
बाबा आमटे निबंध मराठी – Baba Amte Essay in Marathi
कधी कधी सत्य हे स्वप्नापेक्षाही अधिक अद्भूत बनते. नाहीतर एक प्रथितयश वकील, एका शहराचा नगराध्यक्ष, घरातील सुखसर्वस्वाचा त्याग करून ओसाड माळावर एक नवे जग बसवायला जाईल, हे कधी खरे तरी वाटले असते का? पण हे खरे आहे. बाबा आमटे या थोर समाजसेवकाच्या बाबतीत हे असे अघटित घडले आहे.
बाबा आमट्यांचे सारे जीवनच असे अद्भुतरम्य आहे. १९१४ साली विदर्भातील एका सुखवस्तू घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. पराभवाच्या तडाख्याने खचून न जाणे हेच खरे जीवन, हा संस्कार बाबांवर बालवयात झाला. त्यामुळे वकील झालेले बाबा त्या व्यवसायात समाधानी नव्हते. त्यांना सतत असामान्यत्वाचे वेध लागले होते.
एक विलक्षण क्षण बाबांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देऊन गेला. पावसाच्या दिवसांत बाबा एकदा रस्त्याने जात असता त्यांना रस्त्यात एक महारोगी दिसला. प्रथमदर्शनी बाबांना त्याची किळस वाटली. पावसात तो भिजत होता म्हणून बाबांनी त्याच्या अंगावर पोते टाकले; पण त्याला स्पर्श केला नाही. बाबा पुढे गेले, तेव्हा त्यांच्या विवेकी मनाने त्यांना टोचणी लावली, ‘तू केलेस हे बरोबर केलेस? त्या महारोग्याच्या जागी तू असतास तर?’ हाच क्षण बाबांच्या जीवनातला साक्षात्काराचा क्षण ठरला.
बाबांनी त्याच क्षणी आपल्या घरादाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला व आपले कार्य सुरू केले. ज्यांना समाजाने दूर फेकलेले होते, अशा अनाथांना बाबांनी जवळ केले. त्यांच्यासाठी ओसाड माळरानावर नवे जग वसवले. अनेक आपत्तींना त्यांनी तोंड दिले. त्या ओसाड माळरानावर एक नवा चमत्कार उभा केला. बाबांनी अपंगांसाठी आनंदवन निर्माण केले. आनंदवन हा केवळ एक आश्रम नाही, तर त्या वरोड्याच्या जागेत त्यांनी निर्माण केलेले नंदनवनच आहे. या नंदनवनात बाबांनी अपंगांचे व्यक्तिमत्त्व फुलवले आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे.
त्यांना स्वावलंबी बनवले आहे. बाबा अपंगांचे दोस्त बनले आहेत. बाबांच्या या थोर समाजसेवेची महती सांगताना वि. स. खांडेकर लिहितात, “वकिलीच्या चांगल्या चालत्या धंदयाकडे पाठ फिरवून अगतिक महारोग्यांना पोटाशी धरणाऱ्या या महात्म्याचे नाते बुद्ध, ख्रिस्त, गांधी, विनोबा, टॉलस्टॉय, विवेकानंद आणि डेमियन श्वायत्सर यांच्यासारख्या पुरुषांशी आहे.”
बाबांनी आपले कार्य येथेच थांबवले नाही. समाजातील अंध मुलांना त्यांनी एकत्र केले व त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची दृष्टी दिली. समाजातील तरुण पिढी आज आदर्शहीन झाली आहे, हे बाबांच्या लक्षात आले. सुट्टीत त्यांनी अशा तरुणांना एकत्र आणले. त्यांची शिबिरे भरवली. बाबा आजही या तरुणांना नवी दृष्टी देतात. त्यांच्यासाठी नवी कार्यक्षेत्रे निर्माण करतात.
मृतप्राय झालेल्या समाजाला संजीवन देणारे बाबा आमटे हे थोर समाजसुधारक आहेत. वय झाले, शरीर थकले तरी बाबांच्यातील समाजसेवक थकला नाही. म्हणून तर नर्मदा आंदोलन, भारत जोडो अशा चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यांच्या या कार्याचा गौरव त्यांना मेगॅसेसे पारितोषिक देऊन केला गेला.
पुढे वाचा:
- लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- अपंग आणि मी निबंध मराठी
- अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी
- अनाथालयास भेट निबंध मराठी
- अंधश्रद्धेचा बळी समाज निबंध मराठी
- अंधश्रद्धा निबंध मराठी
- अंतराळ संशोधन निबंध मराठी
- दूरदर्शन नसते तर निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- मकरसंक्रांत निबंध मराठी
- प्रजासत्ताक दिन निबंध मराठी
- नवीन वर्ष निबंध मराठी
- पावसाळा निबंध मराठी
- मानव आणि पर्यावरण
- पर्यावरण निबंध मराठी