अशी झाली माझी फजिती मराठी निबंध-Ashi Zali Mazi Fajiti Essay in Marathi
अशी झाली माझी फजिती मराठी निबंध

अशी झाली माझी फजिती मराठी निबंध – Ashi Zali Mazi Fajiti Essay in Marathi

लहानपणापासून मला सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याची सवय झालेली. दिसायला गुटगुटीत, गोरापान व वृत्तीने अवखळ असल्यामुळे घरीदारी सर्वत्र मला नावाजत असत. शाळेत गेल्यावर या कौतुकात भरच पडली. अभ्यासात हुशार, बोलण्यात चतुर आणि सर्व खेळांत प्रवीण, त्यामुळे सर्वांच्या तोंडी सदैव माझे नाव असे. अपयश, निराशा यांचा अनुभव मला तेव्हा कधीच आला नव्हता.

वर्गसोबत्यांनी माझे पुढारीपण केव्हाच मान्य केले होते. सातवीपर्यंत असे निरंकुश राज्य मी भोगत आलो होतो, पण वर्गात नीलेश आला आणि माझ्या या अधिसत्तेला धक्का बसणार असे दिसू लागले. मात्र हे कटुसत्य मान्य करायला मी तयार नव्हतो.

नीलेश मुंबईहून आमच्या शाळेत आला होता. अभ्यासात तो हुशार होताच, इंग्लिश भाषेवर त्याचे चांगलेच प्रभुत्व होते, त्यामुळे नीलेश सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला. आपल्या कौतुकात वाटेकरी झालेल्या नीलेशविषयी माझ्या मनात मत्सर निर्माण झाला.

एका शनिवारी दुपारी क्रिकेटचा सामना ठरला होता. वर्गातील विदयार्थ्यांतून दोन संघ तयार केले गेले. एका संघाचा कर्णधार मी होतो, तर दुसऱ्याचा कर्णधार होता नीलेश. सामना सुरू होण्यापूर्वी माझ्या वल्गना सुरू होत्या. ‘अरे बघा, आमचाच संघ जिंकतो की नाही ते !’ नीलेश गप्प होता; नुसता हसत होता.

नाणेफेक मी जिंकली आणि मोठ्या रुबाबात पहिला गडी म्हणून खेळायला गेलो. नीलेशच्या चौथ्या चेंडूलाच माझा त्रिफळा उडाला. थोड्याच वेळात आमचा सारा संघच कोसळला. दुसऱ्या डावातही तसेच झाले. नीलेश मात्र अतिशय सुंदर खेळला. त्याच्या खेळात डौल होता. स्वाभाविकच विजयश्रीने त्याला माळ घातली. माझी मात्र पुरेपूर फजिती झाली. अशा वेळीही नीलेश माझ्यापाशी आला व ‘Better luck next time’ अशी शुभेच्छा देऊन, त्याने माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुकर घातली.

पुढे वाचा:

Leave a Reply