आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी 
आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी 

आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी 

परवाच मी माझ्या आईबाबांसोबत एके ठिकाणी लग्नाला गेलो होतो. माझ्या वडिलांच्या चुलतभावाच्या मुलाचे लग्न होते. लग्नात भरपूर थाटमाट होता. भलेमोठे मैदान, त्यात केलेली फुलांची आणि दिव्यांची रोषणाई, नवरानवरीच्या आणि दोन्ही घरच्या माणसांच्या अंगावर खूप महागाचे कपडे, त्याशिवाय दागदागिन्यांचा चमचमाट पाहून तर माझे बुवा डोळेच दिपले. नवरानवरीला शुभेच्छा देण्यासाठी भलीमोठी रांग लागली होती. तिथे आम्हीही रांगेत उभे राहिलो आणि अर्ध्या तासाने जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा नवरानवरीला शुभेच्छा देऊन मग जेवायला गेलो.

आजकाल काय पंगत नसतेच, त्याऐवजी बुफेची सोय केलेली असते. तसेच तिथेही होते. चायनीज, थाय, इटालियन, साऊथ इंडियन, पंजाबी, भेळपुरी सगळ्या त-हेच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले होते. त्याशिवाय वेलकम ड्रिंक म्हणून तीन चार प्रकारची मॉकटेल्स होती. सोबतीला हराभरा कबाब, पनीर टिक्का, आलू चाट अशा चमचमीत पदार्थांची रेलचेलही होतीच. एवढे स्टॉल बघून आणि त्यावरील पदार्थ बघूनच मला पोट भरल्यासारखे वाटू लागले. माझे आजोबा गावाहून पुतण्याच्या घरचे कार्य म्हणून लग्नाला आले होते.

ते तर हा डामडौल पाहून थक्कच झाले. त्यांच्याबरोबर गावचे दोन नातेवाईक आले होते ते तर गाणेच म्हणू लागले ‘ न मिळे मौज अशी पाहाण्या नरा.. लग्नाला जातो मी द्वारकापुरा.. द्वारकापुरा.” त्या स्टॉल्सवरील वेगवेगळ्या पदार्थांची थोडी थोडी चव घेऊन झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा गोड पदार्थांकडे किंवा हल्लीच्या भाषेत डेझर्ट्सकडे वळवला. त्या स्टॉलवर तर अगदी चंगळच होती. गुलाबजामून, गरम गरम जिलबी, कुल्फी फालुदा, चीझकेक, दोन चार प्रकारचे आईस्क्रिम असे वेगवेगळे गोड पदार्थ तिथे होते. त्यांचा आस्वाद घेऊन झाल्यावर आम्ही विडा घ्यायला गेलो तर त्या स्टॉलवरही दोन पाच प्रकारचे विडे, वेगवेगळ्या सुपा-या आणि मुखशुद्धीचे प्रकार होते. सगळा थाटमाट पाहून मी तर अगदी गारच झालो. आमच्या नात्यात एवढे श्रीमंत लोक आहेत ह्याचा मला अभिमानच वाटला.

घरी गेल्यावर मी बाबांशी ह्या विषयावर बोललो तेव्हा बाबा म्हणाले की अरे, एका दिवसासाठी पैशाची एवढी उधळमाधळ करणे योग्य आहे का? ठीक आहे. माझा चुलतभाऊ मोठा व्यापारी आहे. त्याच्यापाशी खूप पैसे आहेत. पण त्या संपत्तीचे असे प्रदर्शन बरे नव्हे. आपल्या देशातील कित्येक लोक खूप गरीबीत दिवस काढत आहेत. त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. मेळघाटात तर तान्ही तान्ही मुले कुपोषितपणाची शिकार होतात.

अशा वेळेस जेवणावळींसाठी एवढा पैसा उधळणे आणि अन्नधान्याची नासाडी करणे चांगले नाही. माझा सल्ला त्याने घेतला असता तर मी त्याला चार चांगल्या सामाजिक संस्थांची नावे सांगितली असती. म्हणजे त्याचा पैसा खरा कारणी लागला असता. मला आमच्या बाबांचे बोलणे पटले. खरोखरच लग्न आणि इतर समारंभात अनावश्यक छानछोकी करणे हा नैतिक गुन्हाच आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply