थ्रो रेषेच्या मागून बास्केटमध्ये चेंडू फेकावयाचा असतो‚ फ्री थ्रो करणाऱ्याला कोणत्याही खेळाडूने अडथळा आणावयाचा नसतो. चेंडू ताब्यात मिळाल्यापासून पाच सेकंदांच्या आत कोणत्याही पद्धतीने चेंडू फेकावयाचा असतो.

वैयक्तिक प्रमादाबद्दल फ्री थ्रो मिळाला असेल‚ तर ज्याच्याविरुद्ध प्रमाद घडला असेल‚ त्या खेळाडूने फ्री थ्रो करावयाचा असतो. (जखमी झाल्याने त्याला फ्री थ्रो करणे शक्य नसेल‚ तर त्याच्याऐवजी बदली खेळाडू फ्री थ्रो करू शकतो. बदली खेळाडू उपलब्ध नसेल‚ तर कोणत्याही खेळाडूस फ्री थ्रो करावयास परवानगी दिली जाते.) तांत्रिक प्रमादाबद्दल फ्री थ्रो मिळाला असेल‚ तर कोणत्याही खेळाडूला फ्री थ्रो करता येईल.

फ्री थ्रो केला जात असताना अंतिम रेषेजवळच्या पहिल्या फ्री थ्रो लेनमध्ये अंतिम रेषेपासून १.७५ मी. अंतरामध्ये कोणताही खेळाडू उभा असणार नाही. पहिल्या लेनमध्ये दोन्ही बाजूंना दोन प्रतिस्पर्धी उभे राहतील. इतर खेळाडू आलटून-पालटून उभे राहतील. चेंडूचा कडीला स्पर्श होईपर्यंत त्यांनी आपल्या जागा सोडावयाच्या नाहीत. कोच किंवा बदली खेळाडूच्या तांत्रिक प्रमादाबद्दल फ्री थ्रो असेल‚ तर खेळाडूंनी फ्री थ्रो लेन्समध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही. (न्यूट्रल झोनमध्ये कोणीही उभे राहणार नाही.)

चेंडूचा कडीला स्पर्श होईपर्यंत फ्री थ्रो करणाऱ्याने फ्री थ्रो रेषेला अगर रेषेपुढील जमिनीला स्पर्श करावयाचा नाही. त्याचा नियमभंग झाला‚ तर गोल दिला जाणार नाही. खेळाडूच्या प्रमादाबद्दल फ्री थ्रो असेल‚ तर प्रतिपक्षास थ्रो-इन मिळेल. कोच किंवा बदली खेळाडूच्या तांत्रिक प्रमादाबद्दल फ्री थ्रो असेल तर फ्री थ्रो संपल्यानंतर फ्री थ्रो करणाऱ्या संघास बाजूच्या रेषेबाहेरून‚ थ्रो-इन मिळेल.

चेंडू बास्केटकडे वरून खाली जाताना‚ चेंडू बास्केटवर किंवा बास्केटमध्ये असताना कोणत्याही खेळाडूने चेंडूला अगर बास्केटला स्पर्श करावयाचा नाही. फ्री थ्रो करणाऱ्याच्या साथीदाराकडून असा नियमभंग घडला‚ तर गोल दिला जाणार नाही आणि प्रतिपक्षास थ्रो-इन मिळेल. कोच किंवा बदली खेळाडूच्या तांत्रिक प्रमादाबद्दल फ्री थ्रो असेल आणि असा नियमभंग घडला‚ तर फ्री थ्रो करणाऱ्या संघास बाजूच्या रेषेबाहेरून थ्रो-इन मिळेल. दोन्ही संघांचा एकाच वेळी नियमभंग घडला‚ तर गोल दिला जाणार नाही व फ्री थ्रो रेषेवर चेंडू वर उडवून खेळ सुरू होईल. प्रतिपक्षाच्या खेळाडूचा नियमभंग असेल‚ तर फ्री थ्रो करणाऱ्या संघास एक गुण मिळेल.

फ्री थ्रो केलेल्या चेंडूचा कडीला स्पर्श होईपर्यंत किंवा चेंडूचा कडीला स्पर्श होणार नाही अशी स्पष्ट स्थिती येईपर्यंत कोणत्याही खेळाडूने नियंत्रित क्षेत्राच्या रेषेला किंवा आतील जमिनीला स्पर्श करावयाचा नाही. फ्री थ्रो करणाऱ्या खेळाडूच्या साथीदाराचा असा नियमभंग झाला व गोल झाला असेल‚ तर त्याची नोंद होणार नाही. प्रतिस्पर्ध्याचा असा नियमभंग झाला व गोल झाला‚ तर त्याची नोंद होईल आणि गोल झाला नाही‚ तर फ्री थ्रो करणाऱ्या त्या खेळाडूस एक जादा फ्री थ्रो दिला जाईल. दोन्ही संघांचा एकाच वेळी नियमभंग झाला व गोल झाला‚ तर याची नोंद होईल. गोल झाला नसेल‚ तर फ्री थ्रो रेषेवर चेंडू उडवून खेळ सुरू होईल.

खेळ सुरू होण्यापूर्वी‚ जादा वेळेचा खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा मध्यंतरासाठी खेळ थांबला असताना घडलेल्या तांत्रिक प्रमादाबद्दल मिळालेल्या दोन फ्री थ्रोनंतर मध्य वर्तुळात चेंडू उडवून खेळ पुढे सुरू केला जातो.

खेळाडूच्या प्रमादाबद्दल मिळालेल्या फ्री थ्रोपैकी शेवटचा फ्री थ्रो करून गोल झाला‚ तर प्रतिपक्षास अंतिम रेषेबाहेरून थ्रो-इन मिळेल आणि गोल झाला नाही‚ तर चेंडू खेळात राहील. चेंडूचा कडीला स्पर्श झालाच नाही‚ तर प्रतिपक्षाला बाजूच्या रेषेबाहेरून थ्रो-इन मिळेल.

कोचच्या तांत्रिक प्रमादाबद्दल मिळालेल्या फ्री थ्रोमुळे गोल झाला किंवा गोल झाला नाही‚ तर फ्री थ्रो करणाऱ्या संघाच्या कोणत्याही खेळाडूस बाजूच्या रेषेबाहेरून थ्रो-इन करता येईल.

वैयक्तिक प्रमादाबद्दल फ्री थ्रो मिळाल्यावर फ्री थ्रोऐवजी त्या संघास थ्रो-इन करण्याची मुभा असते. त्या वेळी मध्य रेषेबाहेरून थ्रो-इन करावा.


बास्केटबॉल त्रुटित काळ (Basketball Time Out)

पुढील प्रसंगी खेळ थांबविला जातो व त्या वेळी घड्याळ बंद केले जाते :

१) नियमभंग होणे‚ प्रमाद घडणे.
२) चेंडू हातात पकडून ठेवणे.
३) खेळाडू जखमी होणे.
४) खेळाडूस पंचाने / सरपंचाने क्रीडांगणाबाहेर काढणे.
५) अन्य कारणासाठी खेळ थांबविण्याचा पंचाने / सरपंचाने आदेश देणे.
६) २ सेकंदांचा इशारा होणे.
७) दांडगाईचा खेळ होणे किंवा प्रमाद घडणे.
८) त्रुटित काळाची मागणी.

बास्केटबॉल विनंतीनुसार त्रुटित काळ (Basketball Charged Time out)

चेंडू खेळात नसताना किंवा फील्ड गोल झाल्यावर त्रुटीत काळासाठी कोच गुणलेखकाला खेळ थांबविण्याची विनंती करू शकतो (Charged Time Out). विनंतीनुसार गुणलेखक खेळ थांबविण्याचा इशारा पंच / सरपंच यांना करतो. पहिल्या दोन सत्रांत प्रत्येक संघाला प्रत्येक सत्रात एकदा आणि पुढील दोन सत्रांत प्रत्येक संघाला तीन वेळा त्रुटित काळाची मागणी करता येते.

संबंधित संघाच्या नावे त्रुटित काळाची नोंद केली जाईल. प्रत्येक जादा वेळेच्या खेळात प्रत्येक संघाला एकदा त्रुटित काळाची मागणी करता येईल. एखाद्या संघाने एखाद्या सत्रात त्रुटित काळाची मागणी केली नाही तर त्या त्रुटित काळाची मागणी पुढील सत्रामध्ये करता येणार नाही.

त्रुटित काळाचा अवधी एक मिनिटाचा राहील.

फ्री थ्रो आणि थ्रो इन घेतला जात असताना त्रुटित काळाची मागणी मान्य करता येणार नाही. खेळ चालू असताना त्रुटित काळाची मागणी चेंडू ताब्यात असणाऱ्या संघास करता येईल. त्रुटित काळात खेळाडू मैदानातून आपल्या बेंचकडे जाऊ शकतात.

खेळाडू जखमी झाल्याने खेळ थांबला‚ तर त्या त्रुटित काळाची नोंद संघाच्या नावे होणार नाही. तसेच बाद केलेल्या (Disqualification) किंवा पाच प्रमाद घडलेल्या खेळाडूच्या जागी ३० सेकंदांच्या आत बदली खेळाडू आत आला‚ तर संबंधित संघाच्या नावे त्रुटित काळाची नोंद होणार नाही.


बास्केटबॉल बदली खेळाडू नियम

संघातील जे खेळाडू प्रत्यक्ष क्रीडांगणावर खेळत नसतात‚ त्यांना बदली खेळाडू म्हणतात. सामन्यात सर्व खेळाडूंच्या जागी बदली खेळाडू घेता येतील. चेंडू खेळात नसताना बदली खेळाडू घेता येईल.

नियमभंगानंतर ज्या संघाकडे थ्रो-इन करण्यासाठी चेंडू असेल‚ त्या संघाला बदली खेळाडू घेण्याची मागणी करता येईल. त्या वेळी प्रतिस्पर्धी संघालाही बदली खेळाडू घेता येईल. बदली खेळाडूने पंचांच्या परवानगीने आत येताना आपला क्रमांक आणि बाहेर जाणाऱ्या खेळाडूचा क्रमांक सांगावा. सत्रानंतर खेळ थांबला असताना बदली खेळाडू घ्यावयाचे ठरले‚ तर नवीन सत्राच्या सुरुवातीस त्याने गुणलेखकास सूचना द्यावी.

बदली खेळाडू घेण्याचे काम विनाविलंब तीस सेकंदांच्या आत व्हावे. जर वेळेत बदली खेळाडू घेतला नाही‚ तर त्या संघाच्या नावे त्रुटित काळाची नोंद होईल. त्या संघाकडे त्या सत्रात त्रुटित काळ शिल्लक नसेल‚ तर त्या संघाच्या कोचच्या नावे तांत्रिक प्रमादाची नोंद होईल.

१) थ्रो इन साठी किंवा फ्री थ्रो साठी चेंडू खेळाडूकडे दिला असेल तर त्या वेळी बदली खेळाडूची मागणी करता येणार नाही.

२) मैदानावरील एक खेळाडू जखमी झाल्याने पुढे खेळण्यास असमर्थ असेल तर त्याच्या जागी बदली खेळाडू घ्यावाच लागेल.

३) फील्ड गोल झाला त्या वेळी चौथे सत्र किंवा जादा वेळेतील खेळ संपण्यास दोन मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ राहिला असेल तर प्रतिस्पर्धी संघास बदली खेळाडू घेता येईल.


बास्केटबॉल – गोल (बास्केट) व गुण नियम

१) खेळातील चेंडू बास्केटमधून वरून खाली येतो त्या वेळी गोल (बास्केट) होतो. अंगणाच्या कोणत्याही भागातून चेंडू बास्केटमध्ये टाकता येतो.

२) चेंडू बास्केटमध्ये खालून वर गेला‚ तर गोल होत नाही. चेंडू मुद्दाम खालून वर असा टाकला असेल‚ तर तो नियमभंग मानून प्रतिस्पर्ध्यास बाजूच्या रेषेबाहेरून थ्रो-इन मिळेल.

३) फ्री थ्रोमुळे गोल झाला असेल‚ तर गोल करणाऱ्या संघास एक गुण मिळतो. फ्री थ्रो केलेल्या चेंडूचा कडीला स्पर्श झाल्यावर आक्रमक किंवा संरक्षक खेळाडूचा वैधरीत्या चेंडूस स्पर्श झाला आणि त्या वेळी गोल झाला‚ तर त्या गोलसाठी दोन गुण दिले जातात. संरक्षक खेळाडूने चुकून आपल्याच संघाच्या बास्केटमध्ये चेंडू टाकल्याने गोल झाला‚ तर प्रतिस्पर्धी संघास त्या गोलचे दोन गुण दिले जातील.

खेळाडूने जाणीवपूर्वक आपल्याच संघाच्या बास्केटमध्ये चेंडू टाकला आणि गोल झाला तर त्या गोलची नोंद होणार नाही. तो नियमभंग आहे. थ्री पॉइंट सर्कलच्या बाहेरून फील्ड गोल केला‚ तर तीन गुण मिळतात. थ्री पॉइंट सर्कलच्या आतून फील्ड गोल केला‚ तर दोन गुण मिळतात.

४) पूर्ण सामन्यात अधिक गुण मिळविणारा संघ विजयी होतो.

५) फील्ड गोल झाला असेल किंवा वैयक्तिक प्रमादाबद्दल मिळालेल्या शेवटच्या फ्री थ्रोमुळे गोल झाला असेल‚ तर ज्या संघावर गोल झाला असेल‚ त्या संघाचा खेळाडू अंतिम रेषेच्या बाहेरून चेंडू मैदानात फेकील किंवा आपल्या साथीदाराकडे पास करील. गोल झाल्यानंतर पाच सेकंदांच्या आत चेंडू खेळात आला पाहिजे.

६) कोचच्या तांत्रिक प्रमादामुळे फ्री थ्रो मिळाला असेल आणि फ्री थ्रोनंतर गोल झाला असेल किंवा नसेल‚ तर फ्री थ्रो करणाऱ्या संघाचा खेळाडू मध्य रेषेच्या बाहेरून चेंडू थ्रो-इन करील.

७) सत्र समाप्तीचा इशारा झाला किंवा सामना संपण्याची वेळ झाल्याचा किंवा जादा वेळेतील खेळाचा वेळ संपल्याचा वेळाधिकाऱ्याने इशारा करण्यापूर्वी किंवा इशारा करताना खेळाडूचा प्रमाद घडला असेल‚ तर फ्री थ्रोनंतर खेळ थांबवावा. खेळ संपण्याचा इशारा होण्यापूर्वी बास्केटकडे फेकलेल्या चेंडूने गोल झाला‚ तर तो मान्य होईल.

८) फील्ड गोल करण्याची कृती (Motion) सुरू झाल्यावर त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा प्रमाद घडला व त्या वेळी गोल झाला‚ तर तो गोल नोंदविला जाईल. पंचाने / सरपंचाने शिट्टी वाजविल्यानंतर कृती सुरू झाली असेल‚ तर गोल दिला जाणार नाही.

९) प्रतिपक्षाच्या नियंत्रित क्षेत्रात असणाऱ्या आक्रमक खेळाडूस वरून कडीकडे चेंडू येत असताना चेंडूचा कडीला स्पर्श होईपर्यंत चेंडूला स्पर्श करता येणार नाही. तसेच गोल होण्यासाठी टाकलेला चेंडू कडीच्या वर असताना खेळाडूला प्रतिस्पर्ध्याच्या बास्केटला किंवा फळ्याला स्पर्श करता येणार नाही. आक्रमक खेळाडूचा असा नियमभंग झाला व गोल झाला‚ तर तो नोंदला जाणार नाही. प्रतिपक्षाला बाजूच्या रेषेबाहेरून थ्रो-इन मिळेल.

१०) प्रतिस्पर्ध्याने गोल होण्यासाठी फेकलेला चेंडू खाली येऊन कडीला स्पर्श करेपर्यंत किंवा चेंडू कडीला स्पर्श करणार नाही हे स्पष्ट होईपर्यंत संरक्षक खेळाडूस चेंडूला स्पर्श करता येणार नाही. संरक्षक खेळाडूने चेंडू कडीच्या वर असताना बास्केट‚ कडीच्या मागील ४५ सें.मी. × ५९ सें.मी. मापाचा आयत किंवा आयताच्या आत असलेला चेंडू यांना स्पर्श करावयाचा नाही; तसेच बास्केटमधील चेंडूलाही स्पर्श करावयाचा नाही. संरक्षक खेळाडूच्या अशा नियमभंगाबद्दल आक्रमक संघास एक / दोन / तीन फ्री थ्रो दिले जातील. अंतिम रेषेच्या बाहेरून थ्रो-इन करून खेळ पुढे सुरू होईल.

११) तिसरे सत्र सुरू होण्यापूर्वी तीन मिनिटे अगोदर कप्तानांना खेळ सुरू होण्याबाबत सूचना दिली जाईल. खेळ सुरू करण्याची पंचाने / सरपंचाने घोषणा केल्यानंतर एका मिनिटाच्या आत एखादा संघ क्रीडांगणावर हजर झाला नाही‚ तर चेंडू खेळात येईल आणि गैरहजर संघ हरल्याचे जाहीर केले जाईल.

१२) सरपंचाने सांगूनही संघाने खेळण्याचे नाकारले‚ तर तो संघ हरल्याचे जाहीर केले जाईल.


बास्केटबॉल सामना अधिकारी माहिती

सामन्यासाठी एक सरपंच व एक पंच असे अधिकारी असतात आणि त्यांना दोन गुणलेखक‚ एक वेळाधिकारी आणि एक २४ सेकंद वेळाधिकारी हे सहायक असतात. अधिकाऱ्यांनी काळ्या रंगाचे कॅनव्हास (बास्केटबॉल) शूज व पायमोजे‚ करड्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट वापरावी.

सरपंच सामना सुरू होण्यापूर्वी साहित्याची तपासणी करून साहित्याला मान्यता देईल. सामना सुरू करताना मध्य वर्तुळात चेंडू उडविणे‚ गुणलेखक आणि वेळाधिकारी यांच्यामध्ये एखाद्या बाबीबाबत एकमत नसल्यास अंतिम निर्णय देणे; मध्यंतरानंतर‚ सामना संपल्यावर किंवा कोणत्याही वेळी गुणपत्रकाची तपासणी करणे‚ गोल झाला किंवा नाही याबाबत एकमत नसल्यास अंतिम निर्णय देणे इत्यादी जबाबदाऱ्या सरपंचाला पार पाडाव्या लागतात.

खेळ सुरू करण्यापूर्वी पंच व सरपंच निर्णय देण्यासाठी क्रीडांगणाची विभागणी करतील. ते नियमानुसार सामन्याचे संचालन करतील. योग्य वेळी खेळ थांबविणे व सुरू करणे‚ नियमभंग आणि प्रमादाबाबत योग्य शासन करणे‚ त्रुटित काळाची मागणी मान्य करणे‚ बदली खेळाडूस परवानगी देणे इत्यादी बाबतींत त्यांनी निर्णय द्यावयाचे असतात. सामना सुरू होण्याच्या अगोदर वीस मिनिटे‚ मध्यंतराचा कालावधी‚ प्रत्यक्ष सामन्याचा कालावधी या वेळेत क्रीडांगणावर व क्रीडांगणाबाहेर घडलेल्या प्रमादांबाबत संबंधितांना शासन करण्याचा त्यांना अधिकार आहे.

खेळाडूचा नियमभंग किंवा प्रमाद घडला‚ तर ते योग्य इशारा करतील. खेळाडूचा प्रमाद घडताच ताबडतोब शिट्टी वाजवून खेळाडूच्या क्रमांकाचा गुणलेखकाला इशारा करतील आणि फ्री थ्रो रेषेकडे निर्देश करतील किंवा थ्रो-इन करावयास सांगतील किंवा जंप बॉल घेतला जाईल. या वेळी पंच व सरपंच आपल्या जागांची अदलाबदल करतील. गोल झाला‚ तर त्यांनी शिट्टी वाजवावयाची नाही. गैरवर्तन किंवा असभ्य वर्तन करणाऱ्या खेळाडूला / बदली खेळाडूला किंवा कोचला शासन करण्याचा त्यांना अधिकार आहे.

गुणलेखक सर्व खेळाडूंच्या नावांची व क्रमांकाची नोंद ठेवतो. गुणपत्रकात तो दोन्ही संघांचे गुण‚ गोल‚ फ्री थ्रो यांची नोंद करतो. प्रत्येक खेळाडूच्या तांत्रिक व वैयक्तिक प्रमादाची नोंद ठेवतो आणि एखाद्या खेळाडूच्या नावे पाच प्रमाद होताच त्याबाबत सरपंचाला इशारा करतो. विनंतीनुसार घेतलेल्या त्रुटित काळाची नोंद ठेवतो. सामन्याची वेळ संपल्यानंतर चेंडू खेळात नसताना सामना संपल्याचा तो इशारा करतो.

सामना सुरू करण्याची व सामना संपण्याच्या वेळेची नोंद वेळाधिकारी ठेवतो. खेळाच्या वेळेची व खेळ थांबलेल्या वेळेची तो नोंद ठेवतो. विनंतीनुसार त्रुटित काळ मान्य केल्यावर तो संबंधित घड्याळ (Time out watch) सुरू करतो आणि वेळ संपताच गुणलेखकामार्फत सरपंचाला इशारा करतो. मध्यंतराची किंवा सामना संपल्याची वेळ होताच घंटा वाजवून तो खेळाची वेळ संपल्याचा इशारा करतो.

‘२४ सेकंद वेळाधिकारी’ नियमाप्रमाणे इशारा करतो आणि त्याचा इशारा होताच चेंडू ‘डेड’ मानला जातो.

आज आपण पाहिली Basketball Information in Marathi.

पुढे वाचा:

Leave a Reply