अस्पृश्यता एक कलंक मराठी निबंध-Asprushyata Ek Kalank Essay in Marathi
अस्पृश्यता एक कलंक मराठी निबंध

अस्पृश्यता एक कलंक मराठी निबंध – Asprushyata Ek Kalank Essay in Marathi

‘नरेचि केला हीन किती नर ।’ या छोट्याशा पदय-चरणात कवी केशवसुतांनी केवढे मोठे विदारक सत्य सांगितले आहे. ईश्वराने माणसांना निर्माण करताना भेदभाव ठेवला नाही. सर्वांना सारखेच अवयव दिले. पण माणसाने मात्र वंश- जात – धर्म इत्यादी कृत्रिम भेद निर्माण करून माणसामाणसांत मोठमोठ्या सामाजिक, भावनिक दऱ्या निर्माण केल्या आहेत.

प्राचीन काळी नित्यकर्मांच्या सोयीसाठी वर्णपद्धती निर्माण करण्यात आली आणि या चातुर्वर्त्यांतूनच जाती-उपजाती जन्माला आल्या. श्रमविभागणी तत्त्वातून काहींच्या वाट्याला गावातील, समाजातील हलकी कामे आली. ही कामे कनिष्ठ दर्जाची असली तरी सर्व माणसांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. पण उच्च दर्जाची कामे ज्यांना मिळाली, त्या लबाड, स्वार्थी समाजाने कनिष्ठ दर्जाची कामे करणाऱ्या काही लोकांना हीन मानून ही कामे वर्षानुवर्षे त्यांच्या व त्यांच्या वंशजांच्या माथी मारली. त्यांना हीन, अपवित्र समजून दूर ठेवण्यात येऊ लागले. त्यातून ‘अस्पृश्यते ‘चा जन्म झाला.

मूठभर उच्चप्रतिष्ठित लोक एवढे स्वार्थी बनले की, त्यांनी या दलितांना विकासाची सर्व दारे बंद केली. ज्ञानार्जनाचा त्यांचा हक्क हिरावून घेऊन त्यांना अज्ञानांधकारात चाचपडत ठेवले. त्यांच्या स्पर्शाने पाणीही अपवित्र होते, असे ठरवून त्यांना निसर्गनिर्मित पाण्यापासूनही वंचित केले. दारिद्र्य त्यांच्या सदैव सोबतीला ठेवलेले असे. देव-देवतांच्या मंदिरांची दारे त्यांच्यासाठी बंद केली गेली. इतकेच काय पण त्यांची सावलीही अपवित्र ठरवून त्यांना गावाबाहेर ठेवले गेले.

वर्षानुवर्षे दडपून ठेवलेला हा दलित समाज आता जागृत झाला आहे. स्वतःच्या अस्तित्वाची व अस्मितेची जाणीव झालेल्या या समाजाने अन्यायाचा प्रतिकार सुरू केला आहे. ‘माणसासारखा माणूस अस्पृश्य कसा?’ हा त्यांचा प्रश्न आहे. या अस्पृश्यतेमुळे भारतातील राष्ट्रीय एकात्मता आज धोक्यात आली आहे. खरोखरच अस्पृश्यता हा मानवसमाजावरील फार मोठा कलंक आहे. आपल्या सद्वर्तनानेच आपण तो कायमचा पुसला पाहिजे. त्यासाठी ‘ते माझे, मी त्यांचा, एकच ओघ अम्हातुनि वाहे ‘ हा आपला जीवनमंत्र झाला पाहिजे.

पुढे वाचा:

Leave a Reply