
अंधश्रद्धेचा बळी समाज निबंध मराठी – Andhashradecha Bali Samaj Marathi Nibandh
अंधश्रद्धा म्हणजे स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य घटकच पूर्वापार चालत आलेले अंधश्रद्धेचे खूळ आजच्या युगातही आपली रुप बदलत नाही मग ती स्त्री सुशिक्षित असो वा अशिक्षित.
उदाहरणच दयायचे झाले तर मूल व्हावे म्हणून व्रतवैकल्ये, साधुसंन्यासी यांची जारणमारणादी, भविष्यवाणी. माणूस आजारी पडला तर त्याला डॉक्टरकडे न नेता त्याला देवाची करणी झाली असेल म्हणून त्याच्या गळ्यात तथाकथित बाबाकडून मंचून आणलेले गंडे दोरे बांधणे, क्षय, कर्करोग, महारोग अशा दुर्धर आजारावर इलाजाची सोय असताना देखील, तो रोग आपणास झाला आहे व समाजाकडून अवहेलना होईल या भीतीने त्यावर इलाजच केला जात नाही. परिणामत: मृत्यूस कारणीभूत होतो शिवाय तोपर्यंत अंथरुणाला खिळून राहून मृत्यूची वाट पहावी लागते.
मूल नसेल तर वांझोटी ठरेल या भीतीने कुणीही काहीही सांगेल तसे वागायचे कारण मूल नाही तर जीवनच निरुपयोगी आहे अशा समजूतीने मनात न्यूनगंड जोपासला जातो. सासूसासरे, समाजाकडून होणारी सततची निंदा याने त्रासून स्त्री मुल होण्यासाठी कोणतेही अघोरी उपाय करुन घ्यायला प्राप्त होते किंवा अकाली मृत्यूस मरतेवेळी कोण पाणी पाजणार ! ही भावना किंवा कवटाळते. कारण मुलगा नसेल तर वंशाचा दिवा कसा तेवणार ! या अंधश्रद्धा मनात खोलवर रुजलेल्या असतात.
समाजातील अशिक्षित लोक व निरक्षरता यास कारणीभूत असतात. कारण घरात आईवडिल, सासूसासरे अशिक्षित व अर्धशिक्षित असतात व त्यांच्या अपत्यांवर त्यांच्या विचारांचा अधिक प्रभाव असतो. त्यांनी जास्त पावसाळे पाहिलेत व त्यांचा अनुभव दांडगा आहे त्यामुळे सुशिक्षित लोकांनादेखील त्यांच्या अविचाराला बळी पडावे लागते.
काही समाजात तर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणे म्हणजे पाप समजतात कारण मूल म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे. व देवाच्या देणगीचा शस्त्रक्रिया करून रोष ओढवून घेणे त्यांना मान्य नसते. त्यामुळे जास्त मुले झाली तरी सांभाळायची या भावने पोटी मुलांचे प्रमाण वाढते व ओघाने दारिद्रयही वाढते. कमावणारा कर्ता माणूस एक व खाणारी तोंडे अधिक त्यामुळे घरात सुबत्ता येतव नाही. दारिद्रयाशी झगडावे लागते. त्यामुळे गरिबी हटण्यासाठी ‘कुटूंब लहान सुख महान’ या धोरणाचा अवलंब करायला हवा. कुटूंबाची वाताहात होते व देशाचे आर्थिक पाठबळ किंवा सामर्थ्य नष्ट होते. अवर्षण, दुष्काळ, महापूर अशा विपत्तींना तोंड देणे देशाला दुरापास्त होते. त्यातच भूकबळी, हुंडाबळी यांचे प्रमाण वाढते.
या सर्वाला अंधश्रद्धाच कारणीभूत आहे. स्त्री तिची पहिली बळी असते. काही ठिकाणी आजार झाल्यास त्या भागाला डागण्या देतात तसेच साप चावल्यास देवळात नेऊन गुलाल खाऊ घालतात अशा प्रक्रियांनी रुग्ण बरा होत नाहीच तर डागणीचे दुःख सहन करावे लागते. साप चावून गुलाल खाऊनही मृत्यू आला तर पूर्वजन्मीचे पाप म्हणून वाचला नाही असा गैरसमज असतो. चावणारा साप विषारी असेल तर रुग्ण कसा वाचणार ? किंवा एखादी व्यक्ती पिसाटाप्रमाणे करत असेल तर मांत्रिकाला बोलावून अंगात भूत शिरले आहे म्हणून झाडपाला खायला घालतात, व्यक्तीला झोडपूना काढतात किंवा लिंबू, कोंबडा, बकरा त्या व्यक्तीवरुन उतरुन स्मशानात टाकतात.
अगर देवाच्या देवळात, जत्रेत एखादी व्यक्ती हातवारेकरुन झुलायला लागली तर देवीचा दूत म्हणून तिला आपल्या तक्रारी सांगून निवारण मागितले जाते कारण तिच्या अंगात देवीने प्रत्यक्ष प्रवेश केलेला आहे अशी समजूत असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्या विकृतीपासून न सोडवता संरक्षणच मिळते.
या क्रियांच्यामुळे सर्व समाज अंधश्रद्धांना बळी पडून स्वत:बरोबरच देशाचेही नुकसान करतो. साक्षरतेसाठी कितीही हाकाटी केली सुविधा पुरविल्या तरीही समाजमनावर पूर्वापार भिनलेल्या वृत्तीच मूळ धरुन असतात. या अंधश्रध्दा समाजातून समूळ नष्ट करण्यासाठी नरेंद्र दाभोळकरांसारखे अंधश्रध्दा निर्मूलन प्रवर्तक निर्माण व्हायला हवेत.
पुढे वाचा: