Air Pollution in Marathi : मानवाने पृथ्वीवर पसरवलेल्या प्रदूषणामुळे, मानवाला वेळोवेळी नवीन आजारांना सामोरे जावे लागते. दिवसेंदिवस पर्यावरणातील ताजी हवा कण, सेंद्रिय रेणू आणि इतर हानिकारक पदार्थांच्या समावेशामुळे प्रदूषित होत आहे.

वायू प्रदूषण ही पर्यावरणीय समस्यांपैकी एक प्रमुख समस्या आहे, ज्याचे निराकरण सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी करणे आवश्यक आहे. या लेखात आपण वायू प्रदूषणाबाबत सविस्तर चर्चा करू.

हवा प्रदूषण-Air Pollution
हवा प्रदूषण, Air Pollution

हवा प्रदूषण मराठी माहिती – Air Pollution in Marathi

Table of Contents

प्रदूषण म्हणजे काय?

मूळ लॅटिन शब्द ‘Pollutus’ म्हणजे अस्वच्छता, घाण करणे होय. ‘Pollutus’ शब्दावरून ‘Pollution’ हा शब्द आला, त्याला मराठीत ‘प्रदूषण’ म्हणतात.

प्रदूषण व्याख्या मराठी

मानव, प्राणी व इतर जीवांना जगावयास घातक ठरतील अशा पदार्थांची, द्रव्याची निर्मिती केल्याने ‘प्रदूषण’ निर्माण होते. अशुद्ध द्रव्ये, दुर्गंधी, विषारी घटक यांच्यामुळे हवेतील ‘प्राणवायूचे प्रमाण २०.९५ टक्क्यांपेक्षा कमी होते. तसेच पाण्यातील प्राणवायूचेही प्रमाण कमी होते. त्यापासून आरोग्याला हानी पोहोचते, त्यालाच प्रदूषण म्हणतात. पाणी, हवा, जमीन यांच्या प्रदूषणाबरोबरच तीव्र प्रखर’ अशा ध्वनीच्या खडखडाटामुळे आवाजाचेही प्रदूषण घडते. जोराच्या ध्वनी / आवाजामुळे कानठळ्या बसून बहिरेपणा येतो. अस्वस्थता, अशांतता निर्माण होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण धोक्याचे ठरू लागले आहे.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषणाचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

 1. हवा प्रदूषण
 2. जलप्रदूषण
 3. मृदा प्रदूषण
 4. ध्वनिप्रदूषण

या लेखामध्ये आपण हवेच्या प्रदूषणाची माहिती करून घेणार आहोत.


वातावरण म्हणजे काय?

पुरेसे वस्तुमान असलेल्या वस्तूभोवतालचे वायू, बाष्प आणि धूलिकण ह्यांनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण होय.

पृथ्वीवरील वातावरणातील हवेचे घटक

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीभोवती भूपृष्ठापासून सुमारे ४०० ते ५०० कि.मी. उंचीपर्यंत वातावरणाचे वेगवेगळे थर भूपृष्ठाला चिकटून निर्माण झाले आहेत. वातावरणात जड व हलके वायू आहेत. जड वायू भूपृष्ठालगत, तर हलके वायू उंचावर आढळतात. आपल्या पृथ्वीभोवती वातावरणाचे पुढील थर आढळून येतात –

 1. तपांबर
 2. स्थितांबर
 3. दलांबर

वातावरणाच्या भूपृष्ठालगतच्या थराला ‘तपांबर’ असे म्हणतात. या तपांबरात उंचीनुसार हवा विरळ होत जाते. वातावरणातील हवेत विविध वायू, सूक्ष्मजीव, धूलिकण, पाण्याची वाफ इ. घटक तरंगत असतात. वातावरणातील ‘तपांबर’ हा थर जीवसृष्टीचा संरक्षक आधार आहे. हवेशिवाय कोणीही सजीव जगू शकणार नाही.

पृथ्वीवर भूपृष्ठालगतच्या तपांबरातील हवेचे महत्त्वाचे घटक

वातावरण, नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, कार्बनडाय ऑक्साइड, हायड्रोजन यांसारख्या जड वायूंबरोबरच निऑन, हेलियम, क्रिफ्टॉन, झेनॉन, ओझोन इत्यादी हलक्या वायूंचे प्रमाण असते. जड वायू भूपृष्ठालगत तर हलके वायू जास्त उंचीवर तरंगत असतात. वातावरणातील तपांबरात भूपृष्ठालगत पुढीलप्रमाणे वायूंच्या घटकांचे प्रमाण आढळून येते.

वायूवातावरणातील प्रमाण (टक्क्यांमध्ये)
नायट्रोजन७८.०९ (९९.०४%)
ऑक्सिजन (प्राणवायू)(Co2)२०.९५
ऑर्गन००.९३
कार्बन डाय ऑक्साइड (Co2)००.०३
हायड्रोजन (H2o)००.०१

भूपृष्ठालगतच्या वातावरणाच्या थरात नायट्रोजन, ऑक्सिजन इत्यादी जड वायूंचे प्रमाण सुमारे ९९% आहे; तर इतर हलक्या वायूंचे प्रमाण केवळ १ टक्का आहे. मानवासह सर्व सजीवांच्या दृष्टीने वनस्पती, प्राणी, कीटक यांच्या पोषणाला उपयुक्त असा भूपृष्ठालगतचा ‘तपांबर’ हा थर आहे. कारण याच थरात सजीवांना आवश्यक असे सर्व घटक उपलब्ध आहेत. जमीन, पाणी, हवा, इत्यादींचा सजीवांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग होतो. शुद्ध हवा व शुद्ध पाणी यांची जीवसृष्टीच्या निर्मिती व विकासाला आवश्यकता असते. वातावरणातील घटकांचा समतोल बिघडल्याने प्रदूषण घडून येते.


हवा प्रदूषण मराठी माहिती प्रकल्प – वायू प्रदूषण

आपल्याभोवती अदृश्य असा हवेच्या घटकांचा, आपणास जगवणारा, श्वासावाटे आपल्याला जिवंत ठेवणारा (अत्यंत) आवश्यक असा भाग म्हणजे ‘हवा’ होय, हवेशिवाय आपण जगू शकत नाही.

हवा प्रदूषण व्याख्या मराठी

आपल्या भोवतालच्या पर्यावरणात विघातक बदल केल्याने सजीवांच्या व मानवाच्या कार्यक्षमतेत घट होत जाते. अशा भूपृष्ठावरील हवेतील घाण, टाकाऊ पदार्थांना प्रदूषके’ म्हणतात व त्यातून हवेचे प्रदूषण होते. पर्यावरणाला व मानवाला हानी होईल इतकी हवा अस्वच्छ होणे, हवेत विषारी घटक मिसळणे, हवेत दुर्गंधी येणे अशा अनेक बाबींचा मानवी व इतर सजीवांच्या आरोग्यावर हवेतून दुष्परिणाम होणे म्हणजे हवेचे प्रदूषण’ होय.

अशुद्ध द्रव्यमिश्रित हवा : ज्या हवेत प्राणवायूचे प्रमाण २०.९५ टक्क्यांपेक्षा कमी असते ती ‘दूषित हवा’ आराग्यास घातक असते. अतिऔदयोगिकीकरण, अणुयुद्धे, रासायनिक घटकांचा अयोग्य वापर, रासायनिक खते व कीटकनाशकांचा अती व अयोग्य वापर, वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहनांच्या संख्येत वाढ, अतिनागरीकरण, वाढती लोकसंख्या, अमर्याद जंगलतोड इत्यादी हवेचे प्रदूषण घडवून आणणारी महत्त्वाची कारणे आहेत. या मानवी कृतीतून जे प्रदूषण होते, त्याला ‘मानवी प्रदूषण’ म्हणतात.

निसर्गाचे शोषण केल्याने व अतिऔदयोगिकीकरणामुळे, वाहनांची संख्या वाढल्याने हवेचे प्रदूषण ही आज एक जागतिक गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाचा प्रश्न सर्वच सजीवांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम करू लागला आहे. अनेक रोगांच्या सार्थीमुळे सजीवांची शक्ती क्षीण होत चालली आहे.

हवा प्रदूषण मराठी माहिती–Air Pollution in Marathi
हवा प्रदूषण मराठी माहिती, Air Pollution in Marathi

हवा प्रदूषण कारणे – वायू प्रदूषण कारणे

हवेच्या प्रदूषणाची कारणे :

मानवनिर्मित म्हणजेच मानवाच्या अतिशोषण करण्याच्या प्रवृत्तीमुळे, निसर्गसंपत्तीच्या वापरामुळे, तसेच रासायनिक घटकांच्या अतिनिर्मितीमुळे हवेचे प्रदूषण सर्वत्र निर्माण झाले आहे. हवा प्रदूषणाची/हवा दूषित होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत

हवा प्रदूषण-Air Pollution (1)
हवा प्रदूषण, Air Pollution

१) औद्योगिकीकरण

कारखानदारी वाढली. महाराष्ट्रात १९७१ मध्ये १०,२४१ कारखाने होते. २००१ मध्ये एकूण कारखान्यांची संख्या २८,३२४ इतकी (२.८ पटीने जास्त) वाढलेली आहे. यंत्रांचा वापर अनेक कारणांसाठी वाढला. कारखान्यातील यंत्रांना गती, शक्ती, ऊर्जा मिळविण्यासाठी खनिजतेल (पेट्रोल-डिझेल), कोळसा, अणुशक्ती इत्यादींचा वापर केला जातो.

अॅल्युमिनियम, लोह-स्टील, पेट्रोलियम, सिमेंट, कोळसा, कागद, खतनिर्मिती, तांबे, रबर, काचनिर्मिती, साखर कारखाने, सूत, कापड गिरण्या, प्लॅस्टिक अशा अनेक उदयोगधंदयांमधून वस्तू निर्माण करताना इंधन शक्तीचा वापर करतात; तेव्हा हवेत अनेक प्रकारचे विषारी वायू सोडले जातात. या कारखान्यातून निर्माण झालेला विषारी धूर व दुर्गंध वातावरणात मिसळून हवेचे प्रदूषण वाढवतात. पेट्रोल, डिझेल, कोळसा, अणुशक्तीच्या वापरामधून, त्यांच्या ज्वलनातून कार्बनचे कण, गंधक, भस्मे (सल्फरडाय ऑक्साइड इ.), हायड्रोजन सल्फाइड हे विषारी वायू बाहेर पडतात. हायड्रोजन सल्फाइड हा वायू अत्यंत विषारी वायू आहे.

डिझेल, पेट्रोल, कोळसा व अणू यांच्या इंधन ज्वलनातून, त्यांचा वापर यंत्रात केल्यानंतर त्यातून कार्बन डाय ऑक्साइड (CO2), कार्बन मोनॉक्साइड (CO), नायट्रोजन ऑक्साइड (NO, NO2), सल्फर डाय ऑक्साइड (SO2), कोळशाचे कण हे कारखान्याच्या किंवा यंत्राच्या धुरातून बाहेर पडतात व हवा प्रदूषित होते. रासायनिक कारखाने, साखर – रबर उदयोग, खत कारखाने, कागद उदयोग, सिमेंट उदयोग, औष्णिक कारखाने हे प्रदूषणनिर्मितीत आघाडीवर आहेत. कोळशाच्या धुरातील कणात ४० ते ६० टक्के गंधक व पेट्रोल शुद्धीकरणातूनही मोठ्या प्रमाणात गंधक बाहेर पडतो व तो हवेचे प्रदूषण करतो. धूळ, राख, काजळी, वाफ हे विषारी पदार्थ बाहेर पडतात.

आज औदयोगिकीकरण झालेल्या प्रदेशात सर्वात जास्त हवेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात. हवेच्या किंवा पाण्याच्या प्रदूषणाला प्रादेशिक मर्यादा नसतात. दूषित हवा जेथे जेथे जाईल, तेथे तेथे ती प्रदूषण घडवून आणते व त्यातून रोगराईचे भयानक स्वरूप निर्माण होते. अनेक जीव दगावतात.

मानवनिर्मित सुमारे ३०,००० अपायकारक रसायने पृथ्वीवर वातावरणात भूपृष्ठालगतच्या हवेत प्रदूषण घडवून आणतात. औदयोगिक विकासाने प्रदेश भकास केला का ? प्रदूषण वाढले का ? रोगराई वाढली का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘होय’ म्हणूनच मिळतात. कारण औदयोगिक विकास करताना कारखानदाराने कारखान्यात निर्माण केलेल्या हवेचे व पाण्याचे प्रदूषण नियंत्रित करण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे का ? हवा व पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा नसेल तर या कारखान्यांना उत्पादन व प्रदूषण करायला परवानगी का देण्यात आली ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

२) वाहतुकीत वाढ – वाहनांचा वापर

मोटार सायकल, स्कूटर, रिक्षा, टेम्पो, टॅक्सी, ट्रक, ट्रॅक्टर्स, प्रवासी वाहने, खाजगी वाहने या सर्व प्रकारच्या वाहनांची रस्त्यावर एवढी गर्दी वाढलेली असते, की वाहने उभी करायला जागा मिळत नाही. या सर्व वाहनांची संख्या दरवर्षी वाढत आहे. म्हणजेच या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल या इंधन-ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंच्या घटकांचे प्रमाणही दरवर्षी वाढते आहे. घर तेथे किंवा कुटुंब तेथे मोटारसायकल, स्कूटर, मोटारींची संख्या मोजली तर गरीबांच्या घराबाहेर झोपडपट्टीतसुद्धा अगदी मोटार सायकल दिसते.

महाराष्ट्रात १९७१ मध्ये सर्व प्रकारच्या इंधन ऊर्जेच्या वाहनांची एकूण संख्या सुमारे ३ लाख ११ हजार होती. त्यानंतर २००१ साली एकूण वाहनांची संख्या ६६ लाख ७ हजार झाली. म्हणजेच या काळात एकूण २१ पटींनी वाहनांची संख्या (अवघ्या तीस वर्षात) वाढली. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या या वाहनांकडून याच पटीने अपूर्ण इंधन ज्वलनातून हवेत धूर व प्रदूषके बाहेर पडतात व हवेचे प्रदूषण घडवून आणतात.

भारतातही याच प्रमाणात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहनांच्या धुरांमधून नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनाक्साइड, हायड्रोजन, कार्बन्स, शिशाची संयुगे बाहेर पडतात व त्यापासून वातावरण दूषित होते. अप्रगत देशात जुन्या मोटारगाड्या वापरतात व हलक्या प्रतीचे इंधन वापरतात; त्यामुळेही प्रदूषण घडून येते. हवेचे ७४ टक्के प्रदूषण हे स्वयंचलित वाहनांमुळे घडून येते.

वाहनातील यंत्रात पेट्रोलचे ज्वलन सावकाश व्हावे म्हणून त्यात ‘टेट्रा इथिल लेड’ या शिशाच्या संयुगाचा वापर होतो. त्यामधील धूरामधून शिशाचे कण हवेत मिसळून वातावरण दूषित करतात. कोळसा, पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन कण, धूर, कार्बनडाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनाक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड व अनेक विषारी वायू बाहेर पडून हवेत मिसळतात व त्यामुळे हवा प्रदूषित होते.

कोळशावर चालणाऱ्या रेल्वे इंजिनमधूनही प्रदूषके निर्माण होतात. विमानातून इंधनज्वलनातून नायट्रोजन ऑक्साइड वायू बाहेर पडतो व तो मोठ्या प्रमाणात हवेतील प्राणवायू व ओझोन वायू नष्ट करतो.

भूपृष्ठापासून सुमारे ४० कि.मी. उंचीवर ओझोन या हलक्या वायूचा थर आहे. सूर्याकडून येणाऱ्या अतिउष्ण, नीलातीत (अतिनील) किरणांचे ओझोन या हलक्या वायूच्या थराकडून शोषण केले जाते; त्यामुळे आपल्याला, सर्व जीवांना, वनस्पतींना, मानव व इतर प्राण्यांना आवश्यक तेवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. म्हणजे सर्वांचे या विषारी प्रखर उष्णतेपासून संरक्षण होते.

ओझोनचा हा थर नसता तर पृथ्वीवर सर्वत्र अतिउष्ण नीलातीत (अतिनील) किरणांमुळे सजीवांचे जगणे अशक्य झाले असते. म्हणूनच पृथ्वीभोवती ‘ओझोन’ हा थर ब्लॅन्केटसारखे संरक्षक कवच बनला आहे. जंबोजेट, काँकार्ड, सुपरसॉनिक इत्यादी विमानांकडून इंधनज्वलनातून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइडमुळे हा ओझोनचा थर पातळ बनत चालला आहे.

सर्वच वाहनांची संख्या इतकी वाढली आहे, की वाहने रस्त्यावर लावायला व रहाण्याच्या ठिकाणी लावायला जागा अपुरी पडू लागली आहे. रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळ व गर्दीमुळे हवेचे प्रदूषण जास्त घडून येत आहे.

३) अतिनागरीकरण

शहरांची संख्या वाढत आहे. शहरात अनेक मजली इमारती, झोपडपट्ट्या, कारखाने व उदयोगधंदयांची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे शहरांमध्ये वस्ती व उदयोगांमधून बाहेर टाकलेला कचरा, कारखान्यांची धुरांडी, वाहनांची वाढ, सांडपाण्याची अपुरी व्यवस्था यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. शहरांच्या या हवा-पाणी प्रदूषणाचा दुष्परिणाम होऊन रोगराई वाढते. शहरे सुजतात. सर्व सोयी शहरात अपूर्ण पडतात. झोपडपट्टयात दलदल, डबकी वाढतात व हवा दूषित होते. त्यामूळे शहरे घाणेरडी बनत आहेत.

मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली यांसारख्या शहरांत हवेच्या प्रदूषणाने रोगराईंचे प्रमाण सतत वाढत आहे. उदा. मुंबई शहरात वाहने, वस्तीतील टाकाऊ पदार्थ, कचरा यांमुळे हवेत सर्वांत जास्त कार्बन मोनाक्साइड व सल्फर डाय ऑक्साइड या विषारी वायूंचे प्रमाण वाढत आहे. एकट्या चेंबूर भागात वरील विषारी वायूंचे प्रमाण ६० टक्के आहे. चेंबूर भागाला विषारी वायूंचे ‘चेंबर’ म्हणतात.

गेल्या ५० वर्षांत अनेक देशांमध्ये शहरीकरण हे कारखानदारीमुळे वाढत चालले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक खेड्यांचे रूपांतर मोठ्या शहरांमध्ये होत आहे. त्यामुळे अशा शहरात वाढती लोकसंख्या, बेकारी, रोगराई, महागाई, सर्व सोयींची अपूर्ण व्यवस्था यांसारखे प्रश्नही वाढतच आहेत.

४) हरितगृह वायू परिणाम

ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे पृथ्वीवर वातावरणात असलेल्या इतर वायूघटकांमुळे वातावरणाचे संतुलन कायम राहते. त्यात प्रामुख्याने कार्बनडाय ऑक्साइड, मिथेन, जलबाष्प इ. चा समावेश होतो. मात्र मानवाच्या वर्तनाने शीतगृहांचा अतिरेकी वापर, वाहनांचा अतिवापर त्यामुळे इंधनाचे होणारे ज्वलन, परिणामी कार्बनमोनोक्साइड (Co) क्लोरोफ्ल्युरो, ऑक्साइड (CFC), नायट्रिक उदा. ऑक्साइड (No), नायट्रस ऑक्साइड (N2O), हायड्रोझाईल (OH) क्लोरिन (CL), ब्रोमीन (Br), ब्रोमोफ्ल्युरो कार्बन यांचा समावेश होतो. हे घटक वातावरणातील ओझोनच्या थराला धक्का पोहोचवतात. नायट्रस ऑक्साइड (N2O) हा ओझोनच्या थराला सर्वात जास्त हानी पोहोचवतो. उत्तर गोलार्धात ओझोनच्या थराचे प्रमाण दर दशकाला ४% कमी होत आहे.

ओझोन

ज्या हरितगृह वायूच्या निर्मितीमुळे पृथ्वीच्या पर्यावरणालाच जबर धक्का पोहोचण्याचा संभव निर्माण होतो; त्यात पृथ्वीच्या वातावरणाचे जे संरक्षक कवच समजले जाते, त्या ओझोनच्या थरालाच धक्का पोहोचतो. या ओझोनविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

पृथ्वीच्या वातावरणात ओझोन (O3) ची घनता जास्त असलेल्या पृथ्वीपासूनच्या २० ते ३० कि.मी. उंचीवरील हवेच्या थराला ‘ओझोनचा पट्टा’ म्हणतात. सूर्याच्या किरणांपासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे (UV-C) ही ओझोनमुळे शोषली जातात. ही अतिनील किरणे (UV-C) सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. त्याचप्रमाणे सूर्यापासून निघणारी (UV-B) ही अतिनील किरणे त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सूर्यापासून निघणारी (UV-A) ही किरणे ओझोन थरातून आरपार जातात. ही किरणे पृथ्वीपर्यंत जशीच्या तशी पोहोचतात; परंतु (UV-A) ही किरणे सजीवांना कमी हानिकारक असतात.

५) वाढती लोकसंख्या

अनेक देशांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातही प्रदूषणाचा प्रश्न अतिशय भयानक रूप धारण करू लागला आहे. शहरांमध्ये अतिलोकसंख्या वाढली की, आरोग्य, शिक्षण, रहाण्याच्या सोयी, अन्नपाणी-पुरवठा व वाहतूक सोई अपुऱ्या पडू लागतात.

गरीबी, बेरोजगारीमुळे अनेक लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. तेथे सांडपाण्याची, गटारांची योग्य व्यवस्था नसते. शौचालये पुरेशी नसतात. त्यामुळे अस्वच्छता वाढून हवा प्रदूषण वाढते. शहरी पर्यावरणावर ताण पडतो. रोजगार मिळत नसल्याने अनेक लोक गुन्हेगारीकडे वळतात. झोपडपट्ट्यांमधून व गलिच्छ वस्त्यांमधून राहतात.

झोपडपट्ट्या विविध रोगांचे, आरोग्य समस्यांचे आगर बनतात. चोऱ्या, मारामाऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांना झोपडपट्ट्यांमधून आधार मिळतो. लोक व्यसनी बनतात. एड्स, टी.बी., कॉलरा, कॅन्सर यांसारखे आजार पसरतात. शुद्ध हवा, पाणी उपलब्ध नसल्याने. अनेक खाड्यांमध्ये- झोपडपट्ट्यांमधून दलदल वाढते. डास व पिसवा वाढतात. रोगांच्या साथी पसरतात. लहान मुले कुपोषित होतात.

भारताची लोकसंख्या १९७१ मध्ये ५४.८ कोटी होती. त्यानंतर ४० वर्षांमध्ये म्हणजे इ.स. २०११ मध्ये भारताची लोकसंख्या १२१ कोटी झाली. अवघ्या चाळीस वर्षांत लोकसंख्या दुपटीहून जास्त (२.२० पटींनी) वाढलेली आहे. महाराष्ट्राची १९७१ ची लोकसंख्या ५ कोटी होती; ती २०११ मध्ये अवघ्या चाळीस वर्षांत ११ कोटी झाली, म्हणजे दुपटीहूनही जास्त (२.२ पट) वाढलेली आहे. त्यामुळे निसर्गाची जमीन व पाण्याची क्षमता कमी कमी होत आहे. म्हणजेच अन्न-पाणी अपुरे पडू लागले आहे. याच प्रकारे लोकसंख्या वाढली तर निसर्गाची पोषणक्षमता कमी होऊन आवश्यक उपयुक्त घटकांची कमतरता निर्माण होईल.

वाढत्या लोकसंख्येमुळे हवेतील प्राणवायूच्या उपयोगाचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी कमी होत आहे, तर कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे हवेत, तापमानात बदल होत आहे. नैसर्गिक उत्पादने व लोकसंख्या यांच्यात असमतोल निर्माण झाला आहे.

वाढती लोकसंख्या (कोटीमध्ये)

वर्षे १९७११९८११९९१२००१२०११४० वर्षांतील वाढीचे प्रमाण
१) जग३६३४४०५५०६०५६०६.५१.७ पटीने
२) भारत५४.८६८.४८४.८१०५.०१२१.०२.२ पटीने
३) महाराष्ट्र५.०६.२७.८९.६११.०२.२ पटीने

जमिनीला लोकसंख्या पोसण्याच्या ही मर्यादा असतात. जमिनीत वाढ होत नाही. लोकसंख्येत मात्र वाढ होते, म्हणून असमतोल निर्माण होतो. प्रदूषण वाढते. उदा. ३ मी x ३ मी एवढ्या ९ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीवर १००० लोक कसे राहू शकतील?

हवेचे ९० टक्के प्रदूषण करणारी प्रमुख प्राथमिक प्रदूषके

 1. कार्बन मोनाक्साइड
 2. नायट्रोजन ऑक्साइड
 3. सल्फर ऑक्साइड
 4. हायड्रोकार्बन्स
 5. रासायनिक पदार्थांची धूळ : सूक्ष्म कण

वर दिलेल्या कोष्टकावरून १९७१ ते २००१ या चाळीस वर्षांच्या काळात जगाची लोकसंख्या १.७ पटीने (जवळजवळ दुप्पट) वाढलेली आहे, तर भारत व महाराष्ट्राची लोकसंख्या २.२ पटीने म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढलेली आहे. त्यामुळे लोकांच्या गरजाही वाढत आहेत. अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, वैदयकीय सुविधा अशा विविध प्रकारच्या आवश्यक व महत्त्वाच्या गरजा आहेत. या गरजा भागविण्याची क्षमता जमिनीकडे नाही. कारण पृथ्वीवरील भूभाग व जलभाग कायमस्वरूपी आहेत. जमिनीत वाढ होत नाही.

स्वच्छ हवा-पाण्याचे प्रमाण अपुरे पडते; पण त्या गरजा भागवून घेणारी लोकसंख्या मात्र सतत वाढत आहे.

अनेक अविकसित व विकसनशील देशांमध्ये ‘लोकसंख्येचा स्फोट’ घडून आला. जलद व प्रमाणाबाहेर वाढलेल्या लोकसंख्या प्रमाणाला ‘लोकसंख्येचा स्फोट’ म्हणतात. प्रदूषण, बेकारी, गरीबी वाढली. अनेक ठिकाणी उपासमार घडून भूकबळींची संख्या वाढली.

६) वनस्पतीत/वनक्षेत्रात घट

पर्यावरणाच्या संतुलनासाठी कोणत्याही प्रदेशात सामान्यः ३३ टक्के क्षेत्र जंगलाखाली असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ ९ टक्के क्षेत्र (उपग्रह छायाचित्रावरून) जंगलाखाली आहे. त्यात अजून २४ टक्के क्षेत्र जंगलाखाली आणले पाहिजे.

भारतात एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १२ टक्के क्षेत्र (२०११) जंगलाखाली आहे. त्यात २१ टक्के क्षेत्र जंगलाखाली आणले पाहिजे. याचाच अर्थ असा की, वाढते शहरीकरण, औदयोगिकीकरण, वाढती लोकसंख्या यांच्यामुळे मानवाने जमिनीवरील मूळची जंगले व शेतीखालील क्षेत्र वस्त्या हे उदयोगांच्या विकासासाठी उपयोगात आणले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगले तोडली गेली. जंगले नष्ट झाली. शेती क्षेत्रावरही वस्त्या व उदयोगांचे आक्रमण होऊन शेती क्षेत्र घटले. निसर्गातील सजीवांच्या या आधाराच्या घटकांमध्ये घट झाल्याने प्रदूषण निर्माण झाले.

विकासाच्या नावाखाली निसर्ग संपत्तीचा गैर व जास्त प्रमाणात वापर केला गेला. अन्नासाठी, शेतीविस्तारासाठी, राहण्यासाठी, नोकरी-चरितार्थ, व्यवसायासाठी, कारखान्यांच्या विस्तारासाठी व स्थापनेसाठी, वाहतुकीसाठी, रस्ते-लोहमार्गांच्या विकासासाठी सतत जास्तीत जास्त जागेची गरज भासत गेली. शेती, वसाहतीच्या विस्तारामुळे जंगले तोडली गेली. गावांचे आकार वाढले; पण जमीन मात्र अन्नासाठी अपुरी पडत गेली.

जंगलतोड केल्यामुळे, निसर्गातील हवेच्या शुद्धीकरणाची क्षमता कमी होते. शुद्धीकरण यंत्रणा बिघडते. कारण गेल्या शंभर वर्षांत हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे हवेत उष्णता/तापमान वाढते. पाण्याचे बाष्पीभवन जलद होऊन भूभागावरील पाणी कमी होते.

७) युद्धातील अण्वस्त्रे

युद्धात वापरलेला दारूगोळा, अणुस्फोट, विषारी स्फोटके, रासायनिक द्रव्ये यांच्यामुळे हवेचे प्रदूषण होते. दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण व स्फोट यातून प्राणहानी व वित्तहानी झाली. इराक-इराण (१९९१) मध्ये झालेल्या अण्वस्त्र वापरामुळे किरणोत्सर्गी धूळ हवेत पसरली. हवेचे प्रदूषण झाले. त्यामुळे अनेक लोक दगावले.

ॲटमबॉम्ब, हैड्रोजन बॉम्ब, न्यूट्रॉन बॉम्ब यांसारख्या भयानक अस्त्रांमुळे हजारो सजीव मृत्युमुखी पडतात. सजीवांबरोबर वनस्पतींचा नाश होतो. या स्फोटाच्या प्रदूषण व अग्निज्वालातून जे पदार्थ बाहेर पडतात, त्यांचे दुष्परिणाम पुढे सुमारे २०-२५ वर्षांपर्यंत जाणवत रहातात. लहान अर्भके दुबळी-पांगळी बनतात. जीवांच्या वाढीला योग्य, पोषक आरोग्यदायक स्थिती राहत नाही.

प्रगत राष्ट्रे नेहमीच अणुस्फोटाच्या चाचण्या करतात; त्यातून विषारी धुळीमुळे हवा प्रदूषित होते. अणुभट्ट्यांमधून इंधनाची राख हवेत पसरुन प्रदूषण होते. त्यामुळे जीवसृष्टी संकटात येते. प्रदूषणातून संपूर्ण मानवजात रोगट बनते आहे. अमेरिकेने रासायनिक द्रव्यांचा फवारा विमानातून केला. त्याने जीवितहानी झाली. ही रासायनिक युद्धाची सुरुवात होती. १९९१ मध्ये संयुक्त संस्थाने, इराक व आखाती राष्ट्रांमध्ये अणुबॉम्बचा वापर झाला. त्याने प्रचंड नुकसान झाले.

८) अणुभट्टी स्फोट

२६ एप्रिल व ५ मे १९८६ रोजी युक्रेन (रशिया) मध्ये किव्हजवळ चेर्नोबेल या अणुभट्टीत स्फोट झाला. हवा-पाणी प्रदूषणातून अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले. अणुभट्टीच्या राखेत स्ट्रॉन्शियम, कॅडमियम व प्ल्यूटोनियम २३६ ही विषारी किरणोत्सर्गी द्रव्ये असतात.

९) भोपाळ वायु दुर्घटना

हवेच्या प्रदूषणाचा प्रभाव किती भयंकर असतो, हे समजून यावे म्हणून हे भोपाळच्या वायु – दुर्घटनेचे येथे आपण एक उदाहरण पाहू या.

३ डिसेंबर १९८४ रोजी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी भोपाळ येथे युनियन कार्बाइड’ या कीटकनाशकाच्या कारखान्यातून मिथिल आयसोसायनेट या विषारी वायूच्या गळतीमुळे अर्ध्या तासात १६,००० लोक मरण पावले; तर २०,००० लोक कायमचे अधू, अपंग झाले. अनेकांचे डोळे गेले. अनेकांचे मेंदूचे आजार वाढले. गर्भवती माता मरण पावल्या. गर्भपात झाले. हा विषारी वायू जमिनीखालील सुरक्षित टाक्यांमध्ये ठेवतात; पण अपघाताने या वायूची गळती भूपृष्ठावर झाली व भोपाळ आणि परिसरातील ३ ते ४ कि.मी. अंतरावरील सर्व भागांतील सजीवांवर त्याचा दुष्परिणाम झाला.

भारतातील मथुरेजवळच्या तेलशुद्धीकरण कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणातून ताजमहालचे सौंदर्य कमी होऊ लागले आहे; तर फत्तेपूर सिक्रीतील अनेक वास्तू व स्मारके यांना धोका निर्माण झालेला आहे.


हवा प्रदूषणाचे परिणाम – वायू प्रदूषणाचे परिणाम

हवा प्रदूषण-Air Pollution (3)

१) हवामानावर परिणाम ओझोन थराला छिद्रे पडणे

हवा प्रदूषणामुळे वातावरणातील स्थितांबर या थरामधील ‘ओझोन’ वायूच्या थरावर दुष्परिणाम होतो. हा ओझोन वायूचा थर सूर्याकडून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिउष्ण नीलातीत किरणांचे शोषण करतो व पृथ्वीवरील सजीवांना आवश्यक व उपयुक्त अशी उष्णता पृथ्वीवर म्हणजे अतिनील अतिविषारी अल्ट्राव्हायोलेट (अतिनील)’ किरणांचे शोषण करण्याचे कार्य करतो. त्यामुळे सजीवांना उपयुक्त व आवश्यक तेवढीच उष्णता पृथ्वीपृष्ठावर मिळते. जंबोजेटसारखी विमाने अपूर्ण इंधन ज्वलनातून ओझोन थराला भोके/छिद्रे पाडतात व त्यातून विषारी किरणे भूपृष्ठावर येतात. त्यामुळे भूपृष्ठाचे तापमान वाढून मानवासह सर्वच प्राणी, वनस्पती, सर्व सजीवांचे जीवन संकटात येत आहे.

२) कारखानदारी व वाहनांचे दुष्परिणाम

पृथ्वीवर कारखानदारीतून, उदयोगधंदयातून, वाहने यांच्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड वायू व इतर हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढते. पेट्रोल व दगडी कोळसा यांच्या ज्वलनातून वातावरणातील सुमारे २४,००० कोटी टन ऑक्सिजन संपला आहे; तर ३६,००० कोटी टन कार्बन डाय ऑक्साइड वायू हवेत मिसळला आहे.

हरितगृह वायू म्हणजे पृथ्वीपृष्ठभागावर जास्त उष्ण तापमान वाढविणारे वायू होत. त्यात कार्बनडाय ऑक्साइड, क्लोरोफ्ल्युरो कार्बन, सल्फरडाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, मिथेन यांचा समावेश होतो. या हरितगृह वायूंमुळे भूपृष्ठाची उष्णता वाढते व हवा अशुद्ध होऊन रोगराई पसरते. अनेक जीव दगावतात.

प्रदूषणामुळे ओझोन या संरक्षक कवच असलेल्या ब्लॅन्केटसारख्या वायूच्या थराची हानी होत आहे, याची माहिती सर्वप्रथम इ.स. १९८५ मध्ये इंग्लंडच्या पर्यावरणशास्त्रज्ञांना मिळाली. कारखान्यातून क्लोरिन व नत्र हे दोन वायू हवेत मोठ्या प्रमाणात मिसळतात. क्लोरिन व नत्र (नायट्रोजन) वायू हे ओझोनचे शत्रू आहेत. ते ओझोनचे कवच नष्ट करतात. शिवाय क्लोरोफ्ल्यूरो कार्बन (cfc) हा रासायनिक उदयोगातील वायू ‘ओझोन’च्या संरक्षक कवच थराच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे.

३) पृथ्वीपृष्ठावरील परिणाम

प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ध्रुवावरील बर्फ वितळून सागरजलाची पातळी वाढून किनाऱ्यावरील अनेक गावे, शहरे पाण्याखाली जातील. उष्णता वाढल्यामुळे (Global Warming), कर्क रोग, त्वचारोग, श्वसनविकार, डोळे जळजळणे, डोळ्यांचे आजार वाढतील. पिक-उत्पन्न कमी होईल. प्राणी आंधळे होतील. पिके व वनस्पती जळून जातील, वनस्पतींची वाढ खुंटून जाईल. ओझोनच्या छिद्रांमुळे अतिनील किरणांचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

४) धुरक्याची निर्मिती

हवेत धूळ, धूर व अनेक रासायनिक प्रदूषके मिसळून धूरके निर्माण होते. यामुळे हवेची धूसरता वाढून हवेची दृश्यता कमी होते. रस्त्यांवरील फलक दिसत नाहीत. मुंबईला चेंबूरमध्ये असे धुरके जास्त प्रमाणात आढळून येते.

५) माती व वास्तूंवरील परिणाम

पावसाच्या पाण्यात हवेतील सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांचा संयोग होऊन आम्लयुक्त पाऊस पडतो व त्यामुळे माती नापीक होते व वास्तू, शिल्पे, पुतळे यांचे नुकसान होते.

६) वनस्पती व पिकांवरील परिणाम

वनस्पती व पिकांच्या पानांवर प्रदूषित धूळ, धूरके, सिमेंट व प्लोराईड कण घट्ट चिकटतात त्यामुळे पानांची श्वसनछिद्रे बंद होतात व त्यांची वाढ थांबते. पानांवरील संरक्षक मेणचट थर नष्ट होतो. त्यामुळे वनस्पतींना, पिकांना रोग, कीड लागते. हवेच्या प्रदूषणामुळे प्रकाश-संश्लेषण क्रियेला अडथळा येतो. वनस्पतींची वाढ खुंटते.
सल्फर डाय ऑक्साइडमुळे फुलांच्या कळ्या सुकतात व गळून पडतात.

हवेत तापमान व प्रदूषण वाढल्यामुळे जंगले, वनस्पती, पिके वाळून जातात. फळे कुजतात. पालापाचोळा वाळतो. त्यावर आधारित जीवसृष्टी नाश पावते. निसर्गाचे सौंदर्य नष्ट होते. अनेक पक्ष्यांचे व प्राण्यांचे मृत्युप्रमाण वाढते. जलचर प्राणी नष्ट होऊन व समुद्रातील मत्स्य खादय : प्लवंग (Plankton) नष्ट होत आहे. त्यामुळे मासे व इतर जलचर मरत आहे.

७) कार्बनडाय ऑक्साइडमध्ये वाढ व प्राणवायूत घट

अनेक औदयोगिक वसाहतींत वाढत्या कारखानदारीमुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साइड वायूचे प्रमाण गेल्या. ५० वर्षात १५ टक्क्यांनी वाढलेले आहे; तर वनस्पती, प्राणी, मानव व सर्व सजीवांसाठी प्राणवायू (ऑक्सिजन (0.)) हा अत्यंत आवश्यक वायू आहे. या प्राणवायूचे प्रमाण कमी कमी होत आहे. प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या वनस्पतींचे प्रमाणही घटत चालले. आहे. त्यातून सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

८) पुतळे, वस्तू व वास्तू गंजणे, झिजणे यांचे प्रमाणात वाढ

मथुरेच्या तेलशुद्धीकरण कारखान्यामुळे आत्र्याच्या ताजमहालचा संगमरवर काळा पडू लागला आहे. अनेक देशांमध्ये हवा प्रदूषणामुळे, धुरक्यांमुळे अनेक पुतळे, वास्तू, इमारती, राजवाडे, किल्ले, गुहा त्यांवरील दगडा-लाकडावरील नक्षीकाम, कोरीवकाम, रंगकाम नष्ट होऊ लागले आहे. त्यांचे सौंदर्य घटू लागले आहे. धुरक्याबरोबर विषारी वायूंच्या आम्ल पर्जन्याचा प्रभाव व परिणाम होत आहे. धातू, दगड, पुतळे यांच्या गंजण्याच्या प्रक्रियेने त्यांची झीज होऊन त्यांचे तुकडे पडू लागले आहेत ऐतिहासिक वास्तू व ऐवजांचे पुरावे नष्ट होत आहेत.

९) आम्लपर्जन्याचे परिणाम

नायट्रोजन, कार्बन, सल्फर यांचा ऑक्सिजन व बाष्पाशी संयोग होतो. त्यातून वेगवेगळी आम्ले (Acids) निर्माण होतात. सल्फ्युरिक आम्ल, सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रिक आम्ल, कार्बोनिक आम्ल या विषारी आम्लांच्या संयोगामुळे ढगापासून जो पाऊस पडतो, त्याला ‘आम्ल पर्जन्य’ म्हणतात. त्यामुळे वनस्पती, प्राणी, पिके, जलसाठे, पुतळे आणि इमारतींवर परिणाम होतो. स्वीडनमध्ये हूर खोऱ्यात तसेच नार्वे, कॅनडा इ. औदयोगिक क्षेत्रात आम्ल पर्जन्य पडतो. युरोपमधील औदयोगिक क्षेत्रात अनेक सरोवरे ही आम्ल पर्जन्यामुळे मृत्यूची सरोवरे बनलेली आहेत.

प्रदूषक वायू परिणाम
१) कार्बन डाय ऑक्साइडजागतिक तापमानवाढ, सजीवसृष्टीचे अस्तित्व संकटात येते.
२) सल्फर डाय ऑक्साइडडोळ्यांची जळजळ, घशांचे आजार, दमा, फुप्फुसाचे विकार बळावतात.
३) कार्बन मोनाक्साइडरक्तातील प्राणवायूच्या क्रियेत अडथळे निर्माण होतात. अॅन्जिना पेक्टोरिस रोग होतो. धमन्या कठीण होतात.
४) नायट्रोजन ऑक्साइडडोळे, नाक, त्वचा यांची जळजळ फुप्फुसांवर जखमा, रक्ताभिसरणात अडथळे, पोलिसाथेमिया रोग.
५) हायड्रोकार्बन्सघसा खवखवणे, डोळे जळजळणे, श्वसनास अडथळे.
६) सूक्ष्म कणिकाफुप्फुसाचा कर्करोग, श्वसन अडथळे, विषबाधा.

१०) युद्धाचे परिणाम

युद्धात वापरल्या जाणाऱ्या अण्वस्त्रांमुळे व बॉम्बस्फोटांमुळे, तेलविहिरींना, इमारतींना आगी लागतात. त्यानंतर सुमारे दहा वर्षे अशा युद्धभूमीवर गरोदर स्त्रिया, बालके, पक्षी, प्राणी यांच्या मृत्यूचे भयानक तांडव निर्माण होते. रोगराई वाढते. अनेकांना दुबळेपण येतो. या युद्धाच्या वेदना सजीवांना असह्य होतात. १९९१ मध्ये संयुक्त संस्थाने, इराक व आखाती राष्ट्रांमधील युद्धात रासायनिक क्षेपणास्त्रां’च्या वापरांमुळे मृत्यूचे भयानक तांडव बघायला मिळाले. सजीवांच्या मृत्यूबरोबरच रस्ते, रेल्वे मार्ग, मोठमोठे औद्योगिक प्रकल्प, वस्त्या, इमारती, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक प्रकल्प पूर्णतः नष्ट होतात व प्रदेश ओसाड बनतो.

११) आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

हवेच्या प्रदूषणामुळे खोकला, फुप्फुसाचे रोग, मानसिक विकार होतात. रक्तातील हिमोग्लोबीनमध्ये कार्बन मोनाक्साइड वायू संयोग पावतो व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे डोकेदुखी, बुद्धी भ्रष्ट होणे, चक्कर येणे इ.चे प्रमाण वाढते व शेवटी मृत्यू होतो. शिशाच्या प्रदूषणाचा रक्तावर परिणाम होतो.

हृदयविकार, विषबाधा, कर्करोग, हाडांचे आजार बळावतात. नाक, घसा, श्वासनलिकांचे आजार वाढतात. डोळे लाल होतात. डोळ्यांची आग होते. हवेच्या प्रदूषणामुळे गर्भपात होतात व मानवी गर्भात जन्मतः विकृती निर्माण होऊन ते बाळ मंदबुद्धी, लुळे, दुबळे, विकृत असे जन्माला येते. कारखान्यातील उष्णताग्राहक प्रदूषणांमुळे रक्ताभिसरणात बिघाड निर्माण होतो. हाडांचे आजार व हृदयविकार होतात.

मुंबई, चेन्नई, दिल्ली येथे हवेच्या व पाण्याच्या प्रदूषणाने डोळे, नाक, कान, घसा, फुप्फुस व श्वसनाचे आजार वाढत आहेत.

जपानमध्ये औदयोगिक परिसरात ‘मिनामाता’ नावाच्या विषारी वायूमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाने अंग सुजणे, कावीळ, त्वचा रोग, कार्यक्षमता मंद होणे, गुंगी येणे, हात-पाय सुजणे व सांधे सुजणे इ. विकार निर्माण होतात.

संयुक्त संस्थानात १९६३ मध्ये गॅरिसन फॉस्फेट कंपनीतून निघालेल्या विषारी वायूमुळे गॅरिसन शहराभोवती सुमारे १२५ चौ. कि.मी. परिसरावर विषारी वायूंचे ढग पसरले होते. त्यातून घशाचे व डोळ्यांचे आजार झाले.

सल्फर डाय ऑक्साइडची हवेतील पातळी वाढली तर खोकला व सर्दीचे आजार वाढतात. हवेत शिशाचे कण वाढल्यास त्यांच्या प्रादुर्भावामुळे लहान मुलांचा बुद्ध्यांक/ आकलनक्षमता कमी होत असते.

१२) धूम्रपानाचे दुष्परिणाम

घरगुती लाकूड, गोवऱ्या, कोळसा इ. इंधनांतून निर्माण झालेल्या धुरापासून व तंबाखू, विडी-सिगारेट यांच्या धूम्रपानातून डोळ्यांचे, फुप्फुसाचे श्वसन संस्थेचे आजार होतात. तंबाखूचे व्यसन जडल्याने सुमारे ८५ टक्के व्यसनी तरुण हे वयाची पस्तिशीसुद्धा गाठू शकत नाहीत. धूम्रपानामुळे घशाचा कॅन्सर होतो. कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने भारतात दरवर्षी ६ लाख लोक मरण पावतात.

१३) नैसर्गिक सौंदर्याचा हास

हवेच्या प्रदूषणामुळे सजीवसृष्टीचा नाश होत आहे. जंगलतोड वाढत आहे. पिके व वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे भूजलसाठे आटू लागले आहेत. वणव्यांमुळे व जंगलांना आगी लागल्यामुळे मौल्यवान वनस्पती नष्ट होत आहेत. सर्वत्र निसर्गाचे मूळ सौंदर्य कमी होत असून प्रदेश भकास, ओसाड बनत आहेत. वाघ, सिंह यांसारखे प्राणी व मोरासारखा पक्षी दुर्मिळ होऊ लागले आहेत.


हवा प्रदूषण उपाय – वायू प्रदूषण उपाय योजना

‘प्रदूषण’ ही मानवनिर्मित समस्या आहे. हवेचे प्रदूषण होऊ नये म्हणून प्रयत्न करणे व झालेल्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे हे दोन उपाय आवश्यक आहेत

हवा प्रदूषण-Air Pollution (2)

१) औदयोगिकीकरणावर नियंत्रण

औदयोगिकीकरण वाढत असले तरी प्रत्येक उदयोगाने, कारखान्याने आपली स्वतःची हवा व पाणी प्रदूषण नियंत्रण व्यवस्था करणे उपयुक्त आहे. म्हणजे कारखान्यातील हवा, पाणी प्रदूषणाचे घटक स्वतंत्रपणे साठवून त्यांच्यावर प्रक्रिया करणे व त्यांचे शुद्धीकरण करण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे, उपयुक्त ठरेल. ज्यांच्याकडे हवा व पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था नसेल त्यांना उभारणी वा उत्पादनास परवानगी देऊ नये. काही विषारी प्रदूषणयुक्त पदार्थांची स्वतंत्र विल्हेवाट लावणेही आवश्यक आहे.

प्रदूषणनियंत्रण यंत्रणा उभारणे, ओली व सुकी प्रदूषके गोळा करणे, प्रदूषकांवर प्रक्रिया करणे, प्रदूषण निर्माण करणाऱ्या रसायनांचा वापर टाळणे आवश्यक आहे.

ताजमहाल (आया) परिसरातील प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना सुप्रीम कोर्टाने जबाबदार धरले आहे. १९८४ मध्ये येथील सर्व कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण व्यवस्था स्थापन करावी, असे आदेशही कोर्टाने दिले होते. या आदेशाचे पालन झाले का ? त्यावर प्रदूषण नियंत्रण कायद्या (१९८१) प्रमाणे कडक अंमलबजावणी करावी. कारखान्यातील अपायकारक प्रदूषकांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. कोळशाचा वापर इंधन म्हणून न करता कोळशाचे नैसर्गिक वायूमध्ये रूपांतर करावे. गिरण्यांची धुराडी उंच ठेवावीत.

हवेतील रासायनिक प्रदूषकांचे भस्मीकरण (Oxidation) करावे, रासायनिक व घातक कारखान्यांना बंदी करावी. कीटकनाशके रासायनिक खते याऐवजी नैसर्गिक खते (शेणखत, गांडूळ खत) वापरावीत. कारखान्यांची घाण ही गटारातून नदीओढ्यांना मिळते. ती घाण स्वतंत्र साठवावी. कोणत्याही कारखान्यात शक्तिसाधन म्हणून कोळसा, पेट्रोल, डिझेल यांच्याऐवजी जलविद्युतशक्ती, सौर शक्ती व वारा, पवन ऊर्जा यांचा वापर करावा.

सर्व प्रकारच्या उदयोगधंदयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, म्हणजे प्रदूषण नियंत्रण होईल.

कायदयांची कडक अंमलबजावणी करावी.

२) शहरे व कारखानदारी

भारतातील प्रमुख शहरांमधील हवा प्रदूषकांची मात्रा किती असावी याबाबत नागपूरच्या पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेद्वारे माहिती संकलित केली आहे. या संस्थेला नीरी (NEERI) असे म्हणतात, नीरी ही संस्था प्रदूषण-नियंत्रणासाठी मार्गदर्शन करते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १९८५ मध्ये हवेतील प्रदूषकांची निर्धारित मात्रा निश्चित केलेली आहे. एकट्या मुंबईत महाराष्ट्रातील ८० टक्के कारखाने आहेत. फक्त ७ टक्के कारखान्यांकडे प्रदूषण नियंत्रणव्यवस्था आहे. ही स्थिती घातक आहे. म्हणून कायदयांची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. प्रदूषित हवेचा प्रवाह चक्रीय चाळणीतून (cyclone collector) स्वच्छ करावा. कारखान्यांच्या परिसरात हरितपट्टा (ग्रीनबेल्ट) सुरक्षित राखून ठेवावा.

अत्यंत विषारी कारखाने हे वस्तीपासून खूप दूर हलवावेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरावर प्रक्रिया करावी.

३) स्वयंचलित वाहनांच्या वापरावर नियंत्रण

सर्व प्रकारच्या पेट्रोल, डिझेल, कोळशावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करावा. वाहनांना प्रदूषण नियंत्रण व्यवस्था करावी. उदा. कॅटॅलिक कन्व्हर्टरचा वापर करावा. इंजिनाची देखभाल करावी. संशोधनाद्वारे पेट्रोल, डिझेल वाहनांचे प्रदूषण कमी करणाऱ्या यंत्रणेचा, तंत्राचा शोध घ्यावा. प्रदूषित वायूचे भस्मीकरण करावे.

ओली व सुकी प्रदूषके नष्ट करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी योग्य फिल्टर्स तयार करावेत. तप्त भट्टीत प्रदूषके जाळून टाकावीत. मोटारच्या धुराचे पूर्ण ज्वलन करणारी यंत्रणा उभारावी, खाजगी मोटारींचा वापर कमी करावा. जवळच्या अंतरासाठी सायकलीचा वापर करावा किंवा पायी चालावे. सौर ऊर्जेवर चालणारी वाहने निर्माण करावीत व वापरावीत. पर्यायी इंधनाचा वाहनांसाठी ऊर्जा म्हणून वापर करावा. फार जुनाट वाहन- वापरावर बंदी घालावी.

४) आधुनिक तंत्राचा वापर

उदयोगधंदे व कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रदूषणनियंत्रणासाठी करावा. पेट्रोल, कोळसा, डिझेलऐवजी नैसर्गिक गॅस, सौरऊर्जा, पवनऊर्जा, जलविद्युत, जैवऊर्जा, सागरी लाटांची ऊर्जा यांचा वापर वाढवावा; कारण त्यापासून प्रदूषण होत नाही.

५) वनक्षेत्रात/जंगलक्षेत्रात वाढ

जंगलक्षेत्रात घट झाल्याने प्राणवायू (ऑक्सिजन वायू) व कार्बन डाय ऑक्साइड वायूचा असमतोल निर्माण होतो. जंगलांमुळेच हा समतोल राखला जातो. वनस्पती या दिवसा हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूचे पानांद्वारे शोषण करतात व ऑक्सिजन (प्राणवायू) चे पानांद्वारे उच्छवसन करतात. यास ‘प्रकाशसंश्लेषण’ क्रिया म्हणतात.

जर जंगले नष्ट झाली, झाडे तोडली, तर मग हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण सतत वाढत राहील व ऑक्सिजन (प्राणवायू) चे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सजीवांना जगण्यास आवश्यक प्राणवायू मिळणार नाही व हवेत दूषित घटकांचे प्रमाण वाढेल, म्हणून वनस्पतींच्या लागवडीचे क्षेत्र/जंगल क्षेत्र प्रत्येक वस्तीत, गावात वाढवणे जरुरीचे आहे. वृक्षारोपण व वनसंरक्षण यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम राबवले पाहिजेत. प्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करून, ती झाडे जगविण्यासाठी त्यांची सतत निगा राखून काळजी घेतली पाहिजे.

वनस्पतींचे महत्त्व

१) जंगलांमुळे आपल्याला फळे, फुले, पाने, औषधी द्रव्ये, लाकूड मिळते.

२) जंगलांमुळे जमिनीची धूप होत नाही; कारण – वनस्पतींची मुळे जमिनीलामातीला घट्ट पकडून ठेवतात. जंगलांमुळे जमिनीच्या वरच्या थरांमध्ये ओलावा टिकून रहातो. जंगलांचे आच्छादन त्या दृष्टीने उपयुक्त ठरते.

३) जंगलांमुळे वनस्पतींची मुळे जमिनीत शिरल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे विहिरी, झरे, ओढे यांना पाणीपुरवठा जास्त उपलब्ध होतो. म्हणजेच जमिनीखालील भूजल पातळी जंगलांच्या आच्छादनामुळे जास्त काळ टिकून राहते व ती पातळी वाढते. म्हणूनच पाणी जमिनीत सर्वत्र मुरण्यासाठी – पर्जन्यजल संचयन करणेही उपयुक्त असते.

४) जंगलांमुळे सर्व प्राणी, पक्षी, सजीवांना सावली व आल्हाददायक शुद्ध हवा ४ मिळते. जंगले म्हणजे पक्षी-प्राण्यांचा निवारा असतात. पक्ष्यांची गावेच्या गावे (घरटी) झाडांच्या फांदयांवर रचलेली असतात. झाडपाल्यावर अनेक प्राणी जगतात; झाडांच्या गारव्याचा लाभ घेतात. जंगले तोडली तर पक्षीप्राण्यांनी जायचे कोठे ? राहायचे कोठे ? कारण पक्षी-प्राणी स्वत:च्या जगण्याबरोबर हे वनस्पतींच्या बियांचे/ परागकणांच्या वहनाचे काम करतात.

५) जंगले ही हवेत गारवा निर्माण करतात. प्रदेशाचे सौंदर्य वाढवितात.

६) जंगले ही आकाशातून जाणाऱ्या ढगांपासून जमिनीवर जलवृष्टी करण्यास योग्य परिस्थिती निर्माण करतात. ढग खेचून घेऊन पाऊस पडण्यास वनस्पती उपयुक्त ठरतात.

जंगले ही ओलावा, आर्द्रता टिकवून ठेवणारी, प्राणवायू उपलब्ध करून देणारी मौलिक निसर्गसंपत्ती आहे. म्हणूनच संत तुकारामांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ॥” असे म्हटले आहे.

१ जूनला आपण ‘वृक्षारोपण दिन’ साजरा करतो. १ जुलै हा वनमहोत्सव सप्ताहाचा प्रारंभ होतो, तर २१ मार्च ला जागतिक वनदिन आपण साजरा करतो. पर्यावरण शुद्ध रहाण्यास वनीकरण योजना राबविल्या पाहिजेत. जास्तीत जास्त वनसंरक्षण करणाऱ्यास व वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, वृक्षांची जोपासना करणाऱ्याला जास्तीत जास्त बक्षिसे देऊन या कार्यात समाजाचा सहभाग वाढविला पाहिजे. झाडांच्या फांदयांना प्रदूषणाचे कण चिकटतात व निसर्गतः प्रदूषण कमी होते; म्हणून झाडे ही प्रदूषकांची ‘गाळणी’ बनलेली असतात.

झाडांबरोबर पिके व इतर हिरव्या वनस्पतीही प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत (Photosynthesis) सहभागी होतात. थोडक्यात म्हणजे, ज्या त्या भागातील हवामानात टिकणाऱ्या वनस्पतींची लागवड केली पाहिजे व एकूण भूक्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वनस्पती लावाव्यात. त्यातून पर्यावरण समतोल राखला जातो. हवा, पाणी शुद्ध राखण्यास मदत होते.

६) लोकसंख्यावाढीवर नियंत्रण

भारतासारख्या विकसनशील देशाला लोकसंख्येचा भार जाणवू लागला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होत आहे. निसर्गसंपत्तीचा अतिवापर होत आहे. त्यामुळे अन्न, पाणी अपुरे पडू लागले आहे. रोगराई, कुपोषण वाढत आहे. यासाठी लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्यासाठी चीनसारखी एक मूल’ योजना अंमलात आणावी.

कुटुंब नियोजनाचा प्रसार व प्रचार सर्वत्र झाला पाहिजे. तसेच दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना शासकीय सवलतीचा लाभ देणे देणे बंद करावे. जननप्रमाणावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे. बेकारी, महागाई, टंचाईतून मुक्तता करण्यासाठी सक्तीने कुटुंब नियोजन करणे, कुटुंब-कल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरेल.

लोकसंख्यावाढीवर नियंत्रणआणण्यासाठी आणि जनजागृतीसाठी दरवर्षी ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यास शेतीचे शोषण झाले, कारखानदारी वाढली व शेतीक्षेत्रावर वस्त्यांचे आक्रमण झाले म्हणून जननप्रमाण कमी करणे, कमी करणे, कुटुंब नियोजन होणे आवश्यक आहे.

७) युद्धे नकोत म्हणून शांतता

युद्धांमुळे हवा व पाण्याचे प्रदूषण होतेच; पण युद्ध झालेल्या उद्ध्वस्त ओसाड भागात प्रदूषित हवा ही १०-१५ वर्षे टिकून रहाते. त्याऐवजी जगात सर्व देशादेशांमध्ये शांतता नांदावी म्हणून आंतरराष्ट्रीय ‘युद्धबंदी’चे कायदे व्हावेत. देशा-देशांमधील वाद मिटवणारी कायदेसंस्था निर्माण करावी. अणुभट्टीच्या स्फोटावर नियंत्रण आणण्याची सुरक्षित व्यवस्था निर्माण करावी.

८) आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनावर भर

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा त्यासाठी संशोधनावर भर देणे उपयुक्त ठरेल. प्रदूषणावर नियंत्रण आणणारी उपकरणे, यंत्रे शोधावीत. हवा, पाणी, जमीन यांचे सतत नमुने तपासावेत. हवा, पाणी शुद्ध राहिल्यास सजीवांच्या आरोग्यावर त्याचा अनुकूल परिणाम होईल. जीवीत हानी करणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर पूर्णतः बंदी घालावी. धूम्रपानावर बंदी असावी.

९) हवा-प्रदूषणावर समाजशिक्षण

हवा, पाणी प्रदूषणाची माहिती समाजातील सर्व घटकांना व्हावी म्हणून हवा प्रदूषणाविषयी समाजशिक्षण दयावे. समाजजागृती करावी. लोकशिक्षणाची, प्रसाराची सर्व साधने वापरून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी खास प्रयत्न करावेत. अभ्यासक, समाजसंस्था व सेवाभावी संस्थांनीही उपाय व जनजागृतीच्या कार्यात मोलाची मदत करावी.

१०) पुरातन वास्तूव वस्तूंचे संरक्षण

प्राचीन, ऐतिहासिक वैभवांचे पुतळे, राजवाडे, किल्ले यांचे जतन करावे. त्यांची दुरुस्ती करावी व तशी व्यवस्था असावी. त्याने मनाची प्रसन्नता वाढायला मदत होईल.

११) नैसर्गिक सौंदर्याचे संरक्षण व त्यात वाढ

नैसर्गिक सौंदर्य वाढावे म्हणून प्रयत्न केले तर वनस्पती, फळाफुलांचा निसर्ग, तलाव-सरोवरांमधील जलसाठे, पक्षी, प्राण्यांची समृद्धी, स्वच्छ शुद्ध हवा व पाणी हे मानवासह सर्व सजीवांना सुख, शांती, आरोग्य व समाधान प्राप्त करून देतील. रोगांना थारा राहणार नाही.

१२) सतत निरीक्षण व प्रभावी उपाय

हवा प्रदूषण करणारी व्यवस्था (कारखाना, उदयोग इ.) जेथे आहे तेथे हवेच्या प्रदूषणाच्या घटकांचे मापन करण्याची यंत्रणा उभारली पाहिजे. तसेच प्रदूषणात वाढ होते आहे व ती घातक ठरते आहे. अशा ठिकाणी कडक कायदयाने अंमलबजावणी करून सदर कारखान्याच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी करावी. नागरी व औदयोगिक क्षेत्रात हवा- प्रदूषणाची कारणे व परिणाम तपासणारी कायम यंत्रणा आवश्यक आहे. तेथे लगेच उपाय करता येतील.

१३) मानवी आरोग्य सांभाळणे

निसर्गातील हवा प्रदूषण मुक्तीला नैसर्गिक वनस्पती, वारा, पाऊस इत्यादी प्रक्रिया मदत करीत असतात. या निसर्गचक्रात अडथळा येऊ नये या पद्धतीने विकासाचे नियोजन करावे. शाश्वत नियोजन आवश्यक आहे. वनस्पती औषधे, -पुरवठा, शुद्ध हवा यांच्यासाठी परिसर स्वच्छ, निसर्गसमृद्ध ठेवला , पाहिजे. – शुद्ध पाणी

कायदयांच्या योग्य अंमलबजावणीने हवा, पाणी प्रदूषणाचे प्रश्न सहजपणे नियोजित पद्धतीने सुटू शकतात.

निष्कर्ष

वरील लेख हवा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती वाचून आपल्याला हवा प्रदूषणाची कारणे, हवा प्रदूषणाचे उपाय आणि हवा प्रदूषणाचे परिणाम या लेखातून आपल्याला समजले असेलच. Air Pollution in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मीडियावर शेअर करा. तसेच Information About Air Pollution in Marathi हा लेख कसा वाटला व अजून हवा प्रदूषण बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.

Air Pollution in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली हवा प्रदूषण मराठी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.

हवा प्रदूषण, Air Pollution

पुढे वाचा:

हवा प्रदूषणावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १. वायू प्रदूषणाचे ३ प्रकार कोणते आहेत?

उत्तर- वायू प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी मुख्य ३ प्रकार म्हणजे विशेष पदार्थ, नायड्रोजन डायऑक्साइड, ओझोन, सल्फर डायऑक्साइड.

प्रश्न २. धुके वायू प्रदूषण आहे का?

उत्तर- होय, धुके हा वायू प्रदूषणाचा एक प्रकार आहे, जो सामान्यतः धुक्यासारखा दिसतो पण त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. गेल्या वर्षी धुके खूप पसरले होते, त्यामुळे अनेकांना खोकला, डोळे जळणे आदी समस्यांना सामोरे जावे लागले होते.

प्रश्न ३. वायू प्रदूषणामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का?

उत्तर- जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.

प्रश्न ४. वैद्यकीय विम्यामध्ये कर्करोगाच्या उपचारांचा समावेश होतो का?

उत्तर- जरी, आजकाल बाजारात अशा अनेक विमा कंपन्या आहेत, ज्यात कर्करोगासह अनेक उपचारांचा समावेश आहे, परंतु त्यांच्या स्वतःच्या अटी आणि शर्ती आहेत, ज्यामध्ये कर्करोगाच्या मर्यादित उपचारांचा समावेश आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, वैद्यकीय विम्यामध्ये कर्करोगाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट होत नाही आणि त्यातील काही भाग लोकांना स्वतःच्या खिशातून भरावा लागतो.

प्रश्न ५. वायू प्रदूषणाची मुख्य कारणे कोणती?

उत्तर- हवेतील रसायने, वायू, वाहनांचे धूर, कारखान्यांचा धूर, बांधकामातील धूळ इत्यादींमुळे वायू प्रदूषण प्रामुख्याने होते.

प्रश्न ६. वायू प्रदूषणाचा काय परिणाम होतो?

उत्तर- वायू प्रदूषणाचा परिणाम मानवावर तसेच पर्यावरणावर होतो. जर आपण फक्त माणसाबद्दल बोललो तर हवेच्या प्रदूषणामुळे हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग, किडनी निकामी होणे, किडनी निकामी होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

प्रश्न ७. वायू प्रदूषण कसे रोखता येईल?

उत्तर- जगभरात वायू प्रदूषण ही एक समस्या बनली आहे. असे असतानाही आपण सर्वांनी वाहनांचा वापर कमी करणे, झाडे लावणे, प्लॅस्टिक , पालापाचोळा न जाळणे इत्यादी काही पावले उचलली तर वायू प्रदूषणाला बऱ्याच अंशी आळा बसू शकतो, ही दिलासादायक बाब आहे.

Leave a Reply