
आणि झाडे गप्प झाली निबंध मराठी
त्या दिवशी शाळेत वृक्षारोपणाचा समारंभ झाला. त्यानंतर आम्ही मित्र वृक्षवेलींवर गप्पा मारत होतो. मध्येच एक मित्र म्हणाला, “ही झाडे आपल्यासारखी का नाही बोलत बुवा?” हे ऐकून मला एक एक कल्पना सुचू लागली. मी सांगू लागलो–“अरे, पूर्वी पर्वत अचल नव्हते, त्यांना पंख होते. मनात येईल तिथे ते जाऊ शकत. त्याचप्रमाणे या भूमीवरील झाडे बोलू शकत. वडाचे झाड पिंपळाशी गप्पा मारी. इतकेच नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी हे वटवृक्ष स्वत:च पूजेला येणाऱ्या स्त्रियांना सावित्रीची कथा सांगत.
मोगरा फुलला की तो मुलींना हाका मारी आणि सुवासिक फुले त्यांना देऊन टाकी. त्यामुळे त्यावेळी फुलांची, फळांची कोणी चोरी करत नसे. वसंत ऋतूचे आगमन झाले की, झाडे आनंदाने मोहरत. त्या आनंदात ती गाऊ लागत. सारे वातावरण संगीतमय सुगंधित होऊन जाई.
या झाडांचा एकच धर्म होता, तो म्हणजे ‘सेवाधर्म’! ती स्वत: उन्हात उभी राहायची, पावसाचा वर्षाव सहन करायची, झोंबणारी थंडी सोसायची आणि येणारी फुले, फळे माणसांना दयायची. फळांनी लगडलेले वृक्ष माणसांसाठी खाली ओथंबायचे. माणसांकडूनही त्यांना प्रेम मिळायचे, माया लाभायची. माणसे त्यांना कौतुकाने स्पर्श करायची, त्यांची देखभाल करायची. असे हे परस्परांतील जिव्हाळ्याचे भावबंधन होते.
पण काळ बदलला. माणसांतील माणुसकी हरवली. माणसे स्वार्थी बनू लागली. उंच इमारती बांधण्यासाठी त्यांनी झाडे तोडण्यास सुरवात केली. रहदारी वाढली, मोठ्या रस्त्यांची निकड निर्माण झाली, तसे जुने जुने वृक्षही तोडण्यात आले. इंधनासाठी झाडांची तोड सुरू झाली. जेव्हा हा सारा अन्याय असह्य झाला, हे आक्रमण अति झाले, तेव्हा सारी झाडे एकत्र झाली आणि त्यांनी माणसांकडे मोर्चा आणला.
‘अरे कृतघ्नांनो,” झाडे म्हणाली, ” वर्षानुवर्षे आम्ही उन्हात उभे राहून तुम्हांला सावली देतो, आमची पाने हलवून तुम्हांला थंड वारा देतो. आमची मधुर फळे देऊन तुमच्या जिभेचे चोचले पुरवतो, आमची पाने तुमच्या मंगलकार्याला उपयोगी पडतात. आमच्या साली, मुळे तुम्हांला औषधे पुरवतात. आमच्या पानाफुलांनी तुमच्या घरांची, बागांची, शहरांची शोभा वाढते.
“हे सारे विसरून आज तुम्ही आमच्याच जिवावर उठला आहात. तुमच्या हे कसे लक्षात येत नाही की, अशी आमची तोड केली तर तुम्हांला पाणी मिळणे मुष्किल होईल, कारण आकाशातील मेघांना आमच्याशिवाय कोणीही आकर्षित करू शकत नाही. मानवांनो, तुम्ही इतके दुष्ट व कृतघ्न आहात की, आमची तोड तर करताच; पण आमच्यावर विसावणारे आमचे मित्र-हे पक्षी- त्यांची देखील हत्या करता. काय अपराध केलेला असतो त्या निष्पाप जीवांनी? सांगा बरे !
“माणसांनो, तुमच्या वागण्यातील भोंदूपणाचा आम्हांला उबग येतो. इतर वेळी आमच्याशी निष्ठुरपणे वागणारे तुम्ही वनमहोत्सवाच्या निमित्ताने दोन-चार दिवस आमचे कौतुक करता. तुमच्यातील काही विद्वान कवी आमच्यावर कविता करतात. पण तुमच्या या दांभिक वागणुकीचा वीट येऊन आम्ही आता तुमच्याशी बोलण्याचे सोडून देणार आहोत.” असे सांगून झाडे कायमची गप्प झाली.
पुढे वाचा:
- आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी
- अस्वच्छता आणि प्रदूषण मराठी निबंध
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- हवा प्रदूषण मराठी माहिती
- जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- रस्त्यावरील अपघात मराठी निबंध
- अशी झाली माझी फजिती मराठी निबंध
- अशी झाली चांदण्यातील सहल निबंध मराठी
- अवचित मिळालेला मोकळा तास मराठी निबंध